आम्ही दहा वर्षांपुर्वी चतु:शॄंगीच्या डोंगरापाशी राहायचो. तेंव्हाचा हा घडलेला खराखुरा प्रसंग! आरती तेंव्हा चार आणि तेजस सहा वर्षांचे होते. त्यांची आईपण कुठेतरी बाहेर गेली होती. अशाच एका श्रावणातल्या संध्याकाळी मी मुलांना विचारलं, “काय, डोंगरावर फिरायला जायचं का?” एका सुरात दोघांचही उत्तर आलं, “हो.”
संध्याकाळच्या ह्या उन्हातसुद्धा सडकून पाऊस पडणार असं वाटत होतं. फक्त बालकवींच्याच जमान्यात नाही तर हल्लीच्या प्रदुषणाच्या काळातसुद्धा “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे” मधली हिरवळ वेड्यासारखी कुठेही उगवलेली होती. त्यातुन ही होती श्रावणातली संध्याकाळ! रात्रीच्या अंधाराला बिलगू की नको, जवळ जाऊ की नको ह्या संभ्रमातली! हा तीचा ओढूनताणून आणलेला खट्याळपणा की मुळचाच लाजरेपणा होता कुणास ठाऊक? काही का असेना, तो श्रावणी संध्याकाळचा खट्याळपणा माझ्या ह्या मुलांमधेही उतरलेला होता.
पावसात फिरायला जाताना काहीही झालं तरी छत्री न्यायची नाही हे मीच त्यांना शिकवलेलं होतं. धो धो पावसात नाकावरुन ओघळणारं पाणी जीभेवर झेलायची त्यांना प्रॅक्टीस होती. लोहगडावरती अगदी हाडापर्यंत मुरणार्या पावसात वार्याकडे तोंड करुन उभं राहण्यातली गम्मत त्यांना माहित होती. पहिल्या पावसानंतरच्या चिखलात लोळण्यात आईच्या मांडीवर लोळण्यातली मजा त्यांनी अनुभवलेली होती.
हे झाले थोडेसे जगावेगळे अनुभव! पण नाहीतर इतर आई-वडिलांप्रमाणेच मुलांच्या छोट्याशा मेंदूत नको त्या गोष्टी अगदी ठासून भरण्याचा छंद मलासुद्धा होताच. झिंबाब्वेची राजधानी, टर्कीची एअरलाईन्स, जगातली सर्वात लांब नदी, भारताच्या वनमंत्र्यांचं नाव अशा खरोखरच अर्थशून्य गोष्टी तेजस आणि आरतीच्या डोक्यात भरवण्याचा चाळा मी नियमीतपणे करायचो. त्यातुन मी सायन्स् शिकलेलो. इंद्रधनुष्य का दिसतं, फुलांना रंग का असतात, वरती फेकलेला चेंडू खालीच का परत येतो याची अगदी सविस्तर कारणं त्यांना माहित होती. पढवलेल्या ह्या गोष्टी मुलांकडून, विशेषतः आमच्या मित्रमंडळीत, घोटून घेण्यात आमची छाती अगदी गर्वाने फुगत असे. आपल्या “गणपती बाप्पा” ह्या आरोळीला मिरवणुकीत सगळ्यांनी “मोरया” असा प्रतिसाद दिला की आपण कसे चेकाळतो? तसं ही मुलं माझ्या प्रश्नांना पढवल्यासारखे उत्तर द्यायला लागले की मी अजूनच चेकाळायचो. फिरताना अशा सगळ्या गोष्टींची मुलांकडुन उजळणी करून घेणे ही माझी पहिल्यापासुनची खोड.
डोंगर चढायला लागलो. हिरव्या पिवळ्या रानफुलांचा सगळीकडे गालीचा पसरलेला होता. बालकवींच्या फुलराणीचं लग्न खरं तर सकाळीच त्या कोवळ्या सूर्यकिरणाशी लागलेलं होतं. पण त्या लग्नाच्या रीसेप्शनला आम्ही तिघे वर्हाडी संध्याकाळी पोहोचलो होतो. प्रत्यक्ष वधुवर आम्हा अतिथींचं स्वागत करायला अगदी डोलत डोलत पुढे येत होते. मधूनच येणारी वार्याची झुळुक, चंदेरी झालर घेऊन नटलेले काळे-पांढरे ढग, चिवचिवणारे पक्षी, हिरवंगार गवत अशी सगळी घरचीच मंडळी आमचं हवं नको ते बघत होती. अशा माझ्या मनाच्या तरल अवस्थेत सुद्धा बापाच्या कर्तव्याचं भूत काही माझ्या मानेवरून उतरेना. मी पचकलो,
मी: “आरत्या, फुलांना छान छान रंग का असतात?”
मी सायन्समधेच पूर्ण बुडालेला. मी विचार केला, बघु या मी शिकवलेलं उत्तर मुलं बरोबर देतात की नाही. मागच्याच आठवड्यात त्यांना शिकवलं होतं की फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी फुलांना छान छान रंग असतात. मग फुलपाखरांच्या पायाला परागकण चिकटतात. फुलपाखरं उडत जाऊन दुसर्या फुलांवर बसली की परागकणही दुसर्या फुलात जातात. मग त्यापासून फळं तयार होतात.
आरतीच्या डोक्यात काहीतरी वेगळच होतं. ती म्हणाली,
आरती: “फुलांना नेहमीच हॅपी वाटतं म्हणुन त्यांना छान छान रंग असतात.”
माझ्या तिन्ही दांड्या गुल! खरं तर लहान मुलं ही स्पंजासारखी असतात. त्यांना काहीही शिकवलं तरी त्यांना ते व्यवस्थित कळतं आणि मुलं आपल्याला ते परत सांगतात सुद्धा. आरतीच्या उत्तरावरून ही चार वर्षांची चिटुकली माझ्या फिरक्या घेते आहे की काय असं मला वाटायला लागलं.
मी: “आरत्या, मागच्याच आठवड्यात मी तुला सांगितलं होतं ना की फुलपाखरांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी फुलं रंगीबेरंगी असतात म्हणुन.”
तेजसः “पण मग फुलपाखरांना छान छान रंग का असतात?”
वय वर्ष सहा ने वय वर्ष चाळीसच्या टाळूला लोणी फासायचं काम मात्र छान केलं होतं. हे माझ्या लक्षातच आलं नाही की फुलपाखरं रंगीबेरंगी का असतात ते. बापाने लगेच ह्या सहा वर्षाच्या मुलासमोर शेपूट घातली.
मी: “मी नव्हता ह्याचा विचार केला. पण फुलांना हॅपी वाटतं हे कशावरून?”
आरती: “कारण मी रंगीत कपडे घातले की मला हॅपी वाटतं म्हणून.”
तेजसः “फुलांना हॅपी वाटत म्हणून ते छान छान डोलतात. फुलपाखरांना हॅपी वाटतं म्हणून ते छान छान उडतात.”
मी: “तुम्ही काय करता रंगीत कपडे घातले की?”
आरती: “आम्ही गाणी म्हणतो आणि खूप हसतो.”
सगळ्या वनस्पतीशास्त्रज्ञांना पेचात टाकणार्या ह्या संवादांवरून मला अचानक मार्क ट्वेनचे शब्द आठवले. “I was smart. But then I went to school.” ह्याचा सोपा मराठी अर्थ असा, “मी आधी खूप हुशार होतो. पण झक मारली आणि शाळेत गेलो. त्यात माझं वाटोळं झालं.”
श्रावणातल्या संध्याकाळचा खट्याळपणा ह्या मुलांच्या डोळ्यातून ओसंडून वाहात होता. आपल्या बापाची आपल्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे हे त्यांना पक्कं माहीत होतं, आणि मी शिकवलेलं उत्तर त्यांना नक्कीच माहीत आहे हे मला माहीत होतं. पण मी बाप असल्याने इरेला पेटलो.
मी: “अजून काही कारणं असतील का फुलांना छान छान रंग असण्याची?”
तेजसः “गवताचा हिरवा रंग खूप बोअरींग असतो.”
आरती: “फुलांची दुपारची झोप फार छान झाली आहे.”
आरती: ” बाप्पाला त्याच्या आईने चॉकोलेट खायला दिल्यावर त्याने फुलं बनवली.”
एवढया अफलातून कल्पना मी चार अधिक सहा अशी दहा वर्ष डोकं खाजवलं असतं तरी मला सुचल्या नसत्या. प्रत्यक्ष बालकवी त्यांच्यात शिरले आहेत की काय?
मी: “अरे, तुमच्याकडे तर एकाहून एक कहर आयडिया आहेत. अजून काही? “
तेजसः “हा पृथ्वीच्या अंगावर आलेला काटा आहे. “
मी: “म्हणजे काय? “
तेजसः “छान थंड हवेत माझ्या अंगावर येतो तसा.”
आरती: “पृथ्वीने गजरा घातलायं, मला आजोबा देतात तसा.”
आरती: “पावसाळ्यात गवत होळी खेळताहेत.”
ह्या कल्पनांच्या फटाक्यांच्या माळा अक्षरशः पुढची १५-२० मिनिटं फुटतच राहिल्या. आम्ही चतु:शॄंगीचं देऊळ बाजूला ठेऊन डोंगर चढत राहिलो. देवळात गेलोच नाही. प्रत्यक्ष गणपती एका बाजूला आणि चतु:शृंगी दुसर्या बाजूला माझी बोटं धरुन डोंगर चढत असताना मी देवळात दर्शन कोणाचं घेऊ?
नितीन अंतुरकर (१४ नोव्हेंबर, २००८)
फारच गोड गोष्ट! !! खूप साधी पण तितकीच अंतर्मुख करणारी.. .. खूप छान लिहिलीय..उत्तम शब्दांकन.. दुसर्या परिच्छेदात, वर्तमान काळाला सोडून वाचकाला बोट धरून लेखकाने छान कुठेतरी चक्कर मारून आणलेली आहे. पण दोघेही जण पुन्हा कथासुत्रत रमतात.. हे लेखकाचे कौशल्य आवडले.
लहान मुलांची भरारत चाललेली कल्पनाशक्ती थांबवून बाबा त्यांना वास्तवाची जाणीव करण्याचा एक दुबळा प्रयत्न करतो. पण मुलांचे विमान उंच उडत असते.
शेवटी बाबा च आपला नाद सोडून देतात. आणि मग मुलांची खरंच कल्पनेतील फटाक्यांची माळ ऐकताना फारच मजा येते
फारच छान गोंडस आणि लहान मुलांच्या निरागस स्वप्नील विश्वाचे दर्शन देणारी कथा आहे.
“Sky is pink 🩷” या bolywood movie ची आठवण येते.
खूपच छान… !!!!!! ⭐⭐⭐⭐⭐