माहेर

(लडाखमधील झांस्कर नावाची नदी हिवाळ्यातले दोन महिने काही प्रमाणात गोठते. ही जी बर्फाची “चादर” नदीवर पसरते त्यावरून जाण्याच्या ट्रेकला “चद्दर ट्रेक” असे म्हणतात. मी नुकतीच ही ट्रेक ६ ते १६ फेब्रुवारीला पूर्ण केली. ह्या ट्रेकच्या निमित्ताने ……)

जातो माहेरी माहेरी
शुभ्र स्फटिकांची वाट
जातो माहेरी माहेरी
निळ्या नदीची ही हाक

हो, मी माहेरी जातोय, माहेरी जातोय. माझ्यातलं निरागस बालपण आणि अवखळ तारुण्य अगदी उफाळून आलंय. डोळ्यात उत्सुकता आहे. जाण्यासाठी सगळी तयारी अगदी जोरात झाली आहे. खूप वर्ष लागली हा मुहूर्त यायला! काही ना काही कारणाने आयुष्य अगदी धावपळीचं झालं. त्यातून मी आलो अमेरिकेत. त्यामुळे एवढा दूरचा प्रवास कित्येक वर्षात घडलाच नाही. आता मात्र मी नक्की जाणार. मी अगदी हात उंचावून उडया मारतो आहे. आणि परत परत सांगतोय. मी माहेरी जातोय.

खरं तर प्रत्येकाचं माहेर जरा वेगळंच असतं. काही जणांसाठी ते कोकणातल्या गर्द वनराईत लपलेलं असतं. काही जणांना ते पुण्याच्या पर्वतीची आठवण करून देतं. काही जणांना मुंबईमधलं लगबगीचं घर हाक मारत असतं. माझं माहेर त्यापेक्षा जरा आणखीनच वेगळं आहे. माझ्या माहेरी जाण्याच्या वाटेवर पांढरे शुभ्र हिरे विखुरलेले आहेत. झाडं दिसतीलच असं नाही. पण निळीशार खळाळणारी नदी वाहते आहे. थंड, भुरभुरी हवा मन प्रसन्न करते आहे. मी किती किती सांगू, मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
येथे देवांचा निवास
जातो माहेरी माहेरी
गार अमृताची आस

अशा ह्या आगळ्या वेगळ्या, काहीशा श्रीमंत अशा माझ्या माहेरी, त्याच तोलामोलाचे शेजारी राहात नसतील तरच नवल. येथे शंकर पार्वती राहातात. दुडूदुडू बागडणारा त्यांचा गणपती येथेच लहानाचा मोठा झालाय. विष्णू, इंद्र ह्या सगळ्यांचे दरबार येथेच भरतात. ऋषी मुनींच्या मंत्रांचा गजर येथेच ऐकायला येतो. अशा शंकर-पार्वतीच्या घरी मी गेलो, की मला साहजिकच थंडगार अमृतच मिळणार. मी शरीराने अमर्त्य होणार नाही, पण माहेरच्या आठवणी अमर्त्य होतील हे नक्की. मग अशा ह्या अमृताची मला ओढ लागणार नाही का? त्या तहानेची आर्तता, तळमळ मला अनावर होतीय. मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
मन शोधेल माऊली
जातो माहेरी माहेरी
डोळां तिची निळी सावली

माझ्या माहेरी मला माझे महाकाय बाबा भेटतील. त्यांची पांढरी शुभ्र दाढी, कठोर मुद्रा, अगदी निश्चल भाव, तटस्थता. खरं तर त्यांचाकडे जायचं म्हणजे जरा भीतीच वाटते. अगदी अदबीने, हळू हळू सगळ्या तयारीने जायला लागतं. मग बाबा शिकवतात. “बाळा, सगळे एकत्र राहा. एकमेकांची काळजी घ्या. सगळ्यांना सांभाळून घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. आयुष्य मुळात अगदी साधं, सरळ आहे. ते उगाच अवघड करू नका. आनंदी राहा.” आपण त्यांचं ऐकलं की ते आपल्याला प्रेमाने मिठीत घेतात. मग ते आपल्याला दर्शन देतात. अवघ्या विश्वाला पुरून उरेल असं!! मन भरून येतं.

पण बाबांची आठवण उरात घेऊन जरी मी चाललो असलो, तरी माझं मन मात्र आईलाच शोधत असतं. ती खूपच, म्हणजे खूपच प्रेमळ आहे. मी कितीही मोठा झालो तरी माझ्यासाठी अंगाई गीत गाते. मी आलो की तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. ती कधी अवखळ होते, कधी शांत. कधी निळीशार होते, कधी पांढरी शुभ्र. मी आता माहेरी चालोलाय म्हणून नाही तर अशा माझ्या माऊलीची सावली माझ्या डोळ्यात कायमच असते. ती सावली डोळ्यात घेऊनच मी सगळीकडे वावरत असतो. पण मी तिला आता प्रत्यक्षच भेटणार आहे. मी माहेरी जातोय.

जातो माहेरी माहेरी
माझी अवचित वारी
परतून आलो की मी
सांगीन तिच्या एकेक लहरी

अगदी अचानकच घडला आहे माझा प्रवास. पण हा नुसता प्रवास नाही आहे. ही यात्रा आहे. ह्यात भक्तीची भावुकता आहे, नदीचा नादब्रह्म आहे. विलीन होण्याची तळमळ आहे. “माझे माहेर पंढरी” असं म्हणत वारकरी नाही का पंढरपूरला जात? त्यांच्या मनाचा जो भाव तोच भाव माझ्या मनाचा झाला आहे. पण शेवटी माहेरवाशीण ती माहेरवाशीणच. तिची भेट काही दिवसांचीच. सासर हीच तिची कर्मभूमी. त्यामुळे माझी ही माहेराची यात्रा काही दिवसांचीच. परत यायलाच हवं. पण परत आल्यावर मी तुम्हाला तिच्या लहरी, तिथले तरल, थोडेसे विचित्र, थोडेसे अदभूत आणि तरीही अतिशय सुंदर अनुभव नक्कीच सांगीन. अहो, खरं तर त्यात माझा स्वार्थच आहे. माहेरच्या आठवणी येण्यासाठी माझी ही आणखी एक सबब!

नितीन अंतुरकर (जानेवारी, २०१४)

3 Replies to “माहेर”

  1. Wow Nitin . Through you I could feel the Himalayan ranges , it’s my dream to go there . You just took me there to dream more.

    Enjoy and keep writing .
    -Manoj Mohile

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *