साबुदाणा आणि बटाटा

खरं सांगू का? कोणाला काय, कधी आणि कसं आठवेल त्याचा काही नेम नाही. 

आता हेच उदाहरण बघा. आम्ही राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे ह्यांच्या “वसंतोत्सव” ह्या संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. जबरदस्त कार्यक्रम होता. पहिल्या सत्रात राहुलने निरनिराळ्या ताना, लकबी, तराणे आम्हां श्रोत्यांवर फेकत कार्यक्रमात नुसती बहार आणली. कधी खर्जात, कधी तार सप्तकात गाताना सुध्दा त्याच्या चेहऱ्यावरची सहजता श्रोत्यांच्या मनात एक विश्वास निर्माण करत होती. आपल्या संस्कृतीचा वारसा हा तिशी चाळीशीचा तरुण अगदी छान पुढे नेत आहे अशी सगळ्यांना खात्री पटत होती. गर्वाने अगदी ऊर भरून आला होता. 

आणि बंदिशी थांबल्यावर राहुल हळूच म्हणाला, “ही सगळी मैफिल म्हणजे एक प्रयोगच आहे. आज बघा मी कुठे झब्बा-सुरवार घातला आहे का?” साधा शर्ट आणि जिनची पॅन्ट! ना बैठकीची जागा, ना ती स्वच्छ पांढरी गादी आणि तक्के, ना ते सजवलेले फुलांचे गुच्छ. एकदम इन्फॉर्मल माहौल. त्यातून त्याने शास्त्रीय संगीतात ताना घेताना कसा हुंकार घ्यायचा नसतो आणि तरीही आज मी कसा घेतोय हेही सांगितलं. त्याची Youtube वरची गाणी म्हंटलं तर भावगीते असतात, म्हंटलं तर सेमी-क्लासिकल असतात. मी मात्र गोंधळात! च्यामारी, मग माझ्या हजारो वर्षांच्या महान परंपरेचं कसं होणार? 

चक्क भर मैफिलीच्या मध्ये माझ्या डोळ्यासमोर साबुदाणा आणि बटाटा तरळायला लागले. उपासाच्या दिवशी तुमच्या सारखीच साबुदाण्याची खिचडी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली बटाट्याची भाजी मी सुध्दा हादडतो. तेंव्हा देवाला आणि माझ्या महान संस्कृतीला नमस्कार केल्यावर माझी छाती सुद्धा गर्वाने ३६ इंच फुलते. ते सगळं जाणवलं. पण मग हे ही अचानक लक्षात आलं की पोर्तुगीजांनी साबुदाणा आणि बटाटा आत्ताआत्ता तीनशे-चारशे वर्षांपूर्वीच भारतात आणला. आयला, मग पूर्वीच्या परंपरेत माणसं काय हादडायची? हे असले फालतू विचार त्या भर मैफिलीत माझ्या मेंदूत नाचायला लागले. 

मग हळूहळू बऱ्याच गोष्टी आठवल्या. चीनचा चहा ब्रिटिशांनी भारतात आणला. ज्या भाषेत मी फाडफाड बोलतो ती इंग्रजी भाषा अर्थातच ब्रिटिशांनी आणली. स्वातंत्र्यवीरांचं महान स्वतंत्रता स्तोत्र ज्या आधुनिक लोकशाहीत मी गातो, ती सुध्दा ब्रिटिशांनी भारतात आणली. नऊवारी गेली, गोल साडीसुद्धा गेली. आताच्या पोशाखाला काय म्हणतात कुणास ठाऊक? हजारो फारसी शब्द भारतीय भाषांमध्ये आले. पाली, अर्धमागधी आणि मोडी लिपी गेली. सध्या मराठी देवनागरी लिपीत लिहितात. संस्कृत तर म्हणे कुठल्याही स्थानिक लिपीत लिहायचे. सध्या देवनागरीत लिहितात. ही यादी तर अगदी लांबलचक होईल. 

