नुकतीच २०१५ सालाची माझी “एक अश्रू” ही कविता “माझ्या दुःखाचा प्रवास” ह्या नवीन शीर्षकाने मी काहीजणांना पाठवली. ती वाचल्यावर काहीजणांनी मला विचारलं, “काय रे बाबा, काय झालं?” आणि काहीजणांना दुःखाचा प्रवास म्हणजे काय असा प्रश्न पडला. खरं तर कविता ही वाचकाच्या मालकीची असते. कवीच्या नाही. कविता वाचल्यावर वाचकाच्या मनात उमटलेले तरंग हे सर्वस्वी त्याचे स्वतःचेच असतात. तरीसुध्दा वरच्या प्रश्नांना थोडक्यात सूचक उत्तरे देण्यासाठी हा पंक्तिप्रपंच.
आजकालच्या नवीन, अतिशय वेगाने धावणाऱ्या जगातसुध्दा दुःख ही एक गोष्ट स्थिर असते. माझ्याबाबतीत ते दुःख अचानक मला बेसावधपणे गाठतं आणि क्षणभर खिळवून ठेवतं. अशा दुःखाच्या चार छटा मी कवितेत २०१५ साली मांडल्या. कधी तो दुःखाचा क्षण मला अगदी भिजवून टाकतो आणि निर्माल्यासारखा पटकन लांब आयुष्याच्या वाहत्या नदीत फेकून द्यावासा वाटतो. कधी वेगळाच अनोळखी वाटतो, कधी एकटाच वाटतो तर कधी फकीरासारखा अलिप्त वाटतो.
आज २०२२ साली ह्याच छटा एका प्रवासाच्या रूपात दिसतात. आयुष्याच्या ह्या वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यात यमुनेकाठी खेळणाऱ्या योगेश्वर कृष्णासारखी फकिरी अलिप्तता आली आहे का आता माझ्यात?
एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
चिंब ओला
भाद्रपदातल्या निर्माल्य प्राजक्तासारखा
एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
अनोळखी
क्षितिजावरच्या निळ्या ढगासारखा
एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
एकटाच
अमावास्येच्या निरंतर ध्रुवासारखा
एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
फकीर
यमुनाजळीच्या कृष्णासारखा
एक अथांग दुःख
आणि सोबतीला एक अश्रू !
नितीन अंतुरकर (जून २०, २०१५)