ती आणि मी: एक गोष्ट

ती आगन्तुकासारखी माझ्या आयुष्यात अशीच एके दिवशी आली. वाऱ्याच्या झुळूकेसारखी. नकळत, चोरट्या  पावलांनी. माझं लक्ष नसताना!

मी उंच खुर्चीवर पायांना झोके देत बसलो होतो. शाळेतल्या जुन्या आठवणींचा दरवळणारा सुगंध घरात सगळीकडे पसरला होता. वर्गात जसा सुंदर मुलींकडे चोरट्या नजरेने बघायचो तसा ह्या आठवणींकडे सुद्धा मी हळूच वळून वळून बघत होतो. मनाला मोरपिशी गुदगुल्या होत होत्या. ती गौरी… काय गोरीपान होती? लालभडक ओठ. अगदी लखनवी पान खाल्यासारखे. लांबलचक सुंदर केस. त्यातून हळूच तिच्या कानातले डूल दिसायचे आणि माझं हृदय डूचमळायला लागायचं. आणि ती, किनऱ्या आवाजाची जान्हवी. कलेजा साला खलास व्हायचा! असं वाटायचं, असं वाटायचं की तिच्यावरून नजरच ढळू नये. तो वर्ग, ते दिवस, तो काळ संपूच नयेत. पण आठवणींचेच झोके ते! माझ्या हलणाऱ्या पायांच्या झोक्यांसारखेच डोलत होते, नुसतेच तरंगत होते.

तेव्हढ्यात ती मला अचानक दिसली. माझ्या सोफ्याजवळ घरातच अगदी खाली मान घालून उभी होती. लाजरी, बावरी ती!! एका पावलावर दुसरं पाउल ठेऊन ती कसला विचार करत होती कुणास ठाऊक? होती काळी सावळी. पण डोळे विलक्षण तीक्ष्ण होते. तिच्या कमनीय बांध्यावर काळ्या रंगाचा ड्रेस आणि पिवळा चुणीदार तिला फारच शोभून दिसत होता. बोटात बोटं गुंतवून ती जमिनीचा वेध घेत होती. मला कळेचना. ही इथे कशी? कोण घेऊन आलं तिला? दरवाजा उघडा होता की काय? मी तिला विचारलं, “काय गं, तू इथे कशी?” ती काहीच बोलेना. एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे मी हळू हळू तिच्या जवळ गेलो. माझा श्वासोच्छवास वाढायला लागला. मी माझ्या नकळत अलगद तिच्या पाठीवर हात ठेवला. मला काहीच कळेना. मी त्या एकट्या जीवाला धीर देतो आहे की माझ्यातला पुरुष मला तिच्याज वळ खेचत आहे. मन सैरभैर झालं. क्षणभर वाटलं, तिचा हात हातात धरून आकाशात उंच झोका घ्यावा. सगळं जग मागे सोडावं. पण मग तेव्हढ्यातच असंही मनात आलं, की तिला काय वाटेल. ती एकटीच होती ह्या जगात. असा तिचा गैरफायदा घेणं योग्य आहे का? आणि अचानक… मला अंजलीची आठवण झाली, आणि मनात धस्सं झालं.

अंजलीला काय वाटेल? तिचा मी विचारच केला नव्हता. अग्नीला साक्ष ठेऊन सात फेऱ्या मारल्या होत्या आम्ही. आई-बाबांपासून आजीपर्यंत सगळ्या थोरा-मोठ्यांना नमस्कार केला होता. आताच आमच्या लग्नाला पंचवीस पूर्ण होऊन सव्वीसावं वर्ष लागलं होतं. मुलांनी अगदी धूमधडाक्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. आमचे अमेरिकन मित्र अगदी अभिमानाने सगळ्यांना सांगत होते “What a couple!” अंजलीच्या आईचा तर डोंबिवलीहून अगदी आर्जवाचा फोनही आला होतं, “दृष्ट नको लागू देऊ गं तुमच्या गोड संसाराला!” असा त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिला होता. आणि ह्या अंजलीच्या घरात ही बया अशीच मध्ये उभी! माझं आता कसं होणार? माझ्या संसाराचं कसं होणार? मी काय करू? ही नसती आपत्ती माझ्यावरच का?

तेव्हढ्यात दार वाजलं. माझ्या मनाचा ससा दचकला. कावरा बावरा झाला. मी आजूबाजूला बघीतलं. काहीच सुचेना. तिला मी अलगद उचललं. एवढ्या घाईत सुद्धा अंगातून विजेसारखी शिरशिरी चमकत गेली. पटकन तळघरात प्रवेश केला आणि तिला तिथेच उभं केलं. मी म्हणालो, “बाई गं, हलू नकोस. जरा सुद्धा आवाज करू नकोस. ही  माझी बायको तुला कच्ची खाईल (आणि मग मला तळून खाईल).” मी तळघरातून पटकन जिन्याने वर यायला आणि अंजलीने मला बघायला एकच गाठ पडली. मी धापा टाकत होतो. ती म्हणाली, “काय, विचार काय आहे?” माझी बोबडी वळली होती. मी ततपप करत म्हणालो, “व्यायाम करतोय. संध्याकाळी तळण आहे ना घरात. कॅलरी जाळतोय!” अंजली म्हणाली, “काय रे, विसरलास का? MMD (Maharashtra Mandal of Detroit) ची मिटिंग नाही का? तळण कसलं करतेय मी?” हुश्श, सुटलो एकदाचा! मी कसाबसा प्रसंग निभावून नेला खरा!

तिला मी तळघरातच ठेवलं लपवून. रोज मी तिच्याकडे जायचो. तिला हवं नको ते बघायचो. असंच रस्त्यावर कोणाला सोडून देता येतं का? तिची काळजी घेणं हे मला आता क्रमप्राप्तच होतं. विशेषतः अंजलीपासून तिला लपवून ठेवणं हे अतिशय आवश्यक होतं. माझ्या नशिबाने अंजली तळघरात विशेषतः फिरकत नाही हे माझ्या पथ्यावरच पडलं होतं. मला अंजलीचं आकांडतांडव नको होतं. “ही अडचण माझ्याच घरात कुठून आली, ह्या अवदशेला बाहेर काढा” असा घोषा नको होता. माझा संसार सुखाचा होणे हे माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. पण तिचं काय? किती दिवस ती अशी एकटी तळघरात कोंडून घेणार? कोणाची भेट नाही. कोणाशी ओळख नाही. ती काय करणार?

शेवटी मी तिला MMDच्या कार्यक्रमाला न्यायचं ठरवलं. म्हंटलं, जरा चार चौघांच्या ओळखी झाल्या तर तिला बरं वाटेल. तशी ती कामाला वाघ! अशा कार्यक्रमात नाहीतरी मदत लागतेच. त्यातून मी आणि अंजली एवीतेवी वेगळ्या वेगळ्या कारनेच जातो. त्यामुळे हिला कार मधून लपवून न्यायला फारसा प्रॉब्लेम आला नसता. हिला बघून इतरांना काय वाटेल असा एक मनात विचार आला होता. पण ती एव्हढी मनमिळावू! कोणाही बरोबर कामाला लागते असं तिनेच मला सांगितलं होतं. तेही तिच्याकडून आनंदाने काम करून घेतील. “वा गुरु” ह्या जबरदस्त नाटकाचा प्रयोग गुढी पाडव्याच्या निमित्ताने MMD तर्फे सादर केला जाणार होता. सकाळी आठ वाजल्यापासून झाडून सगळी कमिटी कामाला लागणार होती. तेंव्हा म्हटलं, तिला घेऊन जाऊ या.

तो दिवस आला. अंजली आधीच निघून गेली होती. मी शांतपणे तळघरात गेलो. मी तिला विचारलं. तशी ती एका पायावर उडी मारून तयार झाली. बऱ्याच गोष्टी मला घेऊन जायच्या होत्याच. त्या सगळ्या गोष्टी पण तिने पटकन कारमध्ये नेऊन ठेवल्या. आम्ही जेंव्हा Seaholm Highschool ला (जिथे कार्यक्रम होता) पोहोचलो, तेंव्हा ह्या तरुणीला बघून बरेच पुरुष निर्लज्जासारखे धावत आले. तिला हात देऊन कारमधून त्यांनी उतरवायचा प्रयत्न केला. माझ्याकडे बघून त्यांनी असा आव आणला की जणू काही ते मलाच मदत करताहेत. जनाची नाही तर मनाची तरी त्यांना लाज हवी! एक कौस्तुभ सोडला तर बाकी सगळ्यांची तर लग्नसुद्धा झालेली होती. काही जणांना मुलं सुद्धा होती. पण शेवटी पुरुषांची जातच…. ती सुद्धा शहाणी! गेली कौस्तुभचा हात धरून तुरुतुरु चालत. माझ्याकडे ढुंकून सुद्धा न बघता! मला मात्र विचित्र वाटत होतं. परत मनाची द्विधा अवस्था झाली होती. एका बाजूला वाटत होत, गेली एकदाची अवदसा. आता घरात लपवालपवी करायला लागणार नाही. छाती फुगवून स्वतःच्या बायकोच्या डोळ्याला डोळा भिडवता येईल. पण ही अशी मला पाठ दाखवून गेल्यामुळे माझ्यातला पुरुष सुद्धा दुखावला गेला होता. ठीक आहे, माझ्या डोक्यावर टक्कल आहे, पोट सुटलेलं आहे. पुढचा दात पडलेला आहे. पण मी प्रेमळ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात मी तिला मदत केली आहे. त्याचं तिला काहीच सोयरसुतक नव्हतं. शेवटी बायकांची जातच…

संपूर्ण दिवस तिने माझ्याकडे ढुंकूनही बघीतलं नाही. मला ती दिसलीच नाही. मी भयानक अस्वस्थ होतो. प्रभावळकरांचं एव्हढं powerful नाटक. पण माझं त्याच्याकडे लक्ष लागेना. सारखं डोक्यात मुकेशचंच गाणं!

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे!
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा घर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए!!
अभी तुमको मेरी जरुरत नहीं, बहोत चाहने वाले मिल जायेगे….

खरं म्हणजे प्रभावळकर आणि मुकेश ह्यांच्या चेहऱ्यात काहीच सारखेपणा नाही. पण तिकडे स्टेजवर Neuron Motor Disease झालेला मुकेशच खुर्चीवर बसला आहे असं मला दिसायला लागलं. धाप टाकत टाकत मुकेशचं गाणं चालूच होतं.

नाटक संपलं. कमिटीने पटापट सगळं आवरायला घेतलं. ही सगळी माणसं कहर आहेत. एकदा प्रोग्रॅम संपला की इकडचा डोंगर तिकडे करायला ह्यांना पाच मिनिटं सुद्धा लागत नाहीत. अगदी स्टेजवरच्या गोष्टींपासून ते स्वैपाकघरातल्या गोष्टींपर्यंत. सगळं आवरून मंडळी आपापल्या घरी जायला सुद्धा निघाली. पण माझ्या पोटात मात्र गोळा आला! मला काही ती दिसेना. किरण आणि जयदीपला घेऊन मी अख्ख्या शाळेत तिला शोधत हिंडलो. शाळेत स्वच्छता करणाऱ्या सगळ्या बायाबापड्यांना वेड्यासारखं विचारत सुटलो. ही काही आमच्या डोंबिवलीतल्या शाळेसारखी छटाक भर शाळा नव्हती. त्या शाळेच्या अंधाऱ्या, लांबलचक corridor मधून माझे डोळे जेंव्हा तिचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होते तेंव्हा मला कारण नसताना “बीस साल बाद” मधल्या त्या गूढ डोळ्यांची आठवण यायला लागली. शेवटी अतिशय जड मनाने मी घरी निघालो. कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडल्यामुळे घरी जाऊन बरीच मंडळी आनंदात दारू पीत होते. मी माझ्या घरी दुःखात दारू पीत होतो. डोळ्यात पाणी तरळले. तिच्या आठवणीने की जरा जास्तच घेतल्याने… कुणास ठाऊक. पण मनात मात्र काळे ढग साचले होते हे नक्की. डोळ्यासमोर ती तरळत होती आणि कानात मुकेशचं गाणं चालू होतं. “कोई शर्त होती नहीं प्यारमें…” रात्रभर तळमळत होतो. अंजलीने रात्री दोन वाजता मला विचारलं, “तुला झोप का येत नाही आहे? तुझं काय चाललंय?” मी बापडा काय सांगणार. म्हणालो, “अगं, नाटकासाठी खूप काम केल्याने आता पाय दुखताहेत. ही MMD वेड्यासारखी वाढते आहे. आता पन्नाशीनंतर मला हे झेपत नाहीय.” पण डोळ्यासमोर तीच दिसत होती… तोच काळा ड्रेस आणि पिवळा चुणीदार. हाय………काय करू, काय करू!!!

दुसऱ्या दिवशी मी मनोजला फोन केला. त्याला त्या शाळेतल्या माणसांची चांगलीच माहिती होती. त्याला म्हटलं, “मनोज, प्लीज, त्यांच्याशी बोल. ती बाहेर अशीच निर्वासितासारखी राहू नाही शकणार. त्यांना शोध घ्यायला सांग. मिशिगन मधली हवा काय बेकार असते. तिचं काय होईल?” मनात अगदी काहूर माजलं होतं. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मी तिच्या वागणुकीने दुखावलो गेलो होतो. ती कौस्तुभ बरोबर टणाटणा उड्या मारत होती. आणि मी मात्र त्या भरल्या सभागृहात मनातल्या मनात मुकेशचं गाणं गात होतो. आज मात्र त्या दुःखापेक्षा, मत्सरापेक्षा मला काळजीनेच व्यापून टाकलं होतं. पण… पण एव्हढं होऊन सुद्धा माझ्या सरळ मनात चुकूनही असा विचार आला नाही की ती दुसऱ्याचाच हात धरून निघून गेली असेल. कसं असतं मनाचं नाही? जेंव्हा वस्तुस्थिती आपल्याला अनुकूल नसते, तेंव्हा आपण किती सहजपणे सत्याकडे दुर्लक्ष करतो. चालायचंच.मनोजने त्याच्या परीने प्रयत्न केले असतीलही. पण शेवटी ती काही सापडली नाही. पोलिसांकडे तक्रार नाही का करायची असं कदाचित वाचणाऱ्याच्या मनात येईल. पण मी मूर्ख नव्हतो. पोलीस येणार, चौकश्या करणार, ते अंजलीला कळणार, आणि मग मीच रस्त्यावर येऊन मिशिगनभर मुकेशची गाणी म्हणत हिंडणार. हा असा धोंडा स्वतःच्याच पायावर कोणी पाडून घ्यायला सांगितला आहे?

असेच काही दिवस गेले. मनावरचे घाव हळू हळू भरून यायला लागले. रोजच्या ऑफिसच्या रगाड्यात आणि MMDच्या हमालीत तिच्या आठवणी कमी व्हायला लागल्या. तिचा पिवळा चुणीदार वाऱ्याच्या झुळुकीने आकाशात उडाला आहे आणि तरंगत तरंगत येऊन माझ्या चेहऱ्याला, माझ्या शरीराला त्याने लपेटून घेतलं आहे असं गुलाबी स्वप्न मला पहाटे कधीकधी पडायचं. मग मी सुरेश भटांच्या गझला गायला लागायचो. “हल्ली तू रात्री झोपेत तुझ्या भसाड्या आवाजात जरा जास्तच बडबड करतोस” असं अंजली मला तेंव्हा म्हणायची. पण असे प्रसंगही आता कमी व्हायला लागले. पिवळ्या चुणीदाराच्या आठवणी काळाच्या ओघात अस्पष्ट व्हायला लागल्या. कशी मजा आहे बघा, तुफान पावसानंतर डोंबिवलीच्या गटारात कसं चांगलं – वाईट सगळंच वाहून जातं, काळाच्या ओघाचंही तसंच आहे. चांगली आठवण मनाच्या ह्या कोपऱ्यात ठेऊन देऊ या, फक्त वाईट आठवणी वाहून जाऊ देत, असा भेदाभेद काळ करत नाही. थोडक्यात काय तर माझ्या मनातून आणि संसारातून ती नाहीशी व्हायला लागली.

ह्या घटनेला आता महिना होऊन गेला. नेहमीप्रमाणे मी मंजिरी आणि राज ह्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. हे दोघे आमचे जुने शेजारी. (म्हणजे ते जुने नव्हेत. त्यांचं शेजारपण जुनं!) माझ्या पोटात दुःखाचं, निराशेचं मळभ जमायला लागलं, की मी त्यांच्याकडे खादाडीला जातो. मंजिरीच्या हातचा बटाटेवडा, दमालू किंवा साबुदाण्याची खिचडी असं काहीतरी खाल्लं, की मग माझ्या पोटातल्या निराशेचा आणि दुःखाचा कोठा एकदम साफ होतो. बटाटेवड्या बरोबर लसणाची चटणी कुठे आहे असं मी मंजिरीला विचारात असतानाच अचानक राज मला म्हणाला, “अरे, तिला घेऊन जा”. तिला? तिला म्हणजे कुणाला? अचानक माझ्या डोळ्यासमोर पिवळा चुणीदार विजेसारखा चमकला. ती माझ्या शेजाऱ्याकडे कशी? कम्बख्त दोस्त, अरे असा माझा घात का केलास? माझ्या नकळत तिला हा घेऊन आला, हळूच लपवलं आणि मान वर करून आपल्या सख्ख्या बायकोसमोर मला म्हणतो आहे की “तिला घेऊन जा”. राज तर अशा तऱ्हेने बघत होता की काही झालंच नाही. मी त्याला म्हटलं, “तुझ्याकडे?” तो म्हणाला, “नाटकानंतर माझ्या बरोबर आली. मंजिरी म्हणाली, तिला सामान घेऊन जायला वापरू. मी म्हणालो ठीक आहे.” मला राजला गदागदा हलवून विचारावंसं वाटला, “राज, तुला माहिती आहे का तू काय बोलतो आहेस?”

आणि तेव्हढ्यात मला ती दिसली. कोनाड्यातल्या अंधारात उभी होती. तशीच, जशी मला पहिल्यांदा दिसली होती तशीच. अगदी खाली मान घालून उभी होती. तशीच न बोलता, लाजरी. काळी सावळी. तोच कमनीय बांधा, तोच काळा ड्रेस, तोच पिवळा चुणीदार. ती तशीच माझ्याकडे आर्जवाने बघत होती. तिच्या डोळ्यातून मुकेश गात होता,

ज़ब अपनी नजरसेही गिरने लगो, अंधेरोंमे अपनेही घिरने लगो!
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा घर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए!!

बटाटेवडा न खाता मी तिचा हात धरला आणि माझ्या घराच्या दिशेने मी चालू लागलो.

ती…. डॉली आणि मी

नितीन अंतुरकर (मे, २०१२) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *