ॲपेलेशिअन ट्रेल ही २,२०० मैलांची पायवाट अमेरिकेच्या पूर्वेकडच्या १४ राज्यांमधल्या डोंगरांतून जाते. १० लाख फुटांचा चढउतार असलेली ही पायवाट चक्क बहुतेक देशांपेक्षाही लांबलचक आहे. ही पायवाट सलग ६-७ महिन्यात पार करण्याचा माझा प्रयत्न बऱ्याच निरनिराळ्या शारीरिक दुखापतींमुळे ह्या वर्षीतरी यशस्वी झाला नाही. पण मी जे काही ३३४ मैल चाललो, त्यात शिकलेल्या गोष्टींची ही गम्मत जम्मत!
माझे सगळे पूर्वगृह धुळीस मिळाले.
तुफान गरमी, चड्डी पासून पोटऱ्यांवर ठिबकणारं घामाचं पाणी, निरनिराळे चढउतार, पाठीवर घेतलेली २६-२७ पौंडांची बॅकपॅक आणि माझं दमलेलं शरीर घेऊन मी एकदाचा “५०१” नावाच्या शेल्टरला पोहोचलो. शेल्टर म्हणजे छत आणि तीन बाजूंनी बंद असलेलं लाकडी घर. ना तिथे संडासाची सोय, ना वीज, ना दिवा, ना पाणी! पण पावसा-वादळामध्ये त्यातल्या त्यात थोडी आश्रयाची जागा म्हणून त्याचा उपयोग. तिथे पोचल्या पोचल्या समोर दिसले ते सहा उघडबंब पुरुष. सगळ्यांचा गांजा ओढण्याचा भाता अगदी जोरात चालू होता. (सगळ्या प्रकारच्या ड्रग्सना गांजा हे मीच दिलेलं मुळमुळीत नाव, बरं का!) ह्यांचे अगदी इंचनइंच देह रंगीबेरंगी टॅटूने कोरलेले होते आणि बाजूलाच भसाड्या आवाजात जोरात रॉक म्युझिक चालू होतं.
हे सगळं मला नवीन होतं. मी शहारलो. आता हे काय माझ्या नशिबात आहे असा विचार मनात येऊन गेला. त्याचं काय आहे, डोंबिवलीच्या मध्यम वर्गात वाढलेला मी मनुष्य. अगदी सरळसोट मार्गाने झालेला माझा एकमार्गी प्रवास. गांजा तर जाऊच दे, पण २४ वर्षांपर्यंत दारूच्या थेंबालाही मी शिवलो नव्हतो. रॉक म्युझिक नाही, धामडधिंगा नाही, मुलींशी बोलणं सुध्द्धा नाही. साला, अगदीच सरळसोट जिंदगानी होती. आज मात्र इथें मी माझा घामाने पिचपिचीत भिजलेला शर्ट बाजूला काढून त्यांच्यात चक्क गप्पा मारायला जाऊन बसलो होतो. माझ्या शरीराला येणारा घामाचा घाणेरडा वास, लांबलचक वाढलेली दाढी, केसाळ उघडबंब पोट किंवा धुळीने माखलेलं शरीर, सगळंच एकदम त्यांच्यासारखं होतं! त्यामुळेच कदाचित त्यांनी मला त्यांच्यातलाच मानलं असावं. काही का असेना पण आम्ही वेगवेगळी रॉक म्युझिक, वेगवेगळे गांज्याचे प्रकार, ते एकमेकांना कुठे भेटले, त्यांचे ट्रेल विषयीचे अनुभव अशा इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा मारल्या. (गांजा प्यायच्या पहिल्यावहिल्या अनुभवाला मात्र मी नकार दिला.)
त्यांच्यापैकी एक जण मला म्हणाला की “माझे वडील धर्मोपदेशक आहेत आणि त्यामुळे मी अतिशय बंडखोर झालेलो आहे.” मग रेनमॅनने (हे त्याचं खास ट्रेलवरचं टोपणनाव) त्याला एक अफाट गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “बाबा रे, ऐक. तुला एक अतिशय फंटास्टिक आयडिया सांगतो. मी चक्क एकेका धर्मामध्ये एकेक वर्ष अगदी समरस होऊन जातो. प्रत्येक वर्षी त्या त्या धर्माची पुस्तक वाचतो, त्यांच्या देवळात / मशिदीत / चर्चमध्ये जातो, सगळी प्रवचनं ऐकतो. ध्यान लावतो. असे चक्क 12 वेगळे वेगळे धर्म मी बारा वर्षात पाळले आहेत. त्यामुळे आता मला कुठल्याच धर्माचं अवडंबर वाटत नाही, कुठल्याच धर्माचा मला त्रास होत नाही.”
ओ माय गॉड! एका छोट्या साध्या वाक्यामधून ह्या भसाभसा गांजा पिणाऱ्या माणसाने माझ्यासारख्या सरळसोट माणसाला केव्हढा जबरदस्त धडा शिकवला! पूर्वग्रह घालवायचा काय साधा आणि सोपा मार्ग सांगितला! जरा विचार करा की मी पुढच्या वर्षी मुस्लिम व्हायचं, मग त्यानंतर ज्यू, मग बौद्ध, मग मॉर्मन वगैरे वगैरे! एका फटक्यात ह्या धर्मांविषयीचे माझे सगळे पूर्वग्रह गायब होतील. एखाद्याची जात, कातडीचा रंग ह्यांविषयी पूर्वग्रह आहेत? मग त्या जातीच्या माणसांना मित्र बनवा. कुठल्याही पूर्वग्रहाचा स्वतः अनुभव घ्या आणि मग चट के फट! सगळ्या पूर्वगृहांना बाय बाय करा! अचानक मला जाणवलं की हा विचित्र मनुष्य देवाचा अगदी आवडता बंदा असावा! (हा लेख लिहिल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की स्वतः रामकृष्ण परमहंसांनी सुध्दा हीच पद्धत वापरून निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास केला होता.)
मी भीतीला तडीपार केलंय.
मला आठवतंय! 8 फेब्रुवारीचा दिवस होता. अजून दोन महिने होते मला ट्रेलवर जायला! माझ्या दोन वर्षांपूर्वीच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरने माझी Echo Stress Cardiogram Test करायची ठरवली. त्यात म्हणे मी धावताना आणि विश्रांती घेत असताना हृदय कसं चालतंय ते बघतात. टेस्ट नंतर डॉक्टर म्हणाले, “नितीन, तुझ्या कुठल्याही रक्तवाहिनीत अडथळे नाहीत. पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुझं Ejection Fraction फक्त ३५% आहे. म्हणजे प्रत्येक ठोक्याला हृदयातलं फक्त ३५% रक्त शरीरात जातंय. I am sorry. पण तुला ॲपेलेशिअन ट्रेलचं स्वप्न विसरायला लागेल. आपल्याला खरं तर एक ऑपरेशन करायला लागणार आहे.” मी मनातल्या मनात किंचाळत होतो, “साला, हा काय नवीन राडा आहे?” पण चेहऱ्यावरची माशीसुध्दा न हलवता मी डॉक्टरला म्हणालो, “डॉक्टर, पण मला व्यायाम करताना काही विचित्र जाणवत नाही.” त्यांनी मग एक दुसरीच टेस्ट केली आणि त्यात त्यांना Ejection Fraction ४५% आहे असं लक्षात आलं. मी आता पुरताच गोंधळलो होतो. मनाने कधी नव्हे ती कच खाल्ली होती. ट्रेलवर कसं होणार ह्याची चिंता वाटायला लागली. तेंव्हा अंजली, म्हणजे माझी सर्वात जवळची मैत्रीण, mentor आणि अर्धांगिनी, मला म्हणाली, “नितीन, सर सलामत तो पगडी पचास हे खरं. पण जगात फारच कमी माणसं अशी स्वप्नं उराशी बाळगतात. तू हे तुझं स्वप्न ट्रेलवर जायच्या आधीच रद्द करू नकोस. तुझ्या दररोजच्या हालहवालीं वरून ठरव की आपण पुढे जायचं की प्रवास रद्द करायचा.” त्या दिवशी अंजलीने माझ्या भीतीला खुल्लमखुल्ला ठेंगा दाखवला होता.
माझी भीती वाटण्याची यादी खूप मोठी होती. दोन वर्षांपुर्वीसारखाच हृदयविकाराचा झटका आला तर काय करू? डावा गुडघा धातूचा आहे, तो तुटला तर काय करू? घोट्याच्या खालचे सगळे सांधे गाउटमुळे दुखतात. त्यांचं काय होईल? माझा उजवा हात ६०F तापमानाखाली बधिर होतो, तसं झालं तर? पेन्सिल्वेनिया मध्ये मोठमोठे प्रचंड दगड आहेत. तिथे पडून डोक्याला मार बसला तर? अमेरिकेतल्या छोट्याछोट्या गावातल्या लोकांनी माझ्यासारख्या भारतीय वंशाच्या माणसाला बघितलं नसणार. मग मला ते कसं वागवतील? दर १७ वर्षांनी Cicada हे किडे प्रचंड प्रमाणात जमिनीतून वर येतात. हेच ते वर्ष त्यांच्या जमिनीबाहेर येण्याचं. ते अंगावर चढले तर? १०-१० फुटाचे विषारी साप ह्या ट्रेलवर खूप आहेत. त्यांच्यावर माझा पाय पडला तर? मधमाशी चावली तर, उंदरांनी शेल्टरमध्ये माझ्या पायाचा चावा घेतला तर, ticks चावून मी लुळा झालो तर? एक ना दोन, ही भली मोठी यादी होती भीती वाटण्याची. त्याशिवाय ट्रेलवरच्या गोष्टी होत्याच. वीज अंगावर पडली तर, वादळात झाड उन्मळलं तर, कळकळीची तहान लागली असताना पाणीच सापडलं नाही तर, पावसात पायाखालचे दगड घसरडे झाले तर?
ही सगळी भीती आता अगदी तडीपार झाली आहे. अक्षरशः चुकून सुध्दा त्यांचा विचार मनात येत नाही. सगळी आई वडिलांची आणि देवाची कृपा!
ह्यामुळे सर्वात मोठा झालेला फायदा म्हणजे ॲपेलेशिअन ट्रेल नावाचं एक अतिशय सुंदर जग माझ्यासमोर उघडलं गेलं. अगदी अलिबाबाच्या गुहेसारखं. मग मी भलंमोठं केसाळ अस्वल उघड्या जंगलात अनिमिष डोळ्यांनी बघू शकलो. Rattle Snake चं rattle होनाजी बाळाच्या अमर भूपाळीच्या तन्मयतेने ऐकू शकलो. बाकी सगळं जाऊ दे, मी चालताना खूप म्हणजे खूपच आनंदी राहू शकलो. आणखी एक मजा म्हणजे प्रत्येक क्षणाला वर्तमान काळात जगायला शिकलो. हे फार म्हणजे फारच अवघड आहे. घरात बसून किंवा भीतीपोटी हे मला कधीच जमलं नसतं! भविष्यकाळाची अधीरता नाही. भूतकाळाची कटकट नाही. १-१, २-२, ३-३, ४-४, प्रत्येक श्वासाला एक अंक मोजायचा. फार म्हणजे फारच मस्त!
नेणिवेच्या पलीकडल्या फार मोठ्या शक्तीची जाणीव झाली.
कुसुमाग्रजांच्या कवितेमधला एक निळा ढग ह्या निरभ्र आकाशात क्षितिजापाशी रेंगाळत दिसू लागला. हळूहळू तो वाघासारखा गुरगुरू लागला. मग असेच आणखी ५-७ ढग गोळा झाले. मग त्यांची काळी-निळी छटा जंगलातल्या ताज्या हिरव्या रंगावर झाकाळायला लागली. ट्रेलवरच्या Pinecone Needles च्या सड्याचा सावळा तपकिरी रंग अजूनच गूढ वाटायला लागला. जणू काही तो निळा-सावळा रंग आकाशातून जंगलात आणि जंगलातून माझ्या मनात प्रतिबिंबित व्हायला लागला होता. आणि.. आणि अचानक जोरात कडकडाट झाला, विजांचा लखलखाट झाला आणि आकाशातून पाऊस सुरु झाला. कानाचे पडदे फाटतील की काय असं वाटणारा कडकडाट. अक्षरशः आकाशातून दशलक्ष धबधबे कोसळू लागले. आणि ते तुफान वारं ! त्याला मी काय म्हणू? अवाढव्य झाडंसुदधा वेड्यासारखे झोके घेऊ लागली. हे झोके म्हणजे आनंदाने डोलणं नव्हतं. हा होता उन्मत्त बेभान नाच. आल्फ्रेड हिचकॉकच्या सिनेमात कसं दार बंद होताना “कुईई” असं आवाज करतं! अगदी तस्साच आवाज हजारो झाडं करू लागली. लाखो पानातून आकाशाला व्यापणारा गडगडाट (हो, ह्या आवाजाला सळसळाट म्हणता येणार नाही) येऊ लागला. उघडे हात आणि चेहऱ्यावर पावसाच्या असंख्य सुया बोचू लागल्या. अख्खी ट्रेलच कोकणातल्या नदीसारखी वाहू लागली. हे सगळं अतिशय घाबरवणारं होतं. मनाचं कोकरू थरथरत होतं. आणि ते अफाट सुंदर पण होतं. कसं सांगू? जंगलाचा हा सर्वात सुंदर असा अवतार होता. अचानक माझ्या मनाची वीज लखलखली. अचानक लक्षात आलं. वेद आणि उपनिषदांनी गायलेलं हेच ते तांडव नृत्य! तोच तो निळा सावळा शंकर नाचत होता आणि मी तोच नाच बघत जंगलाच्या अगदी मध्ये उभा होतो. त्या पावसात माझ्या डोळ्यातलं पाणी कुठे वाहून गेलं ते माझं मलाच कळलं नव्हतं.
असे केव्हढे तरी वेगवेगळे अवतार मी जंगलात बघितले. नेणिवेपलीकडल्या कुठल्यातरी मोठ्या शक्तीच्या मी नक्कीच जवळ पोहोचलो होतो.
मौन आणि शांतता अनुभवली.
ट्रेलवर दिवसभरात एखाद्दुसरं कोणीतरी भेटायचं. आणि संध्याकाळी शेल्टरपाशी कोणाशी तरी तासभर गप्पा व्हायच्या. पण नाही तर मी दिवसाचे २२-२३ तास एकटाच असायचो. सकाळी पक्षांच्या कलकलाटाने जाग यायची. कधीतरी पटकन एखादी खारूताई वाळलेल्या पानांचा आवाज करत पळून जायची. कधीतरी रातकिडे किंवा cicadas त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने अख्ख जंगल व्यापून टाकायचे. कधीतरी पावसाची रिपरिप आणि माझ्या श्वासांचा ताल एक होऊन माझ्याशी संगत करायचा. हाच तो जंगलातल्या शांततेचा आवाज. गोबऱ्या गालाच्या गोड बाळाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या तिटीसारखा. आणि हे सगळं कसं अनुभवायचं? बाकी सगळा कलकलाट बंद करायचा. गाणं नाही, मोबाईल नाही, पुस्तक नाही, काही काही नाही. रक्ताच्या प्रत्येक थेंबाला, प्रत्येक हाडाला, शरीरातल्या प्रत्येक पेशीला ही शांतता अनुभवू द्यायची. अगदी रोज, सगळेच्या सगळे ४५ दिवस अनुभवू द्यायची.
प्राजक्ता पाडगावकरांच्याच भाषेत सांगायचं तर (फेसबुकचा ग्रुप: माझा मराठीचा बोल):
“मौनात जे सौन्दर्य आहे, ते उपजत असे सृजन आहे. मौन हे केवळ काहीतरी अलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखादं नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे. शांतता, म्हणजे आवाजाचा अभाव नसून, सर्व आवाजाचा एक उच्चतम बिंदु आहे. हयात एक आंतरिक लय आहे, एक सृष्टीशी तादात्म्य आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यात निसर्गाचे माग आहेत. शांतता ही एखाद्या डोहासारखी भासते, त्यात पुष्कळ खोल असे काही असते त्याच बरोबर त्यात काही गूढ आणि स्वतःच्या आतले काही ढवळून काढण्याचे सामर्थ्य आहे.”
पुढच्या वर्षी परत स्वतःच्या आतलं काही तरी परत एकदा ढवळून काढायला हवं.
(हा माझ्याच मुळच्या इंग्रजी लेखाचा मीच मराठीत केलेला स्वैर अनुवाद. माझ्या ॲपेलेशिअन ट्रेलच्या प्रवासाचे असे बरेच इंग्रजी लेख आणि इतर मराठी साहित्य तुम्हाला dadhionthetrail.com ह्या website वर वाचायला मिळतील.)
Wonderful articulation.
लै भारी . फारच सुरेख वर्णन 👌👍
Very well
खूप छान वर्णन केले आहे आम्ही पण मनाने फिरत होतो अनुभव घेत होते
वाह! क्या नात है, दाढी!
अतिशय चित्तथरारक अनुभव, की जो कपोलकल्पित वाटत असला तरी केवळ तू स्वतः तो सांगत असल्यामुळेच विश्वास ठेवू शकतो.
तो अनुभव इतक्या जिवंतपणे मांडला आहे की मी स्वतः तो अनुभवत आहे असे वाटले.
फारच अप्रतिम! 😊
तुझ्या लेखनातून ओसंडून वाहणारा उत्साह दिव्य आहे!
Fantastic narration, Nitin!!!
अप्रतिम लिखान. निसर्गाचे तांडव नृत्य आवडल.. आजच्या युगात मोबाईल शिवाय कल्पना करू शकत नाही.
निसर्ग हा खरोखर राजा आहे. जितका रौद्र तितकाच तो सुंदर आहे.
खूष रहा. लिहित रहा.
नितिन, तुझे आश्चर्यकारक अनुभव आणि अप्रतिम लेखन वाचून फार आनंद झाला. जे अनुभव आता आमच्या शक्यतेपलीकडचे आहेत, ते तुझ्या लिखाणातून अनुभवायला मिळाले. अभिनंदन आणि धन्यवाद. आणि मुख्य सूचना म्हणजे अंजलीच्या परवानगीखेरीज पुन्हा असे धाडस करू नकोस!
माधव देशपांडे
Marvelous
It is not easy to put it into words what one sees and what comes in mind at that time but you expressed it so well! Great.
Superb!
Startling.Appreciate your courage.
खूपच सुंदर. हा लेख खूप प्रेरणादायी आहे. You have given us a new dream !!
Nitin, thanks for sharing. I could understand
Dhananjay