संध्याकाळची ५:४३ ची कल्याण सुपरफास्ट. पण मुलुंडला थांबणारी. नेहा ह्याच गाडीत चढते. त्यामुळे मी सुद्धा ह्याच गाडीत चढतो. दारातच लटकतो. हे माझं बरेच दिवस चालू होतं. आज मात्र मी तिचं घर कुठे आहे हे बघायचं ठरवलं. मुलुंडला तिच्यापाठोपाठ मी सुद्धा उतरलो. ती छोटी छोटी पावलं टाकत निघाली. मागून दिसणारे तिचे जीव गुंतवणारे मोकळे केस. आणि मोगर्याचा गजरा… कलेजा अगदी पिघळून जात होता. मुलुंड ईस्टला बाजारातून नेहा पुढे एका छोट्या गल्लीत शिरली. इथे वर्दळ तशी नव्हतीच. संध्याकाळची वेळ. रस्त्यावरचे दिवे असून नसल्यासारखेच होते. मंद झुळुकेबरोबर तरंगत येणारा मोगर्याचा सुंदर वास मला बेभान करायला लागला. श्वासाची गती वाढली. कानशीलं तापायला लागली. तेव्हढ्यात तिने मागे बघीतलं.. आणि, आणि आम्ही दोघेही किंचाळलो. ती माझी बायको होती. घड्याळाच्या गजरासारखी ती कोकलत होती.
मला एकदम जाग आली. सकाळचे साडेपाच वाजले होते.
च्यायला, सकाळच्या शांततेत घड्याळ बेंबीच्या देठापासून किंचाळत होतं. एक तर नेहा अचानक गुल झालेली. त्या ऐवजी बायको कुठल्यातरी शेणकुट गल्लीत पाच फुटांवर उभी. स्वप्नात सुद्धा बायकोचा पिच्छा सुटत नाही? साला, काय फालतू नशीब आहे? असं म्हणत कपाळावर हात मारतात तसा घड्याळावर मी हात मारला. तर डिजिटल अलार्म क्लॉकमधे अचानक रेडिओ मिरची स्टेशन सुरू झालं. “च” आणि “स” नंतर आता “भ” च्या भाषेत माझ्या मुखातून शिव्या बाहेर पडायला लागल्या. व्यासमुनींच्या मुखातून जेव्हढ्या सहजपणे महाभारत बाहेर पडलं तेव्हढ्याच सहजपणे! आधी गजराचं घड्याळ, मग रेडिओ मिरची आणि आता बाजूला घोरत असलेली खरी तिखट मिरची ओरडायला लागली.
ह्या सगळ्या लफड्यात रेडिओ मिरचीने कोकलणं चालूच ठेवलं होतं. सकाळी साडेपाचला त्यावर “बिडी जलाई ले, जिगर में पिया” हे गाणं लागलं होतं. ह्या असल्या बिड्या कोणाच्या बापाने तरी पेटवल्या आहेत का पहाटे? कानाखालीच पेटवावीशी वाटत होती ह्या बाईच्या… बाईच्या म्हणजे गाणारीच्या, शेजारी झोपलेल्या माझ्या बायकोच्या नव्हे!
काय प्रसंग आहे? नेहाऐवजी माझी बायको स्वप्नात दिसली म्हणून मी किंचाळत उठलो आहे, डोळ्यांवर अपरंपार झोप आहे, “भ”च्या भाषेत सक्काळी सक्काळी शिव्या हासडतो आहे, त्याने बायको ओरडत उठली आहे आणि बॅकग्राऊंडला काय? तर म्हणे “बिडी जलाई ले”… सकाळी साडेपाच वाजता. एवढ्या राड्यामधे बिडी वगैरे जळणं राहू दे, पण आमचे शेजारी आमचं घर मात्र नक्की जाळणार. ह्या रेडिओ मिरचीला सुद्धा अगदी काडीचीही किंवा बिडीचीही अक्कल नाही. पहाटेच्या प्रहरी देवाचं नाव घ्यायचं सोडून शिव्या, बीड्या, भांडणं.. नुसता कल्ला चालला होता घरात. मोगं वरती अगदी तळमळत असतील. (मोगं म्हणजे मोरेश्वर गणेश, मी जन्मायच्या आधी स्वर्गवासी झालेले माझे आजोबा.)
माझे डोळे बंदच होते. बंद डोळ्यांनी डिजिटल अलार्म क्लॉकमधे वाजणारी बिडी विझणार कशी? पूर्वीची गजराची घड्याळं चांगली होती. त्याला एकच बटन असायचं. त्याच्यावर हात आपटला की आवाज बंद. बायको ओरडल्यावर माझा आवाज बंद होतो तसा. हल्लीच्या डिजिटल अलार्म क्लॉकला किती बटनं असतात माहीती आहे का? आवाज कमी जास्त करायला, रेडिओ स्टेशनचा बँड बदलायला, घड्याळाचे आणि गजराचे आकडे फिरवायला. आर्यभट उपग्रहाला कंट्रोल करायलासुद्धा एव्हढी बटनं वापरत नसतील.
ह्या सगळ्या बटनात सर्वात महत्वाचं बटन घड्याळाचं थोबाड बंद करणारं. ते मात्र एकदम मागच्या बाजूला. भर दुपारी उघड्या डोळ्यांना सुद्धा ते सापडणं मुश्किल, मग पहाटेच्या अंधारात मेंदू कचकलेला असताना बंद डोळ्यांनी ते बटन कसं सापडणार? असली घड्याळं बनवणार्यांना दोन दिवस मिरचीची धुरी देऊन जागं ठेवायला पाहिजे आणि मग ते झोपले की दर दोन तासांनी रेडिओ मिरची त्यांच्याच घड्याळावर वाजवायला पाहिजे. तेंव्हा साल्यांना खरी अद्दल घडेल.
पण ह्याच घड्याळाला “स्नूझ” नावाचं वरती अजून एक मोठ्ठं बटन असतं. स्नूझ म्हणजे हलकी झोप. ते बटन जोरात आपटलं की घड्याळ दहा मिनीटं तरी बोंबलायचं थांबतं. शेवटचा प्रयत्न म्हणून परत एकदा शिवी हासडून जोरात घड्याळावर हात आपटला. माझ्या नशीबाने तो स्नूझ वर पडला, आणि बिडीवालीचा आवाज एकदम बंद झाला. हुश्यऽऽ. सगळीकडे अगदी सन्नाटा. खूप बरं वाटलं. डोळ्यांवर झोप अनावर होत होती.
पण स्नूझमधे म्हणे दोन्ही मेंदू थोडे जागेच असतात. आता अंधारात अचानक डोळ्यांसमोरचा देखावाच बदलला. सुंदर मोठी बेडरुम, रेशमाचे नक्षीदार पडदे, कोपर्यात मंद पणत्या. मधोमध भव्य पलंग. त्यात एका बाजूला छान सुंदरी बसलेली होती. तीने कॉटनचा मऊ मऊ चुणीदार घातला होता. माझं डोकं तीच्या मांडीवर ठेवून मी पहूडलेलो होतो. व्यवस्थित रेशमी सुरवार-झब्बा घालून. ह्या वयात म्हणे दिगंबरावस्थेतली “तसली” स्वप्न पडत नाहीत. पलंगावरसुद्धा सगळेजण सत्यनारायणाच्या पूजेला घालतात तसे कपडे घालून अघळ-पघळ पडलेले असतात. ती सुंदरी शेजारच्या चांदीच्या ताटातून मला एकेक द्राक्षं भरवत होती. माहौल बघून मी सुद्धा ती द्राक्षं वचावचा खात नव्हतो. ओठ दुडपून हळूच रिचवत होतो.
पायापाशी दुसरी तरुणी तिच्या लाल नाजूक नखांनी माझ्या तळपायाला गुदगुल्या करत होती. अहाहाऽऽ, क्या बात है? गुदगुल्यांची शिरशिरी वार्याच्या झुळुकीसारखी अलगदपणे सबंध अंगभर पसरत होती. खोलीभर केवड्याच्या उदबत्तीचा वास दरवळत होता. गुलाम अलीच्या गझलेने वातावरण भरून गेलं होती. सगळी पंचेंद्रिय एकरूप झाली होती. नाकाने वास घेतो आहे की गझल हुंगतो आहे काही काही कळत नव्ह्तं. पलीकडच्या खोलीत तिसरी तरूणी बासुंदी आटवत होती. ह्या स्वप्नात तिन्ही तरूणींचं एकदम माझ्या बायकोत रूपांतर होणार नाही ह्याची खात्री माझ्या मेंदूला झाली होती. त्यामुळे लाजरं, मिश्कील हास्य माझ्या ओठांवरून रांगत जात होतं. कहर, अगदी कहर चालू होता.
काय नशीबाची थट्टा आहे बघा. नुसत्या “गुदगुल्या”त आयुष्य कहर वाटायला लागलं आहे आजकाल. चालायचंच. पन्नाशीत पोहोचल्यावर स्वप्नांशी स्वप्नांतच वाटाघाटी करता येत नाहीत आणि स्वप्नात नविन आणखी स्वप्न बघता येत नाहीत. उदाहरणार्थ मला रेशमी सुरवारीच्या पेहेरावाऐवजी नुसत्या आतल्या चड्डीत लवंडू दे, किंवा सुटलेल्या पोटाऐवजी सिक्स-पॅक दिसू दे अशा ईच्छा आपण स्वप्नात दामटवू शकत नाही. त्यातून लहान मुलांसारखे पाय आपटून मी हावरटपणा करायला गेलो असतो आणि स्वप्नच गुल झालं असतं तर? द्राक्षं आणि बासुंदी तर बाजुलाच राहू द्या, मुगाची खिचडी खायला लागली असती. (मुगाची खिचडी हा माणुसकीला लागलेला काळीमा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे माझं मत बायकोला माहित आहे. त्यामुळे ती माझ्यावर जेंव्हा सरकलेली असते तेंव्हा संध्याकाळी हळूच पुडी सोडते, “अय्या, आज आपण मुगाची खिचडी खाऊ या का?” माझ्या मनात येतं, “अय्या, मी संडासाच्या पॉटमधे उडी मारून जीव देऊ का?” पण असं मी म्हणत नाही. ते फक्त मनातच येतं. मी मोठ्या आवाजात उत्तर देतो, “होऽऽऽ”.) त्यामुळे मी आहे त्यात समाधान मानून स्वप्नांची गम्मत मुकाट्याने चाखायची ठरवली.
तेवढ्यात त्या तिसर्या तरूणीच्या हातातून बासुंदीचं भांडं सटकलं, आणि ती किंचाळायला लागली. गजराच्या घड्याळासारखी. पाच-सहाच द्राक्षं खाऊन झालेली होती. गुलाम अलींची “थोडीसी जो पी ली है” गझल थोडीशीच संपलेली होती. तेव्ह्ढ्यात झोप उडालीच. परत ये रे माझ्या मागल्या. तोच नशीबाला दोष, रानटी शिव्या, “तो बोंबल्या बंद कर आधी” असं माझ्यावर ओरडणारी बायको. डोळे किलकिलत शेवटी घड्याळाच्या मागच्या पॄष्ठ्भागावरती चापट मारून एकदाचा तो आवाज मी बंद केला. आता उठणं भागंच होतं. साडेसात वाजता कोरीयाच्या कस्टमरचा फोन होता. त्याला मोटारीचे काही सुटे भाग विकायचा आम्ही प्रयत्न करणार होतो. त्याआधी ऑफिसात पोहोचायलाच हवं होतं.
उठून बसल्यावरती हात आपोआप जोडले गेले कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला. खरं तरं ह्यावेळी लक्ष्मी, सरस्वती वगैरे देवींनी मस्तपैकी ताणून दिलेली असणार. सकाळी साडेपाच वाजता तडमडत माझ्या हातावर कशाला येऊन बसतील त्या? मी बंद डोळ्यांनी म्हणालो,
कराग्रे वसते झोप ।
कर मधे सुद्धा झोप ॥
करमुले तर झोपच झोप ।
प्रभाते झोप दर्शनम॥
आता ह्या “स्नूझ”च्या झोपेत दोन्ही मेंदू संगनमताने काम करायला लागले होते. मनात नविन नविन विचार यायला लागले, “समजा, मी सकाळी संडासला गेलोच नाही तर?” थोडीशी कळ काढायला लागेल. पण दहा मिनीटं तरी वाचतील. ऑफीसमधेच नंबर दोनला जाऊ.” कल्पना झकास होती. त्यामुळे अशाच आणखी वेळा वाचवायच्या संध्या शोधण्यासाठी मग दोन्ही मेंदू पेटले. छोटया मेंदूला आठवलं की स्वप्नात मी द्राक्षं खात होतो. लगेच त्याने किडा सोडला, “आज ब्रेकफास्ट कशाला हवा? दुपारचं जेवण ऑफिसमधेच जरा लवकर करू. सकाळी चहा घेतोच तिकडे फुकटातला. तो एका ऐवजी दोन कप पिऊ. अजून पंधरा मिनीटं वाचतील.” ह्या २५ मिनीटात द्राक्षाचा अख्खा घड, २-४ बासुंदीच्या वाट्या, गझला, हव्या आणि नको त्या ठिकाणी गुदगुल्या असं बरंच काही साध्य करता आलं असतं.
तेव्ह्ढ्यात मोठ्या मेंदूला काहीतरी आठवलं. मुलीला पण शाळेत जायचयं आणि बायकोला पण ऑफिसला जायचयं. मला २५ मिनीटं उशीर म्हणजे म्हणजे सगळ्यांनाच खोळंबा. मनाचा जळफळाट झाला. विचार आला, वाल्याकोळी सारखा मीच का त्याग सहन करायचा? घरातलं दुसरं कोणी का नाही माझ्या आधी उठू शकणार? सर्वात आधी मीच उठायचं, पैसे पण मीच मिळवायचे, ऑफिसमधे शिव्या पण मीच खायच्या. काय चाललयं काय? माझा पुरुषार्थ जागा झाला… मी नाही जागा झालो. मी झोपलेलोच. पुरुषार्थ जागा व्हायला पुरुषाला जागं व्हायला लागत नाही हे किती बरं आहे. मी माझ्या बाजूला झोपलेल्या घोरणार्या बायकोला म्हणालो,
मी: ए, उठ ना. तुझं आधी आवर ना.
बायको: काय आहे? (हिडिस फिडिस करणार्या आवाजात बायको गरजली)
मी: मला खूऽऽऽप झोप येतेय. तू आधी आवरशील का? मी खूप उशीरा झोपलो. मला थोडं उशीरा ऑफिसमधे गेलं तरी चालेल. (दिली एक थाप ठो़कून!)
बायको: पण आपलं ठरलेलं होतं ना की तू रोज सकाळी आधी उठायचं म्हणून. (आपलं म्हणजे तिचं ठरलं होतं!)
मी: प्लीऽऽऽज. मी खूप दमलोय गं. (गरजवंतांनी भांडणं करू नयेत.)
बायको: पण संध्याकाळी तू घर आवरायचं. (मी कपडे धुतले असते, भांडी घासली असती, स्वैपाक केला असता, तीचे पाय सुद्धा चेपले असते. पण वाटाघाटीत आपला फायदा होत असेल तर शत्रूपक्षाला कळता कामा नये, नाहीतर पुढच्या वेळी त्याचा तोटा होतो.)
चला, स्वप्नात आता पंचवीस मिनीटंच उरली होती. बासुंदीवालीला सांगितलं की बाई गं, शेगडीची धग वाढव. पातेल्यात एक भांडं उलटं टाक म्हणजे बासुंदी खालून करपणार नाही आणि ओतू जाणार नाही. गुदगुलीवालीला सांगितलं की तळपायाला गुदगुल्या खूप झाल्या. पेन्सिलीच्या टोकाने पायाच्या बोटांच्या तळाशी आणि कानाच्या मागच्या बाजूला अगदी हळूच गुदगुल्या कर. त्याने माझ्या टकलावर सुद्धा काटा येतो. द्राक्षवालीला सांगितलं की इकडे तिकडे बघत एकेक द्राक्षं माझ्यासमोर नाचवू नकोस. कामाकडे लक्ष दे आणि दोन दोन द्राक्षं माझ्या घशाखाली उतरव. अचानक सगळीकडे घाई सुरु झाली. मधेच बासुंदीवाली माझ्या बायकोच्या आवाजात म्हणाली, “झालं माझं. उठ आता.” मी माझं लक्ष बासुंदीकडे वळवलं. रबडी सारखी केशरयुक्त गरम गरम बासुंदी काय लागते म्हणून सांगू? जरा नंबर दोनची कळ काढायला लागते. पण बासुंदीच्या चवीपुढे ह्या प्रेशरला कोण विचारतो? सॉलीड धमाल येत होती.
तेवढ्यात गुलाम अलींच्या गझलांची सीडी संपली म्हणून डोळे उघडून बघितलं तर मला समोर घड्याळच दिसलं. परत एकदा खाडकन् झोप उडाली. पंचवीसच्या ऐवजी ४५ मिनीटं मी स्वप्नातच होतो. बायको “झालं माझं. उठ आता.” असं म्हणून निघून गेलेली असणार. स्वप्नात मजा केली. आता मात्र धावधाव होणार.
जाळ्यातल्या मासळीसारखी पलंगातच टुणकन् उडी मारली. हात जोडले. कराग्रे कोरीयन लक्ष्मी दिसायला लागली. कर मधे बॉस खुन्नस खात हजमोला खाल्ल्यासारखा चेहरा करून उभा होता. कर मुले मी ऑफिसात उशीरा पोहोचल्याने सगळे सहकारी फिदीफिदी हसत होते. मी पटकन उभा राहिलो. आणि पहिलं पाऊल टाकतानाच माझा गुडघा दाणकन् शेजारच्या टेबलाला आदळला. “आई गंऽऽ” मी जोरात विव्हळलो. ह्या क्षणाला डोक्यातून अशी रागाची सणक गेली म्हणून सांगू! त्याला कारणही तसंच होतं.
जगातल्या प्रत्येक पलंगाला दोन बाजू असतात. एक अडगळीची बाजू आणि दुसरी मोकळी बाजू. मोकळ्या बाजूला बाथरूम असते. अडगळीच्या बाजूला टेबल, खुर्ची, सामानाची पेटी, खिडकी, मुलांची अभ्यासाची पुस्तकं, धुण्याचे कपडे अशा गोष्टी पसरलेल्या असतात. नविन पलंग आणला तेंव्हा पहिल्या दिवशीच बेडकाच्या चपळाईने बायको पलंगाच्या मोकळ्या बाजूला पटकन् उडी मारून बसली. मला एकदम श्रीकृष्णाच्या पलंगावर दुर्योधनाशी वाटाघाटी करतो आहोत असं वाटायला लागलं.
मी: असं काय गं? इतकी वर्षं तू ह्या साईड्ला झोपलीस ना. आता माझी टर्न.
बायको: नाही, मीच झोपणार.
मी: अगं, दिवसेंदिवस माझा प्रोस्ट्रेट मोठा होत जाणार. इतर पुरुषांप्रमाणे मला सुद्धा सारखं बाथरूमला जावं लागणार.
बायको: त्या बाजूने जा.
मी: पण अडगळीमधून पलीकडच्या बाजूने जाताना उशीर झाला आणि वाटेतच झाली तर?
बायको: शीऽऽ, काय पाचकळ बोलतोस. तसं काहीही होणार नाही. काही का असेना, मी इथेच झोपणार.
स्वतः श्रीकॄष्ण हजर नसल्याने ह्या वाटाघाटीत अर्जुनाचा बोर्या वाजणार होताच. मी शेवटी हरलो. रोज सकाळी अडथळ्याची शर्यत पार करायला लागलो. पण आज घाईघाईत गुडघा टेबलाला आपटला होता. त्यातून स्वप्नातल्या खोट्या बासुंदीचं खरं प्रेशर मला बाथरूम पर्यंत पोहोचायच्या आधीच जाणवायला लागलं. अगदी निश्चय केला होता की काहीही झालं तरी घरी नंबर दोनला जायचं नाही. पाय क्रॉस टाकत तग धरायचा. त्यामुळे फॅशन शो मधल्या बायकांसारखं एकासमोर एक पावलं टाकत बाथरूमच्या दिशेने जायला सुरुवात केली. लेंगा-पायजमा घातलेला हा टकल्या पॅरीसच्या फॅशन-शो मधे रॅम्प वर अवतरल्यासारखा बाथरूममधे अवतरला. तेथे श्रीकृष्ण बासरी वाजवतो त्या पोजमधे मी दात घासायला सुरुवात केली. अगदी पाय क्रॉस करून. कटाक्षाने काहीही झालं तरी संडासाच्या पॉटकडे बघायचं नाही असा माझा प्रयत्न होता.
ते झाल्यावर पुढे आंघोळीतसुद्धा मुरलीधर बासरी वाजवत उभाच. प्रेशर आता कमी होईल, नंतर कमी होईल ह्याची वाट बघत. अशा पोजमधे एकवेळ अंगावर पाणी घेता येईल. पण साबण कसा लावणार? पुढचं पुढे बघू असं म्हणून तशातच शॉवर चालू केला. आणि अंगावर आला थंड पाण्याचा फवारा. मग माझ्या मुखातून आला नेहमीच्या शिव्यांचा फवारा. पण बॉईलरमधलं गरम पाणी शॉवरमधे येईपर्यंत थोडा वेळ लागणारच. तोपर्यंत अंगाला गार पाणी लागू नये ह्याची केविलवाणी धडपड चालू झाली मुरलीधराची. त्या एवढ्याशा बाथरूममधे हा श्रीकॄष्ण पालीसारखा भिंतीला चिटकून उभा… बासरी वाजवायच्या पोजमधे. शेवटी एकदाचं गरम पाणी शॉवरला यायला लागलं तेंव्हा मी हे मुरली-ताडासन सोडू शकलो. मग हळूच पाण्यात देह सरकवला. खरं तर मला खूऽऽप वेळ अतिशय गरम पाण्याखाली उभं राहायला आवडतं. पाण्याची वाफ साठून त्या धुक्यात आपल्या पोटाचा नगारा दिसेनासा झाला की मग साबण लावायचा ही माझी पद्धत. पण आज उशीर झाला असल्याने लगेच साबण शोधायला लागलो. आता बाथरूममधली साबणाची वडी गायब झाली होती. माझ्या नशिबाचं काही खरं नव्हतं.
नविन साबणाची वडी होती बेडरूमच्या फडताळात. बाथरूममधे एवढी जागाच नव्हती. शेवटी ओल्या अंगाने हळूच बेडरूमचं दार बंद करून दिगंबरावस्थेत साहेब निघाले साबण शोधायला. आपल्याच घरात मांजरीच्या पावलाने दबकत दबकत कोणी आत येणार नाही ह्याच्याकडे लक्ष देत. कमरेभोवती टॉवेल गुंडाळायचं सुद्धा मला भान नव्हतं. एकतर पायाखालची फरशी अंगाचं पाणी सांडून सगळी निसरडी होत होती आणि आपल्याच घरात आपण चोरासारखे वावरत आहोत असं उगाच वाटत होतं. काहीका असेना, महत्त्वाचं म्हणजे साबण सापडला. कोलंबसाला जणू अमेरिका सापडली. बैलाने रस्त्याच्या मधोमध नंबर एक उरकल्यावर त्याचं अंग कसं शहारतं, तसं माझं ओलं अंग थंडीत आनंदाने शहारलं. तेही नंबर एक न करता..
सगळीकडे ओली चैथळ करून मुरलिधर परत शॉवरखाली पोहोचले. पण एवढ्या काळात मेंदू आणि डोळे साबण शोधण्यात गुंतलेले असले तरी मोठं आतडं अगदी कार्यक्षमतेने आपलं काम करत होतं प्रेशर वाढवण्याचं.
एव्हढा वेळ कसाबसा तग धरला होत. किती वेळ वरती खेचून धरणार? शेवटी अगदी राहवेना. अशाच ओल्या अंगाने परत शॉवरमधून बाहेर येऊन नंबर दोनसाठी स्थानापन्न झालो. बसलो सिंहासनावर बादशाह अकबरासारखा. अहाहाऽऽ, काय सुख आहे. सुटलो एकदाचा. सुखाच्या वेदना किती गोड असतात नाही? सुखाच्या लाटांवर लाटा अंगावर.. नाही.. पोटावर येत होत्या. काही क्षणांपुरतं मी द्राक्षं, गजरा, गुदगुल्या सगळं सगळं विसरलो होतो. ह्यालाच मोक्ष असं म्हणत असतील का? रंगीबेरंगी सूर्य फक्त माझ्यासाठीच उगवला आहे ह्याची मला खात्री पटायला लागली. अख्ख्या कोरियामधे फक्त माझीच कंपनी मोटारींचे भाग विकते आहे असं मला वाटायला लागलं. माझं डबल प्रोमोशन होउन माझ्या बॉसचा मी बॉस झालो आहे अशी गोड कल्पना मला स्पर्श करून गेली. सगळं आवरल्यानंतर जेंव्हा मी आरशासमोर उभा राहिलो तेंव्हा माझ्याऐवजी मला जॉन अब्राहॅम दिसायला लागला. त्यामुळे मी चक्क दाढीला पण दांडी मारली. माझं रक्त सळसळायला लागलं. आणि जागेपणी पुरूषार्थ जागा झाला की कसं वाटतं ह्याचा जिवंत अनुभव मी घ्यायला लागलो.
नंतरचं आवरायला मला वेळ लागला नाही. ऑफिसात मी उड्या मारत पोहोचलो तेंव्हा खरं तर उशीर झाला होता. पण फोनवरती त्या कोरियन कस्टमरला मी मोटारीच्या प्रत्येक भागाबरोबर एक मोगर्याचा गजरा फुकट द्यायची ऑफर दिली, आणि त्याने तो सौदा खुशीत स्विकारला.
हल्ली मी माझ्या कंपनीचा राजिनामा देऊन मोगर्याचे गजरे, बासुंदी आणि द्राक्षं ह्यांची एक्सपोर्ट एजन्सी सुरू केली आहे.
नितीन अंतुरकर, मार्च, २००९