साबुदाणा आणि बटाटा

खरं सांगू का? कोणाला काय, कधी आणि कसं आठवेल त्याचा काही नेम नाही. 

आता हेच उदाहरण बघा. आम्ही राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे ह्यांच्या “वसंतोत्सव” ह्या संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. जबरदस्त कार्यक्रम होता. पहिल्या सत्रात राहुलने निरनिराळ्या ताना, लकबी, तराणे आम्हां श्रोत्यांवर फेकत कार्यक्रमात नुसती बहार आणली. कधी खर्जात, कधी तार सप्तकात गाताना सुध्दा त्याच्या चेहऱ्यावरची सहजता श्रोत्यांच्या मनात एक विश्वास निर्माण करत होती. आपल्या संस्कृतीचा वारसा हा तिशी चाळीशीचा तरुण अगदी छान पुढे नेत आहे अशी सगळ्यांना खात्री पटत होती. गर्वाने अगदी ऊर भरून आला होता. 

आणि बंदिशी थांबल्यावर राहुल हळूच म्हणाला, “ही सगळी मैफिल म्हणजे एक प्रयोगच आहे. आज बघा मी कुठे झब्बा-सुरवार घातला आहे का?” साधा शर्ट आणि जिनची पॅन्ट! ना बैठकीची जागा, ना ती स्वच्छ पांढरी गादी आणि तक्के, ना ते सजवलेले फुलांचे गुच्छ. एकदम इन्फॉर्मल माहौल. त्यातून त्याने शास्त्रीय संगीतात ताना घेताना कसा हुंकार घ्यायचा नसतो आणि तरीही आज मी कसा घेतोय हेही सांगितलं. त्याची Youtube वरची गाणी म्हंटलं तर भावगीते असतात, म्हंटलं तर सेमी-क्लासिकल असतात. मी मात्र गोंधळात! च्यामारी, मग माझ्या हजारो वर्षांच्या महान परंपरेचं कसं होणार? 

चक्क भर मैफिलीच्या मध्ये माझ्या डोळ्यासमोर साबुदाणा आणि बटाटा तरळायला लागले. उपासाच्या दिवशी तुमच्या सारखीच साबुदाण्याची खिचडी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली बटाट्याची भाजी मी सुध्दा हादडतो. तेंव्हा देवाला आणि माझ्या महान संस्कृतीला नमस्कार केल्यावर माझी छाती सुद्धा गर्वाने ३६ इंच फुलते. ते सगळं जाणवलं. पण मग हे ही अचानक लक्षात आलं की पोर्तुगीजांनी साबुदाणा आणि बटाटा आत्ताआत्ता तीनशे-चारशे वर्षांपूर्वीच भारतात आणला. आयला, मग पूर्वीच्या परंपरेत माणसं काय हादडायची? हे असले फालतू विचार त्या भर मैफिलीत माझ्या मेंदूत नाचायला लागले. 

मग हळूहळू बऱ्याच गोष्टी आठवल्या. चीनचा चहा ब्रिटिशांनी भारतात आणला. ज्या भाषेत मी फाडफाड बोलतो ती इंग्रजी भाषा अर्थातच ब्रिटिशांनी आणली. स्वातंत्र्यवीरांचं महान स्वतंत्रता स्तोत्र ज्या आधुनिक लोकशाहीत मी गातो, ती सुध्दा ब्रिटिशांनी भारतात आणली. नऊवारी गेली, गोल साडीसुद्धा गेली. आताच्या पोशाखाला काय म्हणतात कुणास ठाऊक? हजारो फारसी शब्द भारतीय भाषांमध्ये आले. पाली, अर्धमागधी आणि मोडी लिपी गेली. सध्या मराठी देवनागरी लिपीत लिहितात. संस्कृत तर म्हणे कुठल्याही स्थानिक लिपीत लिहायचे. सध्या देवनागरीत लिहितात. ही यादी तर अगदी लांबलचक होईल. 

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या हजारो वर्षांच्या परंपरेबद्दल मला अभिमान वाटतो त्यातली दोन महत्वाची वाद्ये म्हणजे तबला आणि पेटी. ह्यातली पेटी तर म्हणे फक्त दीडशे वर्षांपूर्वी अस्तित्वात सुध्दा नव्हती. तिचा जन्म फ्रान्समधला! तबला सुध्दा असाच दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी आला मध्य पूर्वेतून! आणि कर्नाटकी शास्त्रीय गायकीमधलं व्हायोलीन सुद्धा युरोपातलं. बोंबला! प्रश्न परत तोच! मग माझ्या महान शास्त्रीय संगीताच्या परंपरेचं काय? मग राहुल देशपांडे, महेश काळे, कौशिकी, कुमार गंधर्व ह्यांच्या प्रयोगांचे काय? हे कसलं शास्त्रीय संगीत? 

मग माझी ट्यूब पेटली. भारतीय परंपरा ही गंगेसारखी आहे. निरंतर दुथडी भरून वाहणारी. किनाऱ्याकडून जे काही मिळेल ते सगळं घेणारी! सतत बदलणारी! आणि तरीही नितळ आणि सुंदर! त्यामुळे भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा “बदल” हाच स्थायी भाव राहिला आहे आणि पुढे ही तो राहणार आहे. जग जितक्या वेगाने बदलेल तितक्याच वेगाने ही संस्कृती बदलत राहणार आहे. आणि त्यामुळेच ती अतिशय सुंदर आहे, निरंतर आहे. भारतीय संस्कृतीवरच्या माझ्या प्रेमाचं आणि गर्वाचं मूळ कारण हेच असावे.

– नितीन अंतुरकर (ऑक्टोबर, 2023)

4 Replies to “साबुदाणा आणि बटाटा”

  1. दादा, एका झटक्यात तू शेकडो प्रश्न सोडवलेले आहेत. आपलं, माझं, त्यांचं हे असलं काही नसतंच मुळी.
    विषय समाप्त…… !!!!
    एकदम मस्त लिहिलंयस. अश्या खूप गोष्टी जेंव्हा कुठेतरी जन्मतात आणि जगभर पसरतात, वर्षानुवर्षं चालतात आणि काळाबरोबर प्रगत होतात आणि खूप काही देत राहतात, त्यांना आपण संस्कृती म्हणतो. ती स्थानिक असेल किंवा वैश्विक असेल….. पण ती कुणाच्या बापाची नसते हे नक्की….. आणि याची देवाण-घेवाण तर होणारच…

  2. भारतीय परंपरा ही गंगेसारखी आहे. खरं आहे. पण सध्या – गेली दीड -दोनशे वर्षं किनाऱ्यावरून प्रदूषित माल गोळा होतोय. ही घाण साफ व्हायला थोडा वेळ लागेल. विजया वनस्पति च्या लागवडीवर बंदी आणि दारूचे ओढे खळाळून वाहताहेत हे त्याचं एक लक्षण. अशी बरीच लक्षणं आहेत. पण एक मात्र खरं. २०० वर्षांपूर्वी, ५०० वर्षांपूर्वी भारतात खाद्य संस्कृती काय होती याचा अभ्यास व्हायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *