माझ्या खादाडीचा प्रवास अर्थातच माझ्या आईच्या आणि आजीच्या कुशीत सुरु झाला. कोंड्याचा मांडा करून साध्या साध्या खाण्याच्या गोष्टी अफलातून बनवण्यात त्या पटाईत होत्या. रोजची आमटी सुध्दा वेगळ्या वेगळ्या चवीची असायची! मी ती चक्क अगदी घटाघटा प्यायचो. लिंबाचं सरबत, कोबीची भाजी, फोडणीचा भात आणि गोडाचा शिरा ह्या चार गोष्टींवर मी अख्ख आयुष्य काढायला तयार असायचो आणि अजूनही आहे. (ह्यात प्रोटीन नाही वगैरे फालतू, पादरफुसके विचार मनात सुदधा आणू नका.) आमची आजी एकदम खवय्यी. तिला रोजच्या जेवणात डावं – उजवं सगळं साग्रसंगीत लागायचं. लोणची, मुरगुंडं, पोह्याचे पापड हे सगळं ती स्वतः करायची. एव्हढं करून बाहेरून इडलीवाला गेला तर तिला आणि तिच्या नातवंडांना इडल्या खायला घातल्याशिवाय त्याला ती पुढे जाऊ द्यायची नाही. थोडक्यात आमची चंगळ होती. आणि पास्ता, आईस्क्रीम, मॅगी नूडल्स असली थेरं अजून आमच्या आयुष्यात अवतरली नव्हती.
पण मग पायाला भिंगरी लागली. एके दिवशी मी नववीत असताना नुकतंच मिसरूड फुटलेला अकरावीतला राजू मला म्हणाला, “नितीन, आपण नुसतेच महाराज, महाराज जप करत बसतो. पण आपण रायगड बघायला पाहिजे.” मी म्हणालो, “अरे, पण एसटीचे पैसे कुठून आणायचे?”. राजूने मार्ग काढला. “त्यात काय, चालत जाऊ या.” आई – बाबा चक्क “हो” म्हणाले (त्याकाळी प्रत्येक मिनिटाला मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची पद्धत नसावी) आणि आम्ही पाच जण प्रवासाला निघालो. सर्वात मोठा अकरावीतला राजू आणि सर्वात धाकटा सहावीतला नऱ्या! दररोज रात्री समोर दिसेल त्या घराचं दार ठोठवायचं आणि दिसेल त्या माणसाला “पथारी पसरायला जागा द्या” अशी विनवणी करायची. ह्या प्रवासात कल्पनेपलीकडले विलक्षण सुंदर अनुभव मिळाले. अनोळखी, प्रेमळ जगाने “अगदी देव घरी आला” अशा थाटात आमचं स्वागत केलं. शेवटी आठ दिवस चालत आम्ही रायगडाला पोहोचलो. ही संपूर्ण अचाट कथा परत कधी तरी. पण त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा रस्त्याच्या कडेला स्वतः शिजवलेल्या गोष्टी खायचा प्रयत्न करायला लागला. नुसताच टोमॅटो घातलेला भात (दुसरं तोंडी लावणं काहीही नाही), शेकोटीवर भाजलेला कांदा आणि गूळ थोड्याशा आंबूस झालेल्या पावात घालून बनवलेलं सँडविच, खूप कच्ची नाही तर खूप पिकलेली फळं असं समोर दिसेल ते खाल्लं. आणि अचानक पारंपरिक जेवणाच्या पलीकडल्या नवीन, अदभूत खादाडीच्या जगाचा शोध लागला.
त्यानंतर दहावीत असताना वाडा तालुक्याच्या अगदी दुर्गम ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेचा सर्व्हे करायला गेलो. दुष्काळातली पराकोटीची गरिबी बघितली. आदिवासी कुटुंबं झाडाची पानं खाऊन जगताना बघितली आणि मग जेवणासाठी समोर जे येईल ते गोड मानून त्यातच सुंदर चव जाणवायला लागली. कॉलेजात असताना अरुण बरोबर ९० दिवस उत्तर भारतात हिंडलो. पैसे नव्हतेच. रेल्वे प्लॅटफॉर्म वर झोपायचं, तिथेच कुठेतरी अंघोळ करायची, शहरात पायी हिंडायचं आणि रस्त्यावरचं खाणं खायचं (त्याला हल्ली स्ट्रीटफूड असं फॅन्सी नाव आहे). एखाद्या देवळात, अजमेरच्या शरीफ दर्ग्याच्या बाहेर, अमृतसरला सुवर्णमंदिरात कुठेही फुकट जेवायला मिळालं तर तसं जेवायचं. प्रत्येक गावाची, शहराची संस्कृती, भाषा, वागणूक, पेहेराव, इतिहास हे सगळं त्या गावच्या सामान्य माणसाच्या रोजच्या आहाराशी जोडलेलं आहे असं जाणवत राहिलं. आणि मग प्रवासात प्रेक्षणीय स्थळं बघण्यापेक्षा “जेवायला इथे काय खास आहे?” हे शोधण्याला प्राधान्य प्राप्त झालं.
मग सह्याद्रीतलं ट्रेकिंग सुरु झालं. एके दिवशी मजा झाली. आकाशातून पावसाचा अक्षरशः धबधबा कोसळत होता. आम्ही डोंगरात ढगांच्यामध्ये. पाच फुटावरचं सुध्दा दिसेना. बरोबर तांदूळ होता. पण बाकी काही नाही. गाव कुठे दिसेल त्याचा नेम नाही. “रात्री झोपण्यासाठी तरी छत दे रे बाबा” अशी देवाची प्राथर्ना करत आम्ही गरागरा हिंडत होतो. त्या तशा धुक्यात आम्हाला एक धनगर आणि त्याचा कळप दिसला. भन्नाट बाळ्याच्या सुपीक डोक्यात एक आयडिया आली. (हा तोच वसंत वसंत लिमये – मराठीतला सध्याचा प्रथितयश लेखक.) त्याने त्या धनगराकडून एक चक्क बकरी विकत घेतली. आणि त्या रात्री आम्ही मटण-भातावर ताव मारला. “जिवंत बकरी ते मटण” ह्या सहा तासाच्या प्रवासाची सुरस कथा मी इथे सविस्तर सांगत नाही. पण ह्या सहा तासात अनुभवात माझं एका आहार-योग्यात रूपांतर झालं. मटण कोणत्या प्राण्याचं आहे, ते कसं बनलं असेल, त्या प्राण्याला कसं वाटलं असेल हा सगळा भूतकाळ. तो काळाबरोबर इतिहासात जमा झालेला. ह्या मटणामुळे माझ्या पोटाचं काय होईल, उद्याच्या सकाळी माझे नैसर्गिक अनुभव कसे असतील, माझं वजन किती वाढेल किंवा कमी होईल हा सगळा भविष्यकाळ. तो अजून यायचा होता. खरा होता फक्त वर्तमानकाळ. आत्ता इथे, मटण जिभेवर ठेवलेला जो क्षण आहे तोच फक्त महत्वाचा. ती चव काय आहे, मटण शिजलं आहे का हेच फक्त काय ते खरं !! हे योगिक तत्वज्ञान खादाडीला लागू पडायला लागलं.
मी आहार-योगी झाल्यामुळे झालेले शारीरिक आणि मानसिक फायदे किती आणि काय सांगू!! १०-१२ वर्षांपूर्वी आम्ही चौघे आणि माईक-बेट्सी व त्यांची तीन मुलं (काही नाती रक्ताची असतात. काही पृथ्वीवर जमतात. माईक-बेट्सी हे आमचे पृथ्वीवरचे अमेरिकन नातेवाईक.) लडाख मध्ये हिंडत होतो. गाईड म्हणाला, “जवळच्या बौद्ध मठात त्या गावाची जत्रा आहे आज. जायचं का?” प्रवासातल्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा लक्षात काय राहत असेल तर तिथली माणसं, तिथला बाजार, त्यांच्या परंपरा! त्यामुळे आम्ही सगळे जण एका पायावर तयार झालो. पण मठ होता डोंगरावर. तिथली लोकं टणाटण उडया मारत वर चालले होते. आम्हीच सावकाश धापा टाकत चढत होतो. बाजूने एक ७०-७५ वर्षाची बाई आमच्या मागून आली. छान लडाखी पारंपरिक ड्रेस, कानात मोठया हिरव्या खड्याचे डूल. गळ्यात सुंदर पारंपरिक लडाखी दागिने. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरसुध्दा अगदी उन्हाळी हसू अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. हिंदीत तोडक्या मोडक्या गप्पा मारता मारता ती म्हणाली, “शामको चाय पिनेको हमारे घर आओ”. तिने पत्ता दिला आणि तरातरा गेली की पुढे! संध्याकाळी आम्ही नऊजण तिच्या घरी पोहोचलो. त्या अगदी छोट्या गावातलं तिचं टुमदार दोन मजली घर तिच्या श्रीमंतीची जाणीव करून देत होतं. मग तिने छोट्याशा नाजूक कपात प्रत्येकासाठी चहा आणला…. त्याच्या पहिल्या घोटातच सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. कारण तो होता “याक बटर टी”. थोडक्यात सांगायचं तर याकच्या दुधाचं लोणी बनवायचं आणि त्याचं शुद्ध तूप कढवायचं. त्यात थोडं मीठ आणि चहा घालायचा आणि पाहुण्यांना अगदी आग्रहाने प्यायला द्यायचा. मला हा प्रकार जबरदस्त आवडला आणि यजमानांचा अनादर न करता सगळ्या नऊ कपांमधलं ते शुद्ध तूप पिण्याचं काम आहार-योग्याकडे आलं.
असं म्हणतात की माणसाच्या हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटातून जातो. हे काही फक्त नवरा-बायकोच्या नात्यातलं गुपित नाही आहे. व्यावसायिक संबंधांमध्ये सुध्द्धा ते लागू पडतं. उत्तर मेक्सिकोत आम्ही आमच्या एका सप्लायरकडे गेलो होतो. परिस्थिती विचित्र होती. आम्हाला ह्याच सप्लायरकडून पार्टस हवे होते. दर्जा चांगला होता. वेळच्या वेळी माल तो व्यवस्थित पुरवायचा. फक्त आम्हाला किंमत थोडी कमी करून हवी होती. पण दिवसभर वाटाघाटी करून सुध्द्धा काही तो बधेना. शेवटी सगळेजण दमून भागून संध्याकाळी एकत्र जेवायला गेलो. उत्तर मेक्सिकोतलं ते एक ऐतिहासिक सुंदर शहर. नाव होतं ग्वानाहातो (Guanajuato). आम्हाला एका महागड्या रेस्टॉरंट मध्ये नेण्यात आलं. एका सुंदर जुन्या वाड्यातल्या मधल्या आवारात (Hacienda) हे रेस्टॉरंट थाटलेलं होतं. गप्पा मारता मारता गाडी खाण्याच्या पदार्थांवर आली. मी नेहेमीच्या खाक्यात विचारलं की इथले खास पदार्थ कुठले? अतिशय अपराधी चेहेरे करून “आम्ही नाकतोडे खातो” असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सबंध टेबलावर एकदम शांतता पसरली. मी म्हणालो, “त्यात वाईट काय आहे?” तेंव्हा ते म्हणाले, जगातल्या इतर लोकांना ते विचित्र वाटतं. खरं होतं. बाकी सगळी अमेरिकन मंडळी “आपण जरा दुसऱ्या विषयावर बोलू या का?” अशा थाटात माझ्याकडे बघत होते. पण मी इरेला पेटलो होतो. मग खास माझ्याकरता नाकतोडे आणण्यात आले (Chapulines). मला वाटतं ते फ्राय करून त्यांची बारीक पावडर बनवलेली होती. कारळ्याच्या चटणीसारखी दिसत होती. मी अगदी आवडीने खाल्ली. चव मस्त होती. बरोबरच्या अमेरिकन मंडळींनी पण मग ही चटणी ट्राय केली. आमचे सप्लायर मग फारच खुश झाले. ते चेकाळले. ते म्हणाले, आम्ही मोठ्या मुंग्यांची अंडी पण खातो. मग ते Escamoles पण आमच्यासाठी मागवण्यात आले. आम्हाला Caviar (म्हणजे फ्रेंच माशांची अंडी) खूपच आवडतात असं अगदी नाक वर करून म्हणायचं आणि मेक्सिकन मुंग्यांच्या अंड्यांना नाकं मुरडायची हे बरोबर नाही. तेंव्हा मेक्सिकन मुंग्यांना न्यूनगंड येऊ नये म्हणून आम्ही Escamoles खाल्ले. मजा आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली आणि २-३ दिवसांनी आम्हाला कमी किंमतीत पार्टस पुरवायला मेक्सिकन मंडळी राजी झाली. पुढे जाऊन मी हि डिप्लोमसी जर्मनीत मगर खाऊन आणि जपानमध्ये साशिमी खाऊन लागू पडते आहे का तेही बघितलं.
नुकतेच आम्ही FIFA वर्ल्ड कप बघायला दक्षिण रशियाला समारा शहरात गेलो होतो. माझा मेव्हणा अमोल सध्या तिथे भारतातून काही काळाकरता एका जर्मन कंपनीत नियुक्त आहे. समाराहून उझबेकिस्तान, जॉर्जिया, अझरबैजान असले देश त्यामानाने फारच जवळ. लाल बहादूर शास्त्रींचा ताश्कद करार उझबेकिस्तानातला. ह्या कुठल्यातरी देशातले पंतप्रधान “मैं आवारा हूँ” हे राज कपूरचं गाणं गाताना WhatsApp वर बघितलेले. ह्या देशात रानटी घोडे खूप असतात आणि घोडे हे इथलं एक मिष्टान्न असतं असं ऐकलेलं होतं. त्यामुळे शाकाहारी अमोल-अंजली-प्रज्ञा ह्यांनी आम्हाला उझबेकिस्तानच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला न्यायचं ठरवलं तेंव्हा माझ्यातल्या “मांसाहारी नितीनने” टुणकन उडी मारली. अर्थातच तिथे घोड्याचा पदार्थ मेनूमध्ये होताच. अर्थातच मी तो मागवला आणि मजेत खाल्ला. अर्थातच “नितीन कुठ्ठे कुठ्ठे नेण्याच्या लायकीचा राहिला नाही” असा अंजलीने परिचित डायलॉग मारला. योगी मंडळी निंदास्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले असतात. पण ह्यावेळी आणखी एक चांगली गोष्ट झाली. योग्यांना त्यांचं तत्वज्ञान पसरवण्याकरता शिष्य हवेच असतात. आमच्यातल्या २०-२५ वर्षाच्या चार-पाच मंडळींना ह्यावेळी दीक्षा देण्यात आली. त्यांनीही घोडा अतिशय आनंदाने खाल्ला.
गेले कित्येक वर्ष मी अंजलीच्या मागे लागलो आहे की “आपण व्हिएतनाम आणि कंबोडियाला जाऊ या. जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर बघू या.” तेजस आणि आरती जाऊन आले. त्यांनी सुध्दा तिला आग्रह केला. अंजलीचा एकच घोष, “शी, तिकडची माणसं काहीतरीच खातात.” आम्ही सगळे म्हणालो, “अगं, अगदी चांगलं शाकाहारी जेवण तुला तिथे मिळेल.” पण ती काही मानायला तयार नाही. हा लेख लिहिता लिहिता शेवटी माझी ट्यूब पेटली. तिला व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या लोकांबद्दल तक्रार नाही आहे. मी…. तिचा नवरा, तिथे “काहीतरीच” खाणार नाही ह्याचीच तिला खात्री नाही. त्यामुळे तीने नन्नाचा पाढा लावला आहे. तेंव्हा ह्या लेखाद्वारे मी घोषणा करू इच्छितो की “अंजली, मी व्हिएतनाम आणि कंबोडिया मध्ये अतिशय सज्जन माणसासारखा राहीन. सात्विक आहाराचं सेवन करेन.” तुम्हाला पण अंजली कुठे भेटली तर तिला माझ्या वचनाची आठवण करून द्या आणि माझ्याबरोबर ह्याठिकाणी जायचा आग्रह करा. माझी एवढी एकच नम्र विनंती.
नितीन अंतुरकर