संबंध महाराष्ट्र आणि जगभर विखुरलेली मराठी मंडळी गणपती बाप्पाची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती म्हणून झाली की अक्षरशः त्याच ठेक्यात “दुर्गे दुर्घट भारी” ही दुर्गेची आरती पण लगेच म्हणून टाकतात. ह्या दुर्गेच्या आरतीत दुसऱ्या कडव्यात “चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाही” हे जे दोन चरण आहेत ते अगदी ठेक्यात जगभर सगळ्या घरांमध्ये, टीव्ही वर, प्रचलित गाण्यांमध्ये अगदी जोरात म्हंटले जातात. त्यामागची आख्यायिका (म्हणजे गोष्ट) सांगण्यासाठी हा लेख!
नरहरी हा एक टपोरी मुलगा. गावातून हिंडताना इकडे कुत्र्याच्या दिशेने दगड भिरकव, तिकडे समोरून येणाऱ्या मुलाला हूल दे, गर्दीत समोरच्या माणसाच्या टपलीत मार असे चाळे करण्यात त्याचा दिवस जात असे. एके दिवशी, दिवसभर अशी टवाळी केल्यावर ग्रीष्म ऋतूच्या रणरणत्या उन्हात तो आणि त्याचे तीन मित्र ह्या गोदावरी नदीच्या काठावरच्या वडाखाली थकून त्या घनदाट सावलीत न बोलता निपचित पडले होते. तिथे अशीच आणखी दोन मुले आली आणि मग ते परत नदीच्या घाटावरून गप्पा मारत उनाडक्या करत निघाले. वाटेत त्यांना दुर्गेचं मंदिर लागलं. आणि झालं! ही दुर्गा भयानक दिसते का सुंदर दिसते ह्यावरून त्यांच्यात भांडण सुरु झालं. वाद वाढत गेला, हमरीतुमरी आणि धक्काबुक्की झाली. कोणीतरी तेव्हढ्यात नरहरीला नदीत ढकलून दिलं. आणि नदीच्या त्या वाहत्या प्रवाहात तो गटांगळ्या खाऊ लागला. पट्टीच्या पोहोणाऱ्या एका मित्राने त्याला कसाबसा बाहेर काढला. हुश्य, जीवावरच बेतलं होतं पण वाचला बिचारा! ह्याच नरहरीने पुढे जाऊन दुर्गेची आरती लिहिली. त्यात त्याला ह्या भयानक प्रसंगाची आठवण झाली. म्हणून त्याने लिहिलं,
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ! साही विवाद करता पडलो प्रवाही !!
आता ही आख्यायिका कळल्यानंतर तरी ही दुर्गेची आरती म्हणताना नरहरी गटांगळ्या खात असल्याचं दृश्य डोळ्यांसमोर आणायला विसरू नका. “एकमेकांशी भांडू नये” अशी ह्या सुंदर आरतीची सुंदर शिकवण असावी असे वाटते.
अर्थात काही मंडळींना ही आख्यायिका मान्य नाही. “अर्थात” म्हणण्याचे कारण म्हणजे अशी नाठाळ मंडळी समाजात कायम आढळतात.
त्यांना वाटतं की “चारी श्रमले” हे चार वेदांविषयी (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद) सांगितले असावे. हे वेद दुर्गेचा अफाट महिमा गाताना अगदी थकून गेले आहेत आणि आता त्यांच्याकडे शब्द उरलेले नाहीत असं नरहरी आरतीतून सांगत असावा. वेद आणि उपनिषदांनंतर काही जणांनी देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाकारला (नास्तिक) आणि काही जणांनी ठेवला (आस्तिक). नास्तिकांच्या तत्त्वज्ञानाच्या काही शाखा म्हणजे (चार्वाक, आजीविक आणि सगळ्यांना माहीत असलेल्या म्हणजे बौद्ध आणि जैन). आस्तिकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या सहा मूलभूत शाखा आहेत. त्या म्हणजे सांख्य (कपिल मुनी), योग (पातंजली ऋषी), न्याय (गौतम ऋषी), वैशेषिक (कानडा ऋषी), मीमांसा (जैमिनी ऋषी) आणि वेदांत (व्यास किंवा बादरायण मुनी). आचार्य शंकराचार्यांनी पुढे आठव्या शतकात अद्वैत वेदांताचा प्रसार केरळपासून ते काश्मीरपर्यंत संपूर्ण भारतभर केला. “ही सहाही तत्वज्ञाने एकमेकांशी वाद घालताना एका बाबतीत अगदी शरण गेली ती म्हणजे दुर्गेची महती” असं आरतीच्या सांगण्यातला गर्भितार्थ आहे असं ह्या तुरळक नाठाळ मंडळींना वाटत असावे. त्यामुळे नरहरीने लिहिले आहे की,
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ! साही विवाद करता पडले प्रवाही !!
आता आरती म्हणताना “पडलो” म्हणून नरहरीच्या गोदावरीतल्या गटांगळ्या आठवायच्या की “पडले” म्हणून साही तत्वज्ञाने कशी दुर्गेला शरण गेली ते आठवायचे हे तुम्हीच ठरवा.
गणेश चतुर्थीला अजून ३-४ महिने असताना ह्या आरतीची चर्चा आत्ताच कशाला पाहिजे असा प्रश्न तुमच्या मनात येईल. पण जागतिक मराठी दिन नुकताच साजरा झाला. जनता जनार्दन नुसत्या एका कान्याच्या मदतीने अख्ख्या पाच हजार वर्षांची परंपरा लाभलेलं प्रगल्भ तत्वज्ञान एका फटक्यात कसं फक्त मराठीतच बदलू शकतो हे जागतिक मराठीच्या दिवशी लक्षात यावे म्हणून हा लेख! अरे हो, त्यातून आज जागतिक महिला दिन सुध्दा आहे. ह्या आरतीच्या निमित्ताने एका चांगल्या पुरुष कवीला नदीत बुडवायचा की दुर्गेसारख्या स्त्री देवीचा उदोउदो करायचा हे सुध्दा तुम्हाला ठरवता येईल. कित्ती मज्जा आहे की नाही?