“जोड्याला जी रया आहे ती मला नाही.”
माझी आजी बाहेरच्या खोलीतून तीच्या खड्या आवाजात श्रावणातल्या ढगासारखी गरजत होती. ते ऐकून बाबा आतल्या खोलीतून तावातावाने बाहेर आले. आणि मग मायलेकांमधले प्रेमसंवाद सुरू झाले.
“झाले हिचे मनाचे श्लोक सुरू. एवढं वय झालंय तरी माझा छळ काही थांबवत नाही ही. काय झालं एवढं ओरडायला? मी अजून जिवंत आहे ना! करतो आहे ना तुझं सगळं!”
बाबांच्या कडाडडेल्या विजेमुळे असेल नाहीतर त्या दोघांच्या एकमेकांवरच्या अघोरी प्रेमामुळे असेल, आजी थोडीशी निवळली. त्यातून तिला ईदच्या चांदसारखा अवचित उगवलेला इडलीवाला रस्त्याने जाताना दिसला.
“तो इडलीवाला चालला आहे रस्त्यावरून. त्याच्याकडून दोन इडल्या घेऊन घाला गिळायला मला.”
“अगं, तुला सारखे जुलाब होतात ना? मग का सारखं अबरचबर खातेस रस्त्यावरचं? जीभेचे चोचले जरा कमी पुरवावेत म्हातारपणी.”
“माझी हाडं गेली स्मशानात, आणि हा मला शिकवायला निघालाय. पदरेला दमड्या असत्या, तर आले नसते मी तुझ्याकडे इडल्या मागायला. पण माझ्या नवर्याने वाजवलं दिवाळं त्याच्या धंद्यात आणि केलं मला लंकेची पार्वती. म्हणून आता मला भिका मागायला लागताहेत.”
ही अशी वाजंत्री दिवसभर वाजायची. दोघेही म्हातारे. आजी ऐंशी वर्षांची तर बाबा पन्नाशीच्या पुढे पोहोचलेले. पण हे दोघे कायम ए़कमेकांवर सरकलेले असायचे.
तशी ऐंशी वर्षांची होऊनही आजी आमची ठणठणीत होती आत्तापर्यंत. रक्तदाब नाही. मधुमेह नाही. हॉस्पिटलची पायरी चढायचा प्रसंग हिच्यावर कधी उगवलाच नाही. सगळी पंचेंद्रिय एकदम शाबूत. वळवळणारी जीभ. सकाळ-संध्याकाळ रोज ताटात डावं-उजवं तर लागायचंच. पण रस्त्यावरचा इडलीवाला, भेळवाला ह्या सगळ्या मित्रांकडून फराळ पण हवा असायचा. डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा. पण त्यातून नजर मात्र भेदक. बाहेरच्या खोलीतूनसुद्धा स्वैपाकघरातल्या सुनेच्या सगळ्या हालचाली हिला बरोबर दिसायच्या. लख्खं उन्हासारखी स्वच्छ स्मरणशक्ती. बाल्कनीमधे बसून येणार्या जाणार्या सगळ्यांना ती हात करायची आणि सकाळी सकाळी ९:०३ ची लोकल पकडायची असूनही तिच्यासमोर हजेरी लावल्याशिवाय कोणालाही पुढे जाता यायचं नाही. तीच गत संध्याकाळची. मग सगळ्या जमवलेल्या बातम्यांवर आजीचे खास शेरे दिवसभर चालू असायचे. शेजारच्या बाळ्याने नविन ब्लॉक घेतला तर ही म्हणाली,
“आपली उंची नाही तर शिडी लावून कशाला उंटाच्या बुडाचा मुका घ्यायला जायचं?”
थोडक्यात, माझी आजी रसरशीत आयुष्य जगत होती. अगदी हापूसच्या आंब्यासारखं. आणि त्या आंब्याचे गोड डाग आमच्या आयुष्यावर सगळीकडे पडले होते… न धुतले जाणारे, अगदी कायमचे.
