बाबांचा मुलगा

कुलकर्णी सर मस्त गोष्ट सांगतात. वर्गातली दादागिरी करणारी मुलं सुद्धा त्यांच्या  गोष्टी चुपचाप ऐकतात. आज तर त्यांनी माझ्या आवडीची श्रावणबाळाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. श्रावणाने पाण्याचं भांडं तळ्यात बुडवलं तेंव्हा तर माझ्या अंगावर काटाच आला. माझ्यासारखी त्याने अंधारात मोठ्याने रामरक्षा म्हणायला हवी होती. मग दशरथाने बाण नसता मारला. त्याला तरी प्राण्यांना मारण्याची काय हौस? माझ्या डोळ्यात पाणीच आलं रागाने. कोणाला दिसलं असतं तर सगळ्यांनी मला “मुलगी”, “मुलगी” म्हणून चिडवलं असतं. पट्कन पुसून टाकलं.

मी आई-बाबांना कधीच अंधारात श्रावणबाळासारखं एकटं सोडणार नाही.

वर्गात नंतर मजाच झाली. सर म्हणाले की हीच गोष्ट आता मी कवितेत गाणार आहे.

शर आला तो धावून आला काळ ।
विव्हळला श्रावणबाळ ॥

काय रडकी कविता आहे! पण बाजूचा दांडेकर मात्र मान खाली घालून फुसुफुसु हसत होता. मी त्याच्याकडे बघितलं तर त्याने मला हळूच त्याची वही दाखवली. त्यात लिहिलं होतं,

शरू आली तो धावून आले काळे । ।
विव्हळले बाळे बाळे ॥ ॥

शरू जांभेकरच्या मागे काळे सर शाळाभर धावताहेत. काय कल्पना होती! मला तर एवढं हसू आलं की नाकातून शेंबूडच आला. शर्टाला पुसेपर्यंत सरांना कळलंच.

सर म्हणाले, “जोशीसाहेब, उभे राहा. काय झालं हसायला? श्रावणातल्या तेराव्याला तुम्हाला लाडू खायला बोलावलं आहे वाटतं?” मी मान खाली घालून आतल्या आत हसतच होतो. सर अजूनच भडकले. म्हणाले कसे, “वडील हॉस्पिटलमधे, आणि हे हसताहेत. आता तरी शिका जरा जबाबदारी.” सरांना असं का वाटतं की मला बाबांची काळजीच नाही. मी मान वर करून म्हणालो, “बाबा होणारच आहेत बरे माझे. रोज गणपतीची आरती म्हणतो मी.” त्यावर सर गरजले, “एवढं कळतं तर वर्गात का हसता आहात फिदीफिदी. शिकण्याकडे लक्ष द्या नाहीतर याल उद्या रस्त्यावर.”

हो, आम्ही गरीब आहोत. पण रस्त्यावर नाही येणार. माझी आई म्हणते, “घरोघरी पोळ्या करून पैसे कमवीन. पण मुलांचं शिक्षण पूर्ण करीन.” मी पण आईला म्हणतो की “मी चहा आणि तेल विकीन घरोघरी. खूप अभ्यास करीन. बाबांना चांगल्या हॉस्पिटलमधे घेऊन जाईन. त्यांना लवकर बरं करीन.” असं म्हणताना मला उगाच खूप रडू येतं. मग आई पण रडायला लागते. आजी आणि कुंदा पण रडायला लागतात. मग मला माझ्या मुळुमुळु रडण्याचा खूप राग येतो. आजी म्हणते, “वरूण घरातला खंदा पुरुष आहे.” मला खंदा म्हणजे काय ते नक्की कळत नाही. पण आजी असं म्हणाली की खूप बरं वाटतं.

काल मात्र आई आणि आजी जरा जास्तच रडत होते. आजी सारखं हेच म्हणत होती, “कसं होणार माझ्या गोपाळचं (गोपाळ म्हणजे माझे बाबा). घेऊन जा रे मला म्हातारीला वरती. पण माझ्या गोपाळाला वाचव रे.” मामा रात्री बाबांच्यापाशी हॉस्पिटलमधे झोपायला येतो. तो आला तेंव्हा म्हणाला, “काही काळजी करू नका काकू. सगळं छान होईल.” मामाचे धीराचे शब्द ऐकले की सगळ्यांना बरं वाटतं. मला पण पावसात भिजल्यासारखं छान वाटतं. मामा गोड हसतो आणि पक्ष्यांचे छान छान आवाज काढतो. मग आईला सुद्धा हसू येतं.           

मी आणि आजी बाहेरच्या खोलीत झोपतो. कुंदा आणि आई आतल्या खोलीत झोपतात. काल मी रात्री आजीला विचारलं, “राजू म्हणाला की तुझ्या बाबांना कर्करोग झाला आहे. हो का गं आजी?” आजी म्हणाली, “नाही रे बाळा. उद्या परत ऑपरेशन करणार आहेत. मग परत दोन दिवस बेशुद्धी, परत रक्ताच्या बाटल्या. नशीबाचे फेरे असतात बाबा एकेक. तू लवकर मोठा हो आणि कुंदाची, तुझ्या आईची काळजी घे.” आजीच्या डोळ्यातून बाहेरच्या पावसासारखी नुसती धार लागली होती.

