मी गणपती बाप्पाला आशीर्वाद देऊ शकते का?

(हा लेख अंक निनाद २०२३ च्या वार्षिक दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. मला माझ्या वेबसाईट वर तो प्रसिद्ध करू देण्याबद्दल मी अंक निनादच्या संपादकांचा आभारी आहे.)

दादरच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर बसमध्ये चढल्या चढल्या चिमुरड्या ८ वर्षाच्या ऑलिव्हीयाने विचारले, “मी गणपती बाप्पाला आशीर्वाद देऊ शकते का?” बसमध्ये आम्ही सगळे सपशेल क्लीन बोल्ड!  संपूर्ण मानव जातीला कोड्यात टाकू शकणाऱ्या ह्या प्रश्नाने उरलेल्या ३४ प्रौढांचे मेंदू भंजाळले नसते तरच नवल! सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक, तात्विक अशा वेगवेगळ्या स्तरांवर हा एव्हढा गहन प्रश्न फक्त निष्पाप लहान मुलेच विचारू शकतात. अर्थात ह्याचे एकमताने, एका ठेक्यात उत्तर होते, “हो, तू बिनधास्त देवाला आशीर्वाद देऊ शकतेस”. ह्या  अशा प्रश्नोत्तराने आमच्या देवळांच्या आगळ्या वेगळ्या तीर्थयात्रेचा श्रीगणेशा झाला. 

मी आयुष्यभर खूप खूप हिंडलोय. ५३ देश बघितले आहेत. गालापागोस मध्ये हजारो सरड्यांच्या (Iguana) मधून उड्या मारत वाट काढली आहे. हिमालयात दोर लावून शेकडो फुटी काळ्याकभिन्न बर्फाच्या भिंती चढलो आहे. रणथंबोरमध्ये वाघांचे तीन तीन तास मेटींग बघितले आहे. पॅरिसमध्ये भर दिवसा चोरांनी मला लुटण्याचा प्रयत्न केला आहे. “पैसे शून्य आणि हौस अफाट” अशा थाटात उत्तर भारतात ९०-९० दिवस रेल्वेच्या फलाटावर राहून शहरं बघितली आहेत. एक ना दोन! हीऽऽ भली मोठी यादी होईल ह्या चित्रविचित्र अनुभवांची (१)! पण म्हणतात ना, “काखेत कळसा, गावाला वळसा!” माझ्याच जन्मभूमीतली माझ्याच अंगणामधली दक्षिण भारतातली देवळे मी ह्या उभ्या ६३ वर्षांच्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. शेवटी एकदाचा मुहूर्त लागला. आणि, अक्षरशः माझ्या स्वप्नांच्या पलीकडल्या प्रवासाला सुरुवात झाली. 

ह्या ट्रीपचं नियोजन केलं होतं हेवीने! (कॉलेजमध्ये तो जरा जास्तच heavy होता म्हणून हे नाव!) माटुंग्यात जन्मलेला हा तामिळी! माझा कॉलेजमधला जवळचा म्हणजे अगदी अगदी जवळचा मित्र! तुमच्यापैकी १८व्या वर्षी हॉस्टेलमध्ये कोणी राहिले आहात का? ते सुध्दा फक्त मुलांच्या हॉस्टेलमध्ये? रानटी आणि जंगली मैत्री म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला आहात का? ह्या वयात ड्रग्स, दारू आणि मुली ह्यांच्याशिवायसुद्धा तुम्ही हवेतच २४ तास तरंगत असता. त्यावेळी जमलेली ही घट्ट मैत्री! केमिकल इंजिनीरिंगमध्ये कॉर्नेल सारख्या Ivy League विद्यापीठात Ph.D. केल्यावर हेवी इतरांसारखाच पैशांमागे धाव धाव धावला. ७-८ वर्षांनी मग तो दमला. वैतागला. आणि मग सगळं सोडून हिंदू तत्वज्ञान आणि पुराणातल्या गोष्टी ह्यावर व्याख्यानं द्यायला लागला. हिंदू मूर्ती विकून त्यावर त्याचा उदरनिर्वाह व्हायला लागला. त्यातून त्याचे बरेच अनुयायी जमा झाले. असा हा आमचा हेवी, त्याचा व्यवसाय, त्याचं आयुष्य आणि त्याची ही ट्रिप! 

मी देवळं बघायला खूपच उत्सुक होतो. त्यांचे भव्य स्थापत्य, शिल्पकला, गर्भगृहातील मूर्ती, इतिहास सगळं अगदी अधाशासारखं वाचत होतो. पण मी चक्क हे विसरलो की वारीचा शेवट जरी विठ्ठलाच्या पायापाशी होत असला तरी वारीची सुरुवात वारकऱ्यांबरोबर होते. माझी ट्रिप आगळीवेगळी होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझ्याबरोबर तीर्थयात्रेला निघालेली मंडळी. मूळचे भारतीय असे आम्ही तिघे-चौघेच! बाकीचे २६-२८ जण अगदी अमेरिकेत जन्मलेले अमेरिकनंच होते. पण ती एकेक काय अवली माणसे होती! एकदम जबरदस्त! रॅंडीची भारताची ही ४६वी भेट. तो पंडित रविशंकरांचा सतार वाजवणारा शिष्य. ब्रेंट योग शिकवतो, पण पुराणातल्या गोष्टी सांगत. उदा. देवी माहात्म्यामधील दुर्गा जेंव्हा महिषासुराला नष्ट करते तेंव्हा तिची गोष्ट सांगत आसनं, संस्कृत मंत्र आणि प्राणायाम करत त्याने आमचा एक वर्ग घेतला होता. मार्क हा आमचा फोटोग्राफर. त्याने हॉलीवूडमध्ये दहा पेक्षा जास्त सिनेमे  संपादित  (edit) केलेले आहेत. जेम्स कॅमेरॉन सारखे जगप्रसिद्ध दिग्दर्शक त्याचे जवळचे मित्र आहेत. तो रामायण कोळून प्यायला आहे. डॉक्टर किम ही “Women’s Integrated Health” ह्या विषयातली MD. पण रोग्याची रीतसर तपासणी झाल्यावर औषधे देण्याआधी मंत्रोच्चार, साधना, योग्य ह्याद्वारे रोग्यांची कुंडलिनी जागृत करण्याकडे पण तिचा भर असतो. टोनीच्या आजोबांना राज्यपदावरून पदच्युत करून पूर्व सामोआ इथून हाकलण्यात आले. ते आणि त्यांचे कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाले. तो, त्याची योग शिकवणारी बायको एरिन आणि दोन्ही मुले आमच्या ट्रिपला आली होती. वरच्या पहिल्या परिच्छेदात भन्नाट प्रश्न विचारणारी ऑलिव्हीया ही त्याचीच मुलगी. ह्या आमच्या ग्रुपमधले ११ जण अमेरिकेत योग शिकवतात. त्यातले दोन तर शिक्षकांचे शिक्षक आहेत. त्यातल्या काही जणांनी पातंजलीच्या योगसूत्राचा इंग्रजी अनुवाद सविस्तरपणे वाचला आहे. गोयो हा व्यावसायिक आचारी आहे. तो सगळी पक्वान्ने आयुर्वेदाच्या तत्वानुसार बनवतो. युव्हान ही शिकागोची आफ्रिकन अमेरिकन. तिने मानसशास्त्रात Ph.D. केली आहे. “माझ्या मानसिक रुग्णांना ज्या ज्या पद्धतीने मला बरं करता येईल त्या त्या पद्धतीने मी बरं करणार, मग त्या उपचार पद्धती पाश्चिमात्य असोत किंवा आफ्रिकन, भारतीय किंवा चायनीज असोत.” ही तिची विचार पद्धती. आमच्यात बॉब हा एकमेव “हरे राम हरे कृष्ण” पंथातला. तो आठवड्यातून तीन वेळा बर्फाच्या पाण्यात ५ मिनिटे आंघोळ करतो. “भारतातून पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणारा एकमेव गोरा मनुष्य” अशी तोच स्वतःची ओळख करून देतो. डंकन ३० वर्षाचा! गणितात बाप माणूस! कधीकधी जुगार खेळून पैसे कमावतो. जाझ पियानो जबरदस्त वाजवतो आणि रॅप गाणारा तो शीघ्रकवी आहे. अगदी कीर्तनसुध्दा तो रॅप मध्ये मस्त गातो. राजीव हा आमचा भारतातला आयोजक. त्याने तरुणपणी नंदादेवी आणि सतोपंथ सारखी अवघड शिखरे सर केली आहेत. हे असे अगदी भन्नाट वारकरी! अशी मंडळी मला भेटतील ह्याची मला ट्रीपच्या आधी स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. 

पण हे सगळे वारकरी फक्त अद्भुत व्यावसायिक नव्हते, भारत आणि भारतातील तत्वज्ञानाशी ओळख असलेले फक्त Indophiles नव्हते, तर मजा म्हणजे ते सगळे कोणत्या ना कोणत्या तरी देवाचे भक्त होते. ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या मानाने मी अगदीच लिंबूटिंबू होतो. माझी आजी घरात रोज पूजा करायची, पण ती अगदी घरासमोरच्या देवळात सुध्दा पाय ठेवत नसे. मला पसायदान माहिती होतं, ज्ञानेश्वरी वाचली होती, पण गीता, वेद आणि उपनिषद कशाशी खातात ह्याचा गंधही नव्हता. नरडं ताणून आरत्या म्हणायला मला आवडतात, पण रोज गणपतीची पूजा करायचा कंटाळा. एकंदरीत काय तर मी त्रिशंकूसारखा मधेच लटकलेला होतो. त्यातून मला “ग” ची बाधा! मी महान, मलाच सगळं कळतं, धर्म म्हणजे अफूची गोळी, सगळाच भंपकपणा, बुवाबाजी आणि अंधश्रध्दा, “माझा फक्त सायन्सवरच विश्वास आहे” हे असले विचार डोक्यात! त्यामुळे मन आणि डोळे उघडे ठेऊन नवीन आचारविचार, नवीन तत्वज्ञान ऐकायचे, अनुभवायचे आणि पचवायचे हे अवघड काम होतं. पण ह्या वारकऱ्यांनी संत तुकाराम म्हणतात तशी “माझी वाट अगदी सोपी केली”. एकदा का मी ते अमेरिकन असण्याचे नावीन्य बाजूला ठेवू शकलो की मग त्यांच्या वागणुकीतून, अठरा दिवसांच्या बसमधल्या प्रवासात आणि जेवताना मारलेल्या गप्पांमधून मी खूप म्हणजे खूप शिकलो. 

हेवीने सुरुवातीलाच सांगितलेल्या गोष्टी नवशिक्या विद्यार्थ्यांप्रमाणे अगदी एकाग्रतेने पाळायला सुरुवात केली. देवळात का जायचं ह्याबाबतीत त्याचं म्हणणं असं की कोट्यवधी माणसे हजारो वर्षांपासून ह्या देवळातल्या देवासमोर अतिशय शुद्ध मनाने जातात. त्याची एक सामुदायिक शक्ती त्या गर्भगृहात निर्माण होते. ती शक्ती जाणवून आपलं मन शुद्ध करण्याची ही एक संधी असते. कदाचित म्हणूनच तो म्हणतो की देवाचं आपण दर्शन घेत नाही. देव आपलं दर्शन घेतात. देवांचा कटाक्ष आपल्यावर पडण्यासाठी आपण तयार आहोत का हा प्रश्न देवळात जायच्या आधी स्वतःला विचारा. रामेश्वरच्या देवळाच्या दरवाजावर तर स्वामी विवेकानंदांच्या भाषणाची चक्क पाटी आहे की “अशुद्ध मन घेऊन देवळात जाऊच नका” म्हणून.

आमची ट्रिप एकदम आरामदायक होती. अगदी फाईव्ह- किंवा फोर-स्टार हॉटेलात व्यवस्था. रोज सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत जेवायची सोय. गुबगुबीत बैठकीची बस. एकदा पोटोबा चांगला जमला की विठोबा समजायला सोपा होत असावा. त्यातून माझ्या १८ दिवसांच्या निरंतर खोकल्याखेरीज कोणी आजारी पडला नाही हे आमचं भाग्य. सुरुवातीचा एक दिवस आम्ही मुंबईत होतो. मग चेन्नईला गेल्यावर १७ दिवस बसमधून केरळपर्यंत प्रवास आणि शेवट परत मुंबईत! तामिळनाडूतली बरीच महत्वाची देवळे आणि दोन दिवस केरळमध्ये आराम असं एकंदर ट्रीपचं स्वरूप. पण हेवी हा एक मेंदू सटकलेला माणूस आहे. मुंबईत सर्वांनी लोकल ट्रेनचा आणि BEST बसचा प्रवास करायलाच हवा, दादरच्या रानडे रोडचं फुलांचं मार्केट सकाळी ५ वाजता बघायलाच हवं, जगाचे भौतिक नियम लागू नसलेल्या एकातरी योग्याशी गप्पा मारायलाच हव्यात आणि १-२ ज्योतिषांकडून तुम्ही स्वतःचं भविष्य समजावून घ्यायलाच हवं हा त्याचा अट्टाहास. त्यामुळे “आगळी-वेगळी” हा शब्द आम्ही ह्या ट्रीपमध्ये कोळून प्यायलो. 

स्थापत्याच्या दृष्टीने ही देवळे शब्दातीत आहेत. सगळ्या देवळांची माहिती इंटरनेट वर सापडेल. पण तरीसुध्दा  पहिल्यांदा ही देवळे बघितल्यावर तुमचा जबडा जो उघडेल तो बंदच होणार नाही. ४०-४० एकरांची भव्य वास्तू, हजारो खांब आणि त्यांवरील कलाकुसर, २५० फुटी गोपुरे आणि देवळांची शिखरं, ६-८ फुटी माणसांच्या, देवदूतांच्या हजारो मूर्ती, गरीब-श्रीमंत भाविकांची खच्चून गर्दी हे सगळे शब्दात सांगणे अशक्य आहे. अबबब  ऽऽऽ!  हे  बघून  जर  तुमची “आ” वासलेली जबड्याची हाडे मोडकळीला आली नाहीत तरच नवल. त्यातून तंजावरच्या बृहडेश्वराच्या monolithic पद्धतीने बांधलेल्या जवळ जवळ ३०० फुटी शिखराच्या टोकाला ८० टनाचा दगड कसा पोहोचला असेल? रामेश्वरच्या देवळात समुद्रकिनारी २२ गोड पाण्याची कुंडे कशी बांधली असतील? मीनाक्षी अम्माच्या मदुराईच्या देवळात हजारो पुतळे कोरायला किती वर्ष लागली असतील? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची म्हणजे परत एकदा अबबब ऽऽऽ!!! 

पण ह्या “अबबब” च्या पलीकडे जायला मला फार वेळ लागला नाही. देवळांच्या एकाहून एक सुंदर गोष्टी कळत गेल्या. त्या स्थलपुराणातून भाविकांची स्फूर्तिस्थाने उलगडत गेली. उजव्या सोंडेचा दादरचा सिद्धीविनायक हा “सिद्धी”विनायक आहे, “रिद्धी”विनायक नाही. तो अध्यात्मिक प्रवासाला मदत करतो. रोजच्या रोज बासुंदी, गाडी, बंगला मिळवायला मदत करत नाही. “महा”लक्ष्मी ही देवीमाहात्म्यात वर्णन केलेली तीन देवतांची गँग. समुद्रमंथनातून बाहेर आलेली लक्ष्मी नव्हे! ती गँग नेहेमीच काली (तुमच्यातल्या षड्रिपूंचा म्हणजे वासना, भीती, मद (ego), मत्सर, राग, द्वेष अशा सहा शत्रूंचा नाश करणारी), लक्ष्मी (संपत्ती देणारी) आणि सरस्वती (ज्ञान देणारी) ह्या तीन देवतांच्या स्वरूपात समोर येते. नेहेमीच ह्या देवता सिंहावर आरूढ असतात. कन्याकुमारी म्हणजे बाणासुराला मारण्यासाठी घेतलेला विष्णूचा अवतार. पण ती शंकराच्या प्रेमात पडली आणि आपल्या निर्धारापासून ढळली. नारदाने तिला आठवण करून दिल्यावर तिने परत निर्धार केला आणि बाणासुराला ठार मारले. हा “Kanyakumari Resolve” दक्षिणेत फारच प्रसिद्ध आहे. येथे तपश्चर्या आणि हा निर्धार (Resolve) करून विवेकानंदांनी हिंदू धर्माचा आणि महर्षी महेश योगींनी Transcendental Meditation (TM) चा प्रसार केला. रामेश्वरची कथा तर फारच गहन आहे. रावणासारख्या महान तपस्वीला आणि वेदाचार्याला मारण्याआधी रामाला पूजा करायची होती. पण यज्ञासाठी सर्वात बेष्ट पुजारी कुठून आणणार? त्याने रावणालाच बोलावले. रामाने रावणाला नमस्कार करत त्यालाच ठार मारण्याचा संकल्प सांगितला. रावण रामाला “तथास्तु” म्हणाला. असं म्हणे प्रत्येक देवळाचे स्थलपुराण असते. ते आम्ही शिकत गेलो. देवळात जाताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन माझा कन्याकुमारी resolve कोणता? माझा स्वतःचा धर्म (म्हणजे religion नव्हे, धर्म म्हणजे रोजचे आचार विचार आणि राहणीमान) नक्की काय आहे? मी सिद्धी कशी मिळवायची? अशा प्रश्नांचा विचार सुरु केला तर मला वाटतं तीर्थयात्रा सफल संपूर्ण होत असावी. ह्या तीर्थयात्रेने, हेवीने आणि सगळ्या वारकऱ्यांनी मला ह्या देवळांमध्ये जाऊन स्वतःमध्ये डोकवायला शिकवलं. 

दक्षिण भारतातील आमचं पहिलं देऊळ म्हणजे तिरुवन्नमलई. गावात आणि देवळात वेड्यासारखी गर्दी होती. देवळाच्या आवारात तर ५ लाख माणसं होती. लहान मुले, म्हातारी माणसे, श्रीमंत, गरीब, चिमणी बाळं, तरुण बायका, अक्षरशः माणसांचा महासागर पसरला होता. सगळीकडे आरडाओरडा, मधेच “ॐ नमः शिवाय” चा मंत्रघोष, शंख, घंटा ह्यांचा गजर, चेंगराचेंगरी, लांब लांब लायनी… एव्हढी माणसं अगदी छोट्या जागेत आली तर दुसरं काय होणार? पण एव्हढं सगळं असून सुद्धा गर्दीत एक विचित्र शिस्त होती. कोणीही पुढे घुसत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात अपार श्रध्दा होती आणि दर्शनाची आतुरता होती. आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच बायका होत्या, त्यासुध्दा अमेरिकन! त्यामुळे आमच्यातल्या भारतीयांचे डोळे, कान, मन सगळंच एकदम तीक्ष्ण झालं होतं. पण कुठेही छेडछाड होत नव्हती. बायकांना चक्क सुरक्षित वाटत होतं. गर्भगृहात शिरायचं, आतमध्ये खूप कुठेतरी अंधारातल्या दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात दोन सेकंद शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं, आणि मग आयुष्यभर कृतार्थतेने जगायचं, रोजच्या आयुष्यात माणसांवर आणि जगावर प्रेम करायचं, ह्यालाच कदाचित श्रद्धा म्हणत असावेत. मी पैज लावून सांगतो, की ह्या श्रद्धेच्या महासागरात तुम्ही हेलावून गेला नाहीत तरच आश्चर्य! आत्ता सुद्धा लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी तरळलं आहे. दर्शन झाल्यावर गर्भगृहाच्या बाजूलाच एका दगडी बांधकामाच्या विस्तीर्ण आणि बंदिस्त सभागृहात आमच्या उंबेर्तोने आम्हा सगळ्यांना बसवलं. आणि आम्ही “ओम नमः शिवाय” चा गजर सुरु केला. हळूहळू आजूबाजूच्या हजारो लोकांनी तो मंत्र त्याच ठेक्यात म्हणायला सुरुवात केली. तो सगळ्यांचा आवाज आमच्या रक्तात घुमायला लागला. रंध्रारंध्रातून प्रत्येक पेशी त्या तालावर नाचायला लागल्या. हा ताल, हा नाद, हा नाच, हे गाणं, हे श्वास, हे सगळं सगळं सांगण्याच्या पलीकडचं आहे! पंचेंद्रियांच्या पलीकडचं आहे! 

तिथून बाहेर पडल्यावर एव्हढी गर्दी का आहे ते आम्हाला शेवटी एकदाचं कळलं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तामिळनाडूत “कार्तीगेयम दीपम” नावाचा सण सुरु होणार होता. कार्तीगेयम दीपम म्हणजे दुसरी दिवाळीच!  तिरुवन्नमलई  देवळाच्या बाजूलाच एक उंच डोंगर आहे. तो अख्खा डोंगरच शंकर आहे असं मानलं जातं. चंद्र दिसल्याशिवाय कसा ईद सुरु होत नाही, तसंच ह्या डोंगरावर अग्नीचा उजेड दिसल्याशिवाय हा सण सुरु होत नाही. ह्याच डोंगरावर आम्ही सगळे जण अनवाणी पायाने दोन तास चढलो. वरती रमणा महर्षींनी जेथे तपश्चर्या केली ते देऊळ आहे. खाली देवळात आणि गावात ही एव्हढी खच्चून गर्दी, आणि वरती ह्या देवळात फक्त आम्ही इन मिन ३०-३५ माणसं, तेव्हढीच माकडं आणि दोन रखवालदार. त्या गूढ शांततेत सगळ्या पब्लिकने डोळे मिटून तासभर ध्यानधारणा केली. मी लिंबूटिंबू  असलो म्हणून काय झालं? मी पण ध्यान लावले. दहा सेकंदात मन भरकटायला लागलं. ५-१० मिनिटात टिवल्याबावल्या सुरु झाल्या. इतर माकडांच्या कंपूत अजून एक माकड सामील झालं. आणि अजून एक रमणा महर्षी ह्या जगात अवतरायचे राहून गेले. नंतर बसमध्ये मार्कने मला ध्यानाचा एक सोपा मार्ग सांगितलं. एक मंत्र मनात पकडायचा (तो धार्मिक असायची आवश्यकता नाहीं, अगदी “छत्री”, “पैसे”, “दिवा” असे कुठलेही शब्द चालतील) आणि अगदी रेटून २० मिनिटं गजर लावून बसायचंच. मन भरकटलं तर ह्या मंत्राच्या साहाय्याने परत त्याला जागेवर आणायचं. एका झटक्यात भारतापासून दहा हजार मैलावर राहणाऱ्या मार्कच्या मदतीने एक मूळचा भारतीय अध्यात्माच्या वाटेला लागला. पुढे एका देवळात पातंजलींच्या मूर्तीसमोर ह्याच भारतीयाने (म्हणजे मी) ध्यानधारणेत त्यातल्या त्यात थोडी सुधारणा केली. 

आमचा दुसरा पडाव होता चिदंबरमला. तिरुवन्नमलई हे पंचमहाभूतांतल्या अग्नीचे देऊळ तर चिदंबरम हे आकाशाचे. नटराजाच्या रुपातलं शंकराचे हे अगदी खास देऊळ. असे म्हणतात की पातंजलीला योगसूत्र येथेच सुचले. व्याघ्रपाद  ऋषींनी तांत्रिक पंथ येथेच स्थापला आणि भरत मुनींना भरतनाट्याची स्फूर्ती येथेच मिळाली. इथली गोष्ट सुद्धा मस्त!  तराई जंगलातले ऋषी-मुनी आरामाच्या आयुष्याला सुखावले होते. मग हळूहळू त्यांना स्वतःचा गर्व निर्माण झाला. तो त्यांचा गर्व घालवायला शंकर (एका ऋषीच्या अवतारात) आणि विष्णू (मोहिनीच्या वेशात) जंगलात अवतरले. तेथे तांडवनृत्य करून शंकर-मोहिनीने आपण स्वतः कोण आहोत आणि जंगलातल्या ऋषी-मुनींची औकात काय आहे ह्याची त्यांनी जाणीव करून दिली. आरामदायक आयुष्य, त्यानंतर गर्व आणि त्यानंतर कुठल्याही बदलाला विरोध असं जगातलं अगदी ओळखीचं घातकी चक्र आहे. नटराजाच्या मूर्तीसमोर ते चक्र मोडून आपला गर्व घालवायचा आणि निरनिराळ्या नवीन विचारांना, बदलांना  मोकळ्या मनाने सामोरे जायचे हे त्या गोष्टीचे आणि देवळाचे सूत्र आहे. 

आम्ही येथे संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर अगदी साग्रसंगीत रुद्रहवन केलं. असा विधी मी कधीच बघितला नव्हता. दगडात बांधलेले तीन बाजूंनी बंदिस्त असे प्रचंड सभागृह! आम्ही सगळे पायऱ्यांवर बसलेलो! कमरेखाली लुंग्या-धोतर आणि वरून सगळे पुरुष उघडबंब. बायकांना साड्या घालण्याची आवश्यकता नव्हती, पण पाय आणि खांदे झाकणं आवश्यक होतं! खाली जमिनीवर भला मोठा यज्ञकुंड. त्याच्या एका बाजूला १२-१५ आणि दुसऱ्या बाजूला अजून १२-१५ पुजारी! सगळ्या उघडबंब पुजाऱ्यांचा एकच युनिफॉर्म! जानवं, कपाळाला भस्म आणि लुंगी! टीव्हीवर दिसणाऱ्या चाणक्यासारखे सगळ्यांचे केस लांबलचक. त्यांनी अचानक एकदम Stereophonic Corus आवाजात आलटून पालटून मंत्रघोष सुरु केला. यज्ञाच्या उजव्या बाजूला निरनिराळ्या मोठ्या भांड्यांमध्ये धान्ये, भाताच्या लाह्या, तूप, समिधा वगैरे गोष्टी ठेवल्या होत्या. एका वृद्ध पुजाऱ्याने तरुण पुजाऱ्याला विधीसाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. हळूहळू यज्ञातला तो धूर सभागृहाच्या अगदी वर वर जायला लागला. मग यज्ञकुंडामधून ज्वाळांचे लोटच्या लोट धगधगू लागले. तेव्हढ्यात विजेच्या कडकडाटात प्रचंड पाऊस सुरु झाला. तीन चार वटवाघळे कुठून तरी आली आणि धुरात वर गेली. सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला मृदंगम, नादस्वरम (शहनाई सारखे वाद्य), घंटा आणि शंखाच्या गजरात संध्याकाळची देवीची रोजची मिरवणूक सुरु झाली. तो कडाडणारा पाऊस, ती धुराची वलयं, ती मिरवणुकीची वाद्ये  आणि त्यातूनही जाणवणारा तो मंत्रघोष ! आधीच्या देवळासारखाच हा आणखी एक मंत्रमुग्ध अनुभव! परत एकदा शब्दांच्या पलीकडला! पंचेंद्रियांच्या पलीकडला!

हे विधी कशासाठी? किंबहुना हे देव कशासाठी? देवळं कशासाठी? तीर्थयात्रा कशासाठी? माझ्यासाठी तरी हे प्रश्न मी कदाचित तात्पुरते सोडवले आहेत. एक उदाहरण देतो. सत्यनारायणाच्या पूजेत पाणी भरलेल्या कलशावर नवग्रह ठेवतात. त्या कलशाकडे बघून मला हिमालयातली सुंदर गंगोत्री आठवते. पंडित जगन्नाथाचे गंगालहरी काव्य आठवतं. जगातल्या हजारो नद्यांच्या काठांवरची गावे आठवतात. त्यांची निरंतर संस्कृती, लोकांची ओघवती आयुष्यं आठवतात. मग मला मी जाणवतो. माझ्या धमन्यांमधून वाहणारं युगानुयुगांचं तत्वज्ञान, पूर्वजांच्या आनंदाचे आणि दुःखाचे क्षण सगळं सगळं जाणवतं. पूजेत त्या कलशाला हात लावल्याशिवाय हा असा मी मला कसा भासणार? तसंच तीर्थयात्रेचं! काही कर्मयोगी आई-वडिलांची सेवा करताना देवाला विटेवरच ताटकळत वाट बघायला  लावतात,  नाहीतर  काही  साबरमतीच्या आश्रमात झाडू मारून मोक्ष मिळवतात. संतांना “निधान” आणि “निरंतर” विठ्ठल बघून मोक्षाला जाता येतं. काही जण ज्ञान मार्गाने वेद कोळून पितात आणि मुक्ती मिळवतात. मी तर एक शेणकूट आणि कफल्लक प्राणी! हे असलं काही माझ्या नशिबी ह्या जन्मीतरी नाही. पण तीर्थयात्रेला जाऊन मी माझ्या अंतरात डोकावून पाहायला लागू शकतो. कुठेतरी धडपडत ह्या जन्मी स्वातंत्र्याच्या ह्या प्रवासाचं पहिलं पाऊल टाकू शकतो (मुक्ती आणि मोक्ष ह्या भव्य शब्दांसाठी स्वातंत्र्य हा माझा साधा सरळसोट शब्द!). समर्पित व्हायची भावना जागृत करू शकतो. म्हणून हे विधी, देव, देवळे, तीर्थयात्रा, ही एक धडपड!

कुठेतरी, काहीतरी असंच काहीसं टोनीचं झालं. ती वाहायची फुलं, नारळ, उदबत्त्या, आरती, मंत्र, मोठ्या समया, कपाळाला फासलेलं भस्म आणि लालभडक कुंकू ह्या सगळ्यांमुळे टोनीला त्याचे ६,००० मैलांवरच्या पूर्व सामोआमधले पूर्वज आठवले. आणि हा ३०० पौंडी आणि सहा फुटी टोनी चिदंबरमच्या गर्भगृहासमोर अक्षरशः ढसाढसा रडायला लागला. त्याच्या आजोबांना हाकलवल्यावर त्या सगळ्या कुटुंबीयांनी त्यांच्या संस्कृतीशी संबंध तोडला होता. त्याला अचानक ते धागे ह्या देवळात सापडले. त्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या दोन जणांचे वाढदिवस त्याने आणि त्याच्या १७ वर्षाच्या मुलाने खास सामोआचे पवित्र हाका नृत्य करून साजरे केले (२). त्या दोघांच्या हाका नृत्याचा अफाट जोश, अक्राळ विक्राळ चेहरे, जोरजोरात ठोकलेल्या आरोळ्या आणि त्याचवेळी डोळ्यातले ओघळणारे अश्रू! कसं वर्णू ते दृश्य, ते ऋणानुबंध?

आमच्या ह्या तीर्थयात्रेत हे असे एका पाठोपाठ एक धक्के बसतच राहिले. तंजावरला असताना दुपारी हेवी अचानक म्हणाला, “आज आपण fire yogi रामभाऊंना भेटणार आहोत. गुगलवर जाऊन त्यांच्या विषयीचे व्हिडिओ बघा.” हा योगी रोज १२-१४ तास ध्यानधारणा करतो. गेले २६+ वर्षे दोन केळी आणि एक कप दुधावर राहतो. (म्हणजे इतर वेळी पाण्याचा थेंब सुद्धा नाही). अतिशय साधी १० x १० फुटी खोली, एक सुंदर गणपतीचे मंदिर, कृश शरीर, वाढलेली दाढी, आणि निग्रही चेहरा. टीव्हीवर भाषणे नाहीत, कोणाकडून दक्षिणा नाही, अंगावर दागिने नाहीत, भरजरी शुभ्र कपडे नाहीत. ४-५ दिवसांच्या तपश्चर्येनंतर हे महाराज १२-१२ तास धगधगत्या यज्ञकुंडात झोपू शकतात. आम्ही कसेतरी त्यांच्या छोट्याशा खोलीत उभे राहून बोलू शकलो. अगदी अस्खलित इंग्लिशमध्ये ते म्हणाले, “ह्या क्षणाला मी तुमच्यासारखाच आहे. पण ४-५ दिवसांच्या मंत्रांनंतर तुमचे शारीरिक नियम मला लागू पडत नाहीत. मग मी अग्नीला आलिंगन देऊ शकतो. (३)” सगळी मंडळी बाहेर पडल्यावर मागे रेंगाळत मी म्हणालो, “माझ्या वडिलांना पण रामभाऊ म्हणतात.” मग मी मूळचा महाराष्ट्राचा हे कळल्यावर ते मराठीत म्हणाले, “मी सुद्धा मराठीच. समर्थ रामदास स्वामी हे आमचे पूर्वज.” त्यानंतर माझ्यासाठी त्यांचा खास उपदेश म्हणजे “देव बिव नको. फक्त आई-वडिलांची पूजा केलीत तरी पुरेसं आहे.” बाहेर पडताना त्या गणपतीची मखर मला तंतोतंत आमच्या घरातल्या मखरीसारखी वाटली. माझ्या बाबांची खूप म्हणजे खूपच आठवण आली. कुठला संबंध? कुठलं काय? ही तीर्थयात्रा आणि आयुष्याची तीर्थयात्रा असे जोडले जातील हे कुणाला माहिती होतं?

असे किती किती अनुभव सांगणार? अतिशय सुंदर शिल्पकला असलेली हजार खांबी सभागृहे तीन-चार देवळात तरी बघितली. रामेश्वरच्या २२ कुंडात सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि ओलेत्याने हॉटेलात परत गेलो. कुंडांची नावे तरी  किती काव्यात्मक? संस्कृत श्लोक ज्या छंदांमध्ये केले जातात त्यातल्या तीन छंदांची नावे तीन कुंडांना आहेत. आम्ही रामेश्वरला आमच्या गाईडला खांबांवरच्या चितारलेल्या गोष्टी सांगायची विनंती केली. पाच गोष्टी सांगायला तिला दीड तास लागला. ती म्हणाली, खांबांवर सगळ्या कोरलेल्या गोष्टी सांगायला एक महिना तरी लागेल. रॅंडीने तंजावरला वीणेच्या मैफिलीसाठी जाताना वीणा आणि सतारीतला फरक सविस्तरपणे सांगितला. एका विष्णूच्या देवळात आम्ही सूचना देऊन सुद्धा तिथल्या पुजाऱ्याने आमच्यातल्या एका लेस्बियन जोडप्याला अगदी आग्रहाने पुढे बोलावले आणि अगदी सहजपणे त्यांना हजार वर्षांच्या परंपरेचा भाग बनवले. जगातल्या अगदी पुरोगामी लोकांना सुद्धा कदाचित  झीटच आली असती हे पाहून! पण ह्याच टूरमध्ये दोन देवळात केवळ कातडीचा रंग गोरा म्हणून ह्या आमच्या भाविकांना प्रवेश सुद्धा मिळाला नाही. कन्याकुमारीला विवेकानंदांच्या स्मारकाला भेट देऊन माझ्या आणि अंजलीच्या आई-वडिलांची इच्छा मी पूर्ण केली. पद्मनाभस्वामींच्या देवळात पहाटे ३ वाजता ८००० लोकांच्या रांगेत उभे राहून दर्शन घेताना आरती ऐकली आणि जीव धन्य झाला. चेट्टीनाडमध्ये प्रचंड मोठ्या वाड्यात राहिलो. १५ फुटी रुंदीचा चिटपाखरू नसलेला रस्ता आणि दोन्ही बाजूला ओसाड अवाढव्य राजवाडे, हा सुद्धा अनुभव घेतला. एक ना दोन! असे किती अनुभव सांगणार?

पण कुठल्याही चित्तथरारक सिनेमालासुद्धा क्लायमॅक्स लागतोच. आमच्या नाट्यपूर्ण क्लायमॅक्सचे हिरो होते डंकन आणि जनिता. डंकन हा रॅप संगीत गाणारा शीघ्रकवी तर जनिता म्हणजे कर्नाटकी संगीताची विद्यार्थिनी आणि हेवीची मुलगी. आमच्या समारोपाच्या गप्पांमध्ये ब्रेन्टने हळूच पेटी समोर आणली. डंकनने प्रश्न विचारला, “तुमच्यासाठी शंकर म्हणजे काय?” हेवी म्हणाला, “Auspicious nature of consciousness”, राजीव म्हणाला, “Everything” आणि आमची आवडती राजकन्या ऑलिव्हिया म्हणाली, “To share and give everything that we have”. ह्या तीन मुद्द्यांवर मग रॅप कीर्तन सुरु झालं. मागे जनीताचं रागांवर आधारित गाणं आणि अगदी खर्जातल्या Baritone आवाजातलं डंकनचं रॅप संगीत! “शिव शिव शिव शंभो” च्या ध्रुवपदावर आणि सेल फोनमधल्या ठेक्यावर अजून एका शब्दांच्या पलीकडल्या अनुभवाला सुरुवात झाली. काही वेळाने हॉटेलातले गुजराथी माणसे आम्हाला सामील झाली. मग आम्ही थोडा वेळ “शिव शिव शिव शंभो” च्या तालावर गरबा पण केला. तिरुवन्नमलईला जे जाणवलं, तेच परत एकदा इथे जाणवलं. तोच ताल, तोच नाद, तोच नाच, तेच गाणं, तेच श्वास, तेच ते सगळं सगळं सांगण्याच्या पलीकडचं! पंचेंद्रियांच्या पलीकडचं!

अशा तऱ्हेने ह्या लिंबूटिंबूने कसंबसं धडपडत धडपडत स्वातंत्र्याकडे घेऊन जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या प्रवासाचं पहिलं पाऊल टाकलं.  

नितीन (दाढी) अंतुरकर

(१) माझ्या अनुभवांची यादी:  मराठी: http://www.dadhionthetrail.com/2021/04/11/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5/ English: http://www.dadhionthetrail.com/2022/05/18/my-life-experiences

(२) उदाहरण म्हणून न्यूझीलंडच्या “All Black” टीमचे सामना सुरु होण्यापूर्वीचे हाका नृत्य. बारसं, वाढदिवस, अंत्ययात्रा, खेळाचे सामने अशावेळी हाका नृत्य करायची प्रथा आहे. https://www.youtube.com/watch?v=TI93YHILSgk

(३) Fire Yogi रामभाऊ ह्यांचा You-Tube वरील एक व्हिडिओ (इंग्रजी):  https://www.youtube.com/watch?v=rGUMo4uj_dQ

“साही विवाद करीता पडिलो प्रवाही”

संबंध महाराष्ट्र आणि जगभर विखुरलेली मराठी मंडळी गणपती बाप्पाची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती म्हणून झाली की अक्षरशः त्याच ठेक्यात “दुर्गे दुर्घट भारी” ही दुर्गेची आरती पण लगेच म्हणून टाकतात. ह्या दुर्गेच्या आरतीत दुसऱ्या कडव्यात “चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाही” हे जे दोन चरण आहेत ते अगदी ठेक्यात जगभर सगळ्या घरांमध्ये, टीव्ही वर, प्रचलित गाण्यांमध्ये अगदी जोरात म्हंटले जातात. त्यामागची आख्यायिका (म्हणजे गोष्ट) सांगण्यासाठी हा लेख! 

नरहरी हा एक टपोरी मुलगा. गावातून हिंडताना इकडे कुत्र्याच्या दिशेने दगड भिरकव, तिकडे समोरून येणाऱ्या मुलाला हूल दे, गर्दीत समोरच्या माणसाच्या टपलीत मार असे चाळे करण्यात त्याचा दिवस जात असे. एके दिवशी, दिवसभर अशी टवाळी केल्यावर ग्रीष्म ऋतूच्या रणरणत्या उन्हात तो आणि त्याचे तीन मित्र ह्या गोदावरी नदीच्या काठावरच्या वडाखाली थकून त्या घनदाट सावलीत न बोलता निपचित पडले होते. तिथे अशीच आणखी दोन मुले आली आणि मग ते परत नदीच्या घाटावरून गप्पा मारत उनाडक्या करत निघाले. वाटेत त्यांना दुर्गेचं मंदिर लागलं. आणि झालं! ही दुर्गा भयानक दिसते का सुंदर दिसते ह्यावरून त्यांच्यात भांडण सुरु झालं. वाद वाढत गेला, हमरीतुमरी आणि धक्काबुक्की झाली. कोणीतरी तेव्हढ्यात नरहरीला नदीत ढकलून दिलं. आणि नदीच्या त्या वाहत्या प्रवाहात तो गटांगळ्या खाऊ लागला. पट्टीच्या पोहोणाऱ्या एका मित्राने त्याला कसाबसा बाहेर काढला. हुश्य, जीवावरच बेतलं होतं पण वाचला बिचारा! ह्याच नरहरीने पुढे जाऊन दुर्गेची आरती लिहिली. त्यात त्याला ह्या भयानक प्रसंगाची आठवण झाली. म्हणून त्याने लिहिलं, 

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ! साही विवाद करता पडलो प्रवाही !!

आता ही आख्यायिका कळल्यानंतर तरी ही दुर्गेची आरती म्हणताना नरहरी गटांगळ्या खात असल्याचं दृश्य डोळ्यांसमोर आणायला विसरू नका. “एकमेकांशी भांडू नये” अशी ह्या सुंदर आरतीची सुंदर शिकवण असावी असे वाटते. 

अर्थात काही मंडळींना ही आख्यायिका मान्य नाही. “अर्थात” म्हणण्याचे कारण म्हणजे अशी नाठाळ मंडळी समाजात कायम आढळतात. 

त्यांना वाटतं की “चारी श्रमले” हे चार वेदांविषयी (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद) सांगितले असावे. हे वेद दुर्गेचा अफाट महिमा गाताना अगदी थकून गेले आहेत आणि आता त्यांच्याकडे शब्द उरलेले नाहीत असं नरहरी आरतीतून सांगत असावा. वेद आणि उपनिषदांनंतर काही जणांनी देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाकारला (नास्तिक) आणि काही जणांनी ठेवला (आस्तिक). नास्तिकांच्या तत्त्वज्ञानाच्या काही शाखा म्हणजे (चार्वाक, आजीविक आणि सगळ्यांना माहीत असलेल्या म्हणजे बौद्ध आणि जैन). आस्तिकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या सहा मूलभूत शाखा आहेत. त्या म्हणजे सांख्य (कपिल मुनी), योग (पातंजली ऋषी), न्याय (गौतम ऋषी), वैशेषिक (कानडा ऋषी), मीमांसा (जैमिनी ऋषी) आणि वेदांत (व्यास किंवा बादरायण मुनी). आचार्य शंकराचार्यांनी पुढे आठव्या शतकात अद्वैत वेदांताचा प्रसार केरळपासून ते काश्मीरपर्यंत संपूर्ण भारतभर केला. “ही सहाही तत्वज्ञाने एकमेकांशी वाद घालताना एका बाबतीत अगदी शरण गेली ती म्हणजे दुर्गेची महती” असं आरतीच्या सांगण्यातला गर्भितार्थ आहे असं ह्या तुरळक नाठाळ मंडळींना वाटत असावे. त्यामुळे नरहरीने लिहिले आहे की, 

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ! साही विवाद करता पडले प्रवाही !!

आता आरती म्हणताना “पडलो” म्हणून नरहरीच्या गोदावरीतल्या गटांगळ्या आठवायच्या की “पडले” म्हणून साही तत्वज्ञाने कशी दुर्गेला शरण गेली ते आठवायचे हे तुम्हीच ठरवा. 