मी आयआयटीमधून शनिवारी घरी आलो की ती गोड गोड हसायची. तीच्या गालाला ह्या वयातही खळी पडायची, आणि मला रात्री दहा वाजतासुद्धा पहिल्या पावसाची धुतलेली सकाळ आठवायची. तीच्या मांडीवर डोकं ठेवलं की तिचा थरथरता हात ती माझ्या डोक्यातून फिरवायची. मग मी तिच्या सुरकुतलेल्या हाताची शीर खेचत बसायचो आणि म्हणायचो,
“आजी थकलीस तू आता.”
आजी म्हणायची,
“होय रे बाबा! पण तुझ्या बापाने मला टाकली नाही म्हणून मी जिवंत आहे. तो तुम्हाला घेऊन कुठे दुसरीकडे निघून गेला असता तर मी काय केलं असतं? परमेश्वराजवळ एकच मागणं आहे आता. माझा भार होऊ देऊ नकोस माझ्या मुलावर.”
“तुझ्यासारख्या टुणटुणीत बाईचा कसा भार होईल बाबांवर. आणि झाला तर झाला. तू त्यांची आई आहेस ना! तू काय कमी केलं आहेस का आम्हा सगळ्यांकरता? आम्ही सगळे मदत करू बाबांना.”
कुठेतरी पाल चुकचुकायची की ही स्वाभिमानी बाई काही तिला आपल्याला मदत करू देणार नाही. पण तेवढ्यात तीचं नेहमीचं पालुपद चालू व्हायचं.
“तू एकुलता एक. एकदा तुझं लग्न झालं की मी माझ्या माहेरी जायला मोकळी. एखादी मुलगी पटवली असशील तर आण तीला घरी.”
“आमच्या कॉलेजात फारशा मुली नाहीत आजी. कुठून पटवणार मी मुलगी? तुझ्यासारखी एखादी सुंदर मुलगी तुला कुठे दिसली तर तूच तिला सांग माझ्याशी लग्न करायला.”
तेंव्हा तिच्या तोंडाचं बोळकं दुडूदुडू हसायचं.
पण शेवटी अघटित घडायचं ते घडलंच. एके दिवशी तिला संडासात पॅरॅलिसिसचा ॲटॅक आला. ऊग्र वासाच्या थारोळ्यात ती गडाबडा अस्ताव्यस्त पडली. तिचे आतुर डोळे, कृश शरीर, एकच निर्जीव हात आणि वाकडं झालेलं तोंड. एव्हढ्या कर्तबगार बाईची अशी अवस्था मला बघवेना. अगदी भडभडून आलं मला. देवघरातल्या समईतलं तेल आता संपायला आलं होतं. आणि आम्हां सगळ्यांची तपश्चर्या आताशी कुठे सुरू झाली होती.
रात्रभर तिच्या कण्हण्याचे आवाज यायचे. ना झोप ना जाग अशा विचित्र अवस्थेत बाबांची रात्र संपायची. सकाळी कधी कधी सगळे विधी पांघरूणातच झालेले असायचे नाहीतर गळणार्या लाळीने सगळी उशी ओली झालेली असायची. मग आजीला चहा पाजायचा, अंग पुसायचं, नविन स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, जेवायला भरवायचं… बाबांचं आयुष्य आता ह्यातच जायला लागलं. मित्रं नाहीत, नातेवाईक नाहीत, बाबांच्या आवडीचे दादा कोंडकेचे सिनेमे नाहीत. हा गोलगोल “नाच गं घुमा” बाबांचा अगदी अंत बघायला लागला. पण अशा विकलांग अवस्थेतसुद्धा दुसर्या कोणाला आजी जवळसुद्धा फिरकू देत नव्हती. ह्या गोल घुम्यात फक्त बाबा आणि आजीच असायचे. मी आयआयटीतून आलो की माझ्याकडे बाबा भडाभडा बोलायचे.
“म्हातारपण फार वाईट. त्यांना हवं असतं काहीही अपेक्षा न ठेवता काळजी घेणारं कोणीतरी. रात्री दोन वाजतासुद्धा न किरकिर करता पाणी पाजणारं. आपण मात्र गुंतलेलो असतो त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रेमाच्या आठवणीत. पण अशा आठवणींच्या गोळ्या खाऊन माझ्या म्हातार्याच्या अंगात आता बळ येणार आहे का? त्यातून तुझ्या आजीला ठणठणीत बघायची आपली सवय. तीला अशा अवस्थेत बघवत नाही आणि करवतही नाही.”