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या हजारो वर्षांच्या परंपरेबद्दल मला अभिमान वाटतो त्यातली दोन महत्वाची वाद्ये म्हणजे तबला आणि पेटी. ह्यातली पेटी तर म्हणे फक्त दीडशे वर्षांपूर्वी अस्तित्वात सुध्दा नव्हती. तिचा जन्म फ्रान्समधला! तबला सुध्दा असाच दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी आला मध्य पूर्वेतून! आणि कर्नाटकी शास्त्रीय गायकीमधलं व्हायोलीन सुद्धा युरोपातलं. बोंबला! प्रश्न परत तोच! मग माझ्या महान शास्त्रीय संगीताच्या परंपरेचं काय? मग राहुल देशपांडे, महेश काळे, कौशिकी, कुमार गंधर्व ह्यांच्या प्रयोगांचे काय? हे कसलं शास्त्रीय संगीत? 

मग माझी ट्यूब पेटली. भारतीय परंपरा ही गंगेसारखी आहे. निरंतर दुथडी भरून वाहणारी. किनाऱ्याकडून जे काही मिळेल ते सगळं घेणारी! सतत बदलणारी! आणि तरीही नितळ आणि सुंदर! त्यामुळे भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा “बदल” हाच स्थायी भाव राहिला आहे आणि पुढे ही तो राहणार आहे. जग जितक्या वेगाने बदलेल तितक्याच वेगाने ही संस्कृती बदलत राहणार आहे. आणि त्यामुळेच ती अतिशय सुंदर आहे, निरंतर आहे. भारतीय संस्कृतीवरच्या माझ्या प्रेमाचं आणि गर्वाचं मूळ कारण हेच असावे.

– नितीन अंतुरकर (ऑक्टोबर, 2023)

ह्या झाडाचा हा गुणधर्मच आहे

फळं रसरशीत असतात
कुठल्याही ऋतूत मोहोरतात
काही कच्ची असतात, काही पिकलेली असतात
काही झाडाखालीच पडतात
काही पक्षी टिपतात आणि लांब घेऊन जातात
रसाळ फळांचं हे झाड मात्र डवरलेलच आहे
ह्या झाडाचा हा गुणधर्मच आहे

कुठून कुठून झुळुकी येतात
जुन्या झाडापाशी रेंगाळतात
तिथल्या सुगंधाने लहरतात
शिरशिरतात, फुलतात, बागडतात
आणि सुगंधाला कवेत घेऊन ढगांवर स्वार होतात
सुगंधी फुलांचं हे झाड मात्र डवरलेलंच आहे
ह्या झाडाचा हा गुणधर्मच आहे

पक्षीच ते, येतात आणि किलबिलाट करतात
फांद्याफांद्यांमध्ये लपंडाव खेळतात
भांडतात, उडतात आणि परत झाडाशी येतात
आणि एके दिवशी….
झाडाची सावली पंखांवर तोलून
लांब आकाशात झेपावतात
रखरखीत उन्हाशी पैजा जिंकतात
सावल्या वाटण्याचा हा प्रघात अजून चालूच आहे
ह्या कल्पवृक्षाचा हा गुणधर्मच आहे

(जेव्हढी उत्कटता वाटली तेव्हढी मी शब्दात नाही उतरवू शकलो. कदाचित म्हणूनच “फुल ना फुलाची पाकळी” असं म्हणण्याची प्रथा असावी. सगळ्या कल्पवृक्षांना सादर समर्पण !)

एक चिकणी माशी

एक चिकणी माशी
नटायची कशी
दिसेल त्या आरशासमोर
मिरवायची कशी

एकदा काय झाले
तिला टक्कल दिसले
तो तुकतुकीत गोटा पाहून
तिचे डोळे चकाकले

माशी उडत आली
“ह्या” आरशाला पाहून हसली
तिने रोवला पाय
पण सटकन घसरली

संतापाने भुणभुणली
रागाने काळीनिळी झाली
पण ह्या घसरगुंडीने
टकलाला फक्त गुदगुलीचं झाली

तेव्हढ्यात कोणीतरी ओरडले
“माशीला मारा” म्हणाले
एकदम कल्ला झाला
धाडकन काहीतरी आपटले

उडत लांब माशी गेली
हसत हसत गुणगुणली
म्हणाली टेंगुळ बघून
“बरे झाले, अद्दल घडली”

– नितीन अंतुरकर (मार्च, २००८)

पोळ्या बनवण्याची रेसिपी

(आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला स्मरून)

त्यात मीठपाणी घालावे
– पोराटोरांच्या अश्रुंसारखे

पांढरेफटक पीठ घ्यावे
– विधवेच्या कपाळासारखे

मग कणिक तिंबावी
– मांसाच्या गोळ्या सारखी

लाटून तव्यावर भाजावी
– चितेवरच्या प्रेतासारखी

अशी पोळी डायबेटिक्सना फारच छान
– साखर म्हणे रक्तात सावकाश उतरते

नितीन अंतुरकर (जानेवारी, २००७)

मी भाऊ शोधतोय!!

(आपल्या जवळची माणसं पाखरासारखी अलगद ह्या जगातून निघून जातात आणि मागे आपण शोधत राहतो त्या आठवणी. अशाच काही भाऊंच्या (म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या) आठवणींची, त्यांच्या अस्पष्ट अस्तित्वाची जाणीव. )

मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय!

घरातल्या अभ्यासाच्या टेबलावरचं कित्येक वर्षांपासूनचं ते वितभर झाड. हिरव्या टोकेरी पानांचं. रंगीबेरंगी काचेच्या नाजूक कुंडीत सुबकपणे ठेवलेलं. मी आरश्यातून त्याच्याकडे बघीतलं की ते हळूच मला खुणवायचं. त्याला पंधरा दिवसांपूर्वी अचानक दहा कळ्या आल्या. सहा वर्षांनी! दोन दिवसात फुलल्या आणि चौथ्या दिवशी हिरमुसत सुकून सुद्धा गेल्या. दोन पदरी फुलं. नाजूक लालसर पांढरी! फुलंच ती,.. फुलली, सुकून वाळून गेली आणि नाहीशी झाली. पण मनात काहूर ठेऊन गेली. ही फुलं आत्ताच का आली? काय सांगून गेली? कुणास ठाऊक? पण मागे….मागे मंद, शुभ्र गंधाचा रेंगाळणारा आभास ठेऊन गेली. कदाचित…कदाचित पुढच्या वाऱ्याच्या झुळूकीत तो गंध सुद्धा नाहीसा होईल.

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, काहुरलेल्या मनाने त्या रेंगाळणाऱ्या सुवासाचा मागोवा घेत, मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय!

ऑफिसला जायचा बोअरिंग रस्ता. त्याच त्याच इमारती, तीच अंधारातली धुरकटलेली झाडं. त्याच रेडीओवरच्या रटाळ बातम्या आणि त्याच जगातल्या मारामाऱ्या. पण परवा मला निघायला जरा उशीर झाला. आणि भर रस्त्यामध्ये क्षितिजावरच्या त्या लालबुंद सूर्याने मला मिठीच मारली. अगदी पंचवीस वर्षाने भेटलेल्या जुन्या जिवाभावाच्या मित्रासारखी. गच्च कडकडून मारलेली मिठी! मी म्हणालो, “अरे, हो, हो. मला ड्राईव्ह करू दे. एक्सिडेंट होईल ना!” सूर्य हळूच कानात कुजबुजला, “तिकडे बघ.” तिकडे होता एकुलता एक निळा ढग. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेतला. त्याला थोडेसे पिंजारलेले पांढरे केस होते. धुरकट, लांबूटका, कापसासारखा मऊशार प्रेमळ ढग आपल्याच तंद्रीत प्रवासाला निघाला होता. एकटाच… एकटाच. क्षितिजापलिकडे!

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, त्या क्षितिजा पलीकडल्या निळ्याशार कृष्णरंगात मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

फ़्रिजवरचा कागद. हो, …. अगदी पिवळटलेला, भुरभुरा, जुनाट, चुरगळलेला तसलाच कागद. आमचाच हट्ट म्हणून फ्रीजला चिटकून उभा. त्यावर लिहिलंय: “तुमच्या यशाची कमान अशीच चढत राहो – आईभाऊंचा आशीर्वाद.” अक्षर सोपं आहे. पण रेषा थरथरत्या आहेत. मी स्वैपाकघरात त्या कागदाला हळूच हात लावतो आहे. शब्दांना गोंजारता येतं का कधी? तरीही, मी वेडा, ते शब्द गोंजारतोय. ती वेडी वाकडी अक्षरं गिरवतोय.

मी… मी भाऊ शोधतोय. मी भाऊ शोधतोय. त्या वेड्यावाकड्या नागमोडी अक्षरांच्या वाटांवर मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

पसायदान. ज्ञानेश्वर माऊलीने देवाला घातलेलं साकडं.. छे, देवानेच देवाला घातलेलं साकडं. आपल्या सगळ्यांसाठी! आज तेजस आणि आरती देवासमोर बसले आहेत. भाऊंनी शिकवलेल्या त्या पसायदानाची देवाला आठवण करून देत आहेत. त्यांचे डोळे मिटले आहेत. समयीचा मंद प्रकाश त्यांच्या निरभ्र चेहऱ्यावर पडला आहे. अगदी नितळ आरशासारखे त्यांचे चेहरे!

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, त्या निरभ्र, मंद आरशात मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

भाऊ गोष्ट सांगताहेत एक हंसाची. “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक”. तेजस – आरती ऐकताहेत. त्यांच्या डोळ्यात राजहंस बनण्याची हुरहूर आहे. “आजोबा, आजोबा, ते वेडं पिल्लू आकाशात उडेल का हो? उडेल का हो?” ते भाऊंना विचारताहेत. उंच भाऊ उभे राहिले आहेत. त्यांच्या लांब लांब हातांनी त्यांनी आकाश झेललंय. ते तेजस-आरतीला म्हणताहेत: “बघा बघा, तीच तर मजा आहे. आकाशात झेपावण्यासाठी….. हवी फक्त फक्त एक दुर्दम्य इच्छा… आकाशात झेपावण्याची. बाकी काही नको, बाकी काही नको.”

आत्ता ह्या… ह्या क्षणाला, ह्या इथल्या निळ्या नभात डोळ्यात हुरहूर घेऊन झेपावलेल्या हंसांच्या पंखांवर मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

माहेर

(लडाखमधील झांस्कर नावाची नदी हिवाळ्यातले दोन महिने काही प्रमाणात गोठते. ही जी बर्फाची “चादर” नदीवर पसरते त्यावरून जाण्याच्या ट्रेकला “चद्दर ट्रेक” असे म्हणतात. मी नुकतीच ही ट्रेक ६ ते १६ फेब्रुवारीला पूर्ण केली. ह्या ट्रेकच्या निमित्ताने ……)

जातो माहेरी माहेरी
शुभ्र स्फटिकांची वाट
जातो माहेरी माहेरी
निळ्या नदीची ही हाक

हो, मी माहेरी जातोय, माहेरी जातोय. माझ्यातलं निरागस बालपण आणि अवखळ तारुण्य अगदी उफाळून आलंय. डोळ्यात उत्सुकता आहे. जाण्यासाठी सगळी तयारी अगदी जोरात झाली आहे. खूप वर्ष लागली हा मुहूर्त यायला! काही ना काही कारणाने आयुष्य अगदी धावपळीचं झालं. त्यातून मी आलो अमेरिकेत. त्यामुळे एवढा दूरचा प्रवास कित्येक वर्षात घडलाच नाही. आता मात्र मी नक्की जाणार. मी अगदी हात उंचावून उडया मारतो आहे. आणि परत परत सांगतोय. मी माहेरी जातोय.

खरं तर प्रत्येकाचं माहेर जरा वेगळंच असतं. काही जणांसाठी ते कोकणातल्या गर्द वनराईत लपलेलं असतं. काही जणांना ते पुण्याच्या पर्वतीची आठवण करून देतं. काही जणांना मुंबईमधलं लगबगीचं घर हाक मारत असतं. माझं माहेर त्यापेक्षा जरा आणखीनच वेगळं आहे. माझ्या माहेरी जाण्याच्या वाटेवर पांढरे शुभ्र हिरे विखुरलेले आहेत. झाडं दिसतीलच असं नाही. पण निळीशार खळाळणारी नदी वाहते आहे. थंड, भुरभुरी हवा मन प्रसन्न करते आहे. मी किती किती सांगू, मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
येथे देवांचा निवास
जातो माहेरी माहेरी
गार अमृताची आस

अशा ह्या आगळ्या वेगळ्या, काहीशा श्रीमंत अशा माझ्या माहेरी, त्याच तोलामोलाचे शेजारी राहात नसतील तरच नवल. येथे शंकर पार्वती राहातात. दुडूदुडू बागडणारा त्यांचा गणपती येथेच लहानाचा मोठा झालाय. विष्णू, इंद्र ह्या सगळ्यांचे दरबार येथेच भरतात. ऋषी मुनींच्या मंत्रांचा गजर येथेच ऐकायला येतो. अशा शंकर-पार्वतीच्या घरी मी गेलो, की मला साहजिकच थंडगार अमृतच मिळणार. मी शरीराने अमर्त्य होणार नाही, पण माहेरच्या आठवणी अमर्त्य होतील हे नक्की. मग अशा ह्या अमृताची मला ओढ लागणार नाही का? त्या तहानेची आर्तता, तळमळ मला अनावर होतीय. मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
मन शोधेल माऊली
जातो माहेरी माहेरी
डोळां तिची निळी सावली

माझ्या माहेरी मला माझे महाकाय बाबा भेटतील. त्यांची पांढरी शुभ्र दाढी, कठोर मुद्रा, अगदी निश्चल भाव, तटस्थता. खरं तर त्यांचाकडे जायचं म्हणजे जरा भीतीच वाटते. अगदी अदबीने, हळू हळू सगळ्या तयारीने जायला लागतं. मग बाबा शिकवतात. “बाळा, सगळे एकत्र राहा. एकमेकांची काळजी घ्या. सगळ्यांना सांभाळून घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. आयुष्य मुळात अगदी साधं, सरळ आहे. ते उगाच अवघड करू नका. आनंदी राहा.” आपण त्यांचं ऐकलं की ते आपल्याला प्रेमाने मिठीत घेतात. मग ते आपल्याला दर्शन देतात. अवघ्या विश्वाला पुरून उरेल असं!! मन भरून येतं.

पण बाबांची आठवण उरात घेऊन जरी मी चाललो असलो, तरी माझं मन मात्र आईलाच शोधत असतं. ती खूपच, म्हणजे खूपच प्रेमळ आहे. मी कितीही मोठा झालो तरी माझ्यासाठी अंगाई गीत गाते. मी आलो की तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. ती कधी अवखळ होते, कधी शांत. कधी निळीशार होते, कधी पांढरी शुभ्र. मी आता माहेरी चालोलाय म्हणून नाही तर अशा माझ्या माऊलीची सावली माझ्या डोळ्यात कायमच असते. ती सावली डोळ्यात घेऊनच मी सगळीकडे वावरत असतो. पण मी तिला आता प्रत्यक्षच भेटणार आहे. मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
माझी अवचित वारी
परतून आलो की मी
सांगीन तिच्या एकेक लहरी

अगदी अचानकच घडला आहे माझा प्रवास. पण हा नुसता प्रवास नाही आहे. ही यात्रा आहे. ह्यात भक्तीची भावुकता आहे, नदीचा नादब्रह्म आहे. विलीन होण्याची तळमळ आहे. “माझे माहेर पंढरी” असं म्हणत वारकरी नाही का पंढरपूरला जात? त्यांच्या मनाचा जो भाव तोच भाव माझ्या मनाचा झाला आहे. पण शेवटी माहेरवाशीण ती माहेरवाशीणच. तिची भेट काही दिवसांचीच. सासर हीच तिची कर्मभूमी. त्यामुळे माझी ही माहेराची यात्रा काही दिवसांचीच. परत यायलाच हवं. पण परत आल्यावर मी तुम्हाला तिच्या लहरी, तिथले तरल, थोडेसे विचित्र, थोडेसे अदभूत आणि तरीही अतिशय सुंदर अनुभव नक्कीच सांगीन. अहो, खरं तर त्यात माझा स्वार्थच आहे. माहेरच्या आठवणी येण्यासाठी माझी ही आणखी एक सबब!

नितीन अंतुरकर (जानेवारी, २०१४)

माझ्या दुःखाचा प्रवास

नुकतीच २०१५ सालाची माझी “एक अश्रू” ही कविता “माझ्या दुःखाचा प्रवास” ह्या नवीन शीर्षकाने मी काहीजणांना पाठवली. ती वाचल्यावर काहीजणांनी मला विचारलं, “काय रे बाबा, काय झालं?” आणि काहीजणांना दुःखाचा प्रवास म्हणजे काय असा प्रश्न पडला. खरं तर कविता ही वाचकाच्या मालकीची असते. कवीच्या नाही. कविता वाचल्यावर वाचकाच्या मनात उमटलेले तरंग हे सर्वस्वी त्याचे स्वतःचेच असतात. तरीसुध्दा वरच्या प्रश्नांना थोडक्यात सूचक उत्तरे देण्यासाठी हा पंक्तिप्रपंच. 

आजकालच्या नवीन, अतिशय वेगाने धावणाऱ्या जगातसुध्दा दुःख ही एक गोष्ट स्थिर असते. माझ्याबाबतीत ते दुःख अचानक मला बेसावधपणे गाठतं आणि क्षणभर खिळवून ठेवतं. अशा दुःखाच्या चार छटा मी कवितेत २०१५ साली मांडल्या. कधी तो दुःखाचा क्षण मला अगदी भिजवून टाकतो आणि निर्माल्यासारखा पटकन लांब आयुष्याच्या वाहत्या नदीत फेकून द्यावासा वाटतो. कधी वेगळाच अनोळखी वाटतो, कधी एकटाच वाटतो तर कधी फकीरासारखा अलिप्त वाटतो. 

आज २०२२ साली ह्याच छटा एका प्रवासाच्या रूपात दिसतात. आयुष्याच्या ह्या वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यात यमुनेकाठी खेळणाऱ्या योगेश्वर कृष्णासारखी फकिरी अलिप्तता आली आहे का आता माझ्यात?

एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
चिंब ओला
भाद्रपदातल्या निर्माल्य प्राजक्तासारखा

एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
अनोळखी
क्षितिजावरच्या निळ्या ढगासारखा

एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
एकटाच
अमावास्येच्या निरंतर ध्रुवासारखा

एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
फकीर
यमुनाजळीच्या कृष्णासारखा

एक अथांग दुःख
आणि सोबतीला एक अश्रू !

नितीन अंतुरकर (जून २०, २०१५)

तुझ्या आठवणी

हिरव्याजळ तलावाकाठी तुझ्या डोळ्यातली लकाकी
निळ्या विजेची चमक, जणू सळसळती मासळी

काजळलेल्या डोंगराच्या पाठी मंदगती चांदणं
तुझ्या सावळ्या कांतीवर ओली चंदेरी झालर

शांत अशा आवाजात एका पक्षाची आरळं
तुझ्या घनदाट कुशीत माझ्या मनाचं मुंडावळ

एक टपोरा थेंब तुझ्या ओठांवर टिपला
तहानलेला रावा तुझ्या आश्रयाला आला

असं हे तुटक चित्रं, तसं हे तुटक चित्रं
ओघवत्या वाऱ्याचं गहिऱ्या पाण्यातील प्रतिबिंब

कुठे घेऊन जाऊ मी हा आठवणींचा खेळ
तुझ्या ओंजळीत राहू दे माझ्या आयुष्यफुलांची माळ

नितीन अंतुरकर (2007)