बायकांची पर्स आणि पुरुषांचं पाकीट

परवा एक मजा झाली. रविवारी सकाळी सकाळी चहा पिता पिता माझी बायको म्हणाली, “मला काही काम सांगू नकोस, एक दिड तास लागेल मला पर्स आवरायला.” खरं तर ही बाई एक सुपरवुमन आहे. अख्ख्या खानदानाला ती २० मिनीटात जेवायला घालते. अर्ध्या तासात घर आवरते. ती एका तासात शॉपिंग पण करु शकते. पण पर्स आवरायला एक-दिड तास? नक्की त्या पर्स मध्ये आहे तरी काय? कधी कोणा पुरुषाला “मला पाकीट आवरायचं आहे” असं म्हणताना ऐकलयं कोणी?

आम्हा भावांना बहीण नाही आणि आईची पर्स आईला न सांगता उघडून बघायची आमची हिम्मत नाही. त्यामुळे लग्नाच्या आधीच्या (काही थोड्या) प्रेमळ दिवसात एके दिवशी बायकोची पर्स उघडायचा मी प्रयत्न केला. पण तिने हळुच माझ्या हातावर चापटी मारुन माझा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर माझी अजून हिम्मत झालेली नाही तिच्या पर्सला हात लावायला. पण माझ्या डोक्यातून हा प्रश्न काही जाईना “एक्-दिड तास पर्स आवरायला?” माझ्याकडे जर अल्लाउद्दिनचा जादुचा दिवा असता तर त्यातल्या राक्षसाला मी धनधान्या बरोबर पर्सच्या आतमध्ये काय आहे हे बघायची दृष्टी दे असाही वर मागितला असता. गेले बरेच दिवस कोणीही ओळखीच्या किंवा अनोळखी बाईसाहेब भेटल्या की माझ्या डोक्यात हेच. ह्यांना किती वेळ लागत असेल पर्स आवरायला? हा मानसिक आजार आता घालवायचा कसा?

कमीतकमी रिकाम्या पर्स तरी बघाव्यात असा विचार करुन मी माझा मोर्चा शॉपिंग मॉलकडे वळवला. शॉपिंग मॉलमध्ये पर्सच्या सेक्शनमध्ये मी एकटाच पुरूष! बाजुने जाणारे येणारे सगळे पुरूष माझ्याकडे अतिशय आदराने बघत होते. मला आधी वाटलं की त्यांचा हा आदर मी कोणा स्त्रीसाठी पर्स विकत घेतो आहे म्हणून असावा. पण मग माझ्याच लक्षात आलं की कोणीतरी मला चक्क पर्स “विकत घेऊ देतो आहे” म्हणुन हा त्यांचा आदर होता.

रीकाम्या पर्स बघताना पहिली गोष्ट जाणवली ती ही की सगळ्या पर्सना बरेच कप्पे असतात. किंबहुना एखाद्या बॅगेला पाचापेक्षा जर कमी कप्पे असतील, तर त्याला पर्स म्हणता येत नाही. त्याला बॅग, गोणपाट किंवा दुसर काहीही म्हणा. दुसरं म्हणजे पर्सला जितके कप्पे जास्त, तितकी तीची किम्मत जास्त. साध्या पर्सला सुध्दा १७-१८ कप्पे तर सहज आढळतात (क्रेडिट कार्ड ठेवायच्या जागा सोडून!). तेच पुरूषांच्या पाकिटाचं बघा. जास्तीत जास्त दोन कप्पे. एक नाणी ठेवायला आणि एक नोटा ठेवायला. माझी कल्पनाशक्ती सुद्धा माझ्या पाकीटाच्या कप्प्यांएवढीच मर्यादित. त्यामुळे मला तर अजिबात सुधरेना की काय ठेवत असतील बायका ह्या पर्समध्ये?

पैसे, मोबाइल, बायकांच्या गोष्टी, चष्मा, लिपस्टिक व मेकअप्, रुमाल, (बायकांचा रुमाल हा एक वेगळाच गहन विषय आहे. दणदणीत अंगकाठीच्या बायका सुध्दा एक बाय एक इंचाचा ट्टासा रुमाल घाम पुसायला कसा वापरु शकतात हे समस्त पुरूष जातीला पडलेलं एक कोडं आहे.) वगैरे गोष्टींसाठी ५-६ कप्पे जरी लागले, तरी इतर कप्प्यात काय ठेवत असतील? माझ्यासारख्यांना अशा खालील संवादांवरुनच पर्समध्ये काय असेल ह्याचा अंदाज बांधायला लागतो.

“ए, तुझ्याकडे ॲस्पिरिन आहे का? मुलांनी अगदी उच्छाद मांडला आहे.” “आहे की! त्रिभुवनकिर्ती आणि कैलासजीवन पण आहे.” मला तरं विचारावसं वाटलं होतं की तुमच्या पर्समधे सलाइनची बाटली पण आहे का हो?

“अय्या हे काय, तुझ्या पर्समधे दातकोरणं?” “अगं, मागच्या महिन्यात आम्ही पिझ्झाहट मधे गेलो होतो ना, तिथलं घेऊन ठेवलं होतं कधीतरी लागेल म्हणून.”

असले अगाध संवाद ऐकून मला तर वाटायला लागलं आहे की जगात दोनच प्रकारच्या गोष्टी असतात. पर्समधे मावणार्‍या आणि पर्समधे न मावणार्‍या.

त्यापुढे जाऊन माझं तर असं म्हणणं आहे की अशा पर्स आणि पाकीटांमुळे पुरुष व स्त्रिया ह्यांच्या मानसिक जडणघडणीत काही मुलभूत फरक झालेले आहेत. सहसा आम्ही पुरुष आमच्या पाकीटात काही ठेवतच नाही. त्यामुळे आमचं मन सुध्दा कोर्‍या पाटीसारखं असतं. शाहरुख खानचे सिनेमे, हिमेश रेशमियाची गाणी, मित्राबरोबर दहा वर्षांपुर्वी झालेलं भांडण अशा गोष्टींना पाकीटात जागा नसते. तेच बायकांच्या पर्सचं बघा. जोगेश्वरी, दगडू शेठ, कसबा अशा प्रत्येक देवळात दक्षिणा ठेवल्यासारखे बायका पैसे सहजपणे चार-पाच खणात ठेवू शकतात. कधी नोटांच्या घड्या तर कधी त्या चुरगळलेल्या. दातकोरणं, कैलासजीवन एवढच काय तर जागा असेल तर वाट्यासुध्दा पर्समधे ठेवायला त्यांना अवघड वाटणार नाही. तीन-तीन महीन्यापुर्वीची वाण्याची बिलं नाहीतर मागच्या वर्षीची लग्नाची पत्रिका ह्यांच्या पर्समधे सहज सापडते. तसंच त्यांच्या मनाचं असतं. साध्या साध्या क्षुल्लक गोष्टी त्या १८-१८ कप्प्यांच्या मनात महिनोमहिने ठेवतात. त्यामुळे बायकांमधे गॉसिप एकदम पॉप्युलर! धोनीचं लफडं, समोरच्या धामणकरांच्या पुतण्याच्या लग्नातले राडे, शशी कपूरच्या पोटाचा घेर अशा गोष्टी पर्सच्या एकाच कप्प्यात शेजारी शेजारी नांदताना दिसतात.

त्यातुन दुसरी गोष्ट अशी की पर्समधे आज ज्या खणात एखादी वस्तु असेल त्याच खणात उद्या ती वस्तु सापडेल ह्याची खात्री नाही. एका कप्प्यातून दुसर्‍या कप्प्यात उड्या मारणे ही झाली एकदम मामुली बात. मालती बरोबर आज दोस्ती तर उद्या खुन्नस. आज सासुची धुसफुस तर उद्या सुन म्हणजे मुलीसारखी. आज हा वाणी चांगला तर उद्या तो. त्याच्या विरुध्दं पुरुषांचं. पाकीटातल्या एका कप्प्यात वस्तू गेली की गेली. एखादा गोंद्या भाडखाऊ आहे असं आम्हा पुरुषांनी ठरवलं की ठरवलं. मग परत उद्या त्याच्या गळ्यात गळा घालायचा नाही. ह्या बायकांच्या चंचल वागणुकीमुळे पुरुषमंडळी कायम चक्रावलेली. बायकांच्या मनात आत्ता नक्की काय आहे, त्यांची आपल्याकडुन काय अपेक्षा आहे हे त्यांना कधीच समजत नाही. ठोकताळे नेमके चुकतात आणि मग खातात शिव्या बायकांच्या.”अगदीच तुला कसं काही कळत नाही” हा प्रेमळ संवाद प्रत्येक घरात अगदी हमखास ऐकू येतो.

पर्समधे जागा भरपूर आणि कप्पे खूप. त्यामुळे सर्व प्रकारच्या गोष्टी त्यात मावतात.कोणताही प्रॉब्लेम, गोष्ट किंवा प्रश्न हे फक्त चांगले किंवा वाईट नसून त्याला बरेच कंगोरे असू शकतात हे पर्समुळे बायकांना उपजतच समजतं. कोणाचंही चांगलेपण आणि वाईटपण त्या तेवढ्याच स्थितप्रज्ञतेने पचवू शकतात. आर्थिक मंदी आणि मुलाला झालेली सर्दी, जगातला हिंसाचार आणि शेजारच्या काकूंनी केलेली पुरणाची आमटी ह्या सगळ्या गोष्टींना कुठ्ल्याही पूर्वगृहाचे शिक्के न बसता पर्समधे जागा असते. एखादी गोष्ट चांगली का वाईट ह्याचा पुरुष मात्र कायम विचार करत राहतात. पाकीटाला दोनच कप्पे असल्यामुळे चांगलं-वाईट, डावं-उजवं, हे सगळे झगडे फक्त पुरुषांचेच. पुरुषांनी स्थापन केलेल्या सगळ्या धर्मांची मूलभूत तत्त्वं good-evil ह्या द्वैतावर आधारलेली. आईच्या म्हणजे स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन सुध्दा पर्स वापरण्याचं बाळकडू काही त्यांना मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला दोनच कप्प्यात बसवायचं आणि मग त्यात जरासुध्दा बदल होऊ द्यायचा नाही ह्या पुरुषांच्या वागणुकीमुळे ह्या पुरुषप्रधान समाजात बरेच अनर्थ सुध्दा पटकन होतात. हिटलरच्या मते आपणच सर्वात श्रेष्ठ! बाकी सगळं जग क्षुल्लक. मग महायुध्दं होतात. एवढ्या वाटाघाटी करत बसण्याऐवजी जर चर्चिलने (नाही, चर्चिलच्या बायकोने) हिटलरला एक पर्स गिफ्ट म्हणून दिली असती तर कदाचित दुसरं महायुध्द झालंच नसतं.

पण अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येक पुरुषाने चांगली १७-१८ कप्प्यांची पर्स वापरायला सुरुवात केली तर फक्त बायका आणि पुरुषांमधले प्रॉब्लेम सुटणार नाहीत तर पुरुषांचे एकमेकांमधली भांडणं पण कमी होतील. मुलीच्या आईकडुन लग्नात आता नववधुला बाळकृष्णाची मुर्ती आणि जावयाला मस्तं २५ कप्प्यांची पर्स देण्याची प्रथा सुरु करायला हवी.

नितीन अंतुरकर (२००८)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *