चार वर्षाच्या माधवला घेऊन आज आया साधूराजाच्या आश्रमासमोर येऊन उभी ठाकली होती. रडून रडून माधवच्या घशाची पार फुंकणी झाली होती. गेले सात महीने तिने खूप प्रयत्न केले. गल्लीतल्या डॉक्टरला दाखवला. केईम मधल्या नर्ससमोर ती ढसाढसा रडली. महालक्ष्मीची तिने खणा-नारळाने ओटी भरली. हाजीमलंगला चादर चढवली. काळबादेवीचं व्रत केलं. पण माधवच्या पायाची जखम चिघळतच गेली होती. जखम कुजून पायाचा पार चुथडा झाला होता. पू यायचा काही थांबत नव्हता. गटाराचा वास काहीच नाही असा माधवच्या जखमेचा सगळीकडे वास मारत होता. घोंघावणार्या माशा हाकलता हाकलता आयाचा जीव कालवला होता.
पण आज आया शांत होती. साधूराजाच्या एकेक गोष्टी ऐकून आयाला खात्री पटली होती की साधूराजा माधवला बरा करू शकेल. पांढर्या बंद दारासमोर तीने उघड्या नागड्या माधवला जमिनीवर ठेवला. माधवची काळीशार बुबुळं आणि पापण्या सोडल्या तर आज आयाने माधवच्या अंगावर काळ्या रंगाचा अंशही ठेवला नव्हता. काजळ नाही, तीट नाही, साईबाबाचा नेहमीचा गळ्यातला गंडा नाही, करगोटा नाही, डोक्यावर केस नाहीत, भुवया सुध्दा नाहीत. माधव वेडावाकडा वाढलेला मांसाचा गोळा दिसत होता.
आता पांढरं दार उघडलं. सगळीकडे स्वच्छ पांढरा डोळे दिपवणारा प्रकाश पडला. चारी भिंती, खिडक्या, खिडक्यांचे पडदे सगळंच पांढरं! जमिनीवर सतरंजी सुध्दा पांढरीच, पार भिंतीपर्यंत गेलेली! कुठे रक्तरंगी फुलं नाहीत, तपकीरी नारळ नाही, पिवळी-नारिंगी फळं नाहीत आणि काळ्या उदबत्त्याही नाहीत. नक्की भिंती कुठे संपतात आणि छत कुठे सुरू होतं हेच कळत नव्हतं. अख्खी खोली म्हणजे एक पांढरा अंतरपाट वाटत होता.
अगदी खोलीच्या मधे साधूराजा मांडी घालून बसला होता. स्वच्छ धोतर आणि पांढराच अंगरखा घातलेला! कोडं आल्यामुळे असेल, पण सगळा चेहरा पांढराफटक होता साधूराजाचा! पांढर्या डुकरासारखी चेहर्याभर टच्चं बसलेली निबर कातडी. मानेपर्यंत आलेले लांब पांढरे शुभ्र केस. पांढर्या दाढीमिशा. त्या पांढर्या खोलीच्या अंतरपाटावर फक्त साधूराजाच्या डोळ्यांची बुबुळं काळी होती, आणि डाव्या डोळ्यात बुबुळाच्या बाजूने गेलेली एकच लालभडक नस आयाचं काळीज चिरून जात होती.
लांब कुठेतरी सिनेमातलं गाणं लागलं होतं.
रतिया, कारी कारी रतिया ।
रतिया, आंधियारी रतिया ॥
रात हमारी तो, चांद की सहेली है ।
कितने दिनोंके बाद, आयी वो अकेली है ॥ ….
आयाने उजळ रंगाच्या नागड्या माधवला साधूराजाच्या पायावर घातला. साधूराजाने त्याचे डोळे शांतपणे उघडले आणि त्याची माधवकडे नजर गेली… आणि साधूराजा एकदम अचानक थरथरायलाच लागला. कपाळाच्या टच्चं कातडीवर आठ्या पडल्या. नरड्याच्या शिरा ताणल्या गेल्या. डोळे गारगोट्यांसारखे मोठे झाले. काळी बुबुळं भोवर्यासारखी गरागरा फिरायला लागली. त्याचं संबध शरीर थडाथडा उडायला लागलं. हाताची बोटं ताठ झाली.
तो घोगर्या आवाजात म्हणाला,
“बळी दे बळी…”
त्याला पुढे काहीतरी म्हणायचं होतं. पण त्याचं तोंड वेडवाकडं झालं. लाळ गळायला लागली. तोंडाला पांढरा फेस आला. आचके देत तो खाली उताणा पडला. डाव्या डोळ्यातली ती लालभडक नस आता मोठी व्हायला लागली. घसा तारवटून तो किंचाळला. पण त्याच्या तोंडातून शब्दच येईना. आता ती नस फुटुन साधूराजाच्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं. तो घाबरलेला डावा डोळा थिजला आणि लपकन उघडाच राहिला. साधूराजाला अर्धांगवायुचा झटका आला होता.
आयाने जोरात बोंब मारली. माधवला पदरात घेऊन ती पटकन बाजूला झाली. माधव पण आता जोरात रडायला लागला. सगळीकडे कल्ला झाला. आयाच्या पायातले त्राणच गेले. ती मटकन खाली बसली. आजूबाजूने आश्रमातली माणसं धावत आली. “पाणी आणा, डॉक्टरला बोलवा”, एकच गलका झाला. पण साधूराजाचा देह थाडथाड उडतच होता .. नरडं कापलेल्या कोंबडीसारखा. ह्या कोलाहलात तो घाबरलेला थिजलेला डावा डोळा आयाच्या डोळ्यासमोर आला आणि माधव पदरात असूनसुध्दा ती भडाभडा ओकली.
घरी जाताना आयाच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता.
“बळी दे बळी”
साधूराजाने माझ्या माधवसाठी बोकडाचा बळी द्यायला सांगितला आहे… असंच असेल. नाहीतर माधवकडे बघून तो “बळी दे बळी” असं कशाला म्हणाला असता? आता आपल्या गावदेवीसमोर आपल्याला बोकड कापावा लागणार. गावाच्या आठवणीने तीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गेल्या २५ वर्षात तीने गावाचं नावसुध्दा काढलं नव्हतं. पण आता जुन्या आठवणींनी तीचा मेंदू कुजलेल्या कचर्याच्या कुंडीसारखा बरबटला. दारूड्या बापाने आयाला अकराव्या वर्षीच एका भडव्याला विकायला काढली होती. तेंव्हा गावातला एकही माईचा लाल तीच्या बापाला आडवा आला नव्हता.
आता आयुष्य नासल्यावर एवढ्या वर्षांनी परत गावाला जायचं? पण माधवसाठी हे करायलाच हवं होतं. मसणाईदेवीला बळी द्यायलाच हवा होता.
आया गावाला पोहोचली. विचकणारे जुने आणि नवीन चेहरे मटणाच्या गावजेवणाला आवर्जून आले. ज्या गावात आया अकराव्या वर्षीच नासली, त्या वेश्येच्या हातचं मटणं खायला तोच गाव तोंडातली लाळ गिळत, ओशाळ्या, ओंगळ, हावरट डोळ्यांनी आयाकडे बघत देवळात हजर झाला. ओलेत्या नवसाच्या कसायाला तीने शेंदुर फासला. लकपक बघणार्या बोकडासमोर नारळ फोडला. त्याला मारायला कसायाला कितीसा वेळ लागणार? एक घाव दोन तुकडे! पण नंतर बोकडाची कातडी मात्र आयाने स्वत: सोलली. घामाचा अगदी चिपचिपाट झाला. मग कोर्या कच्च्या मांसाचा आणि काळ्या-लाल रक्ताचा नैवेद्य मसणाईला दाखवत आयाने दोन्ही हात आकाशाकडे वळवले, आणि ती ओरडली,
“बळी घे बळी, बये, बळी घे बळी. माझ्या माधवला बरा कर गं!”