आज आई दिवसभर बाबांपाशीच होती. ऑपरेशन सुखरूप पार पडलं होतं. पण काळजी होतीच. संध्याकाळी मी आणि आजी बाबांना बघायला हॉस्पिटलमधे गेलो. काय भयंकर ठिकाण आहे? पावसामुळे आधीच सगळीकडे चिखल झालेला. त्यातून हॉस्पिटलमधली घाण. आमच्या बालभारतीच्या पुस्तकात महात्मा गांधी म्हणतात, “देवाला स्वच्छ ठिकाणी राहायला आवडतं.” मग ह्या हॉस्पिटलमधे कसा येणार तो देव? आणि इथे तर त्याची सर्वात जास्त गरज. मला बाबांची खूपच काळजी वाटायला लागली. देवाच्या मदतीशिवाय ते कसे बरे होणार? मी आजीला विचारलं, “बाबांना घरी घेऊन जाऊ या का? इथे खूप घाण आहे.” आजी म्हणाली, “तिकडे इंजेक्शन कोण देणार? रक्ताच्या बाटल्या कुठून आणणार? ऑपरेशनची साधन कुठे आहेत आपल्या घरी?”    

बाबांच्या जनरल वॉर्डमधे शिरलो तर माझ्या अंगावर शिरशिरीच आली. सगळीकडे खाटा टाकलेल्या. त्यावर झोपलेली माणसं कधी खोकत होती तर कधी ओरडत होती. प्रत्येकाच्या बाजूला एक पाण्याची बाटली लटकवलेली होती. आणि सगळ्यांचे डोळे… प्रत्येकाच्या डोळ्यात खूप दु:ख होतं काळ्या ढगासारखं. त्या ढगाच्या सावल्या भेटायला आलेल्या लोकांच्या डोळ्यात पडल्या होत्या. पण नर्स.. त्यांच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते.

इतका वेळ मला आई दिसलीच नव्हती. ती पलीकडच्या खाटेच्या बाजूला बसली होती. मी तिला बघितलं आणि विचारलं, “बाबा कुठे आहेत?” तीने खाटेकडे बोट दाखवलं. माझा विश्वासच बसला नाही. त्यांच्या चेहर्‍यावर एक प्लॅस्टीकचा मुखवटा घातला होता. डोळे मिटलेले. चेहर्‍यावर सगळीकडे सुकलेलं काळं निळं रक्त. घसा उघडाच. त्यात काहीतरी घालून ठेवलेलं. घशाच्या खाली एक पट्टी लावलेली. अंगावर घाणेरडी राखाडी चादर. वरती एका बाजूला पाण्याची आणि दुसर्‍या बाजूला रक्ताची बाटली. त्यातून निघालेल्या नळ्या चादरीखाली बाबांच्या हाताला लावलेल्या.

माझ्या पोटात डुचमळायला लागलं. आणि… आणि खूप मोठ्याने रडू येणार असं वाटायला लागलं. मी धावत जाऊन आईच्या पोटाला मिठी मारली आणि हुंदके द्यायला सुरुवात केली. आईने माझ्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. अगदी बाबा फिरवतात तशी. एक टपकन थेंब पडला माझ्या कानावर. थोड्या वेळाने ती म्हणाली, “वरूणा, धीर धर. आपल्याला बाबांची काळजी घ्यायची आहे ना! मग रडून कसं चालेल?” आजी म्हणाली, “डॉक्टर काय म्हणाले?” त्यावर आई म्हणाली, “काय म्हणणार? घशातला उरलेला गोळा काढलायं. टेस्ट करतो म्हणाले. आज रात्रभर लक्ष ठेवायला सांगितलयं.” थोड्या वेळाने मी आणि आजी निघालो. आई म्हणाली, “वसंता (म्हणजे माझा मामा) इथे आला की येते मी घरी.”

घरी आलो तर मामाकडून ठाण्याहून निरोप आला होत की मामाला अचानक ताप आला आहे. तो आज येऊ शकणार नाही. आजी म्हणाली, “अरे देवा, आता हिला रात्रभर राहायला लागणार हॉस्पिटलमधे. वरूणा, मी जेवायला करते.  तू घरातला खंदा पुरुष आहेस ना. हॉस्पिटलमधे जा, आणि आईला पाठव जेवायला. ती परत हॉस्पिटलमधे आली की तू ये घरी. तूला उद्या शाळा आहे ना.” मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. मी आजीला म्हणालो, “काही काळजी करू नकोस आजी. सगळं ठीक होईल.” कुंदा लागली रडायला आई पाहिजे म्हणून. तीला मी रागावून सांगितलं की “तू आता पाच वर्षाची घोडी झाली आहेस. रडणं बंद. अगदी चूप बैस. सारखी मुळुमुळु रडत असते ती.” माझी सगळी भीती कुठेतरी निघून गेली होती.

मी पटपट जेवलो आणि हॉस्पिटलमधे पोहोचलो. मी आईला सांगितलं “मामाला ताप आला आहे. तो येणार नाही आज. रात्री तूच थांब. पण आता घरी जाऊन जेवून ये. कुंदाला झोपव आणि मग ये. मी तो पर्यंत इथेच थांबतो, आणि बाबांकडे बघतो.” आईला काही ते पटत नव्हतं. ती म्हणत होती, “नाही रे बाबा नाही. मी एकदा जेवले नाही तर माझी हाडं काही स्मशानात जाणार नाहीत. तू जा घरी.” मी परत मोठ्या माणसासारखा म्हणालो, ” आई, असं करू नकोस. घरी जा. जेव. कुंदा रडत होती. आजीला पण तू घरी गेलीस तर बरं वाटेल. मी खंदा पुरुष आहे. मी इथे थांबतो.” शेवटी आई एकदाची तयार झाली. म्हणाली, “मी आलेच तासाभरात.”

रात्रीचे दहा वाजले होते. हॉस्पिटलवाल्यांनी दिवे बारीक केले होते. कुठून तरी एक नर्स आली आणि मला म्हणाली,

“ए मुला, कोन तू?” मी छाती फुगवून म्हणालो,

“मी बाबांचा मुलगा. वरूण गोपाळ जोशी.”

“कोंचा बाबा?”

“माझे बाबा इथे झोपलेत.”

“इथली बाय कुटं हाय?”

“आई घरी गेली आहे जेवायला. येईल तासाभरात. तोपर्यंत मी बाबांची काळजी घेणार आहे.”

“एकदम हुशार दिसतो जनू. कितवीत हायसा?”

“मी आहे सहावीत.”

“बाबाचा पोर्‍या हायेस ना. मग ऐक. झोपू नगस. मी फिरतीवर हाय. काय बी लागला तर मला बोलीव तिकडून.”

“हो”

मी खुर्चीत बसलो. थोडीशी भीती वाटत होती. पण सगळीकडे शांत होतं. रक्ताच्या बाटलीतून थेंबे थेंबे रक्त बाबांच्या शरीरात जात होतं. शंकराच्या पिंडावर पाणी पडतं तसं. मला मळमळल्यासारखं झालं. मी मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरूवात केली.          

किती वेळ झाला कुणास ठाऊक. पण.. पण अचानक बाबांचं शरीर हलायला लागलं. उघड्या घशातून बाबा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. पण फक्त गुडूगुडू आवाजच येत होता, गुळण्या केल्यासारखा. मी धाडकन उठलो. बाबांच्या तोंडापाशी कान नेला. मला काहीच सुधरेना. तेव्हढ्यात बाबांचे हातपाय जोरात हालायला लागले. डोकं गदागदा हलू लागलं. मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं. सगळे झोपलेले. नर्स कुठेच नव्हती. मी जोरात ओरडलो,

“धावा धावा. इकडे या. माझे बाबा बघा कसे करताहेत.”

मी धावत धावत दुसर्‍या वॉर्डापाशी गेलो. तिथेसुद्धा कोणी नव्हतं. धावत धावत बाबांपाशी परत आलो.

आता तर त्यांचं अख्खं शरीर उडत होतं. डोळे पण सताड उघडले होते. हातपाय वेडेवाकडे हलायला लागले. घशातूना आवाज येतच होता. बाबांना काहीतरी होतयं. मला काहीतरी करायलाच हवं होतं. पण काय करू? परत नर्सला हाक मारली. कोणी म्हणजे कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हतं. मी मग बाबांनाच हाक मारायला सुरूवात केली. पण त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. काय करू? काय करू? आई गं, कुठे आहेस तू?

तेव्हढ्यात बाबांच्या जोरात हात हलवण्याने दोन्ही बाटल्या धाड्कन जमिनीवर पडल्या. जमिनीवर सगळीकडे रक्त पसरलं. मी धडपडत परत बाटल्या खाटेला अडकवल्या. पाण्याची बाटली भरलेलीच होती. पण रक्ताची बाटली पूर्ण रीकामी झाली होती. बाबांना रक्त लागणार. काय करू? कुठून आणू रक्त?

मग आठवलं. म्हात्रे सर म्हणाले होते की नाडीत रक्ताचा प्रवाह सर्वात जोरात असतो. समोर मोसंबी कापायचा चाकू होता. मी जोरात माझी नाडी कापली. खूप झोंबलं. भळाभळा रक्त वाहायला लागलं. पण मला खूप बरं वाटत होतं. बाटलीच्या भोकावर मी माझा हात धरला. माझं रक्त बाबांच्या त्या बाटलीच्या आत ओघळू लागलं. बाबांची वेडीवाकडी हालचाल आता थांबली होती. मला झोप यायला लागली. मला खूप बरं वाटत होतं. मला खूप बरं वाटतं होतं. कुळकर्णी सर स्वप्नात म्हणत होते,                                

शर आला तो धावून आला काळ ।
विव्हळला श्रावणबाळ ॥

मी मात्र माझ्या बाबांपाशीच होतो.      

नितीन रा. अंतुरकर, एप्रिल, २००९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *