मी भाऊ शोधतोय!!

(आपल्या जवळची माणसं पाखरासारखी अलगद ह्या जगातून निघून जातात आणि मागे आपण शोधत राहतो त्या आठवणी. अशाच काही भाऊंच्या (म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या) आठवणींची, त्यांच्या अस्पष्ट अस्तित्वाची जाणीव. )

मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय!

घरातल्या अभ्यासाच्या टेबलावरचं कित्येक वर्षांपासूनचं ते वितभर झाड. हिरव्या टोकेरी पानांचं. रंगीबेरंगी काचेच्या नाजूक कुंडीत सुबकपणे ठेवलेलं. मी आरश्यातून त्याच्याकडे बघीतलं की ते हळूच मला खुणवायचं. त्याला पंधरा दिवसांपूर्वी अचानक दहा कळ्या आल्या. सहा वर्षांनी! दोन दिवसात फुलल्या आणि चौथ्या दिवशी हिरमुसत सुकून सुद्धा गेल्या. दोन पदरी फुलं. नाजूक लालसर पांढरी! फुलंच ती,.. फुलली, सुकून वाळून गेली आणि नाहीशी झाली. पण मनात काहूर ठेऊन गेली. ही फुलं आत्ताच का आली? काय सांगून गेली? कुणास ठाऊक? पण मागे….मागे मंद, शुभ्र गंधाचा रेंगाळणारा आभास ठेऊन गेली. कदाचित…कदाचित पुढच्या वाऱ्याच्या झुळूकीत तो गंध सुद्धा नाहीसा होईल.

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, काहुरलेल्या मनाने त्या रेंगाळणाऱ्या सुवासाचा मागोवा घेत, मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय!

ऑफिसला जायचा बोअरिंग रस्ता. त्याच त्याच इमारती, तीच अंधारातली धुरकटलेली झाडं. त्याच रेडीओवरच्या रटाळ बातम्या आणि त्याच जगातल्या मारामाऱ्या. पण परवा मला निघायला जरा उशीर झाला. आणि भर रस्त्यामध्ये क्षितिजावरच्या त्या लालबुंद सूर्याने मला मिठीच मारली. अगदी पंचवीस वर्षाने भेटलेल्या जुन्या जिवाभावाच्या मित्रासारखी. गच्च कडकडून मारलेली मिठी! मी म्हणालो, “अरे, हो, हो. मला ड्राईव्ह करू दे. एक्सिडेंट होईल ना!” सूर्य हळूच कानात कुजबुजला, “तिकडे बघ.” तिकडे होता एकुलता एक निळा ढग. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेतला. त्याला थोडेसे पिंजारलेले पांढरे केस होते. धुरकट, लांबूटका, कापसासारखा मऊशार प्रेमळ ढग आपल्याच तंद्रीत प्रवासाला निघाला होता. एकटाच… एकटाच. क्षितिजापलिकडे!

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, त्या क्षितिजा पलीकडल्या निळ्याशार कृष्णरंगात मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

फ़्रिजवरचा कागद. हो, …. अगदी पिवळटलेला, भुरभुरा, जुनाट, चुरगळलेला तसलाच कागद. आमचाच हट्ट म्हणून फ्रीजला चिटकून उभा. त्यावर लिहिलंय: “तुमच्या यशाची कमान अशीच चढत राहो – आईभाऊंचा आशीर्वाद.” अक्षर सोपं आहे. पण रेषा थरथरत्या आहेत. मी स्वैपाकघरात त्या कागदाला हळूच हात लावतो आहे. शब्दांना गोंजारता येतं का कधी? तरीही, मी वेडा, ते शब्द गोंजारतोय. ती वेडी वाकडी अक्षरं गिरवतोय.

मी… मी भाऊ शोधतोय. मी भाऊ शोधतोय. त्या वेड्यावाकड्या नागमोडी अक्षरांच्या वाटांवर मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

पसायदान. ज्ञानेश्वर माऊलीने देवाला घातलेलं साकडं.. छे, देवानेच देवाला घातलेलं साकडं. आपल्या सगळ्यांसाठी! आज तेजस आणि आरती देवासमोर बसले आहेत. भाऊंनी शिकवलेल्या त्या पसायदानाची देवाला आठवण करून देत आहेत. त्यांचे डोळे मिटले आहेत. समयीचा मंद प्रकाश त्यांच्या निरभ्र चेहऱ्यावर पडला आहे. अगदी नितळ आरशासारखे त्यांचे चेहरे!

मी… मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय, त्या निरभ्र, मंद आरशात मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

भाऊ गोष्ट सांगताहेत एक हंसाची. “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक”. तेजस – आरती ऐकताहेत. त्यांच्या डोळ्यात राजहंस बनण्याची हुरहूर आहे. “आजोबा, आजोबा, ते वेडं पिल्लू आकाशात उडेल का हो? उडेल का हो?” ते भाऊंना विचारताहेत. उंच भाऊ उभे राहिले आहेत. त्यांच्या लांब लांब हातांनी त्यांनी आकाश झेललंय. ते तेजस-आरतीला म्हणताहेत: “बघा बघा, तीच तर मजा आहे. आकाशात झेपावण्यासाठी….. हवी फक्त फक्त एक दुर्दम्य इच्छा… आकाशात झेपावण्याची. बाकी काही नको, बाकी काही नको.”

आत्ता ह्या… ह्या क्षणाला, ह्या इथल्या निळ्या नभात डोळ्यात हुरहूर घेऊन झेपावलेल्या हंसांच्या पंखांवर मी भाऊ शोधतोय, मी भाऊ शोधतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *