(हा लेख अंक निनाद २०२३ च्या वार्षिक दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. मला माझ्या वेबसाईट वर तो प्रसिद्ध करू देण्याबद्दल मी अंक निनादच्या संपादकांचा आभारी आहे.)
दादरच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर बसमध्ये चढल्या चढल्या चिमुरड्या ८ वर्षाच्या ऑलिव्हीयाने विचारले, “मी गणपती बाप्पाला आशीर्वाद देऊ शकते का?” बसमध्ये आम्ही सगळे सपशेल क्लीन बोल्ड! संपूर्ण मानव जातीला कोड्यात टाकू शकणाऱ्या ह्या प्रश्नाने उरलेल्या ३४ प्रौढांचे मेंदू भंजाळले नसते तरच नवल! सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक, तात्विक अशा वेगवेगळ्या स्तरांवर हा एव्हढा गहन प्रश्न फक्त निष्पाप लहान मुलेच विचारू शकतात. अर्थात ह्याचे एकमताने, एका ठेक्यात उत्तर होते, “हो, तू बिनधास्त देवाला आशीर्वाद देऊ शकतेस”. ह्या अशा प्रश्नोत्तराने आमच्या देवळांच्या आगळ्या वेगळ्या तीर्थयात्रेचा श्रीगणेशा झाला.
मी आयुष्यभर खूप खूप हिंडलोय. ५३ देश बघितले आहेत. गालापागोस मध्ये हजारो सरड्यांच्या (Iguana) मधून उड्या मारत वाट काढली आहे. हिमालयात दोर लावून शेकडो फुटी काळ्याकभिन्न बर्फाच्या भिंती चढलो आहे. रणथंबोरमध्ये वाघांचे तीन तीन तास मेटींग बघितले आहे. पॅरिसमध्ये भर दिवसा चोरांनी मला लुटण्याचा प्रयत्न केला आहे. “पैसे शून्य आणि हौस अफाट” अशा थाटात उत्तर भारतात ९०-९० दिवस रेल्वेच्या फलाटावर राहून शहरं बघितली आहेत. एक ना दोन! हीऽऽ भली मोठी यादी होईल ह्या चित्रविचित्र अनुभवांची (१)! पण म्हणतात ना, “काखेत कळसा, गावाला वळसा!” माझ्याच जन्मभूमीतली माझ्याच अंगणामधली दक्षिण भारतातली देवळे मी ह्या उभ्या ६३ वर्षांच्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. शेवटी एकदाचा मुहूर्त लागला. आणि, अक्षरशः माझ्या स्वप्नांच्या पलीकडल्या प्रवासाला सुरुवात झाली.
ह्या ट्रीपचं नियोजन केलं होतं हेवीने! (कॉलेजमध्ये तो जरा जास्तच heavy होता म्हणून हे नाव!) माटुंग्यात जन्मलेला हा तामिळी! माझा कॉलेजमधला जवळचा म्हणजे अगदी अगदी जवळचा मित्र! तुमच्यापैकी १८व्या वर्षी हॉस्टेलमध्ये कोणी राहिले आहात का? ते सुध्दा फक्त मुलांच्या हॉस्टेलमध्ये? रानटी आणि जंगली मैत्री म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला आहात का? ह्या वयात ड्रग्स, दारू आणि मुली ह्यांच्याशिवायसुद्धा तुम्ही हवेतच २४ तास तरंगत असता. त्यावेळी जमलेली ही घट्ट मैत्री! केमिकल इंजिनीरिंगमध्ये कॉर्नेल सारख्या Ivy League विद्यापीठात Ph.D. केल्यावर हेवी इतरांसारखाच पैशांमागे धाव धाव धावला. ७-८ वर्षांनी मग तो दमला. वैतागला. आणि मग सगळं सोडून हिंदू तत्वज्ञान आणि पुराणातल्या गोष्टी ह्यावर व्याख्यानं द्यायला लागला. हिंदू मूर्ती विकून त्यावर त्याचा उदरनिर्वाह व्हायला लागला. त्यातून त्याचे बरेच अनुयायी जमा झाले. असा हा आमचा हेवी, त्याचा व्यवसाय, त्याचं आयुष्य आणि त्याची ही ट्रिप!
मी देवळं बघायला खूपच उत्सुक होतो. त्यांचे भव्य स्थापत्य, शिल्पकला, गर्भगृहातील मूर्ती, इतिहास सगळं अगदी अधाशासारखं वाचत होतो. पण मी चक्क हे विसरलो की वारीचा शेवट जरी विठ्ठलाच्या पायापाशी होत असला तरी वारीची सुरुवात वारकऱ्यांबरोबर होते. माझी ट्रिप आगळीवेगळी होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझ्याबरोबर तीर्थयात्रेला निघालेली मंडळी. मूळचे भारतीय असे आम्ही तिघे-चौघेच! बाकीचे २६-२८ जण अगदी अमेरिकेत जन्मलेले अमेरिकनंच होते. पण ती एकेक काय अवली माणसे होती! एकदम जबरदस्त! रॅंडीची भारताची ही ४६वी भेट. तो पंडित रविशंकरांचा सतार वाजवणारा शिष्य. ब्रेंट योग शिकवतो, पण पुराणातल्या गोष्टी सांगत. उदा. देवी माहात्म्यामधील दुर्गा जेंव्हा महिषासुराला नष्ट करते तेंव्हा तिची गोष्ट सांगत आसनं, संस्कृत मंत्र आणि प्राणायाम करत त्याने आमचा एक वर्ग घेतला होता. मार्क हा आमचा फोटोग्राफर. त्याने हॉलीवूडमध्ये दहा पेक्षा जास्त सिनेमे संपादित (edit) केलेले आहेत. जेम्स कॅमेरॉन सारखे जगप्रसिद्ध दिग्दर्शक त्याचे जवळचे मित्र आहेत. तो रामायण कोळून प्यायला आहे. डॉक्टर किम ही “Women’s Integrated Health” ह्या विषयातली MD. पण रोग्याची रीतसर तपासणी झाल्यावर औषधे देण्याआधी मंत्रोच्चार, साधना, योग्य ह्याद्वारे रोग्यांची कुंडलिनी जागृत करण्याकडे पण तिचा भर असतो. टोनीच्या आजोबांना राज्यपदावरून पदच्युत करून पूर्व सामोआ इथून हाकलण्यात आले. ते आणि त्यांचे कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाले. तो, त्याची योग शिकवणारी बायको एरिन आणि दोन्ही मुले आमच्या ट्रिपला आली होती. वरच्या पहिल्या परिच्छेदात भन्नाट प्रश्न विचारणारी ऑलिव्हीया ही त्याचीच मुलगी. ह्या आमच्या ग्रुपमधले ११ जण अमेरिकेत योग शिकवतात. त्यातले दोन तर शिक्षकांचे शिक्षक आहेत. त्यातल्या काही जणांनी पातंजलीच्या योगसूत्राचा इंग्रजी अनुवाद सविस्तरपणे वाचला आहे. गोयो हा व्यावसायिक आचारी आहे. तो सगळी पक्वान्ने आयुर्वेदाच्या तत्वानुसार बनवतो. युव्हान ही शिकागोची आफ्रिकन अमेरिकन. तिने मानसशास्त्रात Ph.D. केली आहे. “माझ्या मानसिक रुग्णांना ज्या ज्या पद्धतीने मला बरं करता येईल त्या त्या पद्धतीने मी बरं करणार, मग त्या उपचार पद्धती पाश्चिमात्य असोत किंवा आफ्रिकन, भारतीय किंवा चायनीज असोत.” ही तिची विचार पद्धती. आमच्यात बॉब हा एकमेव “हरे राम हरे कृष्ण” पंथातला. तो आठवड्यातून तीन वेळा बर्फाच्या पाण्यात ५ मिनिटे आंघोळ करतो. “भारतातून पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणारा एकमेव गोरा मनुष्य” अशी तोच स्वतःची ओळख करून देतो. डंकन ३० वर्षाचा! गणितात बाप माणूस! कधीकधी जुगार खेळून पैसे कमावतो. जाझ पियानो जबरदस्त वाजवतो आणि रॅप गाणारा तो शीघ्रकवी आहे. अगदी कीर्तनसुध्दा तो रॅप मध्ये मस्त गातो. राजीव हा आमचा भारतातला आयोजक. त्याने तरुणपणी नंदादेवी आणि सतोपंथ सारखी अवघड शिखरे सर केली आहेत. हे असे अगदी भन्नाट वारकरी! अशी मंडळी मला भेटतील ह्याची मला ट्रीपच्या आधी स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती.
पण हे सगळे वारकरी फक्त अद्भुत व्यावसायिक नव्हते, भारत आणि भारतातील तत्वज्ञानाशी ओळख असलेले फक्त Indophiles नव्हते, तर मजा म्हणजे ते सगळे कोणत्या ना कोणत्या तरी देवाचे भक्त होते. ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या मानाने मी अगदीच लिंबूटिंबू होतो. माझी आजी घरात रोज पूजा करायची, पण ती अगदी घरासमोरच्या देवळात सुध्दा पाय ठेवत नसे. मला पसायदान माहिती होतं, ज्ञानेश्वरी वाचली होती, पण गीता, वेद आणि उपनिषद कशाशी खातात ह्याचा गंधही नव्हता. नरडं ताणून आरत्या म्हणायला मला आवडतात, पण रोज गणपतीची पूजा करायचा कंटाळा. एकंदरीत काय तर मी त्रिशंकूसारखा मधेच लटकलेला होतो. त्यातून मला “ग” ची बाधा! मी महान, मलाच सगळं कळतं, धर्म म्हणजे अफूची गोळी, सगळाच भंपकपणा, बुवाबाजी आणि अंधश्रध्दा, “माझा फक्त सायन्सवरच विश्वास आहे” हे असले विचार डोक्यात! त्यामुळे मन आणि डोळे उघडे ठेऊन नवीन आचारविचार, नवीन तत्वज्ञान ऐकायचे, अनुभवायचे आणि पचवायचे हे अवघड काम होतं. पण ह्या वारकऱ्यांनी संत तुकाराम म्हणतात तशी “माझी वाट अगदी सोपी केली”. एकदा का मी ते अमेरिकन असण्याचे नावीन्य बाजूला ठेवू शकलो की मग त्यांच्या वागणुकीतून, अठरा दिवसांच्या बसमधल्या प्रवासात आणि जेवताना मारलेल्या गप्पांमधून मी खूप म्हणजे खूप शिकलो.