त्याच रक्ताचा टिळा तीने आधी माधवला आणि मग सगळ्या गोळा झालेल्या लोकांना लावला. भाताचा रांधा उपसण्यात, मटण शिजवण्यात आणि गावजेवण घालण्यात तिचा अख्खा दिवस गेला. विचकणारी थोबाडं हाडाच्या नळ्या चोखत, चोखत, ढेकरा देत संध्याकाळी आपापल्या घरी गेली.
त्या रात्री तिच्या स्वप्नात साधूराजा आला. तो घोगर्या आवाजात म्हणत होता,
“बळी दे बळी…”
त्याला अजून काहीतरी सांगायचं होतं. पण तो लुळा पडला होता. तोंडातल्या तोंडात त्याचा आवाज घोळत होता. त्या रात्री आयाचा अपशकुनाचा डावा डोळा कबुतरासारखा फडफडत राहिला.
बोकडाच्या बळीचा काहीही फायदा झाला नाही. जखम तशीच होती. तोच कुजलेला वास, तोच पू, त्याच मलमाच्या पट्ट्या, त्याच वेदना …सगळं कसं अगदी अटळ ध्रुवतार्यासारखं! पण आया खमकी होती. मोठ्या जोमाने तीने माधवला वाढवला. जगापासून सांभाळला. हेटाळणी, शिव्याशाप, जखमेच्या वासाएवढीच कुजकट बोलणी ह्या सगळयांपासून आपल्या पदराखाली झाकला. माधव गुरासारखा वाढला. तो वीशीच्या पुढे गेला.
पण आज शेवटी ह्या जखमेसमोर, माधवसमोर, ह्या कठोर जगासमॉर आया हरली. हालअपेष्टांमधे कसेतरी दिवस ढकलून शेवटी थकली. भकाभका रक्त ओकून तिने मान टाकली. तिचा दुधासारखा शुभ्र आत्मा तिच्या जराजर्जर छातीच्या सापळ्यातून बाहेर पडला.
माधव धाय मोकलून ढसाढसा रडला. आयाचा हात आपल्या हातात घेऊन हुंदके देत तो म्हणाला,
“आया, होईल बरा तुझा माधव. मुक्त होईन मी घाणीतून. घेईन आकाशात झेप आणि होऊन दाखवीन कोणीतरी तुला.”
आयाने डोळे मिटले. पांढर्या साधूराजाकडे ती निघाली होती.
घोगर्या आवाजात परत साधूराजा सांगायला लागला,
“बळी दे बळी…”
साधूराजाचा फुटका डावा डोळा परत एकदा काही सांगायच्या आधीच थिजला. आता बोकडानंतर आयाचा बळी घेऊनही माधवची कुजलेली घाण जखम तशीच मागे राहीली… अटळ ध्रुवासारखी.
आयाची आठवण काढून माधवने हंबरडा फोडला. मुंबईच्या कुंटणखान्यात तीचं सगळं आयुष्य चिखलातल्या कमळासारखं गेलं होतं. अशाच वाटेवरच्या पुरुषाकडून तीला मूल झालं आणि ह्या चिखलात तीने माधवाच्या नावाने श्रीकृष्णाची पूजा बांधली. आया माधवला नेहमी सांगायची, “माधवा, देह काय, आज आहे, उद्या नाही. पण मन कमळासारखं स्वच्छ पाहिजे. मग ह्या गटारगंगेतसुध्दा श्रीकृष्णाचं मंदीर बांधू शकशील तू!” पण आज मंदीर बांधायचं अर्धवटच राहिलं होतं आणि श्रीकृष्णाला पाठ दाखवून आया निघून गेली होती.
पण माधव आयाला दिलेलं वचन विसरू शकत नव्हता. जखम बरी व्हायलाच हवी होती. सावलीसारखा अंगाला चिकटलेला घाण वास जायलाच हवा होता. बर्याच दिवसांनंतर शेवटी माधवाला एक उपाय सापडला. कुणीतरी त्याला लाल विवरासंबंधी सांगितलं.
माधव निघाला. गल्लीतल्या लुत भरलेल्या लंगड्या कुत्र्यासारखा खुरडत खुरडत माधव निघाला. हा सगळा चंद्राळलेला ज्वालामुखीचा डोंगर ओलांडून लाल विवरापाशी त्याला जायचं होतं. त्या लाल विवराच्या तळाशी एक गंधकाच्या पाण्याचा तलाव असतो. त्यात डुबकी मारली की माधवची जखम म्हणे बरी होणार होती. तशी खुरडत खुरडत चालायची त्याला लहानपणापासूनच सवय होती. पण तरीही ह्या डोंगरावर उजवा पाय पटपट खेचायची त्याची धडपड जरा विचित्रच दिसत होती. चपलेने मारूनही न मेलेल्या झुरळाच्या हालचालीतल्या अगतिकेसारखी.
माधव तसा झुरळासारखाच फाटका मनुष्य. जेमतेम अंगकाठी. बेडकासारखे खोबणीच्या बाहेर आलेले डोळे. त्यातून ओसंडून वाहणारी लाचार वेदना. ऐन विशीतही केस मागे सरल्याने कारण नसताना मोठं दिसणारं चपटं कपाळ. त्यावरच्या आडव्या उभ्या आठ्या. खपाटीला गेलेले गाल आणि दाढीचे खुंट. चेहर्याच्या बऱोबर मधे अगदी फतकल मारून बसलेलं चपटं नाक. डाव्या नाकपुडीतून वरच्या फाटलेल्या ओठांपर्यंत गेलेली जुनी दगडावर आपटल्याची खूण. लांबून ती ओघळणार्या शेमडासारखी दिसे. त्या जाड्याभरड्या ओठातून बाहेर आलेले पांढरे स्वच्छ दात. सुंदर, सोज्वळ आयाच्या पोटी जन्म घेऊनसुध्दा ह्या विद्रूप चेहर्याचा अपशकून आपल्याच नशीबी का? नसलेल्या बेनामी बापाचं हे लेणं मलाच का? आरश्यासमोर रोज माधव ह्याचाच विचार करत असे.
पण लोकांच्या लक्षात येई तो घाण वासाचा भपकारा. माधव दहा फूटांवरून जरी गेला तरी त्याच्या आगमनाची दवंडी पिटवत हा कुजकट वास धावत पुढे येत असे. घराबाहेर पडताना अत्तर आणि फवारे मारायचा माधव किती प्रयत्न करायचा?पण त्याच्या ह्या केविलवाण्या धडपडीने त्याच्या अंगाचा वास आणखीनच विचित्र व्हायचा. चिरडून मेलेली पाल अचानक पूजेनंतर देव्हार्याच्या मागे सापडावी आणि तीचा कुजका भपकारा सुवासिक फुलांच्या आणि उदबत्तीच्या वासात मिसळून जावा तसं काहीसं होत असे.
आज मात्र माधवने अत्तर वगैरे काहीही फासलेलं नव्हतं. येथे कोण येणार होतं त्याला भेटायला? सकाळी सहा वाजताच लख्खं फटफटलं होतं. नीरभ्र आकाश त्याच्या आयाच्या शुभ्र पदरासारखं दिसत होतं. एवढा भलामोठा, अस्ताव्यस्त पसरलेला डोंगर! पण त्याच्यावर झाडं तर सोडाच, पण साधं गवताचं एक पातं सुध्दा नव्हतं. रखरखीत भुरकट माती. त्यातच सगळीकडे काळ्या मातीच्या ढेकळासारखे पसरलेले दगड. एखाद्या काळ्याकभिन्न आडदांड म्हातार्याच्या चेहर्यावरच्या देवीच्या व्रणांसारखे. मधेच काळ्या खडकाच्या लाटांवर लाटा. १०-१५ वर्षांपूर्वीच होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या खूणा सगळीकडेच दिसत होत्या. त्यातूनच एखादा नितळ पाण्याचा झरा! त्या देवीच्या व्रणाच्या चेहर्यामधून वाहणार्या घामाच्या धारेसारखा!
चढ जबरदस्त होता. छातीचा भाता नागासारखा फुत्कारत होता. त्यातून उजव्या पायावर जोर न देता चढायचं म्हणजे डाव्या पायात मणामणाचे गोळे येणं साहजिकच होतं. जखमेतलं रक्त, पू आणि घाम एकत्र होऊन त्याची ओली चिकट धार आता टाचेच्या खाली झिरपली होती. त्या द्रवाला बूट चिकटत होता, आणि त्याचा पचाक पचाक आवाज येत होता. पण माधवला ह्या कशाचीच फिकीर नव्हती. गंधकाच्या पाण्यातल्या आंघोळीने त्याला काशीच्या गंगेत न्हायल्याचा मोक्ष मिळणार होता. नरकातून सुटका होणार होती.
शेवटी माधव लाल विवरापाशी पोहोचला. सगळीकडे लालभडक मातीचे चित्रविचित्र आकार आणि त्याच्या तळाशी लाल भडक गंधकाचं पाणी. अक्षरशः पृथ्वीवर अशी काही जागा असेल ह्यावर आधी माधवचा विश्वासच बसला नसता. लाल मंगळावरचा एखादा जमिनीचा तुकडा कापून आणून पृथ्वीवर चिटकवला आहे की काय असं वाटत होतं. ते लाल तळं बघून माधवचा आनंद गगनात मावेना. एवढ्या आनंदाची त्याला सवय नव्हती. गदगदून हुंदके देत ठेचकाळत ठेचकाळत तो विवरात उतरायला लागला. त्याच्या डोळ्यातून एवढे भळाभळा अश्रू वाहात होते की आधीच खोबणीबाहेर आ॑लेले त्याचे डोळे त्याच्याच अश्रूत वाहात वाहात जमिनीवर पडताहेत की काय असं वाटावं.
सगळीकडे गरम पाण्याच्या वाफेचं धुकं दाटलेलं होतं. त्यात तळ्याचा किनारा पुसटच दिसत होता. गंधकाचा घाणेरडा वास एवढा उग्र होता की त्यात जखमेचा वास येईनासा झाला. माधव पाण्यात पुढे सरकला. पाण्याच्या छान उबदार स्पर्शाने त्याला आयाच्या उबदार कुशीची आठवण झाली. आवेगाने तो अजून पुढे सरकला. नाक डोळे बंद करून त्याने पाण्यात डुबकी मारली. आपल्या आयुष्याचं सार्थक होणार असं त्याल वाटलं. आया मरतानाचे त्याचे स्वतःचे शब्द त्याला आठवले, “मुक्त होईन घाणीतून. घेईन आकाशात झेप आणि होऊन दाखवीन कोणीतरी तुला”. त्या घाण वासापासून, जखमेपासून आपली सुटका होणार ह्याची त्याला खात्री पटली. तो आवेगाने गल्लीतल्या कुत्र्यासारखा हेल काढून मोठ्याने रडायला लागला.
आणि.. आणि अचानक त्याला जाणवलं की आपले पाय चिखलात रुतले आहेत. त्याने मोठ्याने किंकाळी फोडली आणि जीवाच्या आकांताने पाय बाहेर खेचायला सुरुवात केली. पण त्याच्या ह्या केविलवाण्या प्रयत्नाने तो अजूनच जमिनीत रुतत गेला. तो जोरात ओरडला, “धावा, धावा, मला वाचवा. आया, आया, मला वाचव गं!” पण ह्या लाल विवरात साधं वारं सुध्दा हालायला तयार नव्हतं. तो आता कमरेपर्यंत ह्या चिखलात रुतला होता. कसाबसा त्याने आपला चेहरा पाण्यावर ठेवायचा प्रयत्न चालू ठेवला. पण शेवटी साधूराजाच्या घाबरलेल्या डाव्या फुटक्या डोळ्यासारखे झालेले माधवचे डोळे तळ्यात अद्रुश्य झाले. एकच बुडबुडा आला आणि परत पाणी निश्चःल शांत झाले.
लांब पांढर्या बर्फाळ डोंगरातून साधूराजाचा शांत आवाज येत होता,
“बळी घे बळी.. नरबळी!”
साधूराजाला अजून पुढे काहीच सांगायचं नव्हतं!
नितीन अंतुरकर, फेब्रूवारी, २००९