एखाद्या अनुभवाची खिशातली चुरगळलेली पुरचुंडी उलगडून मी कधीकधी गोष्ट लिहितो आणि तुम्हाला वाचायलाही देतो. पण आयुष्याचं अख्ख गाठोडंच उघडून आत काय काय आहे ते मात्र मी कधीही बघितलेलं नाही. पण आता हाच आग्रह माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनी धरला आहे. ही गाठोड्याला घट्ट बांधलेली निरगाठ सोडवायची कशी? म्हंटलं तर गाठोड्यात फारसं काही नाही आहे आणि म्हटलं तर बरंच काही आहे. आपण असं करू या. हे प्रत्येक अनुभवाचं लांबलचक कीर्तन ऐकून तुम्ही कंटाळण्यापेक्षा मी एकदोन वाक्यात माझे अनुभव फटाफट सांगत जातो. त्या अनुभवांच्या मागच्या सुरस गोष्टींचा तुम्हीच नंतर विचार करा. उदा. “मी नववीत असताना चक्क उठून डोंबिवलीहून रायगडाला चालत गेलो” असं लिहिलं की पायाची टराटर फुगलेली गळवं, दुपारी भर रस्त्यावर स्टोव्हवरती करपलेला भात, दिसेल त्या घरात दार ठोठावून त्यांना आसरा देण्याची विनंती करताना झालेली हुरहूर आणि मिसरूडही न फुटलेली सहावी ते अकरावीतली मुलं ह्या सगळ्या कल्पनेची भरारी तुम्हीच घ्या. त्यासाठी मुद्दामहूनच हे अनुभव काळानुसार सांगितले नाही आहेत. आयुष्याच्या सलग आलेखापेक्षा प्रत्येक अनुभव वेगवेगळा जास्त मजेशीर वाटावा अशी अपेक्षा. एव्हढंच.
आणखी एक महत्वाची गोष्ट. आमची (म्हणजे माझी आणि अंजलीची) दुःखं मी लिहिली नाही आहेत. ती आमच्यापाशीच राहू देत.
मग आता उघडतो हे गाठोडं. होऊन जाऊ दे!!
पाचवी-सहावीत बहुतेक वेळा संध्याकाळी मी गटारात मासे पकडायचो. आणि पावसाळ्यात डोंबिवलीच्या बाजारातून पुराच्या पाण्याबरोबर वाहत येणारी हेंदकाळणारी कुजकी संत्री पुलाच्या काठावर बसून झेलायचो. फारच मजा यायची. एकदा गटारात उलटं पडल्यावर शाळेतल्या बाईंनी कान धरून बाहेत खेचलं होतं. सॉलिड वाट लागली होती.
नववीत रायगडला धाकटा भाऊ आणि ३ मित्रांबरोबर चालत गेलो. ७-८ दिवस लागले. रोज रात्री कुठे राहणार ते माहित नव्हतं, दिवसा काय खाणार ते माहित नव्हतं. आई-बाबा “हो” म्हणाले आणि आम्ही निघालो. सगळंच अगाध!
कॉलेजात शिव्या द्यायला खूप आवडायचं. Netflix वरच्या Sacred Games सारखं अगदी प्रत्येक वाक्यात दोन दोन शिव्या असायच्या. मी शिव्या देताना कुणा पांढरपेशा मुलाचा चेहरा कावराबावरा झाला, तर त्याला मी “ती फुलराणी” मधला पुलंचा दाखला द्यायचो, की “शिव्या म्हणजे भाषेचे दागिने” वगैरे वगैरे. हॉस्टेल मध्ये एकदा शिव्यांच्या स्पर्धेत दुसरा नंबर सुध्दा आला होता. घरी किंवा थोरामोठ्यांच्या सहवासात मात्र शिव्या देणं कटाक्षाने टाळलं.
अकरावीला इतर दहा मित्रांनी फूस लावल्याने चेकाळून उच्च गणित (Higher Math) घेतलं. सॉलिड किडा होता. मुख्याध्यापक शिकवायला तयार नव्हते. शेवटी आमच्या वर्गातल्या सज्जन मुलांनी सरांना पटवलं आणि मग शाळेत उच्च गणित शिकलो. मजा म्हणजे अरुण जोशीने चावी मारल्याने आठवा (Extra) विषय म्हणून उच्च अंकगणित (Higher Arithmetic) पण घेतलं होतं. अख्ख्या शाळेत ते तिघांनीच घेतल्याने ते मात्र आमचं आम्हालाच शिकायला लागलं.
अंजलीच्या आई-वडिलांबरोबर माझं चांगलंच गुळपीठ होतं. भारतात गेल्यावर मी चक्क दोन-दोन तास अंजलीच्या आईशी गप्पा मारत बसायचो. असीमच्या (अंजलीच्या भाच्याच्या) लग्नात ह्या सगळ्या नात्यांना परत उजाळा मिळाला. खूप म्हणजे खूपच धमाल केली.
आतापर्यंत ५२ देशात प्रवास केला आहे. प्रत्येक देशातली खास खादाडी करायची, माणसं बघत हिंडायचं आणि निसर्गात मनसोक्त भटकायचं हा माझा / आमचा खाक्या. प्रेक्षणीय स्थळं बघण्याचं अप्रूप आता संपलं आहे. बाकी काही नाही तरी प्रत्येक गावचा बाजार मात्र बघायला नक्कीचआवडतो. गालापागोस, अमेझॉनचं जंगल आणि टांझानिया सारख्या काही सुपर जागा विसरल्या जाणं कठीण आहे. आणि आई-बाबांसकट संपूर्ण अंतुरकर खानदानाबरोबर केलेला न्यूझीलंडचा प्रवास? तो कसा विसरला जाईल? आईचा उत्साह आणि बाबांची नातवंडांबरोबर चाललेली सदोदित मस्करी परत अनुभवायला नाही मिळाली.
हिमालयात ३०० पेक्षा जास्त दिवस ट्रेकिंग केलंय. एकदा कालाबलंद मोहिमेत सलग ४०-४५ दिवस बर्फरेषेच्यावर राहायला लागलं होतं. आमच्याकडे पैसे, पोर्टर्स आणि इंधन ह्या सगळ्यांचीच वानवा! पाणी वितळवायला इंधन वापरायला लागत असल्याने पाणी पिण्यासाठी वापरणं महत्वाचं होतं. मग आंघोळीला आणि दात घासायला बुट्टी. हो, हो, अगदी सलग ४५ दिवस. कित्ती मज्जा! बऱ्याच मित्रांना माझा चेहरा बघून हल्ली पण हा अंघोळ करत नाही की काय असं वाटत असावं. पण ते जाऊ दे.
टाटा ऑटोकॉम्प मध्ये असताना चार जॉईंट व्हेंचर्स भारतात प्रस्थापित केली. नंतर बोर्ड मेंबर ह्या नात्याने त्यांचं संगोपनही केलं. सध्या त्या कंपन्या जोरात चालू आहेत. आमच्या कंपनीचे अध्यक्ष स्वतः रतन टाटाच असल्याने दर तीन महिन्यांनी त्यांची भेट होत असे (टाटा ग्रुपच्या २०० हुन अधिक कंपन्या असल्याने श्री टाटा फक्त काहीच कंपन्यांचे अध्यक्ष होते.) एकदा मी, माझा बॉस आणि श्री टाटा अशा तिघांनाच एकत्र लंच घेण्याचा योग्य सुध्दा आला होता. ह्या अफाट गुरूकडून बरंच काही शिकलो आणि कोणालाही लाच ना देता कंपनी चालवू शकलो.
हा अनुभव म्हंटला तर आमचा, म्हंटला तर मुलांचा. आरती आणि तेजस साधारणतः ४ आणि ६ वर्षांचे असताना आम्ही त्यांना चक्क मुंबईहून सिडनीला भावाकडे एकटं पाठवलं. मध्ये सिंगापूरला त्यांनी विमान सुध्दा बदललं. अर्थात हे सगळं हवाईसुंदरींच्या मदतीने. नंतर मात्र आमचं अवसान गळालं आणि परतीच्या प्रवासाला मी त्यांना आणायला गेलो होतो. ह्या मुलांना आणि भाऊ-वहिनी-भाचा ह्यांना एकमेकांचा एव्हढा लळा लागला होता की निघताना माझ्याखेरीज उरलेले सगळे घळाघळा रडत होते. तो मुलांचा लळा अख्ख्या अंतुरकर खानदानाशी अजून तेव्हढाच टिकून आहे. ह्या आमच्या कुटुंबातलं पहिलं-वहिलं लग्न, युतीका-प्रिन्स मधलं, हा असाच आमच्यातले दुवे घट्ट करणारा अफलातून अनुभव होता.
एकदा एका उत्पादन प्रकल्पासाठी चिंचवड प्राधिकरणाच्या मुख्य माणसाला भेटलो. त्याने मला ६ कोटी रुपये मागितले. ३ कोटी त्याला आणि ३ कोटी एका राजकीय पक्षाला. मी पडलो टाटा ग्रुपचा मनुष्य आणि माझ्या आई-बाबांचा मुलगा. त्या माणसाच्या नाकावर टिच्चून शेवटी हिंजेवाडीत प्रकल्प उभा केला. टाटा ग्रुपने अख्खी पॉवर लाईन आधीच स्वतःच्या खर्चाने हिंजेवाडीत आणली होती. (आणि मजा म्हणजे त्या जोरावर मग महाराष्ट्र सरकारने तिथे हल्लीची प्रसिद्ध सॉफ्टवेअर पार्क पण उभी केली. आमच्या नशिबाने सरकारने टाटा ग्रुपला क्रेडिट तरी दिलं.) सध्या हिंजेवाडी एकदम जोरात आहे. भ्रष्टाचाऱ्याला टिंगणी दाखवून यशस्वी प्रकल्प असेही उभे राहतात.
खादाडी खूप म्हणजे खूपच आवडते. नाकतोडे, घोडे, मुंग्यांची अंडी आणि मगरी खाऊन सुदधा शेवटी गाडी बासुंदीवरच येऊन थांबते. माझ्या पोतडीत नुसत्या खादाडीवर सुध्दा बऱ्याच गोष्टी आहेत. मराठी असून सुदधा मुगाची खिचडी, पिठलं, भाकरी ह्या अशा गोष्टी मला आवडत नाहीत. “अर्थात, नाहीच आवडणार. ह्या गोष्टी पटकन करता येतात ना!” इति आमच्या घरातल्या महाराणीसाहेब.
हा पुढचा अनुभव तुम्हाला उमजणं जरा कठीणच आहे. कालाबलंद मोहिमेमध्ये एका कॅम्पमध्ये मी आणि नितीन धोंड दोघेच होतो आणि अचानक खूप बर्फ सुरु झाल्याने तंबूत २-३ दिवस अडकलो होतो. पाच फुटांवरचं पण दिसत नव्हतं. तंबू छोटा. फक्त आडवं झोपण्याएव्हढा. दर दोन तासाने बाहेर जाऊन सारखा तंबूवरचा बर्फ काढायला लागत होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बर्फाचं वादळ किती दिवस चालणार हे माहित नसल्याने जेवणाचं आणि पाण्यामुळे इंधनाचं रेशन करायला लागत होतं. मानसिक परीक्षा घेणारा हा अफलातून अनुभव होता.
त्याच कालाबलंद मोहिमेतली आणखी एक मजा म्हणजे त्या एकाच मोहिमेत आम्ही चक्क सात शिखरं सर केली. त्यातली तीन शिखरं तर आत्तापर्यंत कोणीच सर केलेली नव्हती. तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल की International Mountaineering Federation अशा गिर्यारोहकांना ह्या शिखरांचं बारसं करू देते! आणि मग अशी नावं जगातल्या सगळ्या नकाशात प्रसिद्ध होतात. आम्हाला ह्या तीन शिखरांना नावं देण्याचा मान मिळाला हे खरं! पण तिथल्या स्थानिक परंपरा आणि भाषेनुसार ती नावं देऊन मला वाटतं आम्ही तिथल्या स्थानिक लोकांचा गौरवच केला. त्याचाच आम्हाला जास्त अभिमान वाटला.
मला साठाव्या वर्षात चक्क हार्ट अटॅक आला. ह्या प्रकारच्या तीव्र STEMI अटॅकला चक्क म्हणे “widowmaker” अटॅक म्हणतात. माहेरचं दार ठोठावलं होतं. पण “त्यांनी” उघडलंच नाही. आई वडिलांच्या कृपेने वेदना आणि चिंता दोन्हीही अक्षरशः जाणवल्या नाहीत. एव्हढा व्यायाम लहानपणापासून करत असून आणि कुठेही ब्लॉक नसताना रक्तवाहिनी कशी बंद पडली असला विचार मनात आला नाही. पाच दिवस ICU मध्ये सगळ्या नर्स आणि डॉक्टरांबरोबर नुसते धमाल विनोद चालू होते. हाहाहा, अनुभव फक्त आपल्याला पाहिजते असेच असावेत असं थोडंच कपाळावर लिहिलेलं असतं!
कॉलेजात जिम्नॅस्टिकस करायचो आणि निरनिराळ्या स्पर्धेत भाग घ्यायचो. आर्मीमधले खत्री सर आमचे प्रशिक्षक होते. चपलेने मारायचे. “वेदना होत असताना आनंद घ्यायला शिका” हा मानसिक मंत्र शारीरिक खेळ खेळताना त्यांनी शिकवला.
दहावीत इंग्रजीत ४६ / १०० मार्क मिळाले. चेम्बुरकर बाई घरी आल्या. आई बाबांना म्हणाल्या “ह्याचं काही खरं नाही.” मग आई-बाबा मला म्हणाले, “तू हुशार आहेस. तू आणि तुझं भवितव्य, तुझं तूच बघ.” ह्याला म्हणतात Ultimate Empowerment. ह्या अनाडी आई-बापांनी माझी मग प्रोफेसर गाडगीळांशी गाठ घालून दिली, जे SIES कॉलेजात विंदा करंदीकरांबरोबर इंग्लिश शिकवायचे. पुढचे ३०० दिवस रोज एक निबंध लिहून त्यांच्याकडून तपासून घ्यायचो. अजूनही अवघड शब्द दिसला की अंजलीला विचारायला लागतो. उदा. Bard म्हणजे शेक्सपिअर हे मला मागच्या आठवड्यात कळलं.
१९७५च्या आणीबाणीने सगळीकडे घबराट निर्माण झाली आणि डोंबिवलीचे बरेच कुटुंबप्रमुख जेल मध्ये गेल्याने माझ्या माहितीतल्या कित्येक कुटुंबांची धूळदाण उडाली. आणीबाणी उठल्यानंतर आम्ही काही जण चक्क चादरी घेऊन दुर्गा भागवत आणि पुलंच्या सभांमध्ये निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचो. माझा अविस्मरणीय अनुभव म्हणजे वयाच्या १७व्या वर्षी माझी पोलिंग एजन्ट म्हणून मुंब्र्याला झालेली नियुक्ती. मतदान केंद्र आतून काळं असतं की गोरं हे ही माहिती नव्हतं. जीव मुठीत धरून ह्या मुस्लिम वस्तीतल्या मतदान केंद्रावर जनता पार्टीचा ड्रेस घालून बसलो होतो. चक्क एका मुस्लिम म्हाताऱ्या बाईने मला मतदान केंद्राच्या आत जेंव्हा रानफूल आणून दिलं तेंव्हा कुठे हुश्य झालं, आश्चर्य वाटलं आणि जीवात जीव आला. त्यावेळी मुंब्र्याने म्हाळगींसाऱख्या संघ प्रचारकाला डोंबिवलीपेक्षा जास्त टक्क्याने मतदान केलं होतं. आता इथे अमेरिकेतल्या कर्मभूमीत, आणिबाणीसारख्या परिस्थितीत, परत निवडणुकांच्या प्रचारासाठी उतरलो होतो. पण हे आयुष्यात दोनदाच! परत कधी उतरायला लागणार नाही ही अपेक्षा.
बाबांच्या नाका-घशात आणि ओठांवर मांस वाढायचं. ते दुखत नसलं तरी ते लालभडक मांस फारच किळसवाणं दिसायचं आणि हळूहळू श्वासोच्छवास बंद व्हायचा. मग दर ६ महिन्यांनी सरकारी इस्पितळात बाबांचं ऑपरेशन व्हायचं. त्यांचा घसा उघडा ठेवून जमा झालेलं रक्त दर १० मिनिटांनी vacuum लावून काढायला लागायचं. बऱ्याच वेळा मी असं रक्त काढत रात्री-रात्री जागून काढल्या आहेत. नंतर टाटा मेमोरियल मधल्या एका लसीने अचानक त्यांचा हा प्रॉब्लेम नाहीसा झाला. असेही असतात एकेक अनुभव. त्यातलीच एक मजा म्हणजे त्यांचं ओठांवरचं लालभडक मांस बघून लोकल ट्रेन मध्ये त्या एव्हढ्या गर्दीत सुदधा कोणीही आमच्या जवळ फिरकायचे सुध्दा नाहीत.
बाबा होते कामगार आणि आई होती प्राथमिक शाळेतली शिक्षिका. दोघेही कधी कॉलेजात गेले नाहीत. दोघेही अकरावीत एकदा दोनदा नापास झालेले. अजून शिक्षण नकोच हा विचार. बाबांच्या कंपनीत सारखा संप व्हायचा. मग घरात दोन वेळा जेवायची सुध्दा भ्रांत असायची. बाबा अशावेळी चहा आणि तेल घाऊक प्रमाणात विकत आणायचे आणि घरोघरी जाऊन विकायचे. कधीकधी मी पण ते विकायचो. गणितातले खास Laplace Transform आणि Eigen Value वगैरे शिकण्यापेक्षाही हे अनुभव खूपच महत्वाचे. त्यातून हा प्रकार विद्यापीठात शिकायला मिळत नाही. पण हे पालकांना समजावणार कोण?
माझ्या सातवीपासून ते कॉलेजात जाईपर्यंत आमच्या घरात सकाळी ८ पासून ते संध्यकाळी ७ पर्यंत आई-बाबांनी स्थापन केलेल्या शाळेच्या चार तुकड्या चालायच्या. स्वैपाकघर आणि छोटीशी बाल्कनी सोडली तर इतर ठिकाणी उभं राहायला सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे माझं सगळं आयुष्य गच्चीतच गेलं. तिथेच “जयोस्तुते” पाठ केलं, तिथेच धाकट्या भावांना शिकवताना भांडी फेकून मारली, तिथेच चावट पुस्तकं वाचली आणि तिथेच अकरावीला मरमरून अभ्यास केला. अरे हो, बाबा चहा, तेल घरोघरी विकायचे पण शाळेकडून त्यांनी भाडं कधी घेतलं नाही. असे होते माझे रोल मॉडेल्स!
७ वर्षांपूर्वी एक हिवाळ्यातली अफलातून धोकादायक पण अतिसुंदर ट्रेक केली. लडाखच्या गोठलेल्या झान्स्कर नदीवरून १०-१२ दिवस चालत गेलो. लय भारी अनुभव. दोन वेळा अवस्था कठीण झाली होती. एकदा त्या थंडगार कमरेएव्हढ्या पाण्यातून ८-९ मिनिटं चालायला लागलं. त्या पाण्याखाली घसरडा बर्फ. नदीचा आवेग प्रचंड. १०-१५ मिनिटे त्या पाण्यात पाय राहिले तर काळे-निळे होऊन कापायला लागतील अशी भीती गाईडनेच घातलेली. “ठंडे ठंडे पानी में” हे गाणं म्हणू की अथर्वशीर्ष म्हणू अशी अवस्था झाली होती. दुसरा अनुभव म्हणजे एका ठिकाणी नदीवरच्या बर्फात पाय अडकला. खाली खोल नदीचं खळाळणारं पाणी बोलावत होतं आणि बर्फाला तडा जाऊन मी पाण्यात पडू नये म्हणून आडवं पडून तिघे जण मला काढायचा प्रयत्न करत होते. शेवटी बाहेर निघालो. नंतर पायात संवेदना यायला एक महिना लागला. खूप वेळा घसरून पडल्याने माकडहाड सरकलं होतं. घरीदारी आणि ऑफिसमध्ये एका टायर वर बसून वर्षभरात ते शेवटी जागेवर आणलं.
IIT मध्ये दुसऱ्या वर्षात असताना लक्षात आलं की आजूबाजूला मित्रांनी बराच प्रवास केला आहे. मी आणि अरुण जोगेश्वरी आणि पुणे ह्याच्या पलीकडे गेलेलो नाही. पण प्रवासाला पैसे कुठून आणायचे? तरीसुध्दा दोघेजण ९० दिवस उत्तर भारतात हिंडलो. फक्त ११ दिवस हॉटेलात राहिलो. श्रीनगर, अनंतनाग आणि आग्रा. बाकी ठिकाणी रेल्वे फलाटावर झोपलो. भिकाऱ्यांशी गप्पा मारल्या. आणि त्यांनीच शिकवल्यानुसार दोन रुळांच्या मधल्या पाण्याच्या पाईपलाईन खाली अंघोळ केली. सगळी शहरं चालत बघितली. अजमेरच्या दर्ग्यावर श्रद्धेने चादर चढवली आणि सुवर्ण मंदिरात लंगर केलं.
माझ्या आणि अंजलीच्या आयुष्यातले दोन सुवर्णदिवस म्हणजे आरतीचा MIT मध्ये आणि तेजसचा Univ of Chicago मध्ये प्रवेश. अगदी जवळचे दोन मित्र सोडले तर ह्या महान विद्यापीठात माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. सगळी मेहेनत त्यांची, अभ्यास त्यांचा, पण आम्हाला इतर पालकांसारख्या फुकट क्रेडिट घेत टणाटण उड्या मारायला काय जातंय? जगावेगळा विचार करण्यात ह्या मुलांनी किती तरी वेळा आमची दांडी उडवली आहे.
मी कॉलेज संपेपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अगदी कर्मदरिद्री होतो. कधी नाटकं बघितली नाहीत. गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो नाही. पैसे नव्हते हे खरं. पण फुकट कार्यक्रम सुध्दा कधी बघितले नाहीत. IIT मधल्या मूड इंडिगो ह्या दोन दिवसांच्या सांस्कृतिक सोहोळ्यात मी चक्क भीमसेन जोशींचा कार्यक्रम आखण्यात मदत केली होती. पण ५ मिनीटं सुध्दा तो कार्यक्रम बघितला नाही. आता दहा फुटांवरून संजीव अभ्यंकर आणि कौशिकी चक्रवर्ती ह्यांच्या मैफिली ऐकतो, जगप्रसिद्ध गायकाबरोबर बरोबर गप्पा मारत बसतो आणि प्रख्यात नाटककार आणि गायक आमच्या स्वैपाक घरात १५ मिनिटं सुंदर गाणं गातो. अशा वेळी माझा आधीचा कर्मदरिद्रीपणा मला जास्तच जाणवतो.
माझ्या आयुष्यात गुरु, शिक्षक, मित्र ह्या नात्याने काही भन्नाट माणसं भेटली. काहींनी आवड म्हणून आयुष्यभर गिर्यारोहण केलं, काही आयुष्यभर ब्रीज खेळले, पर्रीकरांसारखे काही जण “Mr Clean” अशी इमेज असलेले राजकारणी झाले, वसंत लिमये सारखे लेखक झाले, राजू भट सारखे शेतकरी झाले. काहींनी गणितात महत्वाचं संशोधन केलं, काहींच्या पुस्तकांनी अख्खे नवीन विषय निर्माण झाले आणि काही जण विख्यात जागतिक कंपन्यांचे CEO झाले. मला नुकताच कळलं की माझे एक कॉलेजमधले शिक्षक, श्री द्रविड, हे गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचे पहिले शिष्य होते. ही बहुतेक सगळी मंडळी जमिनीवर पाय ठेवून जग बदलण्यात अगदी मग्न आहेत. ह्या भन्नाट व्यक्तींनी माझं आयुष्य इंद्रधनुष्यासारखं अगदी रंगीबेरंगी केलंय. त्यांचे हे ऋण फेडण्याच्या पलीकडले आहेत.
माझे आणि अंजलीचे ३६ गुण जुळतात. म्हणजे “३” आणि “६” चे आकडे कसे अगदी, म्हणजे अगदी, एकमेकांच्या विरुद्ध असतात, तसं काहीसं आमचं आहे. काही म्हणजे काहीही साम्य नाही. तिला पातळ आमटी तर मला दाट, तिला कोथिंबीर हवी तर मला नको, ती कमी खाते तर मी खूप, तीला खर्च करायला आवडतो तर मला नाही. एक ना दोन, हजारो फरक. पण नीतिमूल्यं आणि सगळ्यांशी एकत्र संबंध ठेवण्याची दुर्दम्य इच्छा ह्यात आमचं जरासुध्दा म्हणजे जरासुध्दा दुमत होत नाही. उगाच नाही आई-बाबांनी थोरल्या सुनेला त्यांच्या थोड्याफार संपत्तीची Power of Attorney दिली होती. बायकोला काय वाटतं कुणास ठाऊक, मला मात्र बायको म्हणून अंजली पुढचे सात जन्म नक्की चालेल, खरं तर अगदी धावेल.
बृहन महाराष्ट्र मंडळाचं आमच्या इथलं अधिवेशन अंजलीच्या अधिपत्याखाली झालं. “कमी तिथे आम्ही” ह्या नात्याने मी त्यात गुंतलो होतोच, पण हे चार वर्षांचं प्रोजेक्ट मी अगदी जवळून बघितलं. अधिवेशनात सामील झाल्याखेरीज ह्याचा आवाका आणि गुंतागुंत ह्याचा इतरांना अंदाज येणं कठीण आहे. एव्हढ्या ३००+ स्वयंसेवकांबरोबर हा डोलारा यशस्वीपणे सांभाळणं हा सर्वात अवघड प्रोजेक्ट होता. अक्षरशः मरेपर्यंत मी हा अनुभव विसरू शकणार नाही. ह्या अधिवेशनातल्या ५००हून अधिक जबरदस्त गोष्टी मला माहीत आहेत. माझे IIT मधले आगळे वेगळे मित्र श्री पर्रीकर यांच्याशी संपूर्ण दोन दिवस गप्पा मारायला मिळाल्या ही त्यातलीच एक गोष्ट.
स्वतःची कंपनी काढायचा मला जबरदस्त किडा होता. तो माझा प्रयत्न संपूर्णपणे फसला. मला वाटलं होतं की मी “महान” आहे. भारतात मोटारींना नवीन प्रकारचं प्लास्टिकस् लागतंय. नवीन टेक्नॉलॉजीची गरज आहे. पण टाटा ग्रुप आणि पाश्चिमात्य कंपन्या ह्यांच्या पुढे माझा काय टिकाव लागणार? शेवटी टाटा ग्रुप मला म्हणाले की तू आम्हालाच सामील हो. ह्या लफड्यात कशाला पडतोस? मी शहाण्या मुलासारखा गाशा गुंडाळला आणि टाटा ग्रुपला जॉईन झालो. महाराष्ट्रीयन माणसांना अपयश पचवायला कोणीही शिकवत नाही. खूप म्हणजे खूपच त्रास झाला. पण नंतर टाटा ग्रुपमध्ये खूप मजाही आली.
असंच दुसरं सपशेल अपयश म्हणजे माझा आयर्न मॅन शर्यत धावण्याचा प्रयत्न. ४ किमी पोहायचं, मग १८० किमी सायकल चालवायची आणि मग ४२ किमी मॅरेथॉन शर्यत धावायची. हे सगळं १७ तासात संपलं पाहिजे. त्याचा सराव सुरु करतानाच उजवा गुढगा दुखावला. अख्खा गुढगा कापून कृत्रिम धातूचा गुढगा बसवायला लागला.
माझा अजून एक किडा अंजलीने सहन केला तो म्हणजे भारतात परत जायचा. ज्या देशाने आम्हाला एव्हढं अपरंपार दिलं त्याचे ऋण थोडेतरी परत करायला हवेत अशी माझी भावना. पण हा माझा किडा यशस्वी करण्यासाठी झटली ती अंजली. भारतात परतून संसार लावणं म्हणजे एव्हरेस्टच्या टोकावर जाऊन भांगडा नृत्य करून दाखवण्यापेक्षा अवघड. पण एकदा संसार लावल्यावर तिथे आम्ही ११ वर्ष राहिलो. मुलं पुण्यातच शाळेत गेली. आणि ह्या सगळ्यात कहर म्हणजे अंजलीने पाच वर्ष दर महिन्याला १५ दिवस अमेरिकेचा प्रवास करून कुटुंबासाठी नोकरी सुध्दा केली. हे लिहिताना आणि ते दिवस आठवताना अजून सुध्दा माझ्या डोळ्यात पाणी तरळतं. अशी अर्धांगिनी मिळायला भाग्य लागतं.
मी दहावीत असताना लोणावळ्याच्या दांडेकर प्रतिष्ठानतर्फे वाडा तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागात रोजगार हमी योजनेची पाहणी करण्याकरता माझी नेमणूक झाली. आदिवासी आई आपल्या मुलाला भूक भागवायला झाडाचं पान खाऊ घालताना मी ह्याची डोळा बघीतलं. काय सांगू मी? जगातली सगळी सगळी तत्वज्ञाने किती फोल वाटतात ह्या अनुभवापुढे. आता लिहिताना सुध्दा माझं मन अगदी निःशब्द झालं आहे.
जनरल मोटर्स (GM) मध्ये बरेच वर्ष नोकरी केली. मोटारींना लागणाऱ्या निरनिराळ्या पार्टसची खरेदी हे माझं काम. पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांबरोबर कायम हाणामाऱ्या! त्यांना जास्त नफा हवा असायचा आणि आम्हाला पार्टस स्वस्तात हवे असायचे. त्यामुळे कामात कायम ताण असायचा. माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना मी हसत खिदळत सांगायचो, “गिर्यारोहणात जर चुकून कुठे पडलो असतो तर माझ्या आई-वडिलांना माझं हाडसुद्धा सापडलं नसतं. त्यामानाने हा ताण काहीच नाही.” GM ला पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांची मोनोपोली तोडण्यासाठी तीन-तीन वर्षांचे दोन अफलातून प्रोजेक्ट्स केले. (एक अमेरिकेत आणि एक जर्मनीत) कल्पकता, एकत्र काम करण्यातली धमाल, धोका अशा सगळ्याच बाबतीत ही प्रोजेक्ट्स जबरी होती. ह्या विषयांवर माझी चक्क ८००-१००० पानी पुस्तकं लिहून होतील. गोपनीयतेच्या आवश्यकतेमुळे ते काही ह्या जन्मी शक्य नाही.
सायकल उभी असताना त्यावर बसलात तर पडून ढुंगण शेकून निघतं. तेच ती सायकल चालत असेल, तर पडायला होत नाही. ब्लॅक होल, समुद्रातल्या लाटा, वादळ ह्या निसर्गात आढळणाऱ्या सगळ्या गोष्टी गणितानुसार एकाच प्रकारच्या समीकरणात मांडता येतात. तसंच गणित वापरून द्रव स्वरूपात प्लास्टिक वाहत असताना त्यात लाटा कधी येतात ते ओळखायचं आणि त्यानुसार प्लास्टिकस् गोष्टींची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढवायचं ह्यावर मी संशोधन केलं आणि PhD मिळवली. इतरांनी केलेलं अफाट काम आणि संशोधनाच्या खांद्यावर उभं राहून आपण बंदूक मारणं किती सोपं असतं नाही का?
मी IIT मध्ये पाचही वर्ष दाढी केली नाही. ट्रिम सुध्दा केली नाही. मला बहुतेक मित्र अजूनही “दाढी”च म्हणतात.
आम्ही कॉलेजातल्या २०० विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच हिमांकन नावाची High Altitude Trek आयोजित केली. डोक्यावर अगदी बारीक केस, लांबलचक दाढी, तुटलेल्या दोन वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपर्स आणि अंगात घातलेला पायघोळ कोट हा माझा वेष. मनालीत रोज सकाळी बाजारात जाऊन अन्नधान्य खरेदी करणे ही माझी जबाबदारी. एकदा बसमधून दुसराच एक ठाण्याचा ओळखीचा गिर्यारोहक, चिक्या ओक, उतरला. मला बघून तो म्हणाला, “दाढी, कोटाच्या आत काही घातलं आहेस की नाही?” मी म्हणालो, “नाही”. तो भर बाजारातल्या रस्त्यावर मला म्हणाला, “चल, काहीतरीच बोलतोयस. कोट वर कर आणि दाखव मला”. मी कोट वर केला आणि त्याला पटवलं की मी खोटं बोलत नाही. त्याच भर बाजारातल्या रस्त्यावर चिक्याने मला चक्क साष्टांग नमस्कार घातला.
आत्ताशी कुठे एकषष्ठी झालीय. अजून मोठी bucket list आहे. ३,५०० किलोमीटर आणि दहा लाख फूट खालीवर चढणारी Appalachian Trail ची पर्वतातली लांबलचक मोहीम एकट्याने चालत करायची आहे. (आता पुढच्या आठवड्यात एप्रिल, २०२१ मध्ये मी त्या सात-आठ महिन्याच्या प्रवासाला निघत आहे.) स्पॅनिश आणि संस्कृत शिकायचंय. ज्ञानेश्वरी अनुभवायची आहे. चालत नर्मदा परिक्रमा करायची आहे. पंढरीची वारी आहेच. उत्तर ध्रुव आणि अंटार्क्टिकाचा प्रवास, कच्छच्या रणात सायकल, शार्क बरोबर स्कुबा डायविंग, त्या आधी नीट पोहायला येणं.. लिस्ट मोठी आहे. बघू या कायकाय जमतंय ते!!
नितीन (दाढी) अंतुरकर
मनःपूर्वक शुभेच्छा !!
असेच त्या ट्रेकचे अनुभव वाचायला मिळोत आम्हाला
धन्य तू आणि धन्य ती अंजली……
ह्यातल्या एक दोन गोष्टी तुझ्याबरोबर करण्याचं भाग्य मला लाभलंय…..
तुझ्या मोत्या सारख्या हस्ताक्षरामुळे माझे वाचता येऊ लागले….
Love you.
सुंदर . मोकळेपणा आणि सहजता , सोपी आणि सुटसुटीत भाषा यामुळेच अनुभव यथोचित व्यक्त केलास. लिहीत राहा.
Forty years down the road since Himankan 81, I still remember you running around in the famous long coat for organizing food in Manali, singing by the camp fire in Solang using a pretend guitar (a stick) as well as all the day treks.
Best wishes for the future adventures.
Superb! And best wishes for AT.
दाढी,
असेच सुंदर लिखाण अँँपलेशीयन ट्रेल वरही अपेक्षित आहे. मला काही लिहायला जमत नाही. पण तुझा लेख वाचून मलाही लिहीण्याची उपरती होत आहे.
एकंदरीत करोना व अंतरराष्ट्रीय प्रवास जरा कठिणच वाटतो आहे. तरी माझे प्रयत्न चालू आहेतच पाहु काय होते माझे अजून १७०० किमी. बाकी आहेत. Fontana Dam to PA North Border. तुला तुझ्या ट्रेक साठी अनेक शुभेच्छा मदतीला अंजली आहेच.
काका जोशी
Nitin, reading this blog I saw a total picture of you. I have know you for number of years and always wondered where the heck did you get this wildness. But looks like you were lucky enough to be born with it. And you owned it, reveled in it and most importantly survived. Kudos to Anjali to put up with it. I know you want 7 mor births with her as your partner but ask she is ready to sign up for that. Vat Savitri is coming up you better start preparing for it
नितीन, खूपच छान अनुभव कथन!
तुला आणि अंजलीला मनापासून सलाम!
तुझी bucket list पूर्ण होवो ही मनापासून सदिच्छा!
Nitin: I could not stop reading once I started! So many achievements, so much fire! You are an inspiration!
Enjoy your new adventure and all adventures from your bucket list.
Pradeep Kokate
great write up! keep it up !! All the best !!!
Excellent Dadhi 👍
Very good writing on life experience and your perspective on it. Hats off to you n wish you all the best to finish your bucket list.
नितीन -बुवा, तुमचा ब्लॉग पोस्ट पहिल्यांदाच वाचला. वाचून तुझा इन्स्टंट फॅन झालो आहे. समृद्ध अनुभव, आणि सरळसोट कथन यामुळे वाचण्याचा अनुभव रंजक होता.
Looking forward to more great material from you. Wishing you all the best on your upcoming voyage.
Nitin loved reading it, very well written, wish you success in AT trail & hope to join for some part of it.
आपण व्यक्तीशहा एकमेकांना कधी बघितलं हि नाही ,बोलण तर फार दूरच ,पण तुमचे अनुभव वाचले ,अगदी मनमोकळे पणाने ते तुम्ही सांगितले आहेत . अफलातून व्यक्तिमत्व हा एकच शब्द सुचला . एका प्रभावी उर्जेचा स्तोत्र जाणवला जो मला खूप काही सांगून गेला ………. धन्यवाद तुमचा अनुभव share करण्या करता
आणि प्रशान्त ला हि धन्यवाद कारण त्यांनी तो EBC group वर post केला 🙏
नितीन अतिशय सुंदर लिहिलयस. अगदी मनापासून मनातल . तुझ्या पुढिल सर्व उपक्रमांना शुभेच्छा !
प्रिय अंजली,
काय बेफाम माणसाशी तू लग्न केलं आहेस. त्याला मन:पूत जगू देण्यात त्याच्या एवढं तुझं धारिष्ट्य आहे. त्याची पोस्ट वाचताना लक्षात आलं की त्याच्या दाढीला हात घालायची ताकद तुझ्यात आहे आणि त्याची त्याला जाणीवही आहे. यापेक्षा यशस्वी सहजीवन असूच शकत नाही.
प्रिय दाढी,
तुझा हा ट्रेक यशस्वी होईल याबद्दल य:किंचितही शंका नाही. तुझी पोतडी इतक्या अफलातून अनुभवांनी भरलेली आहे, ती आमच्या समोर कधी उपडी होईल याची वाट बघत आहे. तुला लाख लाख शुभेच्छा
मृणालिनी
सुंदर !
दाढी – नवनवीन आव्हानं स्वीकारत, ती लीलया पेलत किंबहुना अपेक्षेहून सरस कर्तृत्व दाखवत जगण्याची जिजीविषा वृत्तीच तुझं वेगळेपण दाखवते.
AT साठी हार्दिक शुभेच्छा 💐
Exceptionally great. Didn’t know so many things before. Its extremely hard to digest the poverty of the woman feeding leaves to her kids.
So many such sensational moments in this article make one really think and read this again and again.
बापरे. वाचून धन्य झालो आहे
नितीन दाढी अंतुरकर,
जबरदस्त तोडफोड करून टाकली आहेस ह्या लेखात. आपण दोघे H 5 मध्ये एकत्र होतो तेव्हा आणि ACC Thane मध्ये एकाच डिपार्टमेंट मध्ये होतो तेव्हा सुद्धा आपला घनिष्ठ संबंध आला नाही. पण तुझ्या लेखातून तुझ्याशी परत जोडला गेलो आहे. तू चैबासा च्या प्लांट मध्ये गेलेला असतानाचे खास अनुभव देखील सांग!
तुझ्या trail साठी मनःपूर्वक शुभेच्छा !
भाल श्रीखंडे
What a journey! So glad to have met you and Anjali!! Cannot wait to read your updates from the trail. All the best.
Dear Nitin,
You are truly a multi-faceted person. Good Luck to you on your Appalachian Trail. Take care and Stay safe.
Sanjiv Kshirsagar
Thanks a lot for your encouragement and comments!