हेवीने सुरुवातीलाच सांगितलेल्या गोष्टी नवशिक्या विद्यार्थ्यांप्रमाणे अगदी एकाग्रतेने पाळायला सुरुवात केली. देवळात का जायचं ह्याबाबतीत त्याचं म्हणणं असं की कोट्यवधी माणसे हजारो वर्षांपासून ह्या देवळातल्या देवासमोर अतिशय शुद्ध मनाने जातात. त्याची एक सामुदायिक शक्ती त्या गर्भगृहात निर्माण होते. ती शक्ती जाणवून आपलं मन शुद्ध करण्याची ही एक संधी असते. कदाचित म्हणूनच तो म्हणतो की देवाचं आपण दर्शन घेत नाही. देव आपलं दर्शन घेतात. देवांचा कटाक्ष आपल्यावर पडण्यासाठी आपण तयार आहोत का हा प्रश्न देवळात जायच्या आधी स्वतःला विचारा. रामेश्वरच्या देवळाच्या दरवाजावर तर स्वामी विवेकानंदांच्या भाषणाची चक्क पाटी आहे की “अशुद्ध मन घेऊन देवळात जाऊच नका” म्हणून.
आमची ट्रिप एकदम आरामदायक होती. अगदी फाईव्ह- किंवा फोर-स्टार हॉटेलात व्यवस्था. रोज सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत जेवायची सोय. गुबगुबीत बैठकीची बस. एकदा पोटोबा चांगला जमला की विठोबा समजायला सोपा होत असावा. त्यातून माझ्या १८ दिवसांच्या निरंतर खोकल्याखेरीज कोणी आजारी पडला नाही हे आमचं भाग्य. सुरुवातीचा एक दिवस आम्ही मुंबईत होतो. मग चेन्नईला गेल्यावर १७ दिवस बसमधून केरळपर्यंत प्रवास आणि शेवट परत मुंबईत! तामिळनाडूतली बरीच महत्वाची देवळे आणि दोन दिवस केरळमध्ये आराम असं एकंदर ट्रीपचं स्वरूप. पण हेवी हा एक मेंदू सटकलेला माणूस आहे. मुंबईत सर्वांनी लोकल ट्रेनचा आणि BEST बसचा प्रवास करायलाच हवा, दादरच्या रानडे रोडचं फुलांचं मार्केट सकाळी ५ वाजता बघायलाच हवं, जगाचे भौतिक नियम लागू नसलेल्या एकातरी योग्याशी गप्पा मारायलाच हव्यात आणि १-२ ज्योतिषांकडून तुम्ही स्वतःचं भविष्य समजावून घ्यायलाच हवं हा त्याचा अट्टाहास. त्यामुळे “आगळी-वेगळी” हा शब्द आम्ही ह्या ट्रीपमध्ये कोळून प्यायलो.
स्थापत्याच्या दृष्टीने ही देवळे शब्दातीत आहेत. सगळ्या देवळांची माहिती इंटरनेट वर सापडेल. पण तरीसुध्दा पहिल्यांदा ही देवळे बघितल्यावर तुमचा जबडा जो उघडेल तो बंदच होणार नाही. ४०-४० एकरांची भव्य वास्तू, हजारो खांब आणि त्यांवरील कलाकुसर, २५० फुटी गोपुरे आणि देवळांची शिखरं, ६-८ फुटी माणसांच्या, देवदूतांच्या हजारो मूर्ती, गरीब-श्रीमंत भाविकांची खच्चून गर्दी हे सगळे शब्दात सांगणे अशक्य आहे. अबबब ऽऽऽ! हे बघून जर तुमची “आ” वासलेली जबड्याची हाडे मोडकळीला आली नाहीत तरच नवल. त्यातून तंजावरच्या बृहडेश्वराच्या monolithic पद्धतीने बांधलेल्या जवळ जवळ ३०० फुटी शिखराच्या टोकाला ८० टनाचा दगड कसा पोहोचला असेल? रामेश्वरच्या देवळात समुद्रकिनारी २२ गोड पाण्याची कुंडे कशी बांधली असतील? मीनाक्षी अम्माच्या मदुराईच्या देवळात हजारो पुतळे कोरायला किती वर्ष लागली असतील? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची म्हणजे परत एकदा अबबब ऽऽऽ!!!
पण ह्या “अबबब” च्या पलीकडे जायला मला फार वेळ लागला नाही. देवळांच्या एकाहून एक सुंदर गोष्टी कळत गेल्या. त्या स्थलपुराणातून भाविकांची स्फूर्तिस्थाने उलगडत गेली. उजव्या सोंडेचा दादरचा सिद्धीविनायक हा “सिद्धी”विनायक आहे, “रिद्धी”विनायक नाही. तो अध्यात्मिक प्रवासाला मदत करतो. रोजच्या रोज बासुंदी, गाडी, बंगला मिळवायला मदत करत नाही. “महा”लक्ष्मी ही देवीमाहात्म्यात वर्णन केलेली तीन देवतांची गँग. समुद्रमंथनातून बाहेर आलेली लक्ष्मी नव्हे! ती गँग नेहेमीच काली (तुमच्यातल्या षड्रिपूंचा म्हणजे वासना, भीती, मद (ego), मत्सर, राग, द्वेष अशा सहा शत्रूंचा नाश करणारी), लक्ष्मी (संपत्ती देणारी) आणि सरस्वती (ज्ञान देणारी) ह्या तीन देवतांच्या स्वरूपात समोर येते. नेहेमीच ह्या देवता सिंहावर आरूढ असतात. कन्याकुमारी म्हणजे बाणासुराला मारण्यासाठी घेतलेला विष्णूचा अवतार. पण ती शंकराच्या प्रेमात पडली आणि आपल्या निर्धारापासून ढळली. नारदाने तिला आठवण करून दिल्यावर तिने परत निर्धार केला आणि बाणासुराला ठार मारले. हा “Kanyakumari Resolve” दक्षिणेत फारच प्रसिद्ध आहे. येथे तपश्चर्या आणि हा निर्धार (Resolve) करून विवेकानंदांनी हिंदू धर्माचा आणि महर्षी महेश योगींनी Transcendental Meditation (TM) चा प्रसार केला. रामेश्वरची कथा तर फारच गहन आहे. रावणासारख्या महान तपस्वीला आणि वेदाचार्याला मारण्याआधी रामाला पूजा करायची होती. पण यज्ञासाठी सर्वात बेष्ट पुजारी कुठून आणणार? त्याने रावणालाच बोलावले. रामाने रावणाला नमस्कार करत त्यालाच ठार मारण्याचा संकल्प सांगितला. रावण रामाला “तथास्तु” म्हणाला. असं म्हणे प्रत्येक देवळाचे स्थलपुराण असते. ते आम्ही शिकत गेलो. देवळात जाताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन माझा कन्याकुमारी resolve कोणता? माझा स्वतःचा धर्म (म्हणजे religion नव्हे, धर्म म्हणजे रोजचे आचार विचार आणि राहणीमान) नक्की काय आहे? मी सिद्धी कशी मिळवायची? अशा प्रश्नांचा विचार सुरु केला तर मला वाटतं तीर्थयात्रा सफल संपूर्ण होत असावी. ह्या तीर्थयात्रेने, हेवीने आणि सगळ्या वारकऱ्यांनी मला ह्या देवळांमध्ये जाऊन स्वतःमध्ये डोकवायला शिकवलं.
दक्षिण भारतातील आमचं पहिलं देऊळ म्हणजे तिरुवन्नमलई. गावात आणि देवळात वेड्यासारखी गर्दी होती. देवळाच्या आवारात तर ५ लाख माणसं होती. लहान मुले, म्हातारी माणसे, श्रीमंत, गरीब, चिमणी बाळं, तरुण बायका, अक्षरशः माणसांचा महासागर पसरला होता. सगळीकडे आरडाओरडा, मधेच “ॐ नमः शिवाय” चा मंत्रघोष, शंख, घंटा ह्यांचा गजर, चेंगराचेंगरी, लांब लांब लायनी… एव्हढी माणसं अगदी छोट्या जागेत आली तर दुसरं काय होणार? पण एव्हढं सगळं असून सुद्धा गर्दीत एक विचित्र शिस्त होती. कोणीही पुढे घुसत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात अपार श्रध्दा होती आणि दर्शनाची आतुरता होती. आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच बायका होत्या, त्यासुध्दा अमेरिकन! त्यामुळे आमच्यातल्या भारतीयांचे डोळे, कान, मन सगळंच एकदम तीक्ष्ण झालं होतं. पण कुठेही छेडछाड होत नव्हती. बायकांना चक्क सुरक्षित वाटत होतं. गर्भगृहात शिरायचं, आतमध्ये खूप कुठेतरी अंधारातल्या दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात दोन सेकंद शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं, आणि मग आयुष्यभर कृतार्थतेने जगायचं, रोजच्या आयुष्यात माणसांवर आणि जगावर प्रेम करायचं, ह्यालाच कदाचित श्रद्धा म्हणत असावेत. मी पैज लावून सांगतो, की ह्या श्रद्धेच्या महासागरात तुम्ही हेलावून गेला नाहीत तरच आश्चर्य! आत्ता सुद्धा लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी तरळलं आहे. दर्शन झाल्यावर गर्भगृहाच्या बाजूलाच एका दगडी बांधकामाच्या विस्तीर्ण आणि बंदिस्त सभागृहात आमच्या उंबेर्तोने आम्हा सगळ्यांना बसवलं. आणि आम्ही “ओम नमः शिवाय” चा गजर सुरु केला. हळूहळू आजूबाजूच्या हजारो लोकांनी तो मंत्र त्याच ठेक्यात म्हणायला सुरुवात केली. तो सगळ्यांचा आवाज आमच्या रक्तात घुमायला लागला. रंध्रारंध्रातून प्रत्येक पेशी त्या तालावर नाचायला लागल्या. हा ताल, हा नाद, हा नाच, हे गाणं, हे श्वास, हे सगळं सगळं सांगण्याच्या पलीकडचं आहे! पंचेंद्रियांच्या पलीकडचं आहे!
तिथून बाहेर पडल्यावर एव्हढी गर्दी का आहे ते आम्हाला शेवटी एकदाचं कळलं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तामिळनाडूत “कार्तीगेयम दीपम” नावाचा सण सुरु होणार होता. कार्तीगेयम दीपम म्हणजे दुसरी दिवाळीच! तिरुवन्नमलई देवळाच्या बाजूलाच एक उंच डोंगर आहे. तो अख्खा डोंगरच शंकर आहे असं मानलं जातं. चंद्र दिसल्याशिवाय कसा ईद सुरु होत नाही, तसंच ह्या डोंगरावर अग्नीचा उजेड दिसल्याशिवाय हा सण सुरु होत नाही. ह्याच डोंगरावर आम्ही सगळे जण अनवाणी पायाने दोन तास चढलो. वरती रमणा महर्षींनी जेथे तपश्चर्या केली ते देऊळ आहे. खाली देवळात आणि गावात ही एव्हढी खच्चून गर्दी, आणि वरती ह्या देवळात फक्त आम्ही इन मिन ३०-३५ माणसं, तेव्हढीच माकडं आणि दोन रखवालदार. त्या गूढ शांततेत सगळ्या पब्लिकने डोळे मिटून तासभर ध्यानधारणा केली. मी लिंबूटिंबू असलो म्हणून काय झालं? मी पण ध्यान लावले. दहा सेकंदात मन भरकटायला लागलं. ५-१० मिनिटात टिवल्याबावल्या सुरु झाल्या. इतर माकडांच्या कंपूत अजून एक माकड सामील झालं. आणि अजून एक रमणा महर्षी ह्या जगात अवतरायचे राहून गेले. नंतर बसमध्ये मार्कने मला ध्यानाचा एक सोपा मार्ग सांगितलं. एक मंत्र मनात पकडायचा (तो धार्मिक असायची आवश्यकता नाहीं, अगदी “छत्री”, “पैसे”, “दिवा” असे कुठलेही शब्द चालतील) आणि अगदी रेटून २० मिनिटं गजर लावून बसायचंच. मन भरकटलं तर ह्या मंत्राच्या साहाय्याने परत त्याला जागेवर आणायचं. एका झटक्यात भारतापासून दहा हजार मैलावर राहणाऱ्या मार्कच्या मदतीने एक मूळचा भारतीय अध्यात्माच्या वाटेला लागला. पुढे एका देवळात पातंजलींच्या मूर्तीसमोर ह्याच भारतीयाने (म्हणजे मी) ध्यानधारणेत त्यातल्या त्यात थोडी सुधारणा केली.
आमचा दुसरा पडाव होता चिदंबरमला. तिरुवन्नमलई हे पंचमहाभूतांतल्या अग्नीचे देऊळ तर चिदंबरम हे आकाशाचे. नटराजाच्या रुपातलं शंकराचे हे अगदी खास देऊळ. असे म्हणतात की पातंजलीला योगसूत्र येथेच सुचले. व्याघ्रपाद ऋषींनी तांत्रिक पंथ येथेच स्थापला आणि भरत मुनींना भरतनाट्याची स्फूर्ती येथेच मिळाली. इथली गोष्ट सुद्धा मस्त! तराई जंगलातले ऋषी-मुनी आरामाच्या आयुष्याला सुखावले होते. मग हळूहळू त्यांना स्वतःचा गर्व निर्माण झाला. तो त्यांचा गर्व घालवायला शंकर (एका ऋषीच्या अवतारात) आणि विष्णू (मोहिनीच्या वेशात) जंगलात अवतरले. तेथे तांडवनृत्य करून शंकर-मोहिनीने आपण स्वतः कोण आहोत आणि जंगलातल्या ऋषी-मुनींची औकात काय आहे ह्याची त्यांनी जाणीव करून दिली. आरामदायक आयुष्य, त्यानंतर गर्व आणि त्यानंतर कुठल्याही बदलाला विरोध असं जगातलं अगदी ओळखीचं घातकी चक्र आहे. नटराजाच्या मूर्तीसमोर ते चक्र मोडून आपला गर्व घालवायचा आणि निरनिराळ्या नवीन विचारांना, बदलांना मोकळ्या मनाने सामोरे जायचे हे त्या गोष्टीचे आणि देवळाचे सूत्र आहे.
आम्ही येथे संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर अगदी साग्रसंगीत रुद्रहवन केलं. असा विधी मी कधीच बघितला नव्हता. दगडात बांधलेले तीन बाजूंनी बंदिस्त असे प्रचंड सभागृह! आम्ही सगळे पायऱ्यांवर बसलेलो! कमरेखाली लुंग्या-धोतर आणि वरून सगळे पुरुष उघडबंब. बायकांना साड्या घालण्याची आवश्यकता नव्हती, पण पाय आणि खांदे झाकणं आवश्यक होतं! खाली जमिनीवर भला मोठा यज्ञकुंड. त्याच्या एका बाजूला १२-१५ आणि दुसऱ्या बाजूला अजून १२-१५ पुजारी! सगळ्या उघडबंब पुजाऱ्यांचा एकच युनिफॉर्म! जानवं, कपाळाला भस्म आणि लुंगी! टीव्हीवर दिसणाऱ्या चाणक्यासारखे सगळ्यांचे केस लांबलचक. त्यांनी अचानक एकदम Stereophonic Corus आवाजात आलटून पालटून मंत्रघोष सुरु केला. यज्ञाच्या उजव्या बाजूला निरनिराळ्या मोठ्या भांड्यांमध्ये धान्ये, भाताच्या लाह्या, तूप, समिधा वगैरे गोष्टी ठेवल्या होत्या. एका वृद्ध पुजाऱ्याने तरुण पुजाऱ्याला विधीसाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. हळूहळू यज्ञातला तो धूर सभागृहाच्या अगदी वर वर जायला लागला. मग यज्ञकुंडामधून ज्वाळांचे लोटच्या लोट धगधगू लागले. तेव्हढ्यात विजेच्या कडकडाटात प्रचंड पाऊस सुरु झाला. तीन चार वटवाघळे कुठून तरी आली आणि धुरात वर गेली. सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला मृदंगम, नादस्वरम (शहनाई सारखे वाद्य), घंटा आणि शंखाच्या गजरात संध्याकाळची देवीची रोजची मिरवणूक सुरु झाली. तो कडाडणारा पाऊस, ती धुराची वलयं, ती मिरवणुकीची वाद्ये आणि त्यातूनही जाणवणारा तो मंत्रघोष ! आधीच्या देवळासारखाच हा आणखी एक मंत्रमुग्ध अनुभव! परत एकदा शब्दांच्या पलीकडला! पंचेंद्रियांच्या पलीकडला!
हे विधी कशासाठी? किंबहुना हे देव कशासाठी? देवळं कशासाठी? तीर्थयात्रा कशासाठी? माझ्यासाठी तरी हे प्रश्न मी कदाचित तात्पुरते सोडवले आहेत. एक उदाहरण देतो. सत्यनारायणाच्या पूजेत पाणी भरलेल्या कलशावर नवग्रह ठेवतात. त्या कलशाकडे बघून मला हिमालयातली सुंदर गंगोत्री आठवते. पंडित जगन्नाथाचे गंगालहरी काव्य आठवतं. जगातल्या हजारो नद्यांच्या काठांवरची गावे आठवतात. त्यांची निरंतर संस्कृती, लोकांची ओघवती आयुष्यं आठवतात. मग मला मी जाणवतो. माझ्या धमन्यांमधून वाहणारं युगानुयुगांचं तत्वज्ञान, पूर्वजांच्या आनंदाचे आणि दुःखाचे क्षण सगळं सगळं जाणवतं. पूजेत त्या कलशाला हात लावल्याशिवाय हा असा मी मला कसा भासणार? तसंच तीर्थयात्रेचं! काही कर्मयोगी आई-वडिलांची सेवा करताना देवाला विटेवरच ताटकळत वाट बघायला लावतात, नाहीतर काही साबरमतीच्या आश्रमात झाडू मारून मोक्ष मिळवतात. संतांना “निधान” आणि “निरंतर” विठ्ठल बघून मोक्षाला जाता येतं. काही जण ज्ञान मार्गाने वेद कोळून पितात आणि मुक्ती मिळवतात. मी तर एक शेणकूट आणि कफल्लक प्राणी! हे असलं काही माझ्या नशिबी ह्या जन्मीतरी नाही. पण तीर्थयात्रेला जाऊन मी माझ्या अंतरात डोकावून पाहायला लागू शकतो. कुठेतरी धडपडत ह्या जन्मी स्वातंत्र्याच्या ह्या प्रवासाचं पहिलं पाऊल टाकू शकतो (मुक्ती आणि मोक्ष ह्या भव्य शब्दांसाठी स्वातंत्र्य हा माझा साधा सरळसोट शब्द!). समर्पित व्हायची भावना जागृत करू शकतो. म्हणून हे विधी, देव, देवळे, तीर्थयात्रा, ही एक धडपड!
कुठेतरी, काहीतरी असंच काहीसं टोनीचं झालं. ती वाहायची फुलं, नारळ, उदबत्त्या, आरती, मंत्र, मोठ्या समया, कपाळाला फासलेलं भस्म आणि लालभडक कुंकू ह्या सगळ्यांमुळे टोनीला त्याचे ६,००० मैलांवरच्या पूर्व सामोआमधले पूर्वज आठवले. आणि हा ३०० पौंडी आणि सहा फुटी टोनी चिदंबरमच्या गर्भगृहासमोर अक्षरशः ढसाढसा रडायला लागला. त्याच्या आजोबांना हाकलवल्यावर त्या सगळ्या कुटुंबीयांनी त्यांच्या संस्कृतीशी संबंध तोडला होता. त्याला अचानक ते धागे ह्या देवळात सापडले. त्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या दोन जणांचे वाढदिवस त्याने आणि त्याच्या १७ वर्षाच्या मुलाने खास सामोआचे पवित्र हाका नृत्य करून साजरे केले (२). त्या दोघांच्या हाका नृत्याचा अफाट जोश, अक्राळ विक्राळ चेहरे, जोरजोरात ठोकलेल्या आरोळ्या आणि त्याचवेळी डोळ्यातले ओघळणारे अश्रू! कसं वर्णू ते दृश्य, ते ऋणानुबंध?
आमच्या ह्या तीर्थयात्रेत हे असे एका पाठोपाठ एक धक्के बसतच राहिले. तंजावरला असताना दुपारी हेवी अचानक म्हणाला, “आज आपण fire yogi रामभाऊंना भेटणार आहोत. गुगलवर जाऊन त्यांच्या विषयीचे व्हिडिओ बघा.” हा योगी रोज १२-१४ तास ध्यानधारणा करतो. गेले २६+ वर्षे दोन केळी आणि एक कप दुधावर राहतो. (म्हणजे इतर वेळी पाण्याचा थेंब सुद्धा नाही). अतिशय साधी १० x १० फुटी खोली, एक सुंदर गणपतीचे मंदिर, कृश शरीर, वाढलेली दाढी, आणि निग्रही चेहरा. टीव्हीवर भाषणे नाहीत, कोणाकडून दक्षिणा नाही, अंगावर दागिने नाहीत, भरजरी शुभ्र कपडे नाहीत. ४-५ दिवसांच्या तपश्चर्येनंतर हे महाराज १२-१२ तास धगधगत्या यज्ञकुंडात झोपू शकतात. आम्ही कसेतरी त्यांच्या छोट्याशा खोलीत उभे राहून बोलू शकलो. अगदी अस्खलित इंग्लिशमध्ये ते म्हणाले, “ह्या क्षणाला मी तुमच्यासारखाच आहे. पण ४-५ दिवसांच्या मंत्रांनंतर तुमचे शारीरिक नियम मला लागू पडत नाहीत. मग मी अग्नीला आलिंगन देऊ शकतो. (३)” सगळी मंडळी बाहेर पडल्यावर मागे रेंगाळत मी म्हणालो, “माझ्या वडिलांना पण रामभाऊ म्हणतात.” मग मी मूळचा महाराष्ट्राचा हे कळल्यावर ते मराठीत म्हणाले, “मी सुद्धा मराठीच. समर्थ रामदास स्वामी हे आमचे पूर्वज.” त्यानंतर माझ्यासाठी त्यांचा खास उपदेश म्हणजे “देव बिव नको. फक्त आई-वडिलांची पूजा केलीत तरी पुरेसं आहे.” बाहेर पडताना त्या गणपतीची मखर मला तंतोतंत आमच्या घरातल्या मखरीसारखी वाटली. माझ्या बाबांची खूप म्हणजे खूपच आठवण आली. कुठला संबंध? कुठलं काय? ही तीर्थयात्रा आणि आयुष्याची तीर्थयात्रा असे जोडले जातील हे कुणाला माहिती होतं?
असे किती किती अनुभव सांगणार? अतिशय सुंदर शिल्पकला असलेली हजार खांबी सभागृहे तीन-चार देवळात तरी बघितली. रामेश्वरच्या २२ कुंडात सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि ओलेत्याने हॉटेलात परत गेलो. कुंडांची नावे तरी किती काव्यात्मक? संस्कृत श्लोक ज्या छंदांमध्ये केले जातात त्यातल्या तीन छंदांची नावे तीन कुंडांना आहेत. आम्ही रामेश्वरला आमच्या गाईडला खांबांवरच्या चितारलेल्या गोष्टी सांगायची विनंती केली. पाच गोष्टी सांगायला तिला दीड तास लागला. ती म्हणाली, खांबांवर सगळ्या कोरलेल्या गोष्टी सांगायला एक महिना तरी लागेल. रॅंडीने तंजावरला वीणेच्या मैफिलीसाठी जाताना वीणा आणि सतारीतला फरक सविस्तरपणे सांगितला. एका विष्णूच्या देवळात आम्ही सूचना देऊन सुद्धा तिथल्या पुजाऱ्याने आमच्यातल्या एका लेस्बियन जोडप्याला अगदी आग्रहाने पुढे बोलावले आणि अगदी सहजपणे त्यांना हजार वर्षांच्या परंपरेचा भाग बनवले. जगातल्या अगदी पुरोगामी लोकांना सुद्धा कदाचित झीटच आली असती हे पाहून! पण ह्याच टूरमध्ये दोन देवळात केवळ कातडीचा रंग गोरा म्हणून ह्या आमच्या भाविकांना प्रवेश सुद्धा मिळाला नाही. कन्याकुमारीला विवेकानंदांच्या स्मारकाला भेट देऊन माझ्या आणि अंजलीच्या आई-वडिलांची इच्छा मी पूर्ण केली. पद्मनाभस्वामींच्या देवळात पहाटे ३ वाजता ८००० लोकांच्या रांगेत उभे राहून दर्शन घेताना आरती ऐकली आणि जीव धन्य झाला. चेट्टीनाडमध्ये प्रचंड मोठ्या वाड्यात राहिलो. १५ फुटी रुंदीचा चिटपाखरू नसलेला रस्ता आणि दोन्ही बाजूला ओसाड अवाढव्य राजवाडे, हा सुद्धा अनुभव घेतला. एक ना दोन! असे किती अनुभव सांगणार?
पण कुठल्याही चित्तथरारक सिनेमालासुद्धा क्लायमॅक्स लागतोच. आमच्या नाट्यपूर्ण क्लायमॅक्सचे हिरो होते डंकन आणि जनिता. डंकन हा रॅप संगीत गाणारा शीघ्रकवी तर जनिता म्हणजे कर्नाटकी संगीताची विद्यार्थिनी आणि हेवीची मुलगी. आमच्या समारोपाच्या गप्पांमध्ये ब्रेन्टने हळूच पेटी समोर आणली. डंकनने प्रश्न विचारला, “तुमच्यासाठी शंकर म्हणजे काय?” हेवी म्हणाला, “Auspicious nature of consciousness”, राजीव म्हणाला, “Everything” आणि आमची आवडती राजकन्या ऑलिव्हिया म्हणाली, “To share and give everything that we have”. ह्या तीन मुद्द्यांवर मग रॅप कीर्तन सुरु झालं. मागे जनीताचं रागांवर आधारित गाणं आणि अगदी खर्जातल्या Baritone आवाजातलं डंकनचं रॅप संगीत! “शिव शिव शिव शंभो” च्या ध्रुवपदावर आणि सेल फोनमधल्या ठेक्यावर अजून एका शब्दांच्या पलीकडल्या अनुभवाला सुरुवात झाली. काही वेळाने हॉटेलातले गुजराथी माणसे आम्हाला सामील झाली. मग आम्ही थोडा वेळ “शिव शिव शिव शंभो” च्या तालावर गरबा पण केला. तिरुवन्नमलईला जे जाणवलं, तेच परत एकदा इथे जाणवलं. तोच ताल, तोच नाद, तोच नाच, तेच गाणं, तेच श्वास, तेच ते सगळं सगळं सांगण्याच्या पलीकडचं! पंचेंद्रियांच्या पलीकडचं!
अशा तऱ्हेने ह्या लिंबूटिंबूने कसंबसं धडपडत धडपडत स्वातंत्र्याकडे घेऊन जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या प्रवासाचं पहिलं पाऊल टाकलं.
नितीन (दाढी) अंतुरकर
(१) माझ्या अनुभवांची यादी: मराठी: http://www.dadhionthetrail.com/2021/04/11/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5/ English: http://www.dadhionthetrail.com/2022/05/18/my-life-experiences
(२) उदाहरण म्हणून न्यूझीलंडच्या “All Black” टीमचे सामना सुरु होण्यापूर्वीचे हाका नृत्य. बारसं, वाढदिवस, अंत्ययात्रा, खेळाचे सामने अशावेळी हाका नृत्य करायची प्रथा आहे. https://www.youtube.com/watch?v=TI93YHILSgk
(३) Fire Yogi रामभाऊ ह्यांचा You-Tube वरील एक व्हिडिओ (इंग्रजी): https://www.youtube.com/watch?v=rGUMo4uj_dQ