मी आजीला म्हणायचो,
“काय गं आजी? बाबा काय कुठे पळून जाताहेत का? तू आमची मदत घ्यायला हवीस कधी कधी. आम्हाला खूप वाटतं तुझं करावसं. तुल आठवतयं का की मी शाळेतून यायच्या आत तू कसा माझ्यासाठी गोड शिरा बनवून ठेवायचीस ते! बाबांच्या नकळत जीरागोळी खायला तुझ्या तांदूळाच्या डब्यातून दहा पैसे द्यायचीस ते! कशी परतफेड करणार मी तुझ्या ह्या अफाट प्रेमाची?”
मग डोळ्यांच्या कडा पुसता पुसता मी रागाने तिकडून निघून जायचो.
मग ती तिच्या क्षीण हाताने आकाशाकडे बोट दाखवत म्हणायची, “माहेरी जायचयं.” तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचं प्रतिबिंब बाबांच्या डोळ्यात पडायचं. आजीचे अश्रू पुसता पुसता बाबांच्या डोळ्यातला एकच थेंब मात्र आजीच्या सुरकुतलेल्या गालावर वाळून जायचा. आणि मग खिडकीतून वाकून बघणारा यम हा आक्रोश बघत थबकून उभा राहायचा.. विटेवरच्या विठ्ठलासारखा.
दोन वर्षं लागली मरणाला खिडकीतून आत यायला. ह्या आधुनिक पुंडलिकाचे प्रयत्न बघत यमासकट सगळे देव खिडकीबाहेरच वाट बघत थांबले होते. शेवटी आजीची कुडी मिटली तेंव्हा आम्हाला कळलंच नाही. ढगामागच्या चांदण्यासारखा मृत्यू अलगत आत आला आणि आजीला घेऊन गेला. बाबांचं आयुष्य अगदी सैरभैर झालं. बाबांचा घुमा नाचायचा थांबला आणि पायातलं बळ गेल्याने मटकन खालीच बसला.
माझ्यावर तर आभाळच कोसळलं. मी तरातरा आवेगाने बाथरूममधे गेलो. दाराला कडी घातली. आणि जोरजोरात भिंतीवर डोकं आपटायला लागलो. आजी गेली ते गेलीच पण एकदाही तिने माझ्या हातून काहीच कसं करून घेतलं नाही. तिचे एव्हढे ऋण डोक्यावर घेऊन मी कसा जगणार? बाबा नेहमीच जवळ होते म्हणून काय झालं? नातवाचं म्हणून काही नातं असतं की नाही? का नाही तीने कधी माझी मदत मागीतली? माझा आवेग काही थांबत नव्हता. हा धडाधडा आवाज ऐकून सगळे जमलेले नातेवाईक धावत आले. सगळ्यांनी जोरजोरात हाका मारायला सुरूवात केली. दारावर धडका द्यायला सुरूवात केली. माझ्या कपाळावरून रक्त वाहात होतं. डोळ्यातून अश्रू वाहात होते. माझ्या गदगदणार्या हुंदक्यात मला दुसरं काहीच समजत नव्हतं.
तेव्हढ्यात दार तोडून कोणीतरी आत आलं. बाबांनी मला मिठी मारली. ते म्हणाले, “अरे, आपली आजी गेली. तिचं ते वयच होतं रे बाबा! पण तू असं वेड्यासारखं काय करतोस? शांत हो. मी नाही माझं मला सांभाळलं ते” तेव्हढ्यात आईने धावत जाऊन हळद आणली आणि कपाळावरच्या जखमेवर दाबली. सगळे म्हणत होते, “फारच जीव होता नितिनचा आजीवर. दु:ख आवरेना त्याला अगदी.” दुसरं कोणीतरी म्हणालं, “पण बरं झालं. त्याचं दु:ख आत साठून राहीलं नाही ते.” मी काहीच बोललो नाही. मुकाट्याने दुसर्या खोलीत जाऊन पडलो. मी ठरवलं की आजीची वाट बघायची. तिला परत भेटायचं.
आजीला जाऊन आता पाच वर्षं झाली आहेत. अजून मी आजीची वाट बघतोच आहे. मी रोज सकाळी उठतो. आरशात कपाळावरची जखम बघतो. मग आजीची आठवण येते. गोड शिरा, तिचं हसणं, तिच्याशी मारलेल्या गप्पा, इडलीवाला, तिच्याबरोबर बघितलेला दादा कोंडकेचा सोंगाड्या सिनेमा, तिच्या गालावरची खळी, तिचा थरथरता हात…. अगदी उदबत्तीच्या वासासारख्या दरवळणार्या आठवणी. मग आरशात मला उदबत्तीची उरलेली राख दिसते. ती राख आरशातून माझ्याकडे झेपावते. वादळातल्या धुळीच्या भोवर्यासारखी ही राख माझ्याभोवती गरागरा गरागरा फिरते. मग मला माझ्या जागीच आजीचा विकलांग देह दिसायला लागतो. मग मी चूळ भरता भरता तोंड वाकडं करून पाणी तोंडातून ओघळू देतो. मग स्वच्छ टॉवेलने ती गळणारी लाळ मी पुसतो. मी घोगर्या आवाजात म्हणतो, “आजी, कसं वाटतय तुला आता. आज ईडली खायची का भेळ?” मग वाकड्या तोंडाने, बोबड्या आवाजात आजी म्हणते, “आता काही नको बाळा. नितिन, तूच फक्त थांब माझ्यापाशी”.
मग अचानक आरशातला आजीचा चेहरा नाहीसा होतो. मी भानावर येतो. आंघोळ करून बाहेर य्रेतो आणि मुकाट्याने ऑफिसला जातो. रोज, रोज हे असंच. मी कोणालाच सांगीतलेलं नाही आहे. माझं हे असे भास फक्त माझ्यापाशीच आहेत. छायाला, माझ्या बायकोला सुद्धा माहीत नाहीत. सगळे छायाला म्हणतात, “एव्ह्ढा अबोल नव्हता बरं का नितिन! त्याची आजी गेल्यापासून तो एव्हढा घुम्या झाला आहे”. कुणालाच हे माहीत नाही की मी आजीची वाट बघतो आहे.
आज छाया टेन्शन मधे आहे. आज तीचं गर्भारपणाचं ऑपरेशन आहे. बाळ म्हणे सहजासहजी आईच्या पोटातून बाहेर येणार नाही आहे. ऑपरेशन करायलाच हवं. तिचे आणि माझे, दोघांचेही आई-बाबा खूप गडबडीत आहेत. आज आरशात आजी दिसत नाही आहे. राखेचं वादळ शमलं आहे. मी गोंधळलो आहे. आजी… आजी तू कुठे आहेस?
छायाच्या बाळंतपणात एक सुंदर डोळ्यांची इवलीशी परी जन्माला आली आहे. सगळं कसं छान आहे तीचं. टपोरे डोळे. धारदार नाक. भव्य कपाळ. काळेभोर केस. सुंदर खळी…. लुळा डावा हात. वाकडं तोंड. सगळं सगळं अगदी आजीसारखं. मला आजी भेटली आहे. मला खूप खूप आनंद झाला आहे. माझ्या आजीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं मला झालं आहे. सबंध घरभर काळ्या शालीसारखा सन्नाटा पांघरलेला आहे. मधेच छायाचा एखादा हुंदका ऐकायला येत आहे. मी मात्र लळत लोंबणार्या आजीला कडेवर घेतलं आहे. स्वच्छ टॉवेलने तिची लाळ पुसली आहे. तिचा एकच हात हालत आहे. ती एकाच लयीत केविलवाणं, आकारहीन, अर्धवट किरकिरत आहे. आणि ह्या तानपुर्याच्या साथीवर मी गात आहे,
मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटूनी आला।
झुलता झोका जावो आभाळाला, धरतीचा टिळा भाळाला॥
मला आजी भेटली आहे. आता मी मरेपर्यंत माझ्या आजीची सेवा करणार आहे. मी खूप म्हणजे खूपच आनंदात आहे.
नितीन अंतुरकर, ऑगस्ट, २००९