गणेश चतुर्थीला अजून ३-४ महिने असताना ह्या आरतीची चर्चा आत्ताच कशाला पाहिजे असा प्रश्न तुमच्या मनात येईल. पण जागतिक मराठी दिन नुकताच साजरा झाला. जनता जनार्दन नुसत्या एका कान्याच्या मदतीने अख्ख्या पाच हजार वर्षांची परंपरा लाभलेलं प्रगल्भ तत्वज्ञान एका फटक्यात कसं फक्त मराठीतच बदलू शकतो हे जागतिक मराठीच्या दिवशी लक्षात यावे म्हणून हा लेख! अरे हो, त्यातून आज जागतिक महिला दिन सुध्दा आहे. ह्या आरतीच्या निमित्ताने एका चांगल्या पुरुष कवीला नदीत बुडवायचा की दुर्गेसारख्या स्त्री देवीचा उदोउदो करायचा हे सुध्दा तुम्हाला ठरवता येईल. कित्ती मज्जा आहे की नाही? 

मोगऱ्याची फुले

Recall mogra’s gone wild … we have been getting about 2.5 sandwich size ziploc’s  for the last 3-4 days but todays gallon size packed is the largest haul of the season… amazing nature 🙏🙏- Vikram

Wow. 😍. Too bad we didn’t get to wear गजरा here. What are you going to do with them. Where do you buy mogara plant – Prajakta

Renuka will tell u I suffocate the gods with flowers 😳😳 – Vikram

विक्रम, 

तू पूजेत देवांना फुलांच्या ओझ्याखाली गुदमरवतो आहेस हे चांगलेच करतो आहेस. पण तुझ्याकडे त्यापेक्षाही जास्त फुले आहेत. तेंव्हा एक काम कर. छान लाल दोऱ्यात गुंफलेला मस्त गजरा तयार कर. तो करताना कदाचित मन हळुवार होऊन तुला सुरेश भटांची छान रोमॅंटिक गाणी आठवायला लागतील. त्या गाण्यांना जवळपास सुद्धा उभं करू नकोस. तुच्छतेने त्यांना लांब झिडकार. असं का ते नंतर सांगतो.  थांब, उतावळा होऊ नकोस. 

आता तो गजरा स्वतःच्याच डाव्या मनगटात बांध. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर तुझ्या सोफ्यालाच राजमहालातला एक तक्का मान. फोर्ड मध्ये डेस्कवर जसा धप्पकन जाऊन मुडद्यासारखा बसायचास तसा बसू नकोस. तक्क्याशी जाईपर्यंत पावलं दमदार हवीत. बसताना मान थोडीशी ताठर आणि तिरकी व्हायला हवी. जगाकडे अतिशय मग्रुरीने आणि तुच्छतेने बघायचा आविर्भाव डोळ्यात दिसायला हवा. विष्णू जसा समुद्रात थाटात बसतो, तसं रेलून बसता यायला हवं. डावा पाय मुडपून उजव्या पायावर ठेवता यायला हवा. मग आता मोगऱ्याचा वास घ्यायला लाग. वास घेताना मान आखडवून उजवीकडे बघायचं. पण लक्ष डावीकडच्या मोगऱ्यावर  पाहिजे. त्यामुळे तुझ्या मनातली अरेरावी वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती तुझ्या चेहेऱ्यावर दिसायला लागेल. 

आता सर्वात महत्त्वाचं! तुझ्या घशातल्या सर्वात खर्जातल्या आवाजात रेणुकाला हाक मार. 

“रेणुका, चांदीच्या वाटीत अत्तरमिश्रित तेल घेऊन ये. आणि दुसऱ्या चांदीच्या परडीत द्राक्ष सुध्दा आण.” 

तुझ्या आवाजातली मग्रुरी तिला जाणवेल. तुझ्या डोळ्यातली जरब त्या जाड भिंगांच्या चष्म्यातून सुध्दा तिला कळेल. अगदी अदबीने तेल आणि द्राक्ष घेऊन येईल आणि तुझ्या डोक्याच्या जवळ डोळे झुकवून विनम्रतेने बसेल. तिला सांग, 

“रेणुका, माझा चष्मा अलगद काढ. नाकाच्या जवळ आणि कानाच्या मागे जरासुध्दा टोचत कामा नये. आणि मग, अगदी हळू हळू माझ्या केसांमधून तेल लावून मॉलिश कर.” 

ही अतिशय अवघड वेळ आहे. सुरेश भटांची रोमँटिक गाणी परत तुझ्या मनात डोकावायला लागतील. त्यांना चार शिव्या हाण. बायकोसमोर मग्रुरी टिकवायलाच हवी. मग तिला अगदी अलगद तुझ्या तोंडात एक द्राक्ष सोडायला टाक. बटाटेवडा कसा गरम तेलाच्या कढईत सोडतो तसं! माझ्या उपमांचा विचार करू नकोस. माझ्या फालतू उपमांकडे बघत बसायला तुला वेळ नाही आहे. आता अशी द्राक्ष खाताना सगळं जग कसं तुच्छ आहे त्याचा विचार करत राहा. 

तुला अचानक कदाचित जाणवेल ही हे अशक्य आहे. कदाचित मोगऱ्याच्या वेलीला शेणकूट दुधीभोपळा लटकू शकेल. पण हे शक्य नाही. पण तू रिटायर्ड आहेस हे विसरून नकोस. स्वप्न बघणे हा तुझा रिटायर्ड-सिद्ध हक्क आहे हे लक्षात घे. आणि परत मोगऱ्याच्या फुलांचं काय करू असा विचार चुकून सुद्धा मनात आणू नकोस. —  नितीन

मी ॲपेलेशिअन ट्रेलकडून काय शिकलो?

ॲपेलेशिअन ट्रेल ही २,२०० मैलांची पायवाट अमेरिकेच्या पूर्वेकडच्या १४ राज्यांमधल्या डोंगरांतून जाते. १० लाख फुटांचा चढउतार असलेली ही पायवाट चक्क बहुतेक देशांपेक्षाही लांबलचक आहे. ही पायवाट सलग ६-७ महिन्यात पार करण्याचा माझा प्रयत्न बऱ्याच निरनिराळ्या शारीरिक दुखापतींमुळे ह्या वर्षीतरी यशस्वी झाला नाही. पण मी जे काही ३३४ मैल चाललो, त्यात शिकलेल्या गोष्टींची ही गम्मत जम्मत!

माझे सगळे पूर्वगृह धुळीस मिळाले. 

तुफान गरमी, चड्डी पासून पोटऱ्यांवर ठिबकणारं घामाचं पाणी, निरनिराळे चढउतार, पाठीवर घेतलेली २६-२७ पौंडांची बॅकपॅक आणि माझं दमलेलं शरीर घेऊन मी एकदाचा “५०१” नावाच्या शेल्टरला पोहोचलो. शेल्टर म्हणजे छत आणि तीन बाजूंनी बंद असलेलं लाकडी घर. ना तिथे संडासाची सोय, ना वीज, ना दिवा, ना पाणी! पण पावसा-वादळामध्ये त्यातल्या त्यात थोडी आश्रयाची जागा म्हणून त्याचा उपयोग. तिथे पोचल्या पोचल्या समोर दिसले ते सहा उघडबंब पुरुष. सगळ्यांचा गांजा ओढण्याचा भाता अगदी जोरात चालू होता. (सगळ्या प्रकारच्या ड्रग्सना गांजा हे मीच दिलेलं मुळमुळीत नाव, बरं का!) ह्यांचे अगदी इंचनइंच देह रंगीबेरंगी टॅटूने कोरलेले होते आणि बाजूलाच भसाड्या आवाजात जोरात रॉक म्युझिक चालू होतं. 

हे सगळं मला नवीन होतं. मी शहारलो. आता हे काय माझ्या नशिबात आहे असा विचार मनात येऊन गेला. त्याचं काय आहे, डोंबिवलीच्या मध्यम वर्गात वाढलेला मी मनुष्य. अगदी सरळसोट मार्गाने झालेला माझा एकमार्गी प्रवास. गांजा तर जाऊच दे, पण २४ वर्षांपर्यंत दारूच्या थेंबालाही मी शिवलो नव्हतो. रॉक म्युझिक नाही, धामडधिंगा नाही, मुलींशी बोलणं सुध्द्धा नाही. साला, अगदीच सरळसोट जिंदगानी होती. आज मात्र इथें मी माझा घामाने पिचपिचीत भिजलेला शर्ट बाजूला काढून त्यांच्यात चक्क गप्पा मारायला जाऊन बसलो होतो. माझ्या शरीराला येणारा घामाचा घाणेरडा वास, लांबलचक वाढलेली दाढी, केसाळ उघडबंब पोट किंवा धुळीने माखलेलं शरीर, सगळंच एकदम त्यांच्यासारखं होतं! त्यामुळेच कदाचित त्यांनी मला त्यांच्यातलाच मानलं असावं. काही का असेना पण आम्ही वेगवेगळी रॉक म्युझिक, वेगवेगळे गांज्याचे प्रकार, ते एकमेकांना कुठे भेटले, त्यांचे ट्रेल विषयीचे अनुभव अशा इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा मारल्या. (गांजा प्यायच्या पहिल्यावहिल्या अनुभवाला मात्र मी नकार दिला.) 

त्यांच्यापैकी एक जण मला म्हणाला की “माझे वडील धर्मोपदेशक आहेत आणि त्यामुळे मी अतिशय बंडखोर झालेलो आहे.” मग रेनमॅनने (हे त्याचं खास ट्रेलवरचं टोपणनाव) त्याला एक अफाट गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “बाबा रे, ऐक. तुला एक अतिशय फंटास्टिक आयडिया सांगतो. मी चक्क एकेका धर्मामध्ये एकेक वर्ष अगदी समरस होऊन जातो. प्रत्येक वर्षी त्या त्या धर्माची पुस्तक वाचतो, त्यांच्या देवळात / मशिदीत / चर्चमध्ये जातो, सगळी प्रवचनं ऐकतो. ध्यान लावतो. असे चक्क 12 वेगळे वेगळे धर्म मी बारा वर्षात पाळले आहेत. त्यामुळे आता मला कुठल्याच धर्माचं अवडंबर वाटत नाही, कुठल्याच धर्माचा मला त्रास होत नाही.” 

ओ माय गॉड! एका छोट्या साध्या वाक्यामधून ह्या भसाभसा गांजा पिणाऱ्या माणसाने माझ्यासारख्या सरळसोट माणसाला केव्हढा जबरदस्त धडा शिकवला! पूर्वग्रह घालवायचा काय साधा आणि सोपा मार्ग सांगितला! जरा विचार करा की मी पुढच्या वर्षी मुस्लिम व्हायचं, मग त्यानंतर ज्यू, मग बौद्ध, मग मॉर्मन वगैरे वगैरे! एका फटक्यात ह्या धर्मांविषयीचे माझे सगळे पूर्वग्रह गायब होतील. एखाद्याची जात, कातडीचा रंग ह्यांविषयी पूर्वग्रह आहेत? मग त्या जातीच्या माणसांना मित्र बनवा. कुठल्याही पूर्वग्रहाचा स्वतः अनुभव घ्या आणि मग चट के फट! सगळ्या पूर्वगृहांना बाय बाय करा! अचानक मला जाणवलं की हा विचित्र मनुष्य देवाचा अगदी आवडता बंदा असावा! (हा लेख लिहिल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की स्वतः रामकृष्ण परमहंसांनी सुध्दा हीच पद्धत वापरून निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास केला होता.)

मी भीतीला तडीपार केलंय.

मला आठवतंय! 8 फेब्रुवारीचा दिवस होता. अजून दोन महिने होते मला ट्रेलवर जायला! माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरने माझी Echo Stress Cardiogram Test करायची ठरवली. त्यात म्हणे मी धावताना आणि विश्रांती घेत असताना हृदय कसं चालतंय ते बघतात. टेस्ट नंतर डॉक्टर म्हणाले, “नितीन, तुझ्या कुठल्याही रक्तवाहिनीत अडथळे नाहीत. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुझं Ejection Fraction फक्त ३५% आहे. म्हणजे प्रत्येक ठोक्याला हृदयातलं फक्त ३५% रक्त शरीरात जातंय. I am sorry. पण तुला ॲपेलेशिअन ट्रेलचं स्वप्न विसरायला लागेल. आपल्याला खरं तर एक ऑपरेशन करायला लागणार आहे.” मी मनातल्या मनात किंचाळत होतो, “साला, हा काय नवीन राडा आहे?” पण चेहऱ्यावरची माशीसुध्दा न हलवता मी डॉक्टरला म्हणालो, “डॉक्टर, पण मला व्यायाम करताना काही विचित्र जाणवत नाही.” त्यांनी मग एक दुसरीच टेस्ट केली आणि त्यात त्यांना Ejection Fraction ४५% आहे असं लक्षात आलं. मी आता पुरताच गोंधळलो होतो. मनाने कधी नव्हे ती कच खाल्ली होती. ट्रेलवर कसं होणार ह्याची चिंता वाटायला लागली. तेंव्हा अंजली, म्हणजे माझी सर्वात जवळची मैत्रीण, mentor आणि अर्धांगिनी, मला म्हणाली, “नितीन, सर सलामत तो पगडी पचास हे खरं. पण जगात फारच कमी माणसं अशी स्वप्नं उराशी बाळगतात. तू हे तुझं स्वप्न ट्रेलवर जायच्या आधीच रद्द करू नकोस. तुझ्या दररोजच्या हालहवालीं वरून ठरव की आपण पुढे जायचं की प्रवास रद्द करायचा.” त्या दिवशी अंजलीने माझ्या भीतीला खुल्लमखुल्ला ठेंगा दाखवला होता. 

माझी भीती वाटण्याची यादी खूप मोठी होती. दोन वर्षांपुर्वीसारखाच हृदयविकाराचा झटका आला तर काय करू? डावा गुडघा धातूचा आहे, तो तुटला तर काय करू? घोट्याच्या खालचे सगळे सांधे गाउटमुळे दुखतात. त्यांचं काय होईल? माझा उजवा हात ६०F तापमानाखाली बधिर होतो, तसं झालं तर? पेन्सिल्वेनिया मध्ये मोठमोठे प्रचंड दगड आहेत. तिथे पडून डोक्याला मार बसला तर? अमेरिकेतल्या छोट्याछोट्या गावातल्या लोकांनी माझ्यासारख्या भारतीय वंशाच्या माणसाला बघितलं नसणार. मग मला ते कसं वागवतील? दर १७ वर्षांनी Cicada हे किडे प्रचंड प्रमाणात जमिनीतून वर येतात. हेच ते वर्ष त्यांच्या जमिनीबाहेर येण्याचं. ते अंगावर चढले तर? १०-१० फुटाचे विषारी साप ह्या ट्रेलवर खूप आहेत. त्यांच्यावर माझा पाय पडला तर? मधमाशी चावली तर, उंदरांनी शेल्टरमध्ये माझ्या पायाचा चावा घेतला तर, ticks चावून मी लुळा झालो तर? एक ना दोन, ही भली मोठी यादी होती भीती वाटण्याची. त्याशिवाय ट्रेलवरच्या गोष्टी होत्याच. वीज अंगावर पडली तर, वादळात झाड उन्मळलं तर, कळकळीची तहान लागली असताना पाणीच सापडलं नाही तर, पावसात पायाखालचे दगड घसरडे झाले तर? 

ही सगळी भीती आता अगदी तडीपार झाली आहे. अक्षरशः चुकून सुध्दा त्यांचा विचार मनात येत नाही. सगळी आई वडिलांची आणि देवाची कृपा!

ह्यामुळे सर्वात मोठा झालेला फायदा म्हणजे ॲपेलेशिअन ट्रेल नावाचं एक अतिशय सुंदर जग माझ्यासमोर उघडलं गेलं. अगदी अलिबाबाच्या गुहेसारखं. मग मी भलंमोठं केसाळ अस्वल उघड्या जंगलात अनिमिष डोळ्यांनी बघू शकलो. Rattle Snake चं rattle होनाजी बाळाच्या अमर भूपाळीच्या तन्मयतेने ऐकू शकलो. बाकी सगळं जाऊ दे, मी चालताना खूप म्हणजे खूपच आनंदी राहू शकलो. आणखी एक मजा म्हणजे प्रत्येक क्षणाला वर्तमान काळात जगायला शिकलो. हे फार म्हणजे फारच अवघड आहे. घरात बसून किंवा भीतीपोटी हे मला कधीच जमलं नसतं! भविष्यकाळाची अधीरता नाही. भूतकाळाची कटकट नाही. १-१, २-२, ३-३, ४-४, प्रत्येक श्वासाला एक अंक मोजायचा. फार म्हणजे फारच मस्त!

नेणिवेच्या पलीकडल्या फार मोठ्या शक्तीची जाणीव झाली.

कुसुमाग्रजांच्या कवितेमधला एक निळा ढग ह्या निरभ्र आकाशात क्षितिजापाशी रेंगाळत दिसू लागला. हळूहळू तो वाघासारखा गुरगुरू लागला. मग असेच आणखी ५-७ ढग गोळा झाले. मग त्यांची काळी-निळी छटा जंगलातल्या ताज्या हिरव्या रंगावर झाकाळायला लागली. ट्रेलवरच्या Pinecone Needles च्या सड्याचा सावळा तपकिरी रंग अजूनच गूढ वाटायला लागला. जणू काही तो निळा-सावळा रंग आकाशातून जंगलात आणि जंगलातून माझ्या मनात प्रतिबिंबित व्हायला लागला होता. आणि.. आणि अचानक जोरात कडकडाट झाला, विजांचा लखलखाट झाला आणि आकाशातून पाऊस सुरु झाला. कानाचे पडदे फाटतील की काय असं वाटणारा कडकडाट. अक्षरशः आकाशातून दशलक्ष धबधबे कोसळू लागले. आणि ते तुफान वारं ! त्याला मी काय म्हणू? अवाढव्य झाडंसुदधा वेड्यासारखे झोके घेऊ लागली. हे झोके म्हणजे आनंदाने डोलणं नव्हतं. हा होता उन्मत्त बेभान नाच. आल्फ्रेड हिचकॉकच्या सिनेमात कसं दार बंद होताना “कुईई” असं आवाज करतं! अगदी तस्साच आवाज हजारो झाडं करू लागली. लाखो पानातून आकाशाला व्यापणारा गडगडाट (हो, ह्या आवाजाला सळसळाट म्हणता येणार नाही) येऊ लागला. उघडे हात आणि चेहऱ्यावर पावसाच्या असंख्य सुया बोचू लागल्या. अख्खी ट्रेलच कोकणातल्या नदीसारखी वाहू लागली. हे सगळं अतिशय घाबरवणारं होतं. मनाचं कोकरू थरथरत होतं. आणि ते अफाट सुंदर पण होतं. कसं सांगू? जंगलाचा हा सर्वात सुंदर असा अवतार होता. अचानक माझ्या मनाची वीज लखलखली. अचानक लक्षात आलं. वेद आणि उपनिषदांनी गायलेलं हेच ते तांडव नृत्य! तोच तो निळा सावळा शंकर नाचत होता आणि मी तोच नाच बघत जंगलाच्या अगदी मध्ये उभा होतो. त्या पावसात माझ्या डोळ्यातलं पाणी कुठे वाहून गेलं ते माझं मलाच कळलं नव्हतं.

असे केव्हढे तरी वेगवेगळे अवतार मी जंगलात बघितले. नेणिवेपलीकडल्या कुठल्यातरी मोठ्या शक्तीच्या मी नक्कीच जवळ पोहोचलो होतो.  

मौन आणि शांतता अनुभवली

ट्रेलवर दिवसभरात एखाद्दुसरं कोणीतरी भेटायचं. आणि संध्याकाळी शेल्टरपाशी कोणाशी तरी तासभर गप्पा व्हायच्या. पण नाही तर मी दिवसाचे २२-२३ तास एकटाच असायचो. सकाळी पक्षांच्या कलकलाटाने जाग यायची. कधीतरी पटकन एखादी खारूताई वाळलेल्या पानांचा आवाज करत पळून जायची. कधीतरी रातकिडे किंवा cicadas त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने अख्ख जंगल व्यापून टाकायचे. कधीतरी पावसाची रिपरिप आणि माझ्या श्वासांचा ताल एक होऊन माझ्याशी संगत करायचा. हाच तो जंगलातल्या शांततेचा आवाज. गोबऱ्या गालाच्या गोड बाळाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या तिटीसारखा. आणि हे सगळं कसं अनुभवायचं? बाकी सगळा कलकलाट बंद करायचा. गाणं नाही, मोबाईल नाही, पुस्तक नाही, काही काही नाही. रक्ताच्या प्रत्येक थेंबाला, प्रत्येक हाडाला, शरीरातल्या प्रत्येक पेशीला ही शांतता अनुभवू द्यायची. अगदी रोज, सगळेच्या सगळे ४५ दिवस अनुभवू द्यायची. 

प्राजक्ता पाडगावकरांच्याच भाषेत सांगायचं तर (फेसबुकचा ग्रुप: माझा मराठीचा बोल): 

मौनात जे सौन्दर्य आहे, ते उपजत असे सृजन आहे. मौन हे केवळ काहीतरी अलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखादं नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे. शांतता, म्हणजे आवाजाचा अभाव नसून, सर्व आवाजाचा एक उच्चतम बिंदु आहे. हयात एक आंतरिक लय आहे, एक सृष्टीशी तादात्म्य आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यात निसर्गाचे माग आहेतशांतता ही एखाद्या डोहासारखी भासते, त्यात पुष्कळ खोल असे काही असते त्याच बरोबर त्यात काही गूढ आणि स्वतःच्या आतले काही ढवळून काढण्याचे सामर्थ्य आहे.”

पुढच्या वर्षी परत स्वतःच्या आतलं काही तरी परत एकदा ढवळून काढायला हवं. 

(हा माझ्याच मुळच्या इंग्रजी लेखाचा मीच मराठीत केलेला स्वैर अनुवाद. माझ्या ॲपेलेशिअन ट्रेलच्या प्रवासाचे असे बरेच इंग्रजी लेख आणि इतर मराठी साहित्य तुम्हाला dadhionthetrail.com ह्या website वर वाचायला मिळतील.)

माझे अनुभव

एखाद्या अनुभवाची खिशातली चुरगळलेली पुरचुंडी उलगडून मी कधीकधी गोष्ट लिहितो आणि तुम्हाला वाचायलाही देतो. पण आयुष्याचं अख्ख गाठोडंच उघडून आत काय काय आहे ते मात्र मी कधीही बघितलेलं नाही. पण आता हाच आग्रह माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनी धरला आहे. ही गाठोड्याला घट्ट बांधलेली निरगाठ सोडवायची कशी? म्हंटलं तर गाठोड्यात फारसं काही नाही आहे आणि म्हटलं तर बरंच काही आहे. आपण असं करू या. हे प्रत्येक अनुभवाचं लांबलचक कीर्तन ऐकून तुम्ही कंटाळण्यापेक्षा मी एकदोन वाक्यात माझे अनुभव फटाफट सांगत जातो. त्या अनुभवांच्या मागच्या सुरस गोष्टींचा तुम्हीच नंतर विचार करा. उदा. “मी नववीत असताना चक्क उठून डोंबिवलीहून रायगडाला चालत गेलो” असं लिहिलं की पायाची टराटर फुगलेली गळवं, दुपारी भर रस्त्यावर स्टोव्हवरती करपलेला भात, दिसेल त्या घरात दार ठोठावून त्यांना आसरा देण्याची विनंती करताना झालेली हुरहूर आणि मिसरूडही न फुटलेली सहावी ते अकरावीतली मुलं ह्या सगळ्या कल्पनेची भरारी तुम्हीच घ्या. त्यासाठी मुद्दामहूनच हे अनुभव काळानुसार सांगितले नाही आहेत. आयुष्याच्या सलग आलेखापेक्षा प्रत्येक अनुभव वेगवेगळा जास्त मजेशीर वाटावा अशी अपेक्षा. एव्हढंच.

आणखी एक महत्वाची गोष्ट. आमची (म्हणजे माझी आणि अंजलीची) दुःखं मी लिहिली नाही आहेत. ती आमच्यापाशीच राहू देत.

मग आता उघडतो हे गाठोडं. होऊन जाऊ दे!!

पाचवी-सहावीत बहुतेक वेळा संध्याकाळी मी गटारात मासे पकडायचो. आणि पावसाळ्यात डोंबिवलीच्या बाजारातून पुराच्या पाण्याबरोबर वाहत येणारी हेंदकाळणारी कुजकी संत्री पुलाच्या काठावर बसून झेलायचो. फारच मजा यायची. एकदा गटारात उलटं पडल्यावर शाळेतल्या बाईंनी कान धरून बाहेत खेचलं होतं. सॉलिड वाट लागली होती.

नववीत रायगडला धाकटा भाऊ आणि ३ मित्रांबरोबर चालत गेलो. ७-८ दिवस लागले. रोज रात्री कुठे राहणार ते माहित नव्हतं, दिवसा काय खाणार ते माहित नव्हतं. आई-बाबा “हो” म्हणाले आणि आम्ही निघालो. सगळंच अगाध!

कॉलेजात शिव्या द्यायला खूप आवडायचं. Netflix वरच्या Sacred Games सारखं अगदी प्रत्येक वाक्यात दोन दोन शिव्या असायच्या. मी शिव्या देताना कुणा पांढरपेशा मुलाचा चेहरा कावराबावरा झाला, तर त्याला मी “ती फुलराणी” मधला पुलंचा दाखला द्यायचो, की “शिव्या म्हणजे भाषेचे दागिने” वगैरे वगैरे. हॉस्टेल मध्ये एकदा शिव्यांच्या स्पर्धेत दुसरा नंबर सुध्दा आला होता. घरी किंवा थोरामोठ्यांच्या सहवासात मात्र शिव्या देणं कटाक्षाने टाळलं.

अकरावीला इतर दहा मित्रांनी फूस लावल्याने चेकाळून उच्च गणित (Higher Math) घेतलं. सॉलिड किडा होता. मुख्याध्यापक शिकवायला तयार नव्हते. शेवटी आमच्या वर्गातल्या सज्जन मुलांनी सरांना पटवलं आणि मग शाळेत उच्च गणित शिकलो. मजा म्हणजे अरुण जोशीने चावी मारल्याने आठवा (Extra) विषय म्हणून उच्च अंकगणित (Higher Arithmetic) पण घेतलं होतं. अख्ख्या शाळेत ते तिघांनीच घेतल्याने ते मात्र आमचं आम्हालाच शिकायला लागलं.

अंजलीच्या आई-वडिलांबरोबर माझं चांगलंच गुळपीठ होतं. भारतात गेल्यावर मी चक्क दोन-दोन तास अंजलीच्या आईशी गप्पा मारत बसायचो. असीमच्या (अंजलीच्या भाच्याच्या) लग्नात ह्या सगळ्या नात्यांना परत उजाळा मिळाला. खूप म्हणजे खूपच धमाल केली. 

आतापर्यंत ५२ देशात प्रवास केला आहे. प्रत्येक देशातली खास खादाडी करायची, माणसं बघत हिंडायचं आणि निसर्गात मनसोक्त भटकायचं हा माझा / आमचा खाक्या. प्रेक्षणीय स्थळं बघण्याचं अप्रूप आता संपलं आहे. बाकी काही नाही तरी प्रत्येक गावचा बाजार मात्र बघायला नक्कीचआवडतो. गालापागोस, अमेझॉनचं जंगल आणि टांझानिया सारख्या काही सुपर जागा विसरल्या जाणं कठीण आहे. आणि आई-बाबांसकट संपूर्ण अंतुरकर खानदानाबरोबर केलेला  न्यूझीलंडचा प्रवास? तो कसा विसरला जाईल? आईचा उत्साह आणि बाबांची नातवंडांबरोबर चाललेली सदोदित मस्करी परत अनुभवायला नाही मिळाली. 

हिमालयात ३०० पेक्षा जास्त दिवस ट्रेकिंग केलंय. एकदा कालाबलंद मोहिमेत सलग ४०-४५ दिवस बर्फरेषेच्यावर राहायला लागलं होतं. आमच्याकडे पैसे, पोर्टर्स आणि इंधन ह्या सगळ्यांचीच वानवा! ​ पाणी वितळवायला इंधन वापरायला लागत असल्याने पाणी पिण्यासाठी वापरणं महत्वाचं होतं. मग आंघोळीला आणि दात घासायला बुट्टी. हो, हो, अगदी सलग ४५ दिवस. कित्ती मज्जा! बऱ्याच मित्रांना माझा चेहरा बघून हल्ली पण हा अंघोळ करत नाही की काय असं वाटत असावं. पण ते जाऊ दे.

टाटा ऑटोकॉम्प मध्ये असताना चार जॉईंट व्हेंचर्स भारतात प्रस्थापित केली. नंतर बोर्ड मेंबर ह्या नात्याने त्यांचं संगोपनही केलं. सध्या त्या कंपन्या जोरात चालू आहेत. आमच्या कंपनीचे अध्यक्ष स्वतः रतन टाटाच असल्याने दर तीन महिन्यांनी त्यांची भेट होत असे (टाटा ग्रुपच्या २०० हुन अधिक कंपन्या असल्याने श्री टाटा फक्त काहीच कंपन्यांचे अध्यक्ष होते.) एकदा मी, माझा बॉस आणि श्री टाटा अशा तिघांनाच एकत्र लंच घेण्याचा योग्य सुध्दा आला होता. ह्या अफाट गुरूकडून बरंच काही शिकलो आणि कोणालाही लाच ना देता कंपनी चालवू शकलो.

हा अनुभव म्हंटला तर आमचा, म्हंटला तर मुलांचा. आरती आणि तेजस साधारणतः ४ आणि ६ वर्षांचे असताना आम्ही त्यांना चक्क मुंबईहून सिडनीला भावाकडे एकटं पाठवलं. मध्ये सिंगापूरला त्यांनी विमान सुध्दा बदललं. अर्थात हे सगळं हवाईसुंदरींच्या मदतीने. नंतर मात्र आमचं अवसान गळालं आणि परतीच्या प्रवासाला मी त्यांना आणायला गेलो होतो. ह्या मुलांना आणि भाऊ-वहिनी-भाचा ह्यांना एकमेकांचा एव्हढा लळा लागला होता की निघताना माझ्याखेरीज उरलेले सगळे घळाघळा रडत होते. तो मुलांचा लळा अख्ख्या अंतुरकर खानदानाशी अजून तेव्हढाच टिकून आहे. ह्या आमच्या कुटुंबातलं पहिलं-वहिलं लग्न, युतीका-प्रिन्स मधलं, हा असाच आमच्यातले दुवे घट्ट करणारा अफलातून अनुभव होता.

एकदा एका उत्पादन प्रकल्पासाठी चिंचवड प्राधिकरणाच्या मुख्य माणसाला भेटलो. त्याने मला ६ कोटी रुपये मागितले. ३ कोटी त्याला आणि ३ कोटी एका राजकीय पक्षाला. मी पडलो टाटा ग्रुपचा मनुष्य आणि माझ्या आई-बाबांचा मुलगा. त्या माणसाच्या नाकावर टिच्चून शेवटी हिंजेवाडीत प्रकल्प उभा केला. टाटा ग्रुपने अख्खी पॉवर लाईन आधीच स्वतःच्या खर्चाने हिंजेवाडीत आणली होती. (आणि मजा म्हणजे त्या जोरावर मग महाराष्ट्र सरकारने तिथे हल्लीची प्रसिद्ध सॉफ्टवेअर पार्क पण उभी केली. आमच्या नशिबाने सरकारने टाटा ग्रुपला क्रेडिट तरी दिलं.) सध्या हिंजेवाडी एकदम जोरात आहे. भ्रष्टाचाऱ्याला टिंगणी दाखवून यशस्वी प्रकल्प असेही उभे राहतात.

खादाडी खूप म्हणजे खूपच आवडते. नाकतोडे, घोडे, मुंग्यांची अंडी आणि मगरी खाऊन सुदधा शेवटी गाडी बासुंदीवरच येऊन थांबते. माझ्या पोतडीत नुसत्या खादाडीवर सुध्दा बऱ्याच गोष्टी आहेत. मराठी असून सुदधा मुगाची खिचडी, पिठलं, भाकरी ह्या अशा गोष्टी मला आवडत नाहीत. “अर्थात, नाहीच आवडणार. ह्या गोष्टी पटकन करता येतात ना!” इति आमच्या घरातल्या महाराणीसाहेब.

हा पुढचा अनुभव तुम्हाला उमजणं जरा कठीणच आहे. कालाबलंद मोहिमेमध्ये एका कॅम्पमध्ये मी आणि नितीन धोंड दोघेच होतो आणि अचानक खूप बर्फ सुरु झाल्याने तंबूत २-३ दिवस अडकलो होतो. पाच फुटांवरचं पण दिसत नव्हतं. तंबू छोटा. फक्त आडवं झोपण्याएव्हढा. दर दोन तासाने बाहेर जाऊन सारखा तंबूवरचा बर्फ काढायला लागत होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बर्फाचं वादळ किती दिवस चालणार हे माहित नसल्याने जेवणाचं आणि पाण्यामुळे इंधनाचं रेशन करायला लागत होतं. मानसिक परीक्षा घेणारा हा अफलातून अनुभव होता.

त्याच कालाबलंद मोहिमेतली आणखी एक मजा म्हणजे त्या एकाच मोहिमेत आम्ही चक्क सात शिखरं सर केली. त्यातली तीन शिखरं तर आत्तापर्यंत कोणीच सर केलेली नव्हती. तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल की International Mountaineering Federation अशा गिर्यारोहकांना ह्या शिखरांचं बारसं करू देते! आणि मग अशी नावं जगातल्या सगळ्या नकाशात प्रसिद्ध होतात. आम्हाला ह्या तीन शिखरांना नावं देण्याचा मान मिळाला हे खरं! पण तिथल्या स्थानिक परंपरा आणि भाषेनुसार ती नावं देऊन मला वाटतं आम्ही तिथल्या स्थानिक लोकांचा गौरवच केला. त्याचाच आम्हाला जास्त अभिमान वाटला. 

मला साठाव्या वर्षात चक्क हार्ट अटॅक आला. ह्या प्रकारच्या तीव्र STEMI अटॅकला चक्क म्हणे “widowmaker” अटॅक म्हणतात. माहेरचं दार ठोठावलं होतं. पण “त्यांनी” उघडलंच नाही. आई वडिलांच्या कृपेने वेदना आणि चिंता दोन्हीही अक्षरशः जाणवल्या नाहीत. एव्हढा व्यायाम लहानपणापासून करत असून आणि कुठेही ब्लॉक नसताना रक्तवाहिनी कशी बंद पडली असला विचार मनात आला नाही. पाच दिवस ICU मध्ये सगळ्या नर्स आणि डॉक्टरांबरोबर नुसते धमाल विनोद चालू होते. हाहाहा, अनुभव फक्त आपल्याला पाहिजते असेच असावेत असं थोडंच कपाळावर लिहिलेलं असतं!

कॉलेजात जिम्नॅस्टिकस करायचो आणि निरनिराळ्या स्पर्धेत भाग घ्यायचो. आर्मीमधले खत्री सर आमचे प्रशिक्षक होते. चपलेने मारायचे. “वेदना होत असताना आनंद घ्यायला शिका” हा मानसिक मंत्र शारीरिक खेळ खेळताना त्यांनी शिकवला.

दहावीत इंग्रजीत ४६ / १०० मार्क मिळाले. चेम्बुरकर बाई घरी आल्या. आई बाबांना म्हणाल्या “ह्याचं काही खरं नाही.” मग आई-बाबा मला म्हणाले, “तू हुशार आहेस. तू आणि तुझं भवितव्य, तुझं तूच बघ.” ह्याला म्हणतात Ultimate Empowerment. ह्या अनाडी आई-बापांनी माझी मग प्रोफेसर गाडगीळांशी गाठ घालून दिली, जे SIES कॉलेजात विंदा करंदीकरांबरोबर इंग्लिश शिकवायचे. पुढचे ३०० दिवस रोज एक निबंध लिहून त्यांच्याकडून तपासून घ्यायचो. अजूनही अवघड शब्द दिसला की अंजलीला विचारायला लागतो. उदा. Bard म्हणजे शेक्सपिअर हे मला मागच्या आठवड्यात कळलं.

१९७५च्या आणीबाणीने सगळीकडे घबराट निर्माण झाली आणि डोंबिवलीचे बरेच कुटुंबप्रमुख जेल मध्ये गेल्याने माझ्या माहितीतल्या कित्येक कुटुंबांची धूळदाण उडाली. आणीबाणी उठल्यानंतर आम्ही काही जण चक्क चादरी घेऊन दुर्गा भागवत आणि पुलंच्या सभांमध्ये निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचो. माझा अविस्मरणीय अनुभव म्हणजे वयाच्या १७व्या वर्षी माझी पोलिंग एजन्ट म्हणून मुंब्र्याला झालेली नियुक्ती. मतदान केंद्र आतून काळं असतं की गोरं हे ही माहिती नव्हतं. जीव मुठीत धरून ह्या मुस्लिम वस्तीतल्या मतदान केंद्रावर जनता पार्टीचा ड्रेस घालून बसलो होतो. चक्क एका मुस्लिम म्हाताऱ्या बाईने मला मतदान केंद्राच्या आत जेंव्हा रानफूल आणून दिलं तेंव्हा कुठे हुश्य झालं, आश्चर्य वाटलं आणि जीवात जीव आला. त्यावेळी मुंब्र्याने म्हाळगींसाऱख्या संघ प्रचारकाला डोंबिवलीपेक्षा जास्त टक्क्याने मतदान केलं होतं. आता इथे अमेरिकेतल्या कर्मभूमीत, आणिबाणीसारख्या परिस्थितीत, परत निवडणुकांच्या प्रचारासाठी उतरलो होतो. पण हे आयुष्यात दोनदाच! परत कधी उतरायला लागणार नाही ही अपेक्षा.  

बाबांच्या नाका-घशात आणि ओठांवर मांस वाढायचं. ते दुखत नसलं तरी ते लालभडक मांस फारच किळसवाणं दिसायचं आणि हळूहळू श्वासोच्छवास बंद व्हायचा. मग दर ६ महिन्यांनी सरकारी इस्पितळात बाबांचं ऑपरेशन व्हायचं. त्यांचा घसा उघडा ठेवून जमा झालेलं रक्त दर १० मिनिटांनी vacuum लावून काढायला लागायचं. बऱ्याच वेळा मी असं रक्त काढत रात्री-रात्री जागून काढल्या आहेत. नंतर टाटा मेमोरियल मधल्या एका लसीने अचानक त्यांचा हा प्रॉब्लेम नाहीसा झाला. असेही असतात एकेक अनुभव. त्यातलीच एक मजा म्हणजे त्यांचं ओठांवरचं लालभडक मांस बघून लोकल ट्रेन मध्ये त्या एव्हढ्या गर्दीत सुदधा कोणीही आमच्या जवळ फिरकायचे सुध्दा नाहीत.

बाबा होते कामगार आणि आई होती प्राथमिक शाळेतली शिक्षिका. दोघेही कधी कॉलेजात गेले नाहीत. दोघेही अकरावीत एकदा दोनदा नापास झालेले. अजून शिक्षण नकोच हा विचार. बाबांच्या कंपनीत सारखा संप व्हायचा. मग घरात दोन वेळा जेवायची सुध्दा भ्रांत असायची. बाबा अशावेळी चहा आणि तेल घाऊक प्रमाणात विकत आणायचे आणि घरोघरी जाऊन विकायचे. कधीकधी मी पण ते विकायचो. गणितातले खास Laplace Transform आणि Eigen Value वगैरे शिकण्यापेक्षाही हे अनुभव खूपच महत्वाचे. त्यातून हा प्रकार विद्यापीठात शिकायला मिळत नाही. पण हे पालकांना समजावणार कोण?

माझ्या सातवीपासून ते कॉलेजात जाईपर्यंत आमच्या घरात सकाळी ८ पासून ते संध्यकाळी ७ पर्यंत आई-बाबांनी स्थापन केलेल्या शाळेच्या चार तुकड्या चालायच्या. स्वैपाकघर आणि छोटीशी बाल्कनी सोडली तर इतर ठिकाणी उभं राहायला सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे माझं सगळं आयुष्य गच्चीतच गेलं. तिथेच “जयोस्तुते” पाठ केलं, तिथेच धाकट्या भावांना शिकवताना भांडी फेकून मारली, तिथेच चावट पुस्तकं वाचली आणि तिथेच अकरावीला मरमरून अभ्यास केला. अरे हो, बाबा चहा, तेल घरोघरी विकायचे पण शाळेकडून त्यांनी भाडं कधी घेतलं नाही. असे होते माझे रोल मॉडेल्स!

७ वर्षांपूर्वी एक हिवाळ्यातली अफलातून धोकादायक पण अतिसुंदर ट्रेक केली. लडाखच्या गोठलेल्या झान्स्कर नदीवरून १०-१२ दिवस चालत गेलो. लय भारी अनुभव. दोन वेळा अवस्था कठीण झाली होती. एकदा त्या थंडगार कमरेएव्हढ्या पाण्यातून ८-९ मिनिटं चालायला लागलं. त्या पाण्याखाली घसरडा बर्फ. नदीचा आवेग प्रचंड. १०-१५ मिनिटे त्या पाण्यात पाय राहिले तर काळे-निळे होऊन कापायला लागतील अशी भीती गाईडनेच घातलेली. “ठंडे ठंडे पानी में” हे गाणं म्हणू की अथर्वशीर्ष म्हणू अशी अवस्था झाली होती. दुसरा अनुभव म्हणजे एका ठिकाणी नदीवरच्या बर्फात पाय अडकला. खाली खोल नदीचं खळाळणारं पाणी बोलावत होतं आणि बर्फाला तडा जाऊन मी पाण्यात पडू नये म्हणून आडवं पडून तिघे जण मला काढायचा प्रयत्न करत होते. शेवटी बाहेर निघालो. नंतर पायात संवेदना यायला एक महिना लागला. खूप वेळा घसरून पडल्याने माकडहाड सरकलं होतं. घरीदारी आणि ऑफिसमध्ये एका टायर वर बसून वर्षभरात ते शेवटी जागेवर आणलं.

IIT मध्ये दुसऱ्या वर्षात असताना लक्षात आलं की आजूबाजूला मित्रांनी बराच प्रवास केला आहे. मी आणि अरुण जोगेश्वरी आणि पुणे ह्याच्या पलीकडे गेलेलो नाही. पण प्रवासाला पैसे कुठून आणायचे? तरीसुध्दा दोघेजण ९० दिवस उत्तर भारतात हिंडलो. फक्त ११ दिवस हॉटेलात राहिलो. श्रीनगर, अनंतनाग आणि आग्रा. बाकी ठिकाणी रेल्वे फलाटावर झोपलो. भिकाऱ्यांशी गप्पा मारल्या. आणि त्यांनीच शिकवल्यानुसार दोन रुळांच्या मधल्या पाण्याच्या पाईपलाईन खाली अंघोळ केली. सगळी शहरं चालत बघितली. अजमेरच्या दर्ग्यावर श्रद्धेने चादर चढवली आणि सुवर्ण मंदिरात लंगर केलं.

माझ्या आणि अंजलीच्या आयुष्यातले दोन सुवर्णदिवस म्हणजे आरतीचा MIT मध्ये आणि तेजसचा Univ of Chicago मध्ये प्रवेश. अगदी जवळचे दोन मित्र सोडले तर ह्या महान विद्यापीठात माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. सगळी मेहेनत त्यांची, अभ्यास त्यांचा, पण आम्हाला इतर पालकांसारख्या फुकट क्रेडिट घेत टणाटण उड्या मारायला काय जातंय? जगावेगळा विचार करण्यात ह्या मुलांनी किती तरी वेळा आमची दांडी उडवली आहे.

मी कॉलेज संपेपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अगदी कर्मदरिद्री होतो. कधी नाटकं बघितली नाहीत. गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो नाही. पैसे नव्हते हे खरं. पण फुकट कार्यक्रम सुध्दा कधी बघितले नाहीत. IIT मधल्या मूड इंडिगो ह्या दोन दिवसांच्या सांस्कृतिक सोहोळ्यात मी चक्क भीमसेन जोशींचा कार्यक्रम आखण्यात मदत केली होती. पण ५ मिनीटं सुध्दा तो कार्यक्रम बघितला नाही. आता दहा फुटांवरून संजीव अभ्यंकर आणि कौशिकी चक्रवर्ती ह्यांच्या मैफिली ऐकतो, जगप्रसिद्ध गायकाबरोबर बरोबर गप्पा मारत बसतो आणि प्रख्यात नाटककार आणि गायक आमच्या स्वैपाक घरात १५ मिनिटं सुंदर गाणं गातो. अशा वेळी माझा आधीचा कर्मदरिद्रीपणा मला जास्तच जाणवतो.

माझ्या आयुष्यात गुरु, शिक्षक, मित्र ह्या नात्याने काही भन्नाट माणसं भेटली. काहींनी आवड म्हणून आयुष्यभर गिर्यारोहण केलं, काही आयुष्यभर ब्रीज खेळले, पर्रीकरांसारखे काही जण “Mr Clean” अशी इमेज असलेले राजकारणी झाले, वसंत लिमये सारखे लेखक झाले, राजू भट सारखे शेतकरी झाले. काहींनी गणितात महत्वाचं संशोधन केलं, काहींच्या पुस्तकांनी अख्खे नवीन विषय निर्माण झाले आणि काही जण विख्यात जागतिक कंपन्यांचे CEO झाले. मला नुकताच कळलं की माझे एक कॉलेजमधले शिक्षक, श्री द्रविड, हे गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचे पहिले शिष्य होते. ही बहुतेक सगळी मंडळी जमिनीवर पाय ठेवून जग बदलण्यात अगदी मग्न आहेत. ह्या भन्नाट व्यक्तींनी माझं आयुष्य इंद्रधनुष्यासारखं अगदी रंगीबेरंगी केलंय. त्यांचे हे ऋण फेडण्याच्या पलीकडले आहेत.

माझे आणि अंजलीचे ३६ गुण जुळतात. म्हणजे “३” आणि “६” चे आकडे कसे अगदी, म्हणजे अगदी, एकमेकांच्या विरुद्ध असतात, तसं काहीसं आमचं आहे. काही म्हणजे काहीही साम्य नाही. तिला पातळ आमटी तर मला दाट, तिला कोथिंबीर हवी तर मला नको, ती कमी खाते तर मी खूप, तीला खर्च करायला आवडतो तर मला नाही. एक ना दोन, हजारो फरक. पण नीतिमूल्यं आणि सगळ्यांशी एकत्र संबंध ठेवण्याची दुर्दम्य इच्छा ह्यात आमचं जरासुध्दा म्हणजे जरासुध्दा दुमत होत नाही. उगाच नाही आई-बाबांनी थोरल्या सुनेला त्यांच्या थोड्याफार संपत्तीची Power of Attorney दिली होती. बायकोला काय वाटतं कुणास ठाऊक, मला मात्र बायको म्हणून अंजली पुढचे सात जन्म नक्की चालेल, खरं तर अगदी धावेल.

बृहन महाराष्ट्र मंडळाचं आमच्या इथलं अधिवेशन अंजलीच्या अधिपत्याखाली झालं. “कमी तिथे आम्ही” ह्या नात्याने मी त्यात गुंतलो होतोच, पण हे चार वर्षांचं प्रोजेक्ट मी अगदी जवळून बघितलं. अधिवेशनात सामील झाल्याखेरीज ह्याचा आवाका आणि गुंतागुंत ह्याचा इतरांना अंदाज येणं कठीण आहे. एव्हढ्या ३००+ स्वयंसेवकांबरोबर हा डोलारा यशस्वीपणे सांभाळणं हा सर्वात अवघड प्रोजेक्ट होता. अक्षरशः मरेपर्यंत मी हा अनुभव विसरू शकणार नाही. ह्या अधिवेशनातल्या ५००हून अधिक जबरदस्त गोष्टी मला माहीत आहेत. माझे IIT मधले आगळे वेगळे मित्र श्री पर्रीकर यांच्याशी संपूर्ण दोन दिवस गप्पा मारायला मिळाल्या ही त्यातलीच एक गोष्ट.

स्वतःची कंपनी काढायचा मला जबरदस्त किडा होता. तो माझा प्रयत्न संपूर्णपणे फसला. मला वाटलं होतं की मी “महान” आहे. भारतात मोटारींना नवीन प्रकारचं प्लास्टिकस् लागतंय. नवीन टेक्नॉलॉजीची गरज आहे. पण टाटा ग्रुप आणि पाश्चिमात्य कंपन्या ह्यांच्या पुढे माझा काय टिकाव लागणार? शेवटी टाटा ग्रुप मला म्हणाले की तू आम्हालाच सामील हो. ह्या लफड्यात कशाला पडतोस? मी शहाण्या मुलासारखा गाशा गुंडाळला आणि टाटा ग्रुपला जॉईन झालो. महाराष्ट्रीयन माणसांना अपयश पचवायला कोणीही शिकवत नाही. खूप म्हणजे खूपच त्रास झाला. पण नंतर टाटा ग्रुपमध्ये खूप मजाही आली.

असंच दुसरं सपशेल अपयश म्हणजे माझा आयर्न मॅन शर्यत धावण्याचा प्रयत्न. ४ किमी पोहायचं, मग १८० किमी सायकल चालवायची आणि मग ४२ किमी मॅरेथॉन शर्यत धावायची. हे सगळं १७ तासात संपलं पाहिजे. त्याचा सराव सुरु करतानाच उजवा गुढगा दुखावला. अख्खा गुढगा कापून कृत्रिम धातूचा गुढगा बसवायला लागला.

माझा अजून एक किडा अंजलीने सहन केला तो म्हणजे भारतात परत जायचा. ज्या देशाने आम्हाला एव्हढं अपरंपार दिलं त्याचे ऋण थोडेतरी परत करायला हवेत अशी माझी भावना. पण हा माझा किडा यशस्वी करण्यासाठी झटली ती अंजली. भारतात परतून संसार लावणं म्हणजे एव्हरेस्टच्या टोकावर जाऊन भांगडा नृत्य करून दाखवण्यापेक्षा अवघड. पण एकदा संसार लावल्यावर तिथे आम्ही ११ वर्ष राहिलो. मुलं पुण्यातच शाळेत गेली. आणि ह्या सगळ्यात कहर म्हणजे अंजलीने पाच वर्ष दर महिन्याला १५ दिवस अमेरिकेचा प्रवास करून कुटुंबासाठी नोकरी सुध्दा केली. हे लिहिताना आणि ते दिवस आठवताना अजून सुध्दा माझ्या डोळ्यात पाणी तरळतं. अशी अर्धांगिनी मिळायला भाग्य लागतं.

मी दहावीत असताना लोणावळ्याच्या दांडेकर प्रतिष्ठानतर्फे वाडा तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागात रोजगार हमी योजनेची पाहणी करण्याकरता माझी नेमणूक झाली. आदिवासी आई आपल्या मुलाला भूक भागवायला झाडाचं पान खाऊ घालताना मी ह्याची डोळा बघीतलं. काय सांगू मी? जगातली सगळी सगळी तत्वज्ञाने किती फोल वाटतात ह्या अनुभवापुढे. आता लिहिताना सुध्दा माझं मन अगदी निःशब्द झालं आहे.

जनरल मोटर्स (GM) मध्ये बरेच वर्ष नोकरी केली. मोटारींना लागणाऱ्या निरनिराळ्या पार्टसची खरेदी हे माझं काम. पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांबरोबर कायम हाणामाऱ्या! त्यांना जास्त नफा हवा असायचा आणि आम्हाला पार्टस स्वस्तात हवे असायचे. त्यामुळे कामात कायम ताण असायचा. माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना मी हसत खिदळत सांगायचो, “गिर्यारोहणात जर चुकून कुठे पडलो असतो तर माझ्या आई-वडिलांना माझं हाडसुद्धा सापडलं नसतं. त्यामानाने हा ताण काहीच नाही.” GM ला पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांची मोनोपोली तोडण्यासाठी तीन-तीन वर्षांचे दोन अफलातून प्रोजेक्ट्स केले. (एक अमेरिकेत आणि एक जर्मनीत) कल्पकता, एकत्र काम करण्यातली धमाल, धोका अशा सगळ्याच बाबतीत ही प्रोजेक्ट्स जबरी होती. ह्या विषयांवर माझी चक्क ८००-१००० पानी पुस्तकं लिहून होतील. गोपनीयतेच्या आवश्यकतेमुळे ते काही ह्या जन्मी शक्य नाही. 

सायकल उभी असताना त्यावर बसलात तर पडून ढुंगण शेकून निघतं. तेच ती सायकल चालत असेल, तर पडायला होत नाही. ब्लॅक होल, समुद्रातल्या लाटा, वादळ ह्या निसर्गात आढळणाऱ्या सगळ्या गोष्टी गणितानुसार एकाच प्रकारच्या समीकरणात मांडता येतात. तसंच गणित वापरून द्रव स्वरूपात प्लास्टिक वाहत असताना त्यात लाटा कधी येतात ते ओळखायचं आणि त्यानुसार प्लास्टिकस् गोष्टींची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढवायचं ह्यावर मी संशोधन केलं आणि PhD मिळवली. इतरांनी केलेलं अफाट काम आणि संशोधनाच्या खांद्यावर उभं राहून आपण बंदूक मारणं किती सोपं असतं नाही का?

मी IIT मध्ये पाचही वर्ष दाढी केली नाही. ट्रिम सुध्दा केली नाही. मला बहुतेक मित्र अजूनही “दाढी”च म्हणतात. 

Datar and Dadhi (with his long gown)

आम्ही कॉलेजातल्या २०० विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच हिमांकन नावाची High Altitude Trek आयोजित केली. डोक्यावर अगदी बारीक केस, लांबलचक दाढी, तुटलेल्या दोन वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपर्स आणि अंगात घातलेला पायघोळ कोट हा माझा वेष. मनालीत रोज सकाळी बाजारात जाऊन अन्नधान्य खरेदी करणे ही माझी जबाबदारी. एकदा बसमधून दुसराच एक ठाण्याचा ओळखीचा गिर्यारोहक, चिक्या ओक, उतरला. मला बघून तो म्हणाला, “दाढी, कोटाच्या आत काही घातलं आहेस की नाही?” मी म्हणालो, “नाही”. तो भर बाजारातल्या रस्त्यावर मला म्हणाला, “चल, काहीतरीच बोलतोयस. कोट वर कर आणि दाखव मला”. मी कोट वर केला आणि त्याला पटवलं की मी खोटं बोलत नाही. त्याच भर बाजारातल्या रस्त्यावर चिक्याने मला चक्क साष्टांग नमस्कार घातला.

आत्ताशी कुठे एकषष्ठी झालीय. अजून मोठी bucket list आहे. ३,५०० किलोमीटर आणि दहा लाख फूट खालीवर चढणारी Appalachian Trail ची पर्वतातली लांबलचक मोहीम एकट्याने चालत करायची आहे. (आता पुढच्या आठवड्यात एप्रिल, २०२१ मध्ये मी त्या सात-आठ महिन्याच्या प्रवासाला निघत आहे.) स्पॅनिश आणि संस्कृत शिकायचंय. ज्ञानेश्वरी अनुभवायची आहे. चालत नर्मदा परिक्रमा करायची आहे. पंढरीची वारी आहेच. उत्तर ध्रुव आणि अंटार्क्टिकाचा प्रवास, कच्छच्या रणात सायकल, शार्क बरोबर स्कुबा डायविंग, त्या आधी नीट पोहायला येणं.. लिस्ट मोठी आहे. बघू या कायकाय जमतंय ते!!

नितीन (दाढी) अंतुरकर

कॅरम टूर्नामेंट

This was my first carrom tournament to watch and to play. The whole plan was very smooth and well organized by Sagar and the team. Deepa and Kiran were great hosts. Imagine feeding dinner for everybody, who stayed until competition of all matches at 10:00 pm. This was a fantastic experience! 

With all this inspiration, I came home and immediately approached Ganapati Bappa. I lit up a nice samai lamp. I even used pure ghee instead of low quality used veg oil. Then I looked at the Bappa. He also looked at me. I winked. He also winked. 

बाप्पा: काय विचार काय आहे? शुद्ध तूप? रात्री अकरा वाजता?

नितीन: काय सांगू? आज शशी आणि अतुल ह्याच्यातली कॅरम मॅच बघितली. ते काय अफलातून खेळतात.  त्यांचे डोळे आणि हात काय स्थिर असतात. मला कधी जमेल असं खेळायला? मी रोज शुद्ध तुपाचा दिवा लावीन. दर weekend ला सकाळी पूजा करीन. आदल्या आठवड्याचं तुझ्या कपाळावरच सुकलेलं गंध सुद्धा पुशीन. इमानदारीत नमस्कार करीन. आजच्या जमान्यात ह्यापेक्षा अजून मी तरी काय करणार? 

बाप्पा: तुला ह्या जन्मात त्यांच्या सारखं खेळायला जमणार नाही. ते सगळे अफाट खेळतात. तेव्हढी तुझी लायकीच नाही. 

नितीन: काय राव? एकदम आमच्या लायकी वर उठलात? तुम्ही महान देव, मी फालतू माणूस असं असलं म्हणून काय झालं? थोडा तरी mutual respect दाखवा. 

बाप्पा: देवाला उपदेशाचे डोस नंतर पाजा. पुढच्या जन्मी सुद्धा त्यांच्या एव्हढं चांगलं खेळता येणं सोपं नाही. तरीसुद्धा तुझी इच्छा असेल तर पुढच्या जन्मी चांगलं कॅरम खेळण्यासाठी काय करायचं ते सांगतो. 

नितीन: च्यायला, ठीक आहे. पुढच्या जन्मी तर पुढच्या जन्मी!  सांगा, सांगा.  ऐकतो मी इमानदारीत.  

बाप्पा: 

(१) दर तीन महिन्यांनी सत्यनारायणाची पूजा घाल. तेंव्हा शशी व अतुलला मेहूण म्हणून बॊलव. कंजुषपणा करून तेंव्हा एक एक  डॉलरची  दक्षिणा  ठेऊ  नकोस. कमीत कमी दहा डॉलरची दक्षिणा पाहिजे. तुझ्या बायकोला प्रसादात केळं घालायला आवडत नाही. पण शशीला शिऱ्यात केळं आवडतं. चांगली सव्वा किलो केळी अतिशय तृप्त मनाने घाल. (तुझी बायको नाही म्हणेल. पण तुझ्या बायकोवर तुझा ह्या जन्मात control नसेल तर शशी सारखं कॅरम खेळायची अपेक्षा पुढच्या जन्मात ठेऊ नकोस!!) आलटून पालटून किरण-दीपा व सागर ह्यांना पण जेवायला बोलव. खूप  माणसं होतात म्हणून किरकिर करून नकोस. 

(२) पण नुसतंच “देव, देव” करून पुढच्या सात जन्मात तुला कॅरम खेळायला जमणार नाही. प्रयत्नांची जोड सुद्धा हवी. रोज सकाळी पंचवीस “finger push-ups” काढ. जमल्यास बोटांनी फरशी वगैरे फोडायचा प्रयत्न करायला लाग. I-75 वरून जाताना आजूबाजूच्या ड्रायव्हर्सना “finger” दाखवत जा. तसं दाखवताना चेहऱ्यावर राग हवा.  त्याने चेहऱ्याच्या स्नायुंना व्यायाम होतो. नेहेमी मधल्याच बोटाने striker मारायचा असतो. त्यामुळे “finger” दाखवताना ते जोरात “vibrate” कर. त्यामुळे त्या मधल्या बोटाला चांगला व्यायाम होइल. 

(३) एव्हढं सगळं करून जर तू पुढच्या जन्मी किडा-मुंगी वगैरे झालास तर काय फायदा? त्यामुळे ह्या जन्मात पापं कमी कर. जरा कमी खोटं बोल. इतरांच्या मुलांना “आपल्या आई-वडिलांचे ऐकू नका” असं सांगण बंद कर. सकाळी उठताना बायकोला शिव्या घालू नकोस. इतरांना चावट जोक्स सांगू नकोस. त्यांनी जरी सांगितले तरी त्याला फिदीफिदी हसू नकोस. (त्यांचं काय जातंय सांगायला? ते थोडेच पुढच्या जन्मी कॅरम खेळणार आहेत.) तुझे वडील सभ्य आहेत. त्यांना दर आठवड्याला “काय बाबा, आज बियर प्यायची का?” असं विचारू नकोस.

नितीन: ओय, बाप्पा, एव्हढ सगळं करायचं असेल तर नको मला तो कॅरम. पण काय रे, मागच्या जन्मी शशी आणि अतुल ह्यांनी हे सगळे नियम पाळले होते का रे? त्यामुळे ते एव्हढे चांगले players झाले का रे? 

 बाप्पा ह्यावर काहीही बोलला नाही.  थोड्या वेळाने तो म्हणाला, “लई झालं आता. झोपायला जा. आणि शशी आणि अतुल सारखं खेळण्याची स्वप्न बघणं सोडून द्या.” 

नितीन   

जीवाचा आकांत

“तेजस ऊठ. आरती ऊठ. साडेपाच वाजले आहेत. सहाला आपले गाईड येतील” माझा सक्काळी सक्काळी ५:३० वाजता आरडाओरडा सुरु! खरं तर ही दोन्ही मुलं दुपारी दोनला सुद्धा सुट्टीच्या दिवशी उठत नाहीत. त्यांना मी सकाळी साडेपाचला उठवत होतो. आमच्या कोस्टारिकाच्या ट्रीपमधला हा शेवटचा दिवस होता आणि आज आम्ही जंगलात (Corcovado नॅशनल पार्क) एक लांबलचक ट्रेक करायचं ठरवलं होतं. मजा म्हणजे ही आळशी मुलं अक्षरशः पंधरा सेकंदात टणाटण उठून आवरायला गेली सुद्धा!

त्याचं काय आहे, जंगलात पक्षी आणि प्राणी बघायला जायचं हा नुसता छंद नाही आहे, तर ती एक झिंग आहे. जबरदस्त नशा आहे. अतिशय गरम हवा, सगळीकडे घुसमटणारी आर्द्रता, शर्ट घामाने चिंब भिजलेला – एव्हढा की चष्म्यावर सुद्धा त्याची वाफ जमा झालेली! एवढं सगळं असूनसुद्धा अंगात फुल शर्ट, पायात फुलपॅन्ट, वरपर्यंत चढलेले मोजे. सगळीकडे डासांना पळवणारं repellent मारून सुद्धा कधी चावतील त्याचा नेम नाही अशी अवस्था. पाठीवर छोटासा बॅकपॅक. पाठीच्या मणक्याचा खळगा आणि बॅकपॅक ह्यांच्यामधून मधेच धावणारा घामाचा एखादा ओघळ. आणि आता असं सात-आठ तास चालायचं. कोणाशीही एक शब्द बोलायचं नाही. आपल्या चालण्याचा आवाज येता कामा नये. नजर कायम भिरभरती, कुठे काय दिसेल त्याचा नेम नाही. त्यातून एखादा “Brown Crested Flycatcher” किंवा तत्सम पक्षी दिसला, तर तो हातवारे करून दाखवायचा आणि एवढं करूनसुद्धा तो दोन सेकंदात अदृश्य होणार! पुढचे दोन तास त्याचीच excitement! ह्याला मूर्खपणाची नशा म्हणणार नाही तर काय? आरती वैतागून म्हणते तसं ह्यापेक्षा आपण “White Throated Cow” बघायला कोथरूड सारख्या रिमोट जागी गेलो असतो तर किती बरं झालं असतं? (एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा विचित्र ट्रेक ला उड्या मारत जायचं हा सुद्धा खास आरतीचाच खाक्या.) तर सांगायचा मुद्दा असा की अगदी सहाच्या ठोक्याला मी, अंजली, तेजस आणि आरती एकदम तयार होतो आमच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये!

सव्वा सहाला Gerardo (मराठीतला उच्चार हेरार्डो) आणि Geovanni (म्हणजे जिओव्हानी) हे आमचे गाईड हजर झाले. चक्क इंग्रजीमध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं (इथे स्पॅनिश बोलणाऱ्या देशात इंग्रजी तसं दुर्मिळच होतं.) जंगलातल्या प्रवासातला गाईड हा पहिला मटका असतो. गाईड चांगले असतील तर तुमची ट्रिप मस्त होणार. त्यांना लांबूनसुद्धा पक्ष्यांना हेरता आलं पाहिजे. पक्षी इथलेच का migrant, हे त्यांचे नेहमीचे रंग का खास प्रणयासाठी नटलेले seasonal रंग, अजून लहानच (juvenile) आहेत की प्रौढ (adult) झाले आहेत, ते गातात कसे, खातात काय, उडताना कसे दिसतात हे सगळं ज्ञान हवं. त्यांच्याकडे छान दुर्बीण हवी आणि चुकून एखादा दुर्मिळ पक्षी दिसला तर त्याची माहिती तिथल्यातिथे वाचण्यासाठी field guide सुद्धा हवं. सर्वात महत्वाचं म्हणजे आकाशात दूर तीनशे फुटांवर एखादा दुर्मिळ White Hawk दिसला तरी त्यांच्या डोळ्यात लहान मुलांच्या डोळ्यातली मज्जा, excitement आणि कुतूहल दिसायला हवं. (ह्या गोष्टी खरोखरच संसर्गजन्य असतात!) दोघेही गाईड ह्याबाबतीत एकदम परफेक्ट होते.

दुसरा मटका म्हणजे गाडी. आम्हाला Puerto Jimenez ह्या गावापासून ट्रेक सुरु होण्यापर्यंत दोन तास गाडीचा प्रवास होता. त्यात सुद्धा अफलातून पक्षी आणि प्राणी दिसण्याची शक्यता होती. ह्या दोघांनी त्यांच्या मालकीचा वरून छत उघडं असलेला Safari ट्रक आणला होता. नुसती धमाल येणार होती.

तिसरा मटका हा नेहमीचाच, जंगलातला! कधी आणि काय दिसेल ते काही सांगता येत नाही. आम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत एकत्र आणि वेगवेगळ्या अशा थोड्याफार Wildlife मुशाफिरी केलेल्या होत्या. ८०० झेब्रे एकावेळी बघितले होते, आरतीने समुद्रात ९० फूट खोलीवर Scuba Diving करताना व्हेल शार्कच्या शेपटीचा फटका खाल्ला होता, अक्षरशः ७-८ फुटांवरून सिंह आणि मगरी बघितल्या होत्या, वाघाचं तीन तास चाललेलं mating बघितलं होतं (ह्या आणि अशा इतर अनेक गोष्टी नंतर कधीतरी!). पण तुम्ही वाचक जरी ह्या सुरस गोष्टींनी आश्चर्यचकित झाला असलात, तरी खरं सांगायचं तर हा सगळा मटकाच असतो. नशा जी असते ती ह्या बघितलेल्या गोष्टींची नसते. तर ते बघण्यासाठी केलेल्या प्रवासाची, भ्रमंतीची, ट्रेकची असते. ती भिरभिरती नजर, ती आतुरता, चुकून पानांची झालेली सळसळ, हृदयाची धडधड…. आई शपथ, ती असते नशा, ती असते झिंग! तरीसुद्धा, आम्हाला काय माहित की आजचा मटका हा आमच्या आयुष्यातला एक अफाट अनुभव असणार आहे.

आमची सफारी निघाली. १५-२० मिनिटातच छोट्या ओहोळाच्या पुलावर गाडी थांबली. ड्राइव्हर हेरार्डो पुढे गाडी चालवायला, आणि जिओव्हानी मागे आमच्या बरोबर. आम्हाला ५-६ छान Snowy Egrets दिसले. मी हळूच अंजलीच्या कानात कुजबुजलो, “बगळ्यांची माळ फुले…” कोस्टारिका असली म्हणून काय झालं, रक्तातली मराठी कविता अशी कशी विसरली जाईल? पण हे पांढरे पक्षी जिओव्हानीच्या पाचवीलाच पुजलेले. त्याचं लक्ष्य दुसरीकडेच होतं. तो कुजबुजला, “Bare Throated Tiger Heron”. हा एव्हढा तीन फुटी पक्षी मात्र आम्हाला काही दिसेना. त्याचा करडा रंग मागच्या ओहोळाच्या पात्राशी अगदी छान जुळला होता. शेवटी दिसला एकदाचा. तो एव्हढा मोठा पक्षी आहे म्हणून त्याला टायगर म्हणायचं, त्याच्या अंगावरच्या पट्ट्यांमुळे त्याला टायगर म्हणायचं, त्याचा आवाज अक्षरशः वाघाच्या डरकाळीसारखा असतो म्हणून हा टायगर, की वाघ जसा त्याच्या सावजामागे दबकत दबकत जातो तसा हा पाण्यातल्या माशांच्या मागे चालत होता म्हणून त्याला टायगर म्हणायचं? कुणास ठाऊक?

नंतर दोन तासाच्या ह्या सफारी प्रवासात कहरच झाला. वाटेत अगदी उंच झाडाच्या टोकावर ढाराढूर झोपलेला Howler Monkey दिसला. गाडी चालवता चालवता हा असा उंच झाडावरचा प्राणी (तो सुद्धा झोपलेला) हेरार्डोला दिसलाच कसा असले मूर्ख प्रश्न विचारायचे आम्ही कधीच सोडून दिलेले होते. हेरार्डोने छान टेलिस्कोप आणला होता. शांतपणे झोपलेला हा रानटी प्राणी चक्क गोड दिसत होता. हा झाडावरून पेंगता पेंगता धाडकन जमिनीवर पडला तर… असा प्रश्न माझ्या मनात आला होता. पण मुलांच्या समोर इज्जतीचा फालुदा व्हायचा म्हणून मनातंच ठेवला. हा झाडाची पानं खातो. फळं नाही खात. पोटात साखर कमी गेल्याने ह्याची हालचाल शाळेतल्या “अ” तुकडीच्या मुलांसारखी चक्क matured वाटते. आणखी एक मजा. चारच दिवसांपूर्वी Tortuguero नॅशनल पार्कमध्ये आम्ही ट्रेकिंग करत असताना अचानक अतिशय मुसळधार पाऊस सुरु झाला होता. आणि आम्ही ढगांच्या कडकडाटाचा एक विचित्र आवाज ऐकला होता. तेंव्हा गाईड म्हणाला होता, हा आहे Howler Monkey. त्याचा आवाज म्हणे ३-४ किलोमीटर वरून सुद्धा ऐकू येतो.

रस्त्यावरची एकदोन माणसं आकाशात बघत होती. आम्हीपण बघितलं. चार भले मोठे Scarlet Macaw दिसले. हे पक्षी म्हणजे कोस्टारिकाची शान. भन्नाट लाल पिवळ्या रंगाचे हे पक्षी अगदी कुठूनही ओळखता येतात. आकाशात ते उडतात तेंव्हा वीजच चमकून गेल्यासारखं वाटतं. पण आवाज एकदम बेकार. भसाड्या आवाजातला आकाशातला साक्षात जॉनी लिव्हर! नंतर “Neotropical Coromorant” दिसला. तसा अगदी बोअरिंग पक्षी. ह्याचा सुंदर भाऊ “Anhinga” दिसला होता आधीच्या नॅशनल पार्क मध्ये. हे सगळे जण दक्षिण अमेरिका खंडातले उंच उंच भरारी घेत उडणारे आकाशाचे बादशाह. पण चुकून त्यातले काही जण प्रशांत महासागरात गालापागोस बेटांवर पोहोचले. तिथे आकाशात उंच उंच उडून खायला काही मिळेना. सगळे खाण्याचे पदार्थ समुद्राच्या आत. बऱ्याच कालावधीत तिथे त्यांचे पंख झडून ते पट्टीचे पोहोणारे पक्षी झाले. (त्यांचं समुद्रातलं पोहोणं “याचि देही याचि डोळा” आम्ही गालापागोस मध्ये बघितलं होतं) हे असे बरेच स्थानिक चमत्कार बघून आणि त्याचा अभ्यास करून (आणि महत्वाचं म्हणजे चार्ल्सच्या आजीने त्याला दशावताराच्या गोष्टी सांगितलेल्या नसल्याने) चार्ल्स डार्विनने मानवी उत्क्रांतीचा “नवीन” शोध लावला होता.

दोन तासानंतर ५-६ नद्या पार करत (पुलाशिवाय) आमचा ट्रक शेवटी Corcovado नॅशनल पार्कच्या आग्नेय दिशेच्या प्रवेशद्वाराशी पोहोचला. नावं लिहिली, प्रवेश फी भरली, चक्क नळाचं पाणी प्यायलो, सगळे गेले म्हणून बाथरूमला जाऊन आलो (जसा उत्साह संसर्गजन्य असतो तसाच नंबर एकसुद्धा संसर्गजन्यच!). एका बाजूला अतिशय सुंदर निळाभोर समुद्र, मन प्रफुल्लित करणारं खारं वारं, महाभारतातल्या भीष्माच्या पांढऱ्या दाढीसारख्या मोठमोठ्या लाटा, त्यांचा तो घनगंभीर आवाज. स्वच्छ काळसर वाळू. मैलोनमैल पसरलेला बीच. मनुष्यप्राण्याचा मागमूसही नाही. आणि दुसऱ्या बाजूला… निबिड अरण्य. प्रत्येक पावलागणिक नवीन प्रकारचं झाड. प्रत्येक झाडाची आकाशाकडे धावण्याची एक वेडी झेप. अजस्त्र वेली खोडाला लपेटलेल्या. आकाश दिसणं अशक्य. चित्र विचित्र आवाज. ह्या जंगलात कोण कोण लपलेलं असेल कोणास ठाऊक. मिशिगनमधल्या अतिथंड प्रदेशातून येऊनसुद्धा ह्या सुंदर समुद्रात डुबकी घेण्याऐवजी हिरव्या काळ्या गूढ अरण्यात घुसणं ह्याला वेडेपणा म्हणणार नाही तर काय?

जंगलात शिरायच्या आधी जर तुम्हाला Puma किंवा Jauguar दिसला तर काय करायचं हे त्यांनी चक्क बोर्डावर लिहून ठेवलं होतं. “हे प्राणी मुळात लाजाळू आहेत, तुमच्या वाटेला जाणार नाहीत. पण जर त्यांनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यात डोळा लावून रोखून बघा (चड्डीत शू झाली तरी बेहत्तर… हे बोर्डावर लिहीलेलं नव्हतं, माझ्या मनात आलं). हलू नका. ते अंगावर आले तर तुम्हाला फाईट करायला लागेल” वगैरे वगैरे. मी Purchasing Professional आहे. आमच्या व्यवसायात एक मजेशीर विनोद सांगतात. “जंगलात वाघ मागे लागला तर आपण किती जोरात पळायला पाहिजे? वाघापेक्षा जोरात? अजिबात नाही. इतर पळणाऱ्या प्राण्यांच्या मानाने आपण सर्वात कमी गतीने धावणारे असता कामा नये. एव्हढंच!” मी हळूच आजूबाजूला बघितलं. जिओव्हानी, अंजली, तेजस आणि आरती हे सगळे होते एकदम फिट ५०-५५ किलोचे. मीच त्यातल्या त्यात ८० किलोचा गुटगुटीत हत्ती. आत्ता मार्चमध्येच गुडघ्याचं ऑपेरेशन झालेलं. थोडक्यात Jaguar ला मस्त मेजवानी आहे. माझा वाल्या कोळी होणार. जिवाच्या आकांताने मला पळायला लागणार. हे सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. एकदा झिंग चढली की माणसाची विचारशक्ती क्षीण होत असावी.

झाली, आमची ट्रेक सुरु झाली. भिरभिरती नजर. दबकी चाल. एकदम शांत न बोलता चालणं. सॉलिड धमाल. वाटेत एका ठिकाणी गाईडने थांबवलं. तो म्हणाला, “हे बघा एक खास अंजिराचं झाड. ह्याला म्हणतात Strangler Fig Tree. कुठलातरी पक्षी खालेल्या अंजिराची बी कुठल्यातरी झाडावर टाकतो. त्या झाडाची मदत घेत हे परजीवी झाड वाढायला लागतं. हळूहळू ज्या झाडाने आपल्याला आधार दिला, त्याच झाडाचा सगळा जीवनरस ते शोषून घ्यायला लागतं. मग ते परोपकारी झाड मरून जातं. कृतघ्नतेची अगदी परिसीमा! अगदी जंगली कायदा. एखाद्या जिवलग मित्राला तुम्ही स्वतःच्या घरात आग्रहाने राहायला जागा द्यायची आणि त्याने तुमचं सगळं घरदार लुटून न्यायचं त्यातला हा प्रकार. स्थानिक भाषेत ह्याला Matapalo म्हणतात. अंगावर अगदी काटा आला हा प्रकार बघून!

त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट थोडे पुढे गेल्यावर बघायला मिळाली. चालताना पायापाशी अचानक छोटसं हिरवं पान हलल्यासारखं वाटलं. चमकून पाय मागे घेतला. जवळून वाकून बघितलं तर बऱ्याच उद्योगी मुंग्या छोटी छोटी हिरवी पानं घेऊन लगबगीने निघाल्या होत्या. त्या होत्या Leaf Cutter Ants. ह्या शेतकरी मुंग्या हिरवी पानं खत म्हणून वापरून त्यांच्या “शेतात” Mushroom चं पीक काढतात. मजा म्हणजे हे पीक फक्त त्याच खात नाहीत तर इतर कीटकांना पण खायला घालतात.

त्या मुंग्या पाहताना तेजसने जिओव्हानीला विचारलं, “पण ह्या चावतात का Bullet Ant सारख्या?” जिओव्हानी एकदम थबकलाच. त्याचे डोळे मोठे झाले. जणू काही आम्ही “Voldemort” चं नाव घेतलं. तो म्हणाला, “चावतात, चावतात, पण Bullet Ant सारखं नाही.” तेजस म्हणाला, “आम्ही त्या Bullet Ant चे फोटो काढले आहेत मागच्या नॅशनल पार्कमध्ये.” हो, Bullet Ant चावली तर अंगात कोणीतरी गोळीच (बुलेट) घातल्यासारखं दुखतं म्हणे. तीन महिने लागतात बरं व्हायला. च्यायला, हे एव्हढं “She-who-must-not-be-named” प्रकरण असेल असं वाटलं नव्हतं आणि कोस्टारिका आधी ह्या बुलेट मुंगीविषयी ऐकलं सुद्धा नव्हतं.

White Faced Capuchin Monkey ची अख्खी गॅंगच दिसली. ही माकडं काहीही खातात. त्यामुळे ते एकदम हायपर असतात. थोडक्यात इथून तिथून हे सगळे मारुतीचे वंशज एकसारखेच. त्याच त्या नकला, टणाटण उड्या, शेपटीवर लटकणे सगळं सगळं अगदी भारतातल्या माकडांसारखं. Tortuguero नॅशनल पार्क मध्ये ह्यांचाच आणखी एक भाऊबंद Spider monkey दिसले होते. तिथे तर धमालच झाली होती. बहुतेक दुपारची शाळा सुटली होती. १५-२० आया आपल्या पिल्लांना पाठीवर बसवून नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर निघाल्या होत्या. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना चक्क एकीने तर पुलंच तयार केला. अगदी लोहगडापासून ते हरिद्वार पर्यंत खूप खूप माकडं बघितली होती. पण अशी “सेतूमाता” बघायला मिळाली नव्हती. त्यानंतर उंच आकाशात नदीच्या एका किनाऱ्यावरच्या फांदीवरून दुसऱ्या किनाऱ्यावरच्या फांदीवर ह्या प्रत्येक आईने ही भली थोरली उडी मारली तेंव्हा आमच्याच पोटात डुचमळलं. पण आया आणि पिल्लं दोघेही सही सलामत. बहुतेक त्यांचा तो नेहमीचाच रस्ता असावा.

असं बरंच काही बघितलं. साडे तीन फुटी सुंदर Great Curassow बघितला. हा पक्षी कधीतरीच उडतो. Coati हे चार पाच फुटी प्राणी डुगूडुगू चालताना बघितले. ह्या म्हणे सगळ्या माद्या कळपात राहातात. ह्याच्यात नराचा वापर “नर” म्हणून केल्यावर त्या वेगळ्या राहतात आणि नर वेगळे राहतात. सगळंच सुटसुटीत. संसाराचा घोळ नाही. कसलंही मागे पुढे लटांबर नाही. (“कित्ती छान” असं माझ्या मनात आलं. पण माझी जीभ मला प्यारी असल्याने ते मी बोलून दाखवलं नाही.) Green Iguana दिसले. हे भले मोठे नारिंगी रंगाचे सरडे खास माद्यांना आकर्षित करण्यासाठी नटले होते. Red-lored Parrot दिसले, २०-३० पक्ष्याच्या थव्याने शांतपणे तरंगणारे Brown Pelican दिसले, Woodcreeper दिसले आणि Red-Crowned Woodpecker सुद्धा दिसले. हे जिओव्हानीच्या आवडीचे पक्षी. कारण असा एखादाच पक्षी असेल की जो झाडाच्या खोडात भोकं पाडून इतरांसाठी घरं बनवतो. निरनिराळे आवाज काढणारा Melodious Blackbird बघितला. Hummingbirds बघितले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे Black Mandibled Toucan अगदी चार पाच वेळा बघितले. चोचीच्या टोकापासून अगदी शेपटीच्या शेवटच्या पिसापर्यंत नखशिखांत (खरं तर “चोचपिसांत”) रंगलेला असा हा पक्षी. ह्याला कितीही वेळा बघितलं तरी कमीच. ह्याची चोच एव्हढी मोठी असते की एखादी झाडाची बी चोचीत घेतल्यावर त्याला ती तोंडात घालण्यासाठी चक्क परत आकाशात उडवावी लागते.

थोडक्यात डोळ्यांचं पारणं फिटलं. खूप म्हणजे खूप बरं वाटलं. एका नदीपर्यंत पोहोचून आता परत फिरायची वेळ झाली. तोंडावर थंडगार पाणी मारलं आणि उलटे निघालो. ट्रेक मध्ये परतीचा प्रवास हा जरा विचित्रच असतो. उत्सुकता कमी झालेली असते. मनाने आणि शरीराने दमलेलो असतो. सकाळची भिरभिरती नजर आता थोडी स्थिरावलेली असते. White Capuchin Monkey दिसला तरी पावलं एक दोन मिनिटेच त्याच्या भोवती घोटाळतात. एका सॅंडविचने समाधान झालेलं नसल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची स्वप्न दिसायला लागतात. तहान लागलेली असते. एकंदर आजूबाजूच्या वातावरणाचा नवखेपणा संपलेला असतो. खरं तर इतक्या अनुभवांनंतर आमच्या लक्षात राहायला हवं की जंगलात कधीही काहीही होऊ शकतं. पण दमलेल्या शरीराच्या मनाचे खेळ वेगळेच असतात. त्यातून आमचा हा कोस्टारिकाच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. इथून पुढे आरती सॅन फ्रॅन्सिस्कोला आणि तेजस लंडनला आपापल्या कामासाठी जाणार. त्यांच्या जाण्याच्या कल्पनेने मनावर थोडी दुःखाची झालर यायला लागली होती. त्यामुळे चुपचाप मुंडी खाली घालून आम्ही चालायला सुरुवात केली. आम्हाला काय माहिती की आमच्या पुढे काय वाढून ठेवलंय?

शेवटचे १-२ मैल आमचा रस्ता समुद्र किनाऱ्यावरून होता. समुद्राचा घनगंभीर आवाज. पायाला हळुवार गुदगुल्या करणारं पाणी. उबदार मऊमऊ रेती, गार वारं आणि गरम ऊन. खरंच ह्यापेक्षा माणसाला काय हवं? पण त्या झळाळत्या उन्हाच्या मृगजळा पलीकडे आम्हाला क्षितिजापाशी गिधाडांची गर्दी दिसायला लागली. जिओव्हानी म्हणाला, कोणीतरी प्राणी मेलेला दिसतोय. तो आपलं गाइडचं काम चोख करण्याच्या धुंदीत होता. तो म्हणाला, Black आणि Turkey अशी दोन्ही Vultures दिसताहेत. त्याला तर Yellow-Throated आणि Crested Caracara पण दिसायला लागले. पक्षी सारखे उडत होते आणि किनाऱ्यावर निरनिराळ्या ठिकाणी बसत होते. आणि आमच्या आयुष्यातल्या एका अविस्मरणीय विदारक अनुभवाला सुरुवात होते आहे हे आम्हाला कळायला अजून काही मिनिटं बाकी होती.

आम्हाला कळलं होतं की पक्षी सगळीकडे पसरले आहेत म्हणजे हा एखादाच मेलेला प्राणी नाही आहे. मग आम्हाला लांबून अगदी छोटे छोटे काळे ठिपके दिसायला लागले. धावत धावत जवळ जाऊन बघतो तर काय? ती एव्हडुशी, इटुकली, पिटुकली, छोटुली कासवांची पिल्लं होती. दोन-अडीच इंचांची. १००-१५० पिल्लं सगळ्या किनाऱ्यावर पसरली होती. जिवाच्या आकांताने समुद्राकडे धावायचा प्रयत्न करत होती. नुकतीच अंड्यांमधून बाहेर पडली असावीत. आणि त्यांची ती अर्ध्या-पाव इंचांची पावलं!  कशी पोहोचणार ती समुद्रापाशी? मला त्यांना हात लावायला धजवेना.

अगदी जवळ जाऊन खाली वाकून मी त्यांना बघितलं. मला त्यांचं बारीक आवाजातलं हलकं रडणं ऐकू येत होतं का? का त्या होत्या त्यांच्या धापा? का तो सगळाच भास होता? ते आक्रन्दन, त्या धापा माझ्या भोवती गरागरा फिरायला लागल्या. चक्री वादळासारख्या. तो भास, तो सन्नाटा माझं हृदय चिरून कुठेतरी रक्तात भिनायला लागला. केवढासा हा जीव आणि केवढा हा आभाळा एव्हढा आकांत. कसे पोहोचणार होते ते त्या लांब समुद्रात? आणि माझ्यासमोर एकच प्रश्नचिन्ह उभं ठाकलं. कुठे आहेत त्यांचे आईवडील?

लहानपणापासून रस्त्यारस्त्यावर गाईंना आवेगाने लुचणारी वासरं बघत आलो आहे मी. घराच्या एका खोपटात कबुतरी कुठून कुठून काय काय आपल्या पिल्लांसाठी आणायची? जंगलात सुद्धा हत्तींची, माकडांची पिल्लं आईच्या कुशीत कशी निर्धास्त झोपलेली दिसतात? तेच कशाला, आमच्या स्वतःच्या छोट्या पिल्लांना जन्मल्या जन्मल्या जेंव्हा हातात घेतलं तेंव्हा आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले होते. पूर्वजन्मांच्या आणि ह्या जन्माच्या आमच्या सगळ्या पुण्यांची कवचकुंडले घालून ह्या आमच्या रक्तामासांच्या छोट्या जीवांचं रक्षण कर रे बाबा असं आम्ही परमेश्वराला साकडं घातलं होतं. आजही “आमचं सगळं उरलंसुरलं आयुष्यं मुलांच्या पदरी घाल रे बाबा!” अशी देवापाशी आम्ही प्रार्थना करतो. मग ह्या पिल्लांनीच काय वाईट केलं होतं देवाचं? हा कसला निसर्गधर्म? ही कसली क्रूरता? हा कसला आकांत?

गिधाडांनी कितीतरी पिल्लं खाऊन टाकली होती. त्या एव्हढ्याशा पिल्लांचं एव्हढंस मांस कुठे पुरे पडणार होतं गिधाडांना? पण गिधाडं आपला धर्म पाळत होती. काही पिल्लांचं डोकं फक्त खावून टाकलं होतं गिधाडांनी. आणि ते पालथे पडलेले, धड नसलेले जीव उगाच हातपाय मारत होते. मेल्यानंतर सुद्धा जीवापाड आकांत! हा आचके देण्याचा प्रकार आमच्या भावनांच्या पलीकडला होता. हाच होता का तो आभाळाला व्यापणारा आकांत? का ही होती जगण्याची अशक्यप्राय ईर्षा.. मेल्यावर सुद्धा जिवंत असलेली? काय होतं हे? कसं बघायचं हे निसर्गाचं जंगली स्वरूप?

आणि मग आम्ही पाचही जणांनी ठरवलं. आम्ही ताठ उभे राहिलो. जवळच्या सगळ्या गिधाडांना शु शु करून आम्ही हाकलवलं. ते लांब जाऊन उभे राहिले. आणि एक युद्ध सुरु झालं. म्हंटलं तर अगदीच क्षुल्लक युद्ध – आमच्यासाठी आणि गिधाडांसाठी. अर्ध्या एक तासांपुरतं एकमेकांना तोलायचं आणि आपापल्या ठिकाणी निघून जायचं. गिधाडांना काय त्या दहा ग्रॅम मांसाचं सोयरसुतक! आणि आपण काहीतरी जगात महान केलं असं आपल्याच गर्वाला गोंजारणारी क्षुल्लक तात्कालिक भावना! खरं महाभारताएव्हढं युद्ध होतं ते ह्या पिल्लांचं. रणरणत्या उन्हाशी, गिधाडांशी, समुद्राकडे धावताना मधेच लागणाऱ्या खड्ड्यांशी. त्यांना अक्षरशः अर्धी marathon धावायची होती जन्मल्या जन्मल्या. पुढे समुद्रात कशाशी लढायला लागेल ते कुणास ठाऊक? पण आम्ही ह्या युध्दात ह्या पिल्लांच्या बाजूने उभे राहिलो होतो. मनुष्य धर्माचं पालन करायला. मग आम्ही जखमी पिल्लांना समुद्रात सोडलं. ते उलट्या लाटेबरोबर परत मागे किनाऱ्यावर येत होते. आम्हाला समुद्रात खूप आत सोडायला लागलं त्यांना. गिधाडांना लांब ठेवत, इतर काही पिल्लांना आम्ही त्यांचं त्यांनाच समुद्रात जाऊ दिलं. त्यांना मध्ये मध्ये वाळूत माणसांच्या पावलांनी केलेले खड्डे लागत होते. त्यात ही पिल्लं मग उलटी होत होती. आकाशातच वेडेवाकडे हातपाय मारत कधी ती स्वतःच सुलटी व्हायची, तर कधी आमची मदत घेऊन. अशी आम्ही १५-२० पिल्लं तरी गिधाडांपासून वाचवली. मग समुद्राची प्रार्थना केली आणि..

पुढच्या आयुष्यात कधीही चुकून सुद्धा आपल्या आयुष्याची तक्रार करायची नाही असं ठरवून अगदी मुकाट्याने आम्ही परत फिरलो.

नितीन अंतुरकर (जानेवारी,२०१९)


नितीन अंतुरकर (जानेवारी, २०१९)

अंडरवेअर

हल्ली मला काय झालंय काही कळत नाही. माझे रुंद खांदे ढेपाळायला लागले आहेत. ट्रॅफिकमधल्या आजूबाजूंच्या वाहनांना शिवीगाळ करणं मी थांबवलंय. रस्त्यावरच्या कुत्र्याला हल्ली मी हूल देत नाही, भाजीवालीशी घासाघीस करत नाही, एवढंच काय, बायकोच्या डोळ्याला डोळा भिडवून खोटं पण बोलत नाही. परवा माझ्या बायकोने मला विचारलं, “बटाटे नाही आणलेस ते?” त्यावर सहसा माझी नेहमीची थाप असते, “आज बटाटे बाजारातून गायब आहेत.” पण परवा मी चक्क खरं बोललो, “अरेच्चा, विसरलो की!” बायकोने चमकून माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली, “काय रे, काय झालंय तुला? अचानक खरं बोलायला लागलास.” मलाच कळेना. मी खरं बोलतोय? एव्हढी वाईट अवस्था? मला वाटतं माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला आहे. 

आधी वाटलं मला की हा वयाचा परिणाम असावा. शरीराबरोबर मनही कमकुवत व्हायला लागलंय आणि त्यामुळे आत्मविश्वास ढेपाळायला लागलाय. सारखं सगळ्या जगाशी झगडून झगडून जीव कावलाय. त्यातून हाडं स्मशानात जायला निघाली की मग आपण स्वर्गातल्या पाप-पुण्याचा विचार करायला लागतो. पण बायकोशी खरं बोलण्यात कसलं आलंय पुण्य? कटकटीच वाढताहेत. स्वर्गातली एन्ट्री दूर राहिली, इथे सध्या घरातलाच राडा वाढायला लागलाय. 

मग अचानक ट्यूब पेटली. पँट पोटाला कचकचून बांधलेली नसणार. ती ढिली असली की माझा आत्मविश्वास लगेच कमी होतो. आता सुटेल की नंतर सुटेल असं वाटत राहतं. विचित्र दृश्य डोळ्यांसमोर तरळायला लागतात. कधी फर्ग्युसन कॉलेजसमोर पँट सुटून तिथल्या मुली मला फिदीफिदी हसताहेत, तर कधी ऑफिसमध्ये सुटाबुटात पँट सुटून समोर बसलेले जपानी कस्टमर डोळे विस्फारून माझ्याकडे बघत आहेत. कधी व्ही. टी. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ९ वर नुसत्या अंडरवेअरवर मी बागडतोय, तर कधी माझ्या भाच्याच्या लग्नात स्टेजवर  वरवधूंना आशिर्वाद देताना पँट सुटलीय. असल्या विचारांनी आत्मविश्वास कमी होणार नाही तर काय? ढिल्या पँटीची शक्यता मनात आल्याआल्या हात लगेच कमरेपाशी गेला. पण पँट तर चांगली टाईट बांधलेली होती. मग गफलत काय आहे?

हा पॅंटीचा प्रॉब्लेम नव्हता. हा पॅंटीच्या आतल्या अंडरवेअरचा प्रॉब्लेम होता. अंडरवेअर ढिला झाला होता. पाण्याने भरलेली पखाल जशी गाढवाच्या पाठीवरून दोन्ही बाजूने लटकते, तसा माझा अंडरवेअर पॅंटीच्या दोन पायात आतल्या बाजूने लटकत होता. खरंतर वरची पँट एकदम घट्ट बांधलेली होती. जगाला ‘दर्शन’ व्हायची सूत्रं शक्यता नव्हती. पण माणसाच्या मनाचे खेळ काही सांगता येत नाहीत. कमरेला काहीतरी ढिलं लागतंय हे एव्हढं कारण माझा आत्मविश्वास कमी करायला पुरेसं झालं होतं. हा ढिल्या अंडरवेअरचा शोध लागल्याने मला एकदम आर्किमिडीजसारखं “युरेका, युरेका” असं ओरडावसं वाटलं. फरक एवढाच होता की, तो ओरडायला लागला तेव्हा त्याच्या कमरेला काहीच नव्हतं, माझ्या कमरेला आत काही असो वा नसो, वरून कमीतकमी पँट तरी होती. 

हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा? सोपा मार्ग म्हणजे तडक उठून सरळ जाऊन दुसरे अंडरवेअर विकत घेऊन यावेत. पायात बेड्या अडकवल्याप्रमाणे चालत जायला लागेल (एकदा अंडरवेअर खाली सरकलेला असला की चालून बघा म्हणजे कळेल). पण कपड्याच्या दुकानातल्या ड्रेसिंगरूममध्ये नवा घट्ट अंडरवेअर घालून आत्मविश्वासाने घरी परतता येईल. अर्थातच नव्या अंडरवेअरला पैसे पडतील. ‘अंडरवेअर विरला तरी त्याला रफू करूया’, असा विचार करणारा मी मनुष्य! नुसतं इलॅस्टीक ढिलं झालं म्हणून अंडरवेअर फेकून देणं माझ्या पांढरपेशा मनाला पटलं नसतं. 

दुसरा मार्ग. अंडरवेअरला चक्क नाडी शिवावी. “काय हरिभाऊ, माझ्या आतल्या चड्डीला नाडी शिवणार का?” असा प्रश्न आमच्या गल्लीतल्या शिंपीबुवांना विचारला तर त्यांचा चेहेरा कसा होईल हे सांगणं अशक्य आहे. त्यामुळे ही आयडिया शिंप्यांना सांगायचा अजून माझा धीर झालेला नाही. पण माझा अंदाज असा आहे की अंडरवेअरची उंची इंचभराने तरी कमी होईल. फक्त कमेरलाच नाही तर सगळ्याच बाजूने अंडरवेअर घट्ट होईल. मग कायम आपण अंदमानच्या तुरुंगातल्या कोंदट अंधारकोठडीत घुसमटत आहोत असं वाटत राहील.  हे काही मला जमणार नाही. ठीक आहे, तसं जर असेल तर नाड्या शिवायच्या ऐवजी नाड्या मुळातच असलेल्या लेंग्यासारख्या अर्ध्या चड्ड्या वापरूया. असल्या चड्ड्या खूपच मोकळ्या असतात. मग आपण पाचगणीच्या माळरानावर थंडगार हवेत चकाट्या पिटतो आहोत असं सारखं वाटत राहील. पाचगणीला सहलीला एक दोन दिवस जाऊन राहणं वेगळं, आणि कायमचं हुंदडणं वेगळं. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा पाचगणीला जाऊन राहणं मला जमलं नसतं. 

या सगळ्या नन्नाच्या पाढ्यापुढे आता आणि कुठला मार्ग शोधायचा अंडरवेअर घट्ट करायचा? परत एकदा ट्यूब पेटली. हल्लीच्या तरुणी जशा जीन्सच्या पॅंटी कमरेच्या जरा खालीच घालतात, तशी आपली पण पँट आपण जरा कमरेखालीच घालावी. आतला अंडरवेअर वरून थोडा पँटीबाहेरच ठेवावा. मग पँटला टाईट बेल्ट लावला की पॅंटी बरोबर अंडरवेअर पण आपोआपच घट्ट बसेल. पॅंटीच्या वरून अंडरवेअर हळूच बाहेर डोकावतोय असं सगळ्यांना दिसायला नको असेल, तर पँट आणि अंडरवेअरच्या मधून शर्ट खोचावा. ‘फँटॅस्टिक’, हे सगळं व्यवस्थित जमण्यासारखं होतं. सुटलो एकदाचा. मार्ग सापडला. परत एकदा आत्मविश्वासाने खोटं बोलायला मी मोकळा झालो. 

पण मग डोक्यात एक वेगळाच कीड वळवळला. जर अंडरवेअर पँटीबाहेर डोकावणारच असेल तर तो जगाला दिमाखाने दाखवायचा का नाही? हल्लीच्या अंडरवेअरचं इलॅस्टिक भिकारड्या रंगाचं असतं त्यामुळे असा डोकावणारा अंडरवेअर बेकार दिसतो. पण शर्टाला आणि पॅंटीला मॅच होणाऱ्या रंगाचं एखादं इलॅस्टिक असेल तर? छान पांढऱ्या रंगाचा शर्ट, खाली काळ्या रंगाची पँट आणि मध्ये अंडरवेअरचं लाल रंगाचं सुंदर इलॅस्टिक. वरती मॅच होणारा लाल रंगाचा टाय. ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये काय मस्त दिसेल हे? नुसता कहर होईल. 

सगळ्या शॉपिंग मॉल्समध्ये ५० रुपयांपासून लाख लाख रुपयांपर्यंतचे अंडरवेअर दिसायला लागतील. पैठणी, बनारसी, फिरदोसी, जरीकाठी, अगदी सोन्याच्या धाग्याने विणलेले सुद्धा, नाना तऱ्हेच्या इलॅस्टिकचे अंडरवेअर. ठिकठिकाणी अंडरवेअर विकणारी दुकानं उघडतील. दिवाळसणाला नवीन जावयांना महागडे अंडरवेअर आहेर म्हणून देण्यात येतील. जसं लक्ष्मी रोडवरच्या दुकानातले विक्रेते अगदी स्टाईलमध्ये अंगावर साडी पांघरून पाताळाचे काठ दाखवतात, तसं अंडरवेअरच्या दुकानातली माणसं अंडरवेअर कमरेला लावून दाखवतील. काही जण तर उत्साहाने महागडे अंडरवेअर पॅंटीवरून चढवतील आणि स्वतःभोवती गर्रकन गिरकी घेऊन इलॅस्टिकवरची चहूबाजूची नाजूक कलाकुसर दाखवतील. 

मग कोणाच्या तरी डोक्यात कल्पना येईल की नुसतं इलॅस्टिक दाखवण्याऐवजी अख्खा अंडरवेअरच पॅंटीवरून का नाही घालायचा? किती सुंदर दिसेल? निरनिराळे रंग, निरनिराळी डिझाईन्स, निरनिरळ्या स्टाईल्स. प्रत्येकजण आपल्या व्यक्तित्वाला साजेसे अंडरवेअर घालतील. आता आतलं एक आणि बाहेरचं दुसरं असा फरकच राहणार नाही. माणसाच्या आयुष्यात एक प्रकारची पारदर्शकता येईल. दाखवायचे दात वेगळे आणि वापरायचे वेगळे असे दोन दोन मुखवटे घालून माणसं जगणार नाहीत. छक्केपंजे बंद होतील. बायकोशी सगळेजण खरं बोलायला लागतील. अर्थात दांभिक लोकांना हे आवडणार नाही. आमच्या धर्मात हे बसत नाही असा आरडाओरडा ते करतील. पॅंटीवरून अंडरवेअर घातलेले आणि पॅंटीतून अंडरवेअर घातलेले ह्यांच्यात ठिकठिकाणी अंडरवेअर झिंदाबाद आणि मुर्दाबादची नारेबाजी होईल. पण मनुष्यप्राणी मूळचाच स्वच्छ मनाचा असल्याने शेवटी अंडरवेअर बाहेरून घातलेल्यांचीच जीत होईल. 

काय छान कल्पना आहे? सगळ्यांची मनं कोऱ्या पाटीसारखी स्वच्छ झाल्याने आणि त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने जगात सगळीकडे शांती पसरली आहे. मनमोहनसिंग आणि झरदारी ह्यांच्यात भेट झाली आहे. भारताच्या पंतप्रधानांनी स्वतः चरख्यावर विणलेला खादीचा अंडरवेअर धोतरावर चढवला आहे. आतून धोतर असल्याने तो टोचत नाहीये. झरदारी साहेबांनी काराकोरम पर्वतात बनवलेला खास पश्मिना लोकरीचा तलम अंडरवेअर घातला आहे. एकमेकांशी हातमिळवणी करताना त्यांनी आपापल्या देशांचे खास अंडरवेअर एकमेकांना भेट आहेत. जगातील सगळे टी. व्ही. चॅनेल्स दोघांच्याही अंडरवेअरची चर्चा करत आहेत. ह्या ऐतिहासिक वाटाघाटींना ‘अंडरवेअर डिप्लोमसी’ असं नाव देण्यात येत आहे. आता तुम्ही एव्हढे अंडरवेअर धैर्याने बाहेरून घातलेच आहेत, तर सरळ सरळ बोलून आपापसातले प्रश्न मिटवून टाका असा एकंदरीत सगळ्यांचाच सूर आहे. थोडक्यात प्रेम आणि शांतता ह्यांचा कधी नव्हे तो विजय होत आहे. 

शरीर आणि मन एकरूप झाल्याने लोकांना हळूहळू दैवी शक्ती प्राप्त होत आहे. निळा सूट आणि त्यावरून लाल अंडरवेअर चढवणाऱ्या सुपरमॅन सारखंच आपण पण उडू शकू ह्याचा सगळ्यांना आत्मविश्वास वाटायला लागला आहे. मनाची पारदर्शकता आणि एकरूपता वाढून दैवी शक्ती अजून प्रभावी होणार असेल, तर आपण कपडेच कशाला घालायचे असा मूलभूत प्रश्न सुज्ञ लोक विचारायला लागले आहेत…. 

नितीन अंतुरकर, (फेब्रुवारी, २०१०)

घोडा, नाकतोडा आणि मुंग्यांची अंडी

माझ्या खादाडीचा प्रवास अर्थातच माझ्या आईच्या आणि आजीच्या कुशीत सुरु झाला. कोंड्याचा मांडा करून साध्या साध्या खाण्याच्या गोष्टी अफलातून बनवण्यात त्या पटाईत होत्या. रोजची आमटी सुध्दा वेगळ्या वेगळ्या चवीची असायची! मी ती चक्क अगदी घटाघटा प्यायचो. लिंबाचं सरबत, कोबीची भाजी, फोडणीचा भात आणि गोडाचा शिरा ह्या चार गोष्टींवर मी अख्ख आयुष्य काढायला तयार असायचो आणि अजूनही आहे. (ह्यात प्रोटीन नाही वगैरे फालतू, पादरफुसके विचार मनात सुदधा आणू नका.) आमची आजी एकदम खवय्यी. तिला रोजच्या जेवणात डावं – उजवं सगळं साग्रसंगीत लागायचं. लोणची, मुरगुंडं, पोह्याचे पापड हे सगळं ती स्वतः करायची. एव्हढं करून बाहेरून इडलीवाला गेला तर तिला आणि तिच्या नातवंडांना इडल्या खायला घातल्याशिवाय त्याला ती पुढे जाऊ द्यायची नाही. थोडक्यात आमची चंगळ होती. आणि पास्ता, आईस्क्रीम, मॅगी नूडल्स असली थेरं अजून आमच्या आयुष्यात अवतरली नव्हती.

पण मग पायाला भिंगरी लागली. एके दिवशी मी नववीत असताना नुकतंच मिसरूड फुटलेला अकरावीतला राजू मला म्हणाला, “नितीन, आपण नुसतेच महाराज, महाराज जप करत बसतो. पण आपण रायगड बघायला पाहिजे.” मी म्हणालो, “अरे, पण एसटीचे पैसे कुठून आणायचे?”. राजूने मार्ग काढला. “त्यात काय, चालत जाऊ या.”  आई – बाबा चक्क “हो” म्हणाले (त्याकाळी प्रत्येक मिनिटाला मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची पद्धत नसावी) आणि आम्ही पाच जण प्रवासाला निघालो. सर्वात मोठा अकरावीतला राजू आणि सर्वात धाकटा सहावीतला नऱ्या! दररोज रात्री समोर दिसेल त्या घराचं दार ठोठवायचं आणि दिसेल त्या माणसाला “पथारी पसरायला जागा द्या” अशी विनवणी करायची. ह्या प्रवासात कल्पनेपलीकडले विलक्षण सुंदर अनुभव मिळाले. अनोळखी, प्रेमळ जगाने “अगदी देव घरी आला” अशा थाटात आमचं स्वागत केलं. शेवटी आठ दिवस चालत आम्ही रायगडाला पोहोचलो. ही संपूर्ण अचाट कथा परत कधी तरी. पण त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा रस्त्याच्या कडेला स्वतः शिजवलेल्या गोष्टी खायचा प्रयत्न करायला लागला. नुसताच टोमॅटो घातलेला भात (दुसरं तोंडी लावणं काहीही नाही), शेकोटीवर भाजलेला कांदा आणि गूळ थोड्याशा आंबूस झालेल्या पावात घालून बनवलेलं सँडविच, खूप कच्ची नाही तर खूप पिकलेली फळं असं समोर दिसेल ते खाल्लं. आणि अचानक पारंपरिक जेवणाच्या पलीकडल्या नवीन, अदभूत खादाडीच्या जगाचा शोध लागला.

त्यानंतर दहावीत असताना वाडा तालुक्याच्या अगदी दुर्गम ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेचा सर्व्हे करायला गेलो. दुष्काळातली पराकोटीची गरिबी बघितली. आदिवासी कुटुंबं झाडाची पानं खाऊन जगताना बघितली आणि मग जेवणासाठी समोर जे येईल ते गोड मानून त्यातच सुंदर चव जाणवायला लागली. कॉलेजात असताना अरुण बरोबर ९० दिवस उत्तर भारतात हिंडलो. पैसे नव्हतेच. रेल्वे प्लॅटफॉर्म वर झोपायचं, तिथेच कुठेतरी अंघोळ करायची, शहरात पायी हिंडायचं आणि रस्त्यावरचं खाणं खायचं (त्याला हल्ली स्ट्रीटफूड असं फॅन्सी नाव आहे). एखाद्या देवळात, अजमेरच्या शरीफ दर्ग्याच्या बाहेर, अमृतसरला सुवर्णमंदिरात कुठेही फुकट जेवायला मिळालं तर तसं जेवायचं. प्रत्येक गावाची, शहराची संस्कृती, भाषा, वागणूक, पेहेराव, इतिहास हे सगळं त्या गावच्या सामान्य माणसाच्या रोजच्या आहाराशी जोडलेलं आहे असं जाणवत राहिलं. आणि मग प्रवासात प्रेक्षणीय स्थळं बघण्यापेक्षा “जेवायला इथे काय खास आहे?” हे शोधण्याला प्राधान्य प्राप्त झालं.

मग सह्याद्रीतलं ट्रेकिंग सुरु झालं. एके दिवशी मजा झाली. आकाशातून पावसाचा अक्षरशः धबधबा कोसळत होता. आम्ही डोंगरात ढगांच्यामध्ये. पाच फुटावरचं सुध्दा दिसेना. बरोबर तांदूळ होता. पण बाकी काही नाही. गाव कुठे दिसेल त्याचा नेम नाही. “रात्री झोपण्यासाठी तरी छत दे रे बाबा” अशी देवाची प्राथर्ना करत आम्ही गरागरा हिंडत होतो. त्या तशा धुक्यात आम्हाला एक धनगर आणि त्याचा कळप दिसला. भन्नाट बाळ्याच्या सुपीक डोक्यात एक आयडिया आली. (हा तोच वसंत वसंत लिमये – मराठीतला सध्याचा प्रथितयश लेखक.) त्याने त्या धनगराकडून एक चक्क बकरी विकत घेतली. आणि त्या रात्री आम्ही मटण-भातावर ताव मारला. “जिवंत बकरी ते मटण” ह्या सहा तासाच्या प्रवासाची सुरस कथा मी इथे सविस्तर सांगत नाही. पण ह्या सहा तासात अनुभवात माझं एका आहार-योग्यात रूपांतर झालं. मटण कोणत्या प्राण्याचं आहे, ते कसं बनलं असेल, त्या प्राण्याला कसं वाटलं असेल हा सगळा भूतकाळ. तो काळाबरोबर इतिहासात जमा झालेला. ह्या मटणामुळे माझ्या पोटाचं काय होईल, उद्याच्या सकाळी माझे नैसर्गिक अनुभव कसे असतील, माझं वजन किती वाढेल किंवा कमी होईल हा सगळा भविष्यकाळ. तो अजून यायचा होता. खरा होता फक्त वर्तमानकाळ. आत्ता इथे, मटण जिभेवर ठेवलेला जो क्षण आहे तोच फक्त महत्वाचा. ती चव काय आहे, मटण शिजलं आहे का हेच फक्त काय ते खरं !! हे योगिक तत्वज्ञान खादाडीला लागू पडायला लागलं.

मी आहार-योगी झाल्यामुळे झालेले शारीरिक आणि मानसिक फायदे किती आणि काय सांगू!! १०-१२ वर्षांपूर्वी आम्ही चौघे आणि माईक-बेट्सी व त्यांची तीन मुलं (काही नाती रक्ताची असतात. काही पृथ्वीवर जमतात. माईक-बेट्सी हे आमचे पृथ्वीवरचे अमेरिकन नातेवाईक.) लडाख मध्ये हिंडत होतो. गाईड म्हणाला, “जवळच्या बौद्ध मठात त्या गावाची जत्रा आहे आज. जायचं का?” प्रवासातल्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा लक्षात काय राहत असेल तर तिथली माणसं, तिथला बाजार, त्यांच्या परंपरा! त्यामुळे आम्ही सगळे जण एका पायावर तयार झालो. पण मठ होता डोंगरावर. तिथली लोकं टणाटण उडया मारत वर चालले होते. आम्हीच सावकाश धापा टाकत चढत होतो. बाजूने एक ७०-७५ वर्षाची बाई आमच्या मागून आली. छान लडाखी पारंपरिक ड्रेस, कानात मोठया हिरव्या खड्याचे डूल. गळ्यात सुंदर पारंपरिक लडाखी दागिने. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरसुध्दा अगदी उन्हाळी हसू अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. हिंदीत तोडक्या मोडक्या गप्पा मारता मारता ती म्हणाली, “शामको चाय पिनेको हमारे घर आओ”. तिने पत्ता दिला आणि तरातरा गेली की पुढे! संध्याकाळी आम्ही नऊजण तिच्या घरी पोहोचलो. त्या अगदी छोट्या गावातलं तिचं टुमदार दोन मजली घर तिच्या श्रीमंतीची जाणीव करून देत होतं. मग तिने छोट्याशा नाजूक कपात प्रत्येकासाठी चहा आणला…. त्याच्या पहिल्या घोटातच सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. कारण तो होता “याक बटर टी”. थोडक्यात सांगायचं तर याकच्या दुधाचं लोणी बनवायचं आणि त्याचं शुद्ध तूप कढवायचं. त्यात थोडं मीठ आणि चहा घालायचा आणि पाहुण्यांना अगदी आग्रहाने प्यायला द्यायचा. मला हा प्रकार जबरदस्त आवडला आणि यजमानांचा अनादर न करता सगळ्या नऊ कपांमधलं ते शुद्ध तूप पिण्याचं काम आहार-योग्याकडे आलं.

असं म्हणतात की माणसाच्या हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटातून जातो. हे काही फक्त नवरा-बायकोच्या नात्यातलं गुपित नाही आहे. व्यावसायिक संबंधांमध्ये सुध्द्धा ते लागू पडतं. उत्तर मेक्सिकोत आम्ही आमच्या एका सप्लायरकडे गेलो होतो. परिस्थिती विचित्र होती. आम्हाला ह्याच सप्लायरकडून पार्टस हवे होते. दर्जा चांगला होता. वेळच्या वेळी माल तो व्यवस्थित पुरवायचा. फक्त आम्हाला किंमत थोडी कमी करून हवी होती. पण दिवसभर वाटाघाटी करून सुध्द्धा काही तो बधेना. शेवटी सगळेजण दमून भागून संध्याकाळी एकत्र जेवायला गेलो. उत्तर मेक्सिकोतलं ते एक ऐतिहासिक सुंदर शहर. नाव होतं ग्वानाहातो (Guanajuato). आम्हाला एका महागड्या रेस्टॉरंट मध्ये नेण्यात आलं. एका सुंदर जुन्या वाड्यातल्या मधल्या आवारात (Hacienda) हे रेस्टॉरंट थाटलेलं होतं. गप्पा मारता मारता गाडी खाण्याच्या पदार्थांवर आली. मी नेहेमीच्या खाक्यात विचारलं की इथले खास पदार्थ कुठले? अतिशय अपराधी चेहेरे करून “आम्ही नाकतोडे खातो” असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सबंध टेबलावर एकदम शांतता पसरली. मी म्हणालो, “त्यात वाईट काय आहे?” तेंव्हा ते म्हणाले, जगातल्या इतर लोकांना ते विचित्र वाटतं. खरं होतं. बाकी सगळी अमेरिकन मंडळी “आपण जरा दुसऱ्या विषयावर बोलू या का?” अशा थाटात माझ्याकडे बघत होते. पण मी इरेला पेटलो होतो. मग खास माझ्याकरता नाकतोडे आणण्यात आले (Chapulines). मला वाटतं ते फ्राय करून त्यांची बारीक पावडर बनवलेली होती. कारळ्याच्या चटणीसारखी दिसत होती. मी अगदी आवडीने खाल्ली. चव मस्त होती. बरोबरच्या अमेरिकन मंडळींनी पण मग ही चटणी ट्राय केली. आमचे सप्लायर मग फारच खुश झाले. ते चेकाळले. ते म्हणाले, आम्ही मोठ्या मुंग्यांची अंडी पण खातो. मग ते Escamoles पण आमच्यासाठी मागवण्यात आले. आम्हाला Caviar (म्हणजे फ्रेंच माशांची अंडी) खूपच आवडतात असं अगदी नाक वर करून म्हणायचं आणि मेक्सिकन मुंग्यांच्या अंड्यांना नाकं मुरडायची हे बरोबर नाही. तेंव्हा मेक्सिकन मुंग्यांना न्यूनगंड येऊ नये म्हणून आम्ही Escamoles खाल्ले. मजा आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली आणि २-३ दिवसांनी आम्हाला कमी किंमतीत पार्टस पुरवायला मेक्सिकन मंडळी राजी झाली. पुढे जाऊन मी हि डिप्लोमसी जर्मनीत मगर खाऊन आणि जपानमध्ये साशिमी खाऊन लागू पडते आहे का तेही बघितलं.

नुकतेच आम्ही FIFA वर्ल्ड कप बघायला दक्षिण रशियाला समारा शहरात गेलो होतो. माझा मेव्हणा अमोल सध्या तिथे भारतातून काही काळाकरता एका जर्मन कंपनीत नियुक्त आहे. समाराहून उझबेकिस्तान, जॉर्जिया, अझरबैजान असले देश त्यामानाने फारच जवळ. लाल बहादूर शास्त्रींचा ताश्कद करार उझबेकिस्तानातला. ह्या कुठल्यातरी देशातले पंतप्रधान “मैं आवारा हूँ” हे राज कपूरचं गाणं गाताना WhatsApp वर बघितलेले. ह्या देशात रानटी घोडे खूप असतात आणि घोडे हे इथलं एक मिष्टान्न असतं असं ऐकलेलं होतं. त्यामुळे शाकाहारी अमोल-अंजली-प्रज्ञा ह्यांनी आम्हाला उझबेकिस्तानच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला न्यायचं ठरवलं तेंव्हा माझ्यातल्या “मांसाहारी नितीनने” टुणकन उडी मारली. अर्थातच तिथे घोड्याचा पदार्थ मेनूमध्ये होताच. अर्थातच मी तो मागवला आणि मजेत खाल्ला. अर्थातच “नितीन कुठ्ठे कुठ्ठे नेण्याच्या लायकीचा राहिला नाही” असा अंजलीने परिचित डायलॉग मारला. योगी मंडळी निंदास्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले असतात. पण ह्यावेळी आणखी एक चांगली गोष्ट झाली. योग्यांना त्यांचं तत्वज्ञान पसरवण्याकरता शिष्य हवेच असतात. आमच्यातल्या २०-२५ वर्षाच्या चार-पाच मंडळींना ह्यावेळी दीक्षा देण्यात आली. त्यांनीही घोडा अतिशय आनंदाने खाल्ला.

गेले कित्येक वर्ष मी अंजलीच्या मागे लागलो आहे की “आपण व्हिएतनाम आणि कंबोडियाला जाऊ या. जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर बघू या.” तेजस आणि आरती जाऊन आले. त्यांनी सुध्दा तिला आग्रह केला. अंजलीचा एकच घोष, “शी, तिकडची माणसं काहीतरीच खातात.” आम्ही सगळे म्हणालो, “अगं, अगदी चांगलं शाकाहारी जेवण तुला तिथे मिळेल.” पण ती काही मानायला तयार नाही. हा लेख लिहिता लिहिता शेवटी माझी ट्यूब पेटली. तिला व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या लोकांबद्दल तक्रार नाही आहे. मी…. तिचा नवरा, तिथे “काहीतरीच” खाणार नाही ह्याचीच तिला खात्री नाही. त्यामुळे तीने नन्नाचा पाढा लावला आहे. तेंव्हा ह्या लेखाद्वारे मी घोषणा करू इच्छितो की “अंजली, मी व्हिएतनाम आणि कंबोडिया मध्ये अतिशय सज्जन माणसासारखा राहीन. सात्विक आहाराचं सेवन करेन.” तुम्हाला पण अंजली कुठे भेटली तर तिला माझ्या वचनाची आठवण करून द्या आणि माझ्याबरोबर ह्याठिकाणी जायचा आग्रह करा. माझी एवढी एकच नम्र विनंती.

नितीन अंतुरकर

फुलांना छान छान रंग का असतात?

आम्ही दहा वर्षांपुर्वी चतु:शॄंगीच्या डोंगरापाशी राहायचो. तेंव्हाचा हा घडलेला खराखुरा प्रसंग! आरती तेंव्हा चार आणि तेजस सहा वर्षांचे होते. त्यांची आईपण कुठेतरी बाहेर गेली होती. अशाच एका श्रावणातल्या संध्याकाळी मी मुलांना विचारलं, “काय, डोंगरावर फिरायला जायचं का?” एका सुरात दोघांचही उत्तर आलं, “हो.”

संध्याकाळच्या ह्या उन्हातसुद्धा सडकून पाऊस पडणार असं वाटत होतं. फक्त बालकवींच्याच जमान्यात नाही तर हल्लीच्या प्रदुषणाच्या काळातसुद्धा “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे” मधली हिरवळ वेड्यासारखी कुठेही उगवलेली होती. त्यातुन ही होती श्रावणातली संध्याकाळ! रात्रीच्या अंधाराला बिलगू की नको, जवळ जाऊ की नको ह्या संभ्रमातली! हा तीचा ओढूनताणून आणलेला खट्याळपणा की मुळचाच लाजरेपणा होता कुणास ठाऊक? काही का असेना, तो श्रावणी संध्याकाळचा खट्याळपणा माझ्या ह्या मुलांमधेही उतरलेला होता.

पावसात फिरायला जाताना काहीही झालं तरी छत्री न्यायची नाही हे मीच त्यांना शिकवलेलं होतं. धो धो पावसात नाकावरुन ओघळणारं पाणी जीभेवर झेलायची त्यांना प्रॅक्टीस होती. लोहगडावरती अगदी हाडापर्यंत मुरणार्‍या पावसात वार्‍याकडे तोंड करुन उभं राहण्यातली गम्मत त्यांना माहित होती. पहिल्या पावसानंतरच्या चिखलात लोळण्यात आईच्या मांडीवर लोळण्यातली मजा त्यांनी अनुभवलेली होती.

हे झाले थोडेसे जगावेगळे अनुभव! पण नाहीतर इतर आई-वडिलांप्रमाणेच मुलांच्या छोट्याशा मेंदूत नको त्या गोष्टी अगदी ठासून भरण्याचा छंद मलासुद्धा होताच. झिंबाब्वेची राजधानी, टर्कीची एअरलाईन्स, जगातली सर्वात लांब नदी, भारताच्या वनमंत्र्यांचं नाव अशा खरोखरच अर्थशून्य गोष्टी तेजस आणि आरतीच्या डोक्यात भरवण्याचा चाळा मी नियमीतपणे करायचो. त्यातुन मी सायन्स् शिकलेलो. इंद्रधनुष्य का दिसतं, फुलांना रंग का असतात, वरती फेकलेला चेंडू खालीच का परत येतो याची अगदी सविस्तर कारणं त्यांना माहित होती. पढवलेल्या ह्या गोष्टी मुलांकडून, विशेषतः आमच्या मित्रमंडळीत, घोटून घेण्यात आमची छाती अगदी गर्वाने फुगत असे. आपल्या “गणपती बाप्पा” ह्या आरोळीला मिरवणुकीत सगळ्यांनी “मोरया” असा प्रतिसाद दिला की आपण कसे चेकाळतो? तसं ही मुलं माझ्या प्रश्नांना पढवल्यासारखे उत्तर द्यायला लागले की मी अजूनच चेकाळायचो. फिरताना अशा सगळ्या गोष्टींची मुलांकडुन उजळणी करून घेणे ही माझी पहिल्यापासुनची खोड.

डोंगर चढायला लागलो. हिरव्या पिवळ्या रानफुलांचा सगळीकडे गालीचा पसरलेला होता. बालकवींच्या फुलराणीचं लग्न खरं तर सकाळीच त्या कोवळ्या सूर्यकिरणाशी लागलेलं होतं. पण त्या लग्नाच्या रीसेप्शनला आम्ही तिघे वर्‍हाडी संध्याकाळी पोहोचलो होतो. प्रत्यक्ष वधुवर आम्हा अतिथींचं स्वागत करायला अगदी डोलत डोलत पुढे येत होते. मधूनच येणारी वार्‍याची झुळुक, चंदेरी झालर घेऊन नटलेले काळे-पांढरे ढग, चिवचिवणारे पक्षी, हिरवंगार गवत अशी सगळी घरचीच मंडळी आमचं हवं नको ते बघत होती. अशा माझ्या मनाच्या तरल अवस्थेत सुद्धा बापाच्या कर्तव्याचं भूत काही माझ्या मानेवरून उतरेना. मी पचकलो,

 मी: “आरत्या, फुलांना छान छान रंग का असतात?”

मी सायन्समधेच पूर्ण बुडालेला. मी विचार केला, बघु या मी शिकवलेलं उत्तर मुलं बरोबर देतात की नाही. मागच्याच आठवड्यात त्यांना शिकवलं होतं की फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी फुलांना छान छान रंग असतात. मग फुलपाखरांच्या पायाला परागकण चिकटतात. फुलपाखरं उडत जाऊन दुसर्‍या फुलांवर बसली की परागकणही दुसर्‍या फुलात जातात. मग त्यापासून फळं तयार होतात.

आरतीच्या डोक्यात काहीतरी वेगळच होतं. ती म्हणाली,

आरती: “फुलांना नेहमीच हॅपी वाटतं म्हणुन त्यांना छान छान रंग असतात.”

माझ्या तिन्ही दांड्या गुल! खरं तर लहान मुलं ही स्पंजासारखी असतात. त्यांना काहीही शिकवलं तरी त्यांना ते व्यवस्थित कळतं आणि मुलं आपल्याला ते परत सांगतात सुद्धा. आरतीच्या उत्तरावरून ही चार वर्षांची चिटुकली माझ्या फिरक्या घेते आहे की काय असं मला वाटायला लागलं.

मी: “आरत्या, मागच्याच आठवड्यात मी तुला सांगितलं होतं ना की फुलपाखरांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी फुलं रंगीबेरंगी असतात म्हणुन.”

तेजसः “पण मग फुलपाखरांना छान छान रंग का असतात?”

वय वर्ष सहा ने वय वर्ष चाळीसच्या टाळूला लोणी फासायचं काम मात्र छान केलं होतं. हे माझ्या लक्षातच आलं नाही की फुलपाखरं रंगीबेरंगी का असतात ते. बापाने लगेच ह्या सहा वर्षाच्या मुलासमोर शेपूट घातली.

मी: “मी नव्हता ह्याचा विचार केला. पण फुलांना हॅपी वाटतं हे कशावरून?”

आरती: “कारण मी रंगीत कपडे घातले की मला हॅपी वाटतं म्हणून.”

तेजसः “फुलांना हॅपी वाटत म्हणून ते छान छान डोलतात. फुलपाखरांना हॅपी वाटतं म्हणून ते छान छान उडतात.”

मी: “तुम्ही काय करता रंगीत कपडे घातले की?”

आरती: “आम्ही गाणी म्हणतो आणि खूप हसतो.”

सगळ्या वनस्पतीशास्त्रज्ञांना पेचात टाकणार्‍या ह्या संवादांवरून मला अचानक मार्क ट्वेनचे शब्द आठवले. “I was smart. But then I went to school.” ह्याचा सोपा मराठी अर्थ असा, “मी आधी खूप हुशार होतो. पण झक मारली आणि शाळेत गेलो. त्यात माझं वाटोळं झालं.”

श्रावणातल्या संध्याकाळचा खट्याळपणा ह्या मुलांच्या डोळ्यातून ओसंडून वाहात होता. आपल्या बापाची आपल्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे हे त्यांना पक्कं माहीत होतं, आणि मी शिकवलेलं उत्तर त्यांना नक्कीच माहीत आहे हे मला माहीत होतं. पण मी बाप असल्याने इरेला पेटलो.

मी: “अजून काही कारणं असतील का फुलांना छान छान रंग असण्याची?”

तेजसः “गवताचा हिरवा रंग खूप बोअरींग असतो.”

आरती: “फुलांची दुपारची झोप फार छान झाली आहे.”

आरती: ” बाप्पाला त्याच्या आईने चॉकोलेट खायला दिल्यावर त्याने फुलं बनवली.”

एवढया अफलातून कल्पना मी चार अधिक सहा अशी दहा वर्ष डोकं खाजवलं असतं तरी मला सुचल्या नसत्या. प्रत्यक्ष बालकवी त्यांच्यात शिरले आहेत की काय?

मी: “अरे, तुमच्याकडे तर एकाहून एक कहर आयडिया आहेत. अजून काही? “

तेजसः “हा पृथ्वीच्या अंगावर आलेला काटा आहे. “

मी: “म्हणजे काय? “

तेजसः “छान थंड हवेत माझ्या अंगावर येतो तसा.”

आरती: “पृथ्वीने गजरा घातलायं, मला आजोबा देतात तसा.”

आरती: “पावसाळ्यात गवत होळी खेळताहेत.”

ह्या कल्पनांच्या फटाक्यांच्या माळा अक्षरशः पुढची १५-२० मिनिटं फुटतच राहिल्या. आम्ही चतु:शॄंगीचं देऊळ बाजूला ठेऊन डोंगर चढत राहिलो. देवळात गेलोच नाही. प्रत्यक्ष गणपती एका बाजूला आणि चतु:शृंगी दुसर्‍या बाजूला माझी बोटं धरुन डोंगर चढत असताना मी देवळात दर्शन कोणाचं घेऊ?

नितीन अंतुरकर (१४ नोव्हेंबर, २००८)