रात्री दोनच्या सुमारास

(लडाखमधील झांस्कर नावाची नदी हिवाळ्यातले दोन महिने काही प्रमाणात गोठते. ही जी बर्फाची “चादर” नदीवर पसरते त्यावरून जाण्याच्या ट्रेकला “चद्दर ट्रेक” असे म्हणतात. मी ही ट्रेक ६ ते १६ फेब्रुवारी २०१४ ला पूर्ण केली. ह्या ट्रेकच्या निमित्ताने….)

आजकाल दाऊद एकदम भंजाळला होता. कराचीच्या आलिशान बंगल्यात आपली छाती ताणून तो राजरोसपणे वावरायचा. पण लादेनच्या हत्येनंतर त्याची जाम फाटली होती. कराचीतल्याच मोहम्मद जीना झोपडपट्टीमध्ये छोट्याश्या झोपडीतून भुयारात जायचा जिना बांधून तिथे त्याने रहायला सुरुवात केली होती. 

तरीसुद्धा मी त्याच्या मागावर होतोच. माझ्याकडे दाऊदचा मोबाइल नंबर होता. माझ्या अर्ध्या इंच लांबीच्या बारीकश्या ड्रोनने दाऊदला शोधून काढायचा आणि त्याच ड्रोनने त्याच्या मेंदूचा भुगा करायचा हा माझा प्लॅन. पण तो आता भुयारात लपल्यामुळे त्याच्या मोबाइलचा शोध लावणं फारच कठीण होऊन बसलं होतं. एकच संधी होती. तो चुकून मोबाइल वापरत बाथरूम मध्ये एक नंबर करायला घाईघाईने आला तर तिथल्या छोट्या खिडकीच्या भोकातून मला सिग्नल मिळाला असता. पण गेल्या कित्येक दिवसात दाऊद त्याचा मोबाइल घेऊन बाथरूम मध्ये कधी गेलाच नाही. 

आज कडाक्याची थंडी पडली होती. दाऊदचं जाऊ दे, मलाच सारखं एक नंबरला जावसं वाटत होतं. आणि…  आणि मला सिग्नल मिळाला. मी उत्साहात आता ड्रोनचं बटन दाबणार… 

तेव्हढ्यात मला जाग आली. 

च्यायला त्या दाऊदच्या ! साला स्वप्नात सुद्धा मी त्याला खलास करू शकत नाही. काय माझं नशीब आहे? नेहेमीचाच प्रॉब्लेम आहे हा माझा ! नेमकी नको त्या वेळी मला जाग येते. मॅरेथॉन शर्यतीत शेवटच्या दोन-तीन ढांगा राहिलेल्या असताना, एव्हरेस्ट चढताना फक्त ५-१० मीटर उरलेले असताना किंवा ओबामाशी हस्तांदोलन करायच्या दोन मिनिटे आधी मी खाडकन् जागा होतो. स्वप्नात सुद्धा माझी स्वप्न साकार होत नाहीत. श्शी…. 

अशी चिडचिड करत माझा मेंदू आपण नक्की कशामुळे जागे झालो आहोत ह्याचा विचार करायला लागला. खरं तर माझे काही महत्वाचे अवयव पूर्वीच जागे झाले होते. त्यातले एक-दोन अवयव तर अगदी घायकुतीला आले होते. पण त्यांनी एव्हढ्या वेळा ढोसून सुद्धा माझा आळशी मेंदू काही उठला नव्हता. रात्री झोपताना मेंदूच इतर सगळ्या अवयवांना म्हणाला होता, “अबे साल्यांनो, रात्री काही लागलं तर मला लगेच उठवा. एक तर एव्हढ्या कडक थंडीत तो मूर्ख नितीन आपल्याला ह्या हिमालयात घेऊन आलाय! त्यातून भर संध्याकाळी तो घटाघटा सूप पीत होता. शरीराला dehydration नको म्हणे! आता भोगा त्याची फळं!” 

ह्या बर्फाळ नदीच्या काठावर माझ्या मेंदूला रात्री किती वाजता ह्या अवयवांनी उठवलं कुणास ठाऊक? पण मेंदूला काहीच दिसेना. सगळीकडे कच्चं अंधार! मेंदूला आधी वाटलं की कदाचित मी अख्खा माझ्या मुंडीसकट स्लीपिंग बॅगमध्ये खूप आतमध्ये गेल्यामुळे असा अंधार जाणवतो आहे. एक दीर्घ श्वास घेऊन बघितलं तर गरम हवेऐवजी अगदी थंड सणसणीत कळच डोक्यात गेली. शाळेत कोणी बर्फाचा गोळा पाठीमागे शर्टाच्या आत टाकल्यावर तो हळूच पँटीत गेला की कशी कळ यायची अगदी तशी! थोडक्यात काय, तर माझा चेहरा स्लीपिंग बॅगच्या बाहेर होता आणि सगळीकडेच  सॉलिड अंधार होता. 

मी ट्रेकवर जायच्या आधी कुणीतरी मला “खास” सल्ला दिला होता की, “बाबा रे, बॅटरी स्लीपिंग बॅगेच्या जवळ ठेव. म्हणजे अंधारात जाग आली तरी गोष्टी पटकन सापडतील”. हाहाहा, मूर्ख साला, इतर गोष्टी सापडायच्या आधी मुळात बॅटरी सापडली पाहिजे ना!  त्यातून टेंटमध्ये एकदा तुम्ही झोपलात की डिस्नेच्या सिनेमातल्या सारख्या सगळ्या निर्जीव गोष्टी भांगडा करत इकडे तिकडे नाचायला लागतात. कानटोपी स्लीपिंग बॅगच्या तळाशी सापडते. एक हातमोजा गळ्यात तर दुसरा पँटीत जाऊन बसतो. तशी ही डोक्यावर अडकवण्याची बॅटरी कुठे गेली असेल कुणास ठाऊक? 

तेव्हढ्यात एकदाची बॅटरी सापडली. हातमोजा मला हाताला कडक वाटला तेंव्हा कळलं की त्याच्या आत बॅटरी आहे. झोपताना अगद्दी “आठवणीने” मी ती ठेवली होती. मी मोठ्ठा सुटकेचा निःश्वास सोडला. मग त्या बॅटरीच्या दोन्ही बाजूची elastic शोधत मी ती बॅटरी डोक्याला लावायला सुरुवात केली. 

पण त्याआधी मला ह्या तीन तीन स्लीपिंग बॅग मधून बाहेर येणं महत्वाचं होतं. भर हिवाळ्यात १४ हजार फुटावर हिमालयात येण्याचा आम्हाला किडा होता. आमच्या ट्रेकच्या आयोजकांनी सियाचिन ग्लेशियरवर सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या जुन्या स्लीपिंग बॅग आम्हाला दिल्या होत्या. आमची छाती गर्वाने फुलली होती. इतरही अवयव “फुलले” होते. ​ह्या चांगल्या स्लीपिंग बॅगना चेनच्या आतल्या बाजूला एक लोकरी झापड होती. त्यामुळे म्हणे चेनमधून गारठा आत येत नाही. मी घाईघाईत बाहेरच्या स्लीपिंग बॅगची चेन ओढायला गेलो आणि तेव्हढ्यात चेनमध्ये ती झापड अडकली. चेन पुढेही जाईना आणि मागेही जाईना. त्या अंधुक प्रकाशात नक्की काय झालंय तेही कळत नव्हतं. माझ्या अवयवांच्या धुसफ़ुसण्याचं आता आरडयाओरडयात रुपांतर झालं होतं. एव्हढ्या रात्री वेदनेने माझ्या मेंदूला आईची अगदी कळवळून आठवण आली…. माझ्या आईची नव्हे, त्या स्लीपिंग बॅग बनवणाऱ्याच्या आईची ! 

​तीन तीन स्लीपिंग बॅगमधून बाहेर पडून, हातमोजे, पायमोजे घालून उठून बसलो तर माझं डोकं टेंटच्या आतल्या बाजूच्या छताला लागलं. आतमध्ये चक्क झरझर बर्फ पडायला लागला. नाही, नाही, टेंटच्या छताला भोक पडलेलं नव्हतं. माझ्या श्वासोच्छवासातलं ​बाष्प टेंटच्या आतमध्ये साठून त्याचा बर्फ झालेला होता. काय काय विचित्र गोष्टी अनुभवायला मिळणार होत्या कुणास ठाऊक? आता फक्त शम्मी कपूर आणि सायरा बानू टेंटमध्ये येऊन माझ्या भोवती गरागरा गोल फिरत “चाहे कोई मुझे जंगली कहे” गायचे बाकी उरले होते. 

हा, हा, हा, आता फक्त बूट घातले की झा….लं! बाकीची अवयव सोडा, आता मेंदूच खूप आतुर झालेला होता. मुळात हे बूट साधे नाडीवाले नव्हते. तसे बूट पटकन् घालता आले असते. (निरनिराळ्या नाड्यांमुळे माणसाचा स्वःताच्या आयुष्यावर कंट्रोल येतो असं माझं प्रामाणिक मत आहे. पण ते जाऊ दे.) ह्या गोठलेल्या नदीवरून चालताना नाडीवाल्या बुटात पाणी आत जाऊ शकलं असतं. त्यामुळे आम्ही आतून लोकरीचा थर असलेले रबराचे गमबूट घालून ह्या ट्रेक वर निघालो होतो. हे गमबूट एव्हढा “गम” देतील ह्याची मला काय ​कल्पना? 

गमबूट घालायची एक पद्धत असते. पहिलं म्हणजे ताडासनासारखं एका पायावर उभं राहायचं. रशियन बॅले नर्तिकेसारखं आकाशात तरंगत असलेल्या पायाच्या घोट्याखालचा भाग एकदम टोकदार करायचा. मग खाली वाकून दोन हातांनी बुटाचं भोक मोठं करायचं. ह्या संपूर्ण प्रोसेस मध्ये तुम्ही एका पायावरच उभे, बरं का? मग चपळाईने आकाशात तरंगत असलेल्या पायाचं टोक बुटात घुसवायचं. ते बुटाच्या तळाशी गेलं की त्याला पटकन नव्वद अंशात वळवायचं. मग स्वतःचं १०० किलो वजन वापरून टाच खाली ढकलायची. कधी कधी तुम्ही “आतुर” झालेले असाल तर टोक बुटाच्या अगदी तळात जायच्या आधीच ते वळवता. मग टाच दाबली की बुटात पाय चपखलपणे बसायच्या ऐवजी बूटच वेडावाकडा होतो. त्यातून माझ्यासारखे काही पामर ताडासनात निष्णात नसतील तर त्यांना एका हाताने कशाचा तरी आधार घ्यायला लागतो ते वेगळंच. 

आता माझ्या परिस्थितीचा विचार करा. रात्री दोनच्या सुमारास अंधारात मी लहान बाळासारखा रांगत टेंटच्या बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. अमेरिकन बाळासारखा डायपर किंवा भारतीय बाळासारखं “स्वातंत्र्य” मला उपलब्ध नाही आहे. आता सगळेच अवयव आतुर झालेले आहेत. बाहेर तपमान -१५ C आहे. तुफान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टेंट डूगुडूगु हालतो आहे. आजूबाजूला बर्फ आणि टोकेरी दगडांचा खच पडलेला आहे. शेजारीच गोठलेल्या बर्फाखालून हिमालयातली भली मोठी अक्राळविक्राळ नदी खळखळा वाहाते आहे. बॅटरीचं elastic तुटल्यामुळे कावळ्यासारखी वाकडी मान करून त्या अंधुक प्रकाशात मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा परीस्थितीत दोन पायांवर उभं रहाणं कठीण! एका पायावर मी कसा उभा राहू? 

त्यातून तो जमिनीवर ठेवायचा एक पाय ठेऊ कुठे? अजून त्या पायात बूट घातलेला नाही. सगळीकडे बर्फ आणि टोकेरी दगड. शेवटी एका बुटावरच पाय ठेऊन मी कसाबसा उभा राहिलो. दुसरा प्रश्न. आता उभं राहायला आधार कशाचा घेऊ? टेंट वाऱ्यात एव्हढा गदागदा हालत होता की त्याला धरलं असतं आणि त्यात तो टेंट पडला असता तर? कुठल्याच ​अवयवाला परत कधीही घायकुतीला यायला लागलं ​नसतं पृथ्वीवर! मग हा सगळा ड्रामा स्वर्गात सुरु झाला असता. त्यामुळे मी टेंटला ​धरायचं टाळलं आणि मग तोल जाऊ नये म्हणून एकाच पायावर मी तिथल्यातिथे ​नाचायला लागलो.. पिसारा नसलेल्या मोरासारखा.. लांडोरीशिवाय! (अख्ख्या पाचशे मैलाच्या परिसरात लांडोर जाऊ दे, लांडोरीचं पिससुद्धा अस्तित्वात नसेल.) असा नाच चालू असताना, तो पाय वाकवून दुसरा पाय टोकदार करून खाली वाकून दोन्ही हाताने मी बूट उघडला आणि पटकन तरंगणारा पाय बुटात रोवला. पण टाच काही आत जाईना! आता मोर नाहीसा होऊन माझीच “नाच गं घुमा, नाचू मी कशी” अशी अवस्था झालेली होती. लांडोर नव्हती. पण लांडोरीची मंगळागौर सुरु झालेली होती. तो बूट तसाच वेडावाकडा मुरगळलेला राहिला. बऱ्याच प्रयत्नांनी दुसरा बूट मात्र व्यवस्थित घातला गेला. 

आता एक नवीनच प्रश्न मेंदूच्या समोर उभा राहिला. कॅम्प पासून एव्हढं लांब कशाला जायला हवं? होल वावर इज आवर! पण मग मला सकाळी लीडर बरोबर झालेल्या संवादाची आठवण झाली. मी त्याला विचारलं होतं, “काय रे मिलिंद, रात्री एक नंबरला लागली तर काय करायचं?” त्याने मलाच उलटं विचारलं, “अरे, तू पी बॉटल नाही आणलीस?” पी बाटली? एकदम मोरारजी भाई? हे काय लफडं आहे? त्याने समजावलं, “अरे रात्री टेंटच्या बाहेर जाणं हा मूर्खपणा आहे. टेंटच्या आतमध्ये बाटलीतच एक नंबर करायची आणि बाटलीला टाईट झाकण लावून स्लीपिंग बॅगच्या आत ठेवायची म्हणजे त्याचा बर्फ होत नाही आणि सकाळी बाटली विसळून परत वापरता येते.” शी …. ही कल्पनाच काय भयंकर होती. एक नंबर शरीराच्या आत असणं वेगळं आणि त्या गोष्टीला स्लीपिंग बॅगमध्ये कवटाळून झोपणं वेगळं! श्शी…। त्यातून एक नंबर पूर्ण व्हायच्या आधीच बाटली भरली तर? किंवा झाकण पुरेसं टाईट नसलं तर? अंगावर अक्षरशः काटा आला. माझ्या एकंदर अविर्भावाकडे बघून तो म्हणाला, “तुला पी बॉटल वापरायची नसेल तर नको वापरू, पण मग कॅम्प पासून लांब जायला लागेल किंवा टॉयलेट टेंट मध्ये जायला लागेल.” 

टॉयलेट टेंट! मुळात तो कॅम्प पासून लांब लावलेला होता. त्यातून त्या टेंट मधली खुर्ची ​डोळ्यासमोर तरंगायला लागली, आणि परत एकदा अंगावर शिरशिरी आली. ह्या लोखंडाच्या जाळीदार खुर्चीला मध्ये एक छोटंसं भोक होतं. एव्हढ्या थंडीत त्या लोखंडाच्या खुर्चीत बसण्यापेक्षा विजेच्या खुर्चीत बसून प्राण दिलेला बरा. त्याशिवाय ह्या घाईत रात्री दोनच्या सुमारास ते भोक अचूकपणे शोधणं आणि त्यावर बसणं हे द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने अचूकपणे माशाचा डोळा फोडण्यापेक्षाही कठीण! कॅम्प पासून लांब जाण्याखेरीज काही पर्याय आता उरलेला नव्हता. 

अशक्य! अशक्य होतं, एव्हढ्या लांब जाणं अशक्य होतं. वाटेत चड्डीतच झाली तर? त्या सगळ्याचा दोन मिनिटात बर्फ झाला असता. त्यापेक्षा किडनी मधला खडा परवडला असता. एका पायातला तो वेडावाकडा बूट फरपटत नेऊन नेऊन मी किती लांब नेणार? सगळंच अनावर झालं होतं. लीडर गेला मसणात! तो एक तर झोपलेला तरी असेल किंवा पी बॉटल वापरत तरी असेल. म्हणजे तो टेंटच्या बाहेर येणार नाही हे नक्की! जास्त विचार न करता मी माझ्या टेंटच्या जवळच “ओम भुर्भव स्वाहाः” करायचं ठरवलं. आता हे शिखर सर करायला ५-१० मिटरच उरले होते. मॅरेथॉन शर्यत संपत आली होती 

​नेमका अशाच वेळी मेंदू गाफील होतो. त्याचा त्याच्या अनुयायांवर काहीही ताबा राहात नाही. तो विचार करतो की आता काय, काम झालंच. घोडा मैदान आलंच. तो विसरतो की नितीनने ह्या थंडीत चार चार पँटी घातल्या आहेत. बाहेरच्या दोन पँटीना पोस्ट ऑफिस आहे. (साध्या सरळ चेनला हा असला शब्द कुठल्या गाढवाने शोधून काढला आहे कुणास ठाऊक? पण ते आत्ता जाऊ दे!). पण माझा मेंदू किंचाळला, “पण आतल्या दोन्ही पँटीना पोस्ट ऑफिस नाही.” मी सांगायचा प्रयत्न केला की “बाबा रे, पोस्ट ऑफिस असलेली आतली चड्डी अजून जन्माला यायची आहे.” एखाद्या एव्हरेस्ट वीराने अथक प्रयत्नांनी, अतिशय धैर्याने आणि कुशलतेने शिखर चढावं, आणि शेवटच्या टप्प्यात समोर एक भिंत उभी राहावी! 

पहिल्या दोन पँटीचं पोस्ट ऑफिस उघडल्यावर उरलेल्या दोन पँटीची भिंत त्या वीराने कशी सर केली ह्याची कल्पना मी वाचकांवरच सोपवतो. सगळंच काही लेखकाने सांगू नये. प्रतिभेच्या महासागरात काही डुबक्या मारण्याची जबाबदारी वाचकांचीही आहे. 

पण मी एव्हढं नक्की सांगेन की कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ होता. तुमच्या आशीर्वादाने हे कार्य सुलभतेने पार पडले. गरम पाण्यामुळे बर्फाला तडे जाऊन मी त्या खालच्या नदीत पडलो नाही. नंतर टेंटकडे परतताना आजूबाजूच्या टेंटच्या दोऱ्याना अडकून माझे गुडघे फुटले नाहीत. माझ्या टेंटमध्ये जाताना टेंट धाडकन् पडला नाही. परतल्यावर शांतपणे दाऊदला घाईची कधी लागेल आणि त्याला मी ड्रोनने कसं खलास करीन ह्याचा विचार करत करत मी झोपून गेलो. 

सकाळी उठल्या उठल्या मी लीडरला विचारलं, “मिलिंद, तुझ्याकडे एखादी एक्स्ट्रा पी बॉटल आहे का, रे?”

नितीन अंतुरकर, ऑगस्ट, २०१